आयुष मंत्रालय
भारतीय विश्व खाद्य महोत्सव ’ मध्ये केलेल्या उद्घाटनपर भाषणात आयुर्वेद आणि योगाचे महत्त्व पंतप्रधानांनी केले अधोरेखित
आयुष मंत्रालयाकडून आयुष चर्चासत्राचे आयोजन आणि आयुष व्हिसा, आयुष आहार, कृत्रिम बुद्धिमत्तेवर तज्ज्ञांचे विचारमंथन
Posted On:
03 NOV 2023 8:16PM by PIB Mumbai
"भारताची शाश्वत खाद्यसंस्कृती हजारो वर्षांच्या प्रवासाचे फलित आहे'', असे भारतीय विश्व खाद्य महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ''आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदाचा संबंध सर्वसामान्य लोकांच्या आहारशैलीशी जोडला होता.ज्याप्रमाणे भारताच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय खाद्यसंस्कृती विकसित झाली, योग दिनाने योगाला जगाच्या कानाकोपऱ्यात नेले, त्याचप्रमाणे आता भरडधान्य देखील जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल'', असे पंतप्रधान म्हणाले.
नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे 3 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित भारतीय विश्व खाद्य महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेद आणि योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले.
योगाच्या जागतिक प्रसाराच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी भर दिला. उद्घाटन समारंभानंतर, आयुष मंत्रालयाने आयोजित केलेल्या माहितीपर सत्रात, जयपूरच्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेचे प्रा. अनुपम श्रीवास्तव यांनी वैद्यकीय मूल्य पर्यटनावर भर देताना सांगितले की, आयुष व्हिसा ही प्रणाली जगभरातील आरोग्य सेवेच्या गरजूंसाठी खूप उपयुक्त आहे.
भारतीय विश्व खाद्य महोत्सवात आयुष मंत्रालय भागीदाराची भूमिका बजावत आहे. आयुष मंत्रालयातर्फे महोत्सवात आयुष दालन तयार करण्यात आले आहे. यात आयुर्वेद आहारासोबतच आयुष आहाराची सध्याच्या जीवनातील उपयुक्तता, आयुष आहाराचे महत्त्व, ते मिळवण्याच्या पद्धती इत्यादींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यासोबतच पारंपरिक वैद्यक पद्धतींनुसार योग्य आहार आणि जेवणाची थाळी कशी असावी वगैरे गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनीही आज आयुष दालनाला भेट दिली.
***
S.Kakade/S.Chavan/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1974603)
Visitor Counter : 124