सहकार मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह 26 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड द्वारे आयोजित ‘सहकार क्षेत्राद्वारे सुधारित आणि पारंपरिक बियाणांचे उत्पादन’, या विषयावरील राष्ट्रीय परिषदेला करणार संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "सहकार से समृद्धी" या संकल्पनेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, बीबीएसएसएल च्या माध्यमातून दर्जेदार बियाण्याचे उत्पादन आणि वितरणामुळे देशाच्या कृषी उत्पादनात होणार वाढ
Posted On:
25 OCT 2023 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमीत शाह 26 ऑक्टोबर 2023 (गुरुवार) रोजी नवी दिल्ली येथे भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड (बीबीएसएसएल) द्वारे आयोजित ‘सहकार क्षेत्राद्वारे सुधारित आणि पारंपरिक बियाणांचे उत्पादन’, या विषयावरील राष्ट्रीय परिषदेला संबोधित करतील. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लोगो, वेबसाइट आणि माहितीपत्रकाचे प्रकाशन देखील करतील आणि बीबीएसएसएल च्या सदस्यांना सदस्यत्व प्रमाणपत्रांचे वितरण करतील. या परिषदे दरम्यान, छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी सहकारी संस्थांची भूमिका, यासह बीएसएसएल ची उद्दिष्टे, प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या (PACS) माध्यमातून बीजोत्पादनाचे महत्त्व आणि पिकांची उत्पादकता, पोषण यामधील बियाण्याची भूमिका, या मुद्द्यांवर चर्चा होईल.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी, सहकार क्षेत्राद्वारे प्रक्रिया आणि विपणनासह प्रगत आणि पारंपरिक बियाणे संशोधन आणि उत्पादन याचे नियंत्रण करणारी एक संस्था म्हणून राष्ट्रीय स्तरावरील बहु-राज्य सहकारी संस्था स्थापन करण्याच्या गरजेवर भर दिल्यानंतर ‘बीबीएसएसएल’ची स्थापना झाली. ही संस्था मागणी-आधारित बियाणे उत्पादन, बियाण्याची साठवण, प्रक्रिया आणि पॅकेजिंगसाठी पायाभूत सुविधांचा विकास, लॉजिस्टिक सहकार्य, उत्पादित बियाणांची गुणवत्ता वाढ आणि मानकीकरण, आवश्यक प्रमाणीकरण आणि विपणन, यामध्ये देशभरातली सहकारी संस्थांना सहाय्य पुरवेल. बीबीएसएसएल, विविध पिके आणि त्यांच्या विविध प्रकारांच्या पारंपरिक बियाणांचे जतन आणि संवर्धन करण्यामध्ये सहकारी संस्थांना मदतही करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "सहकार से समृद्धी" या संकल्पनेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, बीबीएसएसएल मार्फत दर्जेदार बियाणांचे उत्पादन आणि वितरणामुळे देशातील कृषी उत्पादनात वाढ होईल. यामुळे कृषी आणि सहकार क्षेत्रात अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील, बियाणांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, “मेक इन इंडिया” ला प्रोत्साहन मिळेल आणि ‘आत्मनिर्भर भारतता’च्या उद्दिष्टपूर्तीचा मार्ग मोकळा होईल.
परिषदेच्या सुरुवातीला सहकार क्षेत्राला बळकट करण्यासाठी गेल्या 27 महिन्यांत हाती घेण्यात आलेल्या 54 नवीन उपक्रमांवर सहकार मंत्रालयाचे अधिकारी सादरीकरण करतील. सुमारे 2000 सहकारी संस्थांसह देशभरातील इतर हजारो सहकारी संस्था दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या एकदिवसीय परिषदेत सहभागी होणार आहेत.
इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO), कृषक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेड (KRIBHCO) आणि नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (नाफेड), या देशातील तीन प्रमुख सहकारी संस्था आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (NDDB) आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC), या भारत सरकारच्या दोन प्रमुख वैधानिक संस्था, यांनी संयुक्तपणे बीबीएसएसएल च्या स्थापनेला प्रोत्साहन दिले आहे.
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1970797)
Visitor Counter : 136