संरक्षण मंत्रालय
अरुणाचल प्रदेशातील सरहद्दीवरील आघाडीच्या चौक्यांना संरक्षणमंत्र्यांनी दिली भेट; प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसीवरील) संरक्षण तयारीचा घेतला आढावा
तवांगमध्ये सैनिकांसोबत साजरा केला दसरा आणि केले शस्त्रपूजनही
सध्याच्या जागतिक परिस्थितीत देशाची सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याशिवाय पर्याय नाही; सर्व प्रमुख शस्त्रे आणि मंच भारतात बनवले जातील हे सरकार करत आहे सुनिश्चित: राजनाथ सिंह
Posted On:
24 OCT 2023 4:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2023
अरुणाचल प्रदेशातील सरहद्दीवरील आघाडीच्या चौक्यांना 24 ऑक्टोबर 2023 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भेट दिली. तेथील सशस्त्र दलांच्या कार्यसज्जतेचा आढावाही घेतला.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) आघाडीच्या चौक्यांवर तैनात असलेल्या सैनिकांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत दसरा साजरा केला. अतिशय खडतर परिस्थितीत सीमेवर तैनात असलेल्या परंतु देश आणि तेथील लोकांच्या सुरक्षेची नेहमीच काळजी वाहणाऱ्या सैनिकांचा दृढनिश्चय, अविचल वचनबद्धता आणि अद्वितीय धैर्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
राजनाथ सिंह यांनी तवांगमध्ये सैनिकांसोबत शस्त्रपूजन केले. दसरा हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
सशस्त्र दलांचे शौर्य आणि वचनबद्धता यांसारख्या गुणांमुळे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा वाढला असून तो आता सर्वात शक्तिशाली देशांच्या पक्तींत जाऊन बसला आहे, याकडे संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले. आपल्या नुकत्याच झालेल्या इटली भेटीचा संदर्भ सिंह यांनी दिला. दुसऱ्या महायुद्धात मॉन्टोनला मुक्त करण्यासाठी इटालियन मोहिमेत लढलेल्या नाईक यशवंत घाडगे आणि इतर भारतीय सैनिकांच्या योगदानाला समर्पित असलेल्या मोंटोन स्मारकाला (पेरुगिया प्रांत) त्यांनी भेट दिली असे ते म्हणाले.
सध्याची जागतिक परिस्थिती पाहता देशाची सुरक्षा यंत्रणा बळकट करण्याशिवाय पर्याय नाही, यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला. त्यांनी अधोरेखित केले की सरकार संरक्षण उपकरणांच्या स्वदेशी उत्पादनाद्वारे देशाची लष्करी शक्ती मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाने संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. 2014 मध्ये संरक्षण निर्यातीचे मूल्य सुमारे 1,000 कोटी रुपये होते, परंतु आज आपण हजारो कोटी रुपयांच्या संरक्षण उपकरणांची निर्यात करत आहोत असे ते म्हणाले.
संरक्षणमंत्र्यांनी, तवांग युद्धस्मारक आणि आसाममधील तेजपूर इथल्या 4 कॉर्प्स मुख्यालयालाही भेट दिली.
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे; जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (जीओसी-इन-सी) पूर्व कमांड लेफ्टनंट जनरल आरपी कलिता; सीओसी, 4 कोअरचे लेफ्टनंट जनरल मनीष एरी आणि भारतीय लष्कराचे इतर वरिष्ठ अधिकारीही यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते.
* * *
S.Patil/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1970465)
Visitor Counter : 92