गृह मंत्रालय
उत्तराखंडमधील डेहराडून येथे भारत तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी ) दलाच्या 62 व्या स्थापना दिन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केले संबोधित
अमित शहा यांच्या हस्ते जवानांसाठी स्वयं शाश्वत ऊर्जा भवन (एसएसईबी) आणि दुर्गम भागात असलेल्या सीमा देखरेख चौक्यांवर (बीओपी) भाजीपाला, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी ड्रोनचे ई- लोकार्पण , आयटीबीपीच्या 147 शहीदांवरील फ्लिप बुकचे गृहमंत्र्यांनी केले प्रकाशन
Posted On:
10 NOV 2023 5:47PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज उत्तराखंडमधील डेहराडून येथे भारत तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी ) दलाच्या 62 व्या स्थापना दिन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले. अमित शहा यांच्या हस्ते जवानांसाठी स्वयं शाश्वत ऊर्जा भवन (एसएसईबी) आणि दुर्गम भागात असलेल्या सीमा देखरेख चौक्यांवर (बीओपी ) भाजीपाला, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी ड्रोनचे ई- लोकार्पण झाले. आयटीबीपीच्या 147 शहीदांवरील फ्लिप बुकचे प्रकाशनही गृहमंत्र्यांनी केले. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि आयटीबीपीचे महासंचालक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिवाळीनिमित्त जेव्हा देशवासी आपापल्या घरी दिवे प्रज्वलित करतात तेव्हा ते सीमेवर तैनात असलेल्या आपल्या शूर जवानांसाठीही एक दिवा प्रज्वलित करतात, असे आपल्या भाषणात अमित शहा यांनी सांगितले. देशातील 130 कोटी जनता शूर सैनिकांच्या त्याग, बलिदान, धैर्य आणि शौर्याचा मनापासून आदर करते.हिमवीरांचे त्याग, सेवा आणि बलिदान अमूल्य आहे आणि संपूर्ण देश त्याला अभिवादन करतो, असे शहा यांनी सांगितले.
आज आयटीबीपी चा स्थापना दिवस आहे आणि आपल्या हिमवीरांनी शौर्य, चिकाटी आणि समर्पण या ब्रीदवाक्याने भारताच्या दुर्गम सीमांचे रक्षण करण्यासाठी गेली 62 वर्षे काम केले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. 62 वर्षांपूर्वी 7 विभागांसह सुरू झालेले आयटीबीपी दल आज एक लाख हिमवीर, 60 विभाग, 17 प्रशिक्षण केंद्रे, 16 सेक्टर, 5 फ्रंटियर्स आणि 2 कमांड मुख्यालयांसह एका भक्कम सामर्थ्याच्या रूपात उदयाला आले आहे, असे शहा यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिमवीरांची मागणी लक्षात घेऊन, केंद्र सरकारने विमान आणि रेल्वेमध्ये लष्कराच्या धर्तीवर देशातील केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांचा (सीएपीएफ ) कोटाही निश्चित केला आहे, असे त्यांनी सांगितले.
अमित शाह म्हणाले की, आज येथे सुरू झालेल्या अनेक नवीन उपक्रमांपैकी स्वयं शाश्वत ऊर्जा इमारत (सेल्फ सस्टेनेबल एनर्जी बिल्डिंग ,SSEB) अत्यंत खास आहे कारण 17,000 फूट उंचीवर बांधलेली ही इमारत वाळवंटातील थंडीत आत्मनिर्भर भारताचे प्रतीक असेल. ही वास्तू म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून हिमवीरांना दिलेली एक अनोखी दिवाळी भेट आहे, असे ते पुढे म्हणाले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, दुर्गम भागांतील आणि उंचावरील सीमा निरिक्षण ठाण्यांवर (बीओपी ,बॉर्डर ऑब्झर्व्हेशन पोस्ट) भाजीपाला, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी ड्रोनचा वापर करण्याची संकल्पना पंतप्रधान मोदीजींनी आपल्या सर्वांसमोर ठेवली होती,असे त्यांनी सांगितले. हे साध्य करण्याच्या दिशेने 15 किलो औषधे आणि भाजीपाला घेऊन आज पहिला ड्रोन दुर्गम भागात पोहोचला आहे, ही एक मोठी सुरुवात आहे.ते म्हणाले की आज येथे सुरू झालेली ड्रोन सेवा केवळ आपल्या हिमवीरांसाठीच नाही तर सीमावर्ती गावातील लोकांसाठीही लाभदायी ठरेल.
अमित शहा म्हणाले की, भारत तिबेट सीमा पोलिस (ITBP) शौर्य, दृढनिश्चय आणि कर्तव्यनिष्ठेसाठी ओळखले जातात. ते म्हणाले की, भारताच्या जमिनीच्या सीमा 7 देशांसोबत जोडलेल्या आहेत आणि हिमालयाच्या प्रदेशातील सीमांच्या रक्षणाची जबाबदारी आयटीबीपीकडे देण्यात आली आहे. शाह म्हणाले की, आयटीबीपीने आपल्या सहा दशकांच्या अविरत सेवेत शक्ती शौर्य आणि त्यागाचे प्रतीक असलेली 7 पद्मश्री,2 कीर्ती चक्र, 6 शौर्य चक्र, 19 राष्ट्रपती पोलीस पदके, 14 तेनझिंग नोर्गे साहसी पदके आणि इतर अनेक पदके प्राप्त केली आहेत.
येत्या वर्षभरात संपर्क नसलेली 168 गावे रस्ते, वीज, दूरसंचार आणि आरोग्य सेवांनी जोडली जातील, असे शहा म्हणाले. ते म्हणाले की 2014 पूर्वी, भारत-चीन सीमा सुविधांच्या विकासासाठी दरवर्षी सरासरी 4000 कोटी रुपये खर्च केले जात होते, तर आता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाअंतर्गत गेल्या 9 वर्षांत हा खर्च दरवर्षी सरासरी 12340 कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे.
ते म्हणाले की, नुकतेच स्वातंत्र्याचे अमृत वर्ष संपले असून15 ऑगस्ट 2047 पर्यंत पूर्ण होणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आपण सर्वांनी निश्चय करायचा आहे की,भारत जगातील प्रत्येक क्षेत्रात सर्वप्रथम असला पाहिजे. शाह म्हणाले की, 2047 पर्यंत आपल्याला भारताला प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करणारा देश बनवायचा आहे.
***
S.Kane/S.Chavan/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1976263)
Visitor Counter : 150