सहकार मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ मर्यादितच्या (एनसीसीएफ) संचालक मंडळाला केले संबोधित
एनसीसीएफने 2027-28 पर्यंत 50,000 कोटी रुपयांची उलाढाल साधून आत्मनिर्भर व्हावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकार से समृद्धी’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनसीसीएफ महत्त्वाची भूमिका बजावत आहे
Posted On:
20 OCT 2023 1:22PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे एनसीसीएफ (नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ) अर्थात भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ मर्यादितच्या संचालक मंडळाला संबोधित केले. वर्ष 2027-28 पर्यंत 50,000 कोटी रुपयांची उलाढाल साधून एनसीसीएफने आत्मनिर्भर झाले पाहिजे, असे अमित शाह यांनी यावेळी सांगितले. एनसीसीएफने प्राथमिक कृषी पतसंस्था (पीएसीएस ) आणि देशभरातील इतर सहकारी संस्थांना आपले सदस्य बनवण्यावर भर दिला पाहिजे, यामुळे एनसीसीएफच्या भांडवलाच्या वाट्यामध्ये सहकाराचे प्रमाण तुलनेने अधिक असेल. यासाठी एनसीसीएफला आपला व्यवसाय आराखडा विकसित करावा लागेल आणि व्यावसायिक दृष्टिकोन बदलावा लागेल, असे प्रतिपादन शाह यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकार से समृद्धी’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनसीसीएफ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सहकार मंत्री म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, स्थापनेपासूनच सहकार मंत्रालयाने देशातील सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी आणि जीडीपी अर्थात सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये सहकाराचा वाटा वाढवण्यासाठी गेल्या 26 महिन्यात 52 उपक्रम हाती घेतले आहेत, असे त्यांनी सांगितले.
आत्मनिर्भर सहकारी संस्था होण्यासाठी एनसीसीएफने पुढील 10 वर्षांचा पथदर्शक आराखडा तयार केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. अशा पथदर्शक आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार मंत्रालय एनसीसीएफला पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. इथेनॉल निर्मितीसाठी एनसीसीएफने आपल्या सहयोगी कंपन्यांसह गुजरात, बिहार आणि इतर राज्यांतील शेतकऱ्यांकडून मका खरेदी सुनिश्चित करावी, यावर सहकार मंत्र्यांनी भर दिला.
सहकार मंत्रालय, एनसीसीएफ आणि नाफेडची इच्छा असल्यास राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राकडून (एनआयसी ) डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांचे सामायिक अॅप तयार करण्यासाठी मदत करू शकते आणि या अॅपचा वापर मका खरेदीच्या समन्वयासाठी केला जाऊ शकतो, असे सहकार मंत्री शाह यांनी सांगितले. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या डाळींच्या निर्यातीच्या संधी शोधण्याचे आवाहन त्यांनी एनसीसीएफला केले. अशी खरेदी किमान आधारभूत किमतीवर (MSP) केली जाईल याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. वेगवान विस्तार आणि विपणनाचा अवलंब करणे, शेतकऱ्यांना आधी हमी देऊन खरेदी करणे आणि सामायिक संकलन केंद्रे स्थापन करणे, यावर त्यांनी भर दिला.
कांदा आणि डाळींच्या खरेदीसाठी एनसीसीएफ पीएसीएससोबत करार करू शकते, जेणेकरून सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या साठवण योजनेअंतर्गत या पिकांच्या साठवणुकीची व्यवस्था करता येईल, असे अमित शाह यांनी सांगितले. कृषी उत्पादनांच्या निर्यातीच्या संधी शोधून आणि तांदूळ खरेदी करून राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादितद्वारे (एनईसीएल ) त्याची निर्यात करावी, असेही शाह यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री यांनी मांडलेली उद्दिष्टे पूर्ण करण्याचे आश्वासन एनसीसीएफचे अध्यक्ष विशाल सिंह यांनी दिले. संचालक मंडळाच्या बैठकीला सहकार मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश कुमार आणि एनसीसीएफचे व्यवस्थापकीय संचालक एनिस जोसेफ चंद्र हेदेखील उपस्थित होते.
***
G.Chippalkatti/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1969370)
Visitor Counter : 120