नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विमानविषयक नियम,1937 मध्ये सुधारणा: विमान सुरक्षा बळकट करणे आणि हवाई वाहतूक नियमन क्षेत्रात व्यवसाय सुलभ बनवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल

Posted On: 16 OCT 2023 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2023

 

विमानविषयक नियम, 1937 मध्ये केलेल्या आणि सरकारी राजपत्रात दिनांक 10 ऑक्टोबर, 2023 रोजी अधिकृतरित्या सूचित करण्यात आलेल्या सुधारणांमुळे विमान वाहतूक क्षेत्रात व्यवसाय सुलभता वाढवण्यात तसेच या क्षेत्रातील सुरक्षितता आणि संरक्षण यांच्या सुनिश्चितीच्या संदर्भात आमूलाग्र बदल घडून आला आहे. विमानविषयक नियम, 1937 मध्ये केलेली सुधारणा म्हणजे हवाई वाहतूक क्षेत्राला बळकट करण्याच्या तसेच हