माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

54 व्या भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बझार अंतर्गत प्रस्तावीत चित्रपटांची यादी जाहीर


यावर्षी सहा भाषांमधल्या वैविध्यपूर्ण विषय मांडणाऱ्या चित्रपटांची निवड

Posted On: 11 NOV 2023 1:36PM by PIB Mumbai

 

गोव्यात होणाऱ्या 54 व्या भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बझार अंतर्गत प्रस्तावीत चित्रपटांची यादी जाहीर झाली आहे. या वर्षी निवड झालेल्या सिनेमांमध्ये कथात्मक, लघु माहितीपट, माहितीपट, भयपट आणि कथात्मक अॅनिमेशन पट असं वैविध्यपूर्ण मिश्रण आहे. या सर्व कलाकृतींमधून भारतात आणि भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांशी संबंधीत विषय मांडले गेले आहेत. यात पितृसत्ता, शहरांमधला असंतोष, बिकट गरिबीची स्थिती, हवामानविषयक संकटे, राष्ट्रवाद तसेच खेळ / आरोग्यविषयक तंदुरुस्ती अशा विविध विषयांना स्पर्ष केला गेला आहे. हे चित्रपट इंग्रजी, हिंदी, बंगाली, मारवाडी, कन्नड आणि माओरी (न्यूझीलंड भाषा) भाषांमध्ये आहेत, ज्यातून विविध विषयांचं सर्वसमावेषक चित्रण पाहायला मिळतं. या चित्रपटांच्या छायाचित्र स्वरुपातील छटा पुढे दिलेल्या दुव्यावर पाहता येतील::

या यादीत पुढे दिलेल्या चित्रपटांचा समावेश आहे.:

कथात्मक लघुपट:

एएनयू (14 मिनिटे), दिग्दर्शिक - पुलकित अरोरा (इंग्रजी/हिंदी/माओरी):

पतीच्या मृत्यूमुळे वैधव्य आलेली एक महिला न्यूझीलंडहून भारतात येते. जवळपास वर्षभरापूर्वीच तिने आपल्या पतीला गमावले आहे. मात्र ती अजुनही आपल्या जोडीदाराच्या सहवासाच्या आठवणींमध्येच गुंतलेली आहे. पण तिला अचानकपणे कल्पनातीत संकटाचा सामना करावा लागतो, आणि याच दरम्यानच्या विलक्षण घडामोडी तिला पतीला गमावल्यानं साचून राहिलेल्या दु:खालाही सामोरे जाण्यास भाग पाडतात.

रोटी कून बनासी अथवा हू विल बेक द ब्रेड (25 मिनिटे), दिग्दर्शक चंदनसिंग शेखावत (मारवाडी) : हे राजस्थानमधल्या एका ग्रामीण घरातले कथानक आहे. हू विल बेक द ब्रेड? हा चित्रपट संतोष या व्यक्तिरेखेची कथा मांडतो. तो चित्रपटातील रूपा या पात्राचा पती आणि रणजित या पात्राचा मोठा मुलगा आहे. या कथेतील संतोष ही व्यक्तिरेखा म्हणजे पितृसत्ता आणि पुरुषत्व या आपल्याकडील पारंपरिक धारणांमध्ये अडकलेले पात्र आहे. त्याचे वडिल त्याला सतत त्याच्या अपयशाची आणि तो प्रत्येक गोष्टीसाठी तो कसा लायक नाही याबद्दल दुषणे देत असतात. मात्र संतोषचे विचार हे त्याच्या वडिलांच्या अगदी उलट आहेच. त्यामुळेच तो वडिलांप्रमाणे घरातील महिलेला केवळ गृहिणी म्हणून वागवण्याच्या विरोधात कृती करतो आणि आपली पत्नी रुपा हिला सरकारी नोकरी मिळवण्यासाठीच्या परीक्षेची शेवटची संधी साधता यावी म्हणून पाठबळ देत असतो. या चित्रपटातून आपल्याकडील शेकडो वर्षांच्या पितृसत्तेची धारणा आणि या धारणेचा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत म्हणजेच वडिल मुलाच्या नात्यांच्या माध्यमातून कसा प्रसार होत आला आहे याचा वेध घेतला गेला आहे. या चित्रपटातून राजस्थानातील महिलांचा दैनंदिन संघर्ष तसेच संपूर्ण समाजातील विषमता, पुरुषत्वाच्या चुकीच्या धारणा आणि पितृसत्ताक प्रथेमुळे स्त्री-पुरुष दोघांवरही कशाप्रकारच्या अन्याय अत्याचार होत आला आहे या संदर्भातल्या विविध मुद्यांना स्पर्ष करत, त्याबद्दलचे प्रश्न उपस्थित करतो.

ट्युजडे वुमन (29 मिनिटे), दिग्दर्शक इमाद शाह (इंग्रजी) : एक रमणीय सकाळील आपला नायक, शास्त्रीय संगीताचा आनंद घेत स्टोव्हवर उकळी आलेल्या स्पॅगेतीला शांतपणे ढवळत शिजवत असतो. त्याचवेळी त्याला आलेल्या दूरध्वनी कॉलच्या रिंगमुळे या रम्य क्षणांची तार तुटते. पण तो जेव्हा हा कॉल स्विकारून बोलू लागतो, तेव्हा त्याच्या कानावर एक सौम्य, हळुवार आवाजातले एका स्त्रीचे स्वर ऐकू येतात. मात्र हा आवाज त्याच्या ओळखीचा नसतो. समोरची स्त्री त्याच्याकडून केवळ त्याच्या दहा मिनिटांच्या वेळेची मागणी करते. पण ही दहा मिनेटे तिला त्यांच्यातला करार करण्यासाठी मागत असते. तो लागलीच विचारतो करार करण्यासाठी? आपल्या भावनांबद्दलचा. या क्षणी त्याला फोन कॉल बंद करायची इच्छा होते, मात्र तो ते करू शकत नाही. तो ती कोण आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्याऐवजी एखाद्या रहस्याप्रमाणे त्याच्याशी बोलत असलेली ही स्त्री, त्याला स्वतःत गुंतवून घेते आणि स्वोव्हवर शिजत असलेली स्पॅगेती गरजेपेक्षा जास्त शिजते. हे निरागस संभाषणाअंती प्रत्यक्षात वास्तवातला दिनक्रम सुरू होतो, आपल्या नायकाला हे सगळ्याची नोंद त्याच्या डायरीत करायची असते. पण फोन वाजत राहतो आणि रहस्यमयी, आकर्षून घेणाऱ्या स्त्रिया त्याच्या  दिनचर्येत व्यत्यय आणत राहतात, आणि त्याला त्याच्या जगण्यातल्या चित्रविचित्र बाबींकडे गहन अंतर्दृष्टीनं पाहायला भाग पाडतात. या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर लेखनकलेतील सुंदर अल्पकल्पिकता मांडण्याचा आणि तिला भारतीय अवकाशासोबत जोडून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हारुकी मुराकामी यांच्या तीन लघुकथांचे हे चित्रपट रूपांतरण आहे. या तिनही कथांना एकत्र गुंफून आपल्या नायकाच्या आयुष्यातल्या एका दिवसाचे चित्रण या सिनेमातून मांडले आहे. या चित्रपटातल्या आपल्या नायकाला त्याची नोकरी गमवावी लागली असते, आणि त्यामुळे तो हताश मनःस्थितीत जगत असतो. या चित्रपटात  भाषा आणि संगीताचा केलेला वापर म्हणजे आपल्या स्वतःच्या लेखनाच्या प्रेमात पाडणाऱ्या या जपानी लेखकाच्या लेखनातून दिसणारा जगण्याचा वेग, त्याचे सूर आणि कथाकथनशैलीशी जोडलेला सिनेमॅटिक स्पर्षाचा  शोध घेण्याचा प्रयत्न असल्याचं चित्रपटकर्त्यांचं म्हणणं आहे. हा चित्रपट आपण स्वबळावर उभे राहू शकतो हा सकारात्मक विचार देतो, आणि त्याचवेळी आसपासच्या घडामोडींचा वेध घेत, त्याच्याशी जोडलेले भारतीय संदर्भ आपल्यासमोर मांडतो.

गिध्ध (25 मिनिटे), दिग्दर्शक मनीष सैनी (हिंदी): ही उदरनिर्वाह आणि रोजच्या जगण्यासाठी धडपणाऱ्या एका म्हाताऱ्या व्यक्तीची कथा आहे. हे पात्र आपल्या जवळ आलेल्या मृत्यूपासून वाचू शकत नसण्याच्या स्थितीत जगत असते. त्याच्याकडे अवघे काही रुपये शिल्लक असतात, ज्याचा वापर करून तो औषधे किंवा खाण्यासाठीच्या काही गोष्टी यांपैकी काहीतरी एकच खरेदी करू शकत असतो. उपासमारीचा सामना करत असलेली ही व्यक्ती जर्जर झालेली असल्याने त्याच्यात कुठलंही काम करण्याची क्षमता नसते आणि म्हणूनच त्याला काम मिळणेही अवघड असते. अशावेळी जोपर्यंत जगण्यासाठी काही चमत्कारीक साधन मिळत नाही तोपर्यंत त्याला बिकट स्थितीचाच सामना करावा लागत असतो. अशी संधी त्याच्याकडे येते मात्र त्याची त्याला किंमतही चूकवावी लागते. या संधीसाठी त्याला आपल्यातला विवेक पणाला लावावा लागतो. अशी काही एक आपत्तीजनक परिस्थिती उद्भवते की त्याचा फायदा या म्हाताऱ्याला होऊ शकणार असतो. आत्तापर्यंतची असहाय्यता आणि हतबलतेमुळे त्याला योग्य आणि अयोग्यतेतला फरक कळत आणि समजून घेण्याचीही उसंत नसते, पण या परिस्थितीत त्याच्यासाठी कोणतीच गोष्ट योग्य आणि अयोग्यही नसते. पण तरीही त्याच्या अंतर्मनात कलह सुरू होतो, आणि उपासमारीच्या संकटाच्या जागी त्याचा नव्याने  अपराधीपणाच्या भावनेशी सामना सुरु होतो. एकीकडे आपल्या ताटातलं अन्न पणाला लागलेलं असताना त्याची भूक की अपराधीपणा यांपैकी काय भारी पडेल असा प्रश्न निर्माण होतो. आपल्या ताटात अन्न असणं, अंग कपड्यानं झाकलेलं असणं या दोन गोष्टी माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र, या किमान गरजा पूर्ण करण्यासाठीही काही दुर्दैवी लोकांना दररोज अकाल्पनीक धडपडत करावी लागत असते. हीच धडपड या सिनेमातून मांडली गेली आहे.

लघु माहितीपट:

गोपी (14 मिनिटे), दिग्दर्शन - निशांत गुरुमूर्ती (कन्नड) : गोपी सिद्दी या एक मध्यमवयीन कथाकार आहेत. आपण सिद्दी या समुदायाशी (दक्षिण भारतातील आफ्रिकी नागरिकांचा समुदाय) जोडल्या असल्याचे त्या सांगतात. तोंडी कथाकथन करण्याचा पारंपरिक कलेचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आपणच आपल्या कथा प्रकाशित कराव्यात अशी त्यांची इच्छा आहे. पण त्यासाठी सर्वात आधी तिला प्रथम अलिप्तता, सामाजिक स्तर आणि पर्यावरणीय आपत्तींसोबत लढा द्यावा लागतो.

आयर्न वुमन ऑफ मणिपूर (26 मिनिटे), दिग्दर्शन - होबन पबन कुमार (मणिपुरी/इंग्रजी) : हा चित्रपट म्हणजे आपल्या देशातील क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या प्रगतीत भरीव योगदान देणाऱ्या खेळाडूंना वाहिलेली आदरांजलीच आहे. कुंजाराणी देवी (पद्मश्री पुरस्कार विजेती, 2011), अनिता चानू (ध्यानचंद पुरस्कार विजेती) आणि मीराबाई चानू (पद्मश्री पुरस्कार 2018 आणि टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील रौप्यपदक विजेती) या महिला भारोत्तोलन खेळाडूंच्या प्रेरणादायी कथांनी भारतीय खेळाडूंच्या आणि एकूणच देशाच्या अनेक पिढ्यांना प्रेरीत केले आहे.

माहितीपट, मध्यम-लांबी:

व्हेअर माय ग्रँडमदर लिव्हज (51 मिनिटे), दिग्दर्शन - तस्मिया आफरीन मौ (बंगाली) : चित्रपट निर्मात्या मौ त्यांच्या लाडक्या नानूच्या घरी तिचे चित्रीकरण करण्यासाठी जातात. नानू यांनी 27 वर्षांपूर्वी आपल्या पतीला गमावले असून, त्यांच्या निधनानंतर त्या आपल्या 100 वर्षे जुन्या घरात एकट्याच राहात आहेत. मौ यांच्या आयुष्यातील, नानू आणि त्यांच्या निवासाच्या ठिकाणाची प्रतिमा म्हणजे दलदल आणि हिरवळीने भारलेल्या शांत गावाच्या आठवणी आणि कौटुंबिक मालकीच्या तलावासोबत जोडलेल्या आठवणी आहेत. या तलावात पिढ्यानपिढ्या शेजारची मुले पोहायला शिकून मोठी झाली. नानूचा आणखी एक नातू रावनाक तिच्या घराशेजारीच आपल्या कुटुंबासह राहत असतो. रावनाक यांच्या घराला जोडलेला एक छोटासा तलावही अजून अस्तित्वात आहे. पण रावनाकच्या वडिलांकडच्या नात्यातल्या अनेक वारसदारांना हा तलाव विकायचा असतो. रावनाकला मात्र वडिलांच्या आठवणी जोडलेल्या असलेला हा स्वत:चा कौटुंबिक तलाव विकायचा नसतो. गंमत म्हणजे दलदल किंवा तलाव विकत घेणं, त्यांना वाळूने भरून निवासी भूखंड म्हणून 'विकसित' करणं आणि त्याची विक्री करणं हाच रावनाकचा स्वतःचा व्यवसाय आहे. थोडक्यात आपल्या आसपासचे पाणवठे नष्ट करून, या पाणवठ्यांमध्ये राहणारे सर्व जीव आणि त्यांच्या प्रजाती नष्ट करून, विकास साधण्याची दुर्दैवी परंपरा देशभर सुरू असल्याचे वास्तव आहे.

लडाख 470 (38 मिनिटे), दिग्दर्शन - शिवम सिंग राजपूत (हिंदी/इंग्रजी):

धावण्याच्या क्षेत्रात पाच गिनीज वर्ल्ड रनिंग रेकॉर्ड प्राप्त केलेली, राजस्थानच्या अजमेर इथली धावपटू सुफिया तिच्या आजवरच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रयत्नासाठी सज्ज असते. ती धावण्याचे असे आव्हान पेलण्यासाठी तयारी करत असते, की जसे आजवर कोणीही पेललेले नाही. कारगिल युद्धातील सर्व भारतीय सैन्याच्या युद्धवीरांचा सन्मान करण्यासाठी सियाचिन बेस कॅम्प ते कारगिल युद्ध स्मारकापर्यंत, म्हणजे 11 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर केवळ सात दिवसांमध्येच 770 किलोमीटर धावण्याचा संकल्प तिने केलेला असतो. ती 17980 फुटापर्यंत ओबडधोबड प्रदेशातून धावते, सुफियाला तिचं ध्येय गाठता यावं  प्रशिक्षक, तिचे सहकारी आणि भारतीय सैन्य हे सर्वच तिला मदत करत असतात. ध्येयानं पछाडलेली सुफिया आणि तिची ध्येयासक्त मानसिकतेच्या बळावर सुफिया आपलं ध्येय पूर्ण करते, आणि तिचा हा अनुभव एखादा तप पूर्ण केल्याची अनुभूती देतो.

