माहिती आणि प्रसारण मंत्रालय
क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टुमॉरो हा उपक्रम युवकांना माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी अतुलनीय संधी पुरवतो : केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर
54 व्या इफ्फीमध्ये ‘48 तासांचे फिल्म चॅलेंज’ उपक्रम सुरू
गोवा/मुंबई, 21 नोव्हेंबर 2023
केंद्र सरकार रोजगार निर्मितीसाठी, सृजनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, उत्कृष्ट कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि युवकांना चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी वचनबद्ध आहे असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी '75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो' उपक्रमाच्या विजेत्यांसाठी 48 तासांचे फिल्म मेकिंग चॅलेंजचे उदघाटन करताना सांगितले.
उत्कट व्यक्तींच्या सशक्त सर्जनशील समुदायाला प्रोत्साहन देण्यात ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ च्या भूमिकेचे कौतुक करून केंद्रीय मंत्र्यांनी कठोर निवड प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उपक्रमातील अव्वल 75 सहभागींचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले की, क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ हा देशाच्या कानाकोपऱ्यातील युवकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
"यावर्षीचे 75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो बिष्णुपूर (मणिपूर), जगतसिंगपूर (ओडिशा) आणि सरदारपूर (मध्य प्रदेश) यासह भारतातील तब्बल 19 विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत,. या उपक्रमाचा उद्देश त्यांना माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात अतुलनीय संधी पुरवणे हा आहे ” असे ते म्हणाले.
ठाकूर यांनी गेल्या वर्षी क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो मध्ये सहभागी झालेल्या तामिळनाडूतील एका मुलीची मार्मिक कथा सांगितली. "सुरुवातीला तिचे पालक तिला गोव्यात पाठवायला तयार नव्हते. .मात्र कठोर निवड प्रक्रिया आणि क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो मध्ये तिच्या प्रतीक्षेत असलेल्या अविश्वसनीय संधी समजून घेतल्यानंतर, तिच्या पालकांनी तिला तिची स्वप्ने साकार करण्यासाठी आनंदाने परवानगी दिली.
ती मुलगी आणि तिच्या टीमने गेल्यावर्षी 53 तासांचे चॅलेंज जिंकून 2,25,000 रुपयांचे रोख बक्षीस मिळवले. डिअर डायरी या विजेत्या चित्रपटाने भविष्यात महिलांची सुरक्षा कशी एक सामान्य बाब असेल हे अधोरेखित केले. अशा यशोगाथा लिहिण्यास हे व्यासपीठ उत्सुक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
चित्रपट निर्मिती ही केवळ आशयाची निर्मितीच नाही, तर ती मोठ्या प्रेक्षकांपर्यंत त्याचे विपणन आणि वितरण करणे देखील आहे. आपल्या युवकांमध्ये आणि उद्योगांमध्ये नेटवर्किंग आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी यावर्षी इफ्फी टॅलेंट कॅम्प आयोजित करत आहे, जिथे 75 क्रिएटिव्ह माइंड्सना अनेक प्रसिद्ध निर्मिती संस्था, स्टुडिओ आणि ओटीटी प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींना भेटण्याची ,संवाद आणि संपर्क साधण्याची संधी मिळेल.
सरकारने स्टार्ट-अप्सना दिलेल्या प्रोत्साहनावर भर देत, केंद्रीय मंत्री म्हणाले की, नवीन स्टार्ट-अप धोरणामुळे, देशातील एक लाखाहून अधिक स्टार्ट-अप्ससह भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप परिसंस्था म्हणून उदयाला आला आहे. “रोज एक नवीन स्टार्टअप सुरु होत आहे. कोविड 19 महामारीच्या काळात जेव्हा मोठ्या कंपन्याही संघर्ष करत होत्या, तेव्हा भारतातील पन्नास स्टार्टअप्सने युनिकॉर्नच्या स्तरावर पोहोचून भरतीय तरुणांचे सामर्थ्य जगात सिद्ध केले,” ते म्हणाले. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते 75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमोरो, स्पर्धेतील सहभागींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला शॉर्ट्स टीव्हीचे सीईओ आणि संस्थापक कार्टर पिल्चर, युरोपियन फिल्म मार्केटचे संचालक डेनिस रुह, द आर्चीज चे कार्यकारी निर्माता जॉन गोल्डवॉटर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव नीरज सेखर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव (चित्रपट) आणि एनएफडीसी चे व्यवस्थापकीय संचालक प्रितुल कुमार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शॉर्ट्स टीव्हीच्या सहयोगाने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने सीएमओटीचा (CMOT) भाग म्हणून ’48 अवर चॅलेंज’ चे आयोजन केले आहे.
फिल्म चॅलेंजचा एक भाग म्हणून, 75 CMOT सहभागींना पाच संघांमध्ये विभागण्यात आले होते, जे 48 तासांत ‘मिशन लाइफ’ या विषयावर लघुपट बनवतील.
चित्रपट महोत्सवादरम्यान, सीएमओटी चे स्पर्धक जागतिक सिनेमामधील दिग्गज व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कार्यशाळा आणि विशेष सत्रांना देखील उपस्थित राहतील.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/Sushma/Rajshree/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1978492)
Visitor Counter : 136