कोळसा मंत्रालय
वर्ष 2027 पर्यंत 1404 दशलक्ष टन कोळसा उत्पादन करण्याची कोळसा मंत्रालयाची योजना
Posted On:
13 NOV 2023 6:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2023
कोळसा मंत्रालयाने वर्ष 2027 पर्यंत 1404 दशलक्ष टन (एमटी) तर वर्ष 2030 पर्यंत 1577 दशलक्ष टन (एमटी) कोळसा उत्पादनासाठी योजना आखली आहे. सध्याच्या घडीला प्रतिवर्षी सुमारे एक अब्ज टन कोळशाचे उत्पादन होत आहे. चालू वर्षासाठी देशांतर्गत कोळसा-आधारित वीज प्रकल्पांना पुरवठा करण्यात आलेला कोळसा सुमारे 821 एमटी इतका आहे.
कोळसा मंत्रालयाने वर्ष 2030 पर्यंत देशात आवश्यक असलेल्या अतिरिक्त 80 GW (गिगावॅट) औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक पुरवठ्याकरिता अतिरिक्त कोळशाच्या गरजेची दखल घेतली आहे. या अतिरिक्त औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी कोळशाची गरज 85% प्लांट लोड फॅक्टर (PLF) वर सुमारे 400 एमटी इतकी असेल. आगामी काळात
प्रत्यक्ष कोळशाची गरज ही नवीकरणीय स्त्रोतांच्या योगदानामुळे निर्मितीच्या गरजेनुसार कमी होऊ शकते.
कोळसा मंत्रालयाने आपल्या उत्पादन वाढीच्या योजनेमध्ये अतिरिक्त प्रमाणात कोळशाचे उत्पादन करण्याची योजना आखली आहे आणि त्यामुळे औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना देशांतल्या कोळशाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होणार आहे.
या उत्पादन वाढवण्याच्या योजनांमध्ये नवीन खाणींना मान्यता देणे, प्रत्यक्षात असलेल्या खाणींच्या क्षमतेचा विस्तार करणे आणि बंदिस्त/व्यावसायिक खाणींमधून उत्पादन वाढवणे इत्यादी उपाययोजनांचा समावेश होतो. सध्याच्या घडीला हे तीनही घटक आपआपले योगदान देत आहेत आणि त्यांच्या पुढील वाढीसाठी स्पष्ट योजना आखण्यात आल्या आहेत. वर्ष 2027 आणि वर्ष 2030 च्या कोळसा उत्पादन करण्याच्या योजना ह्या संभाव्य अतिरिक्त ऊर्जा क्षमतेसह देशातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांच्या संभाव्य कोळशाच्या गरजेपेक्षा जास्त कोळसा उत्पादन करतील.
चालू वर्षातील कोळशाच्या उपलब्धतेविषयी सांगायचे झाले तर, सध्या कोळशाच्या साठ्याची सुरुवात झाली असून देशातल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा आता सुमारे 20 एमटी आहे आणि खाणींमध्ये तो 41.59 एमटी इतका आहे. एकूण साठा (ट्रान्झिट आणि कॅप्टिव्ह खाणींसह) 73.56 एमटी इतका आहे जो मागच्या वर्षी 65.56 एमटी इतका होता, जो (वर्ष-दर-वर्ष) 12% ची वाढ दर्शवितो.
कोळसा, ऊर्जा आणि रेल्वे हे तीनही मंत्रालये योग्य समन्वयाने काम करत असल्यामुळेच देशात कोळसा पुरवठा सुरळीत ठेवणे शक्य झाले आहे.
N.Chitale/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1976722)
Visitor Counter : 147