राष्ट्रपती कार्यालय
गुरूग्राम येथील एचआयपीए येथे 98च्या विशेष फाउंडेशन कोर्स मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली
Posted On:
24 NOV 2023 4:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2023
गुरूग्राम मध्ये एचआयपीए येथे 98व्या विशेष फाउंडेशन कोर्स मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांनी आज, 24 नोव्हेंबर 2023 रोजी राष्ट्रपती भवन येथे जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, आपल्या सनदी अधिकाऱ्यांनी देशाचा बहुआयामी विकास साधण्यात मोठी भूमिका निभावली आहे. देशाचे ऐक्य आणि एकात्मता अधिक मजबूत करण्यासाठी देखील तेच जबाबदार आहेत असे त्या पुढे म्हणाल्या. देशात आज घडून येत असलेले परिवर्तन आपल्या सनदी अधिकाऱ्यांच्या निर्धाराशिवाय शक्य झाले नसते असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रपती म्हणाल्या की, देशाच्या सर्वसमावेशक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे हे नागरी अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. भारताचे नागरिक देशाच्या विकास यात्रेतील सक्रीयपणे सहभागी होत आहेत असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. विविध कार्यक्रमांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लोकसहभागाला प्रोत्साहन देण्याची सूचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केली.
उत्तम प्रशासनाचा अर्थ, वेळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो असे त्यांनी सांगितले. राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर नागरिकांना वेगवान आणि कार्यक्षम सेवा वितरणाची सुनिश्चिती करण्याच्या गरजेवर अधिक भर दिला जावा म्हणून इलेक्ट्रॉनिक प्रशासन, स्मार्ट प्रशासन, परिणामकारक प्रशासन आणि इतर अनेक संज्ञा उदयाला आल्या आहेत.
समाज माध्यमांचा प्रभाव असलेल्या सध्याच्या काळात जनतेला त्यांच्या तक्रारी त्याक्षणी माध्यमांमध्ये मांडणे शक्य असताना, जनतेला सेवा देण्यासाठी अद्ययावत प्रशासकीय साधने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करण्याची गरज अनेक पटींनी वाढली आहे असे मत राष्ट्रपतींनी सर्वांसमोर व्यक्त केले. सामान्य जनतेच्या तक्रारी आणि समस्या यांना तात्काळ प्रतिसाद देणे हे नागरी अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे असे त्या म्हणाल्या. आपला देश आणि देशातील नागरिक यांना अल्प आणि दीर्घकाळ लाभदायक ठरतील अशा अभिनव उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना त्यांनी या तरुण अधिकाऱ्यांना केल्या.
राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा.
S.Bedekar/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979455)
Visitor Counter : 116