पूर्ण लांबीचा चित्रपट:

द एक्सलेशन (भयपट) – (82 मिनिटे), दिग्दर्शक - सन्मान रॉय (बंगाली): या चित्रपटात बंगालमधील एका खेड्यातील गौरंगा या तरुणाची कथा मांडली आहे. या तरुणाने नुकतीच आपली पत्नी गमावली आहे. खरे तर त्याचे वर्षानुवर्षे त्याचे कुटुंब असख्य दु:खांच्या मालिकेच्या सामना करत असतानाच त्यांच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळतो, आणि त्यामुळे गौरांगाच्या मनस्थितीवर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि या दुःखातून सावरणे त्याला कठीण होऊन बसते. अखेरीस गौरंगा एका प्रवासाला निघतो. या प्रवासात तो आपल्या आतल्याच राक्षशी वृत्तीचा सामना करू शकत नाही. या प्रवासात त्याला आपल्या ग्रामजीवनात रुजलेल्या काही अख्यायिकांवर आधारलेल्या अलौकिक शक्तींचाही सामना करावा लागतो. या चित्रपटातले कथानक 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात घडते. यात नुकसान, अंधश्रद्धा, लैंगिक विकृती, अलौकिक शक्ती तसेच समाजातील स्त्रीची भूमिका, तसेच त्या काळात अस्तित्वात असलेल्या पण अलिकडे लोप पावत गेलेल्या जुन्या पारंपारिक श्रद्धा, आणि त्याच्याशी जोडलेलं राजकारण तसंच आधुनिक विचार अशा विविधांगी मुद्यांना स्पर्ष करतो.

रिटर्न ऑफ द जंगल (अ ॅनिमेशन) – (105 मिनिटे), दिग्दर्शक - वैभव कुमारेश (हिंदी) : 9 वर्षांचा मिहीर आणि त्याच्या शाळेतल्या मित्रांसमोर, त्यांच्यापेक्षा मोठा असलेल्या आणि आडदांड वृत्तीच्या राहुल मल्होत्राला पराभूत करण्याचे कठीण आव्हान आहे. त्यांच्या या अशक्यप्राय आव्हानात त्यांच्याच  शहरातले थाथा हे आनंदी आणि मिश्कील स्वभावाचे आजोबा आणि त्यांच्याकडच्या जंगलावर आधारीत प्रेरणादायी गोष्टी त्यांना मदत करत असतात. या दोघांनी निर्दयी वाटू शकेल असा डायनासोर तयार करायचा आहे, मानसिक कसोटी पाहणारा क्रिकेटचा खेळ खेळायचा आहे, मैत्री - दयाभाव आणि निर्धाराच्या ताकदीचा शोध घेण्यासाठी राजस्थानभर प्रवास करायचा आहे. रिटर्न ऑफ द जंगल हा समकालीन भारतीय अॅनिमेशनपट आहे. या चित्रपट म्हणजे या आधी कधीही न घेता आलेला अनुभवच आहे. या चित्रपटातून कौटुंबिक मनोरंजनासोबतच प्रेरणादायी कथा आपल्यासमोर मांडली जाते. या कथेमुळे आपणही आठवणीत रमतो आणि आपल्या आसपासच्या घटनांशी त्याला जोडून घेऊ पाहतो.

***

Jaydevi PS/T.Pawar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1976417) Visitor Counter : 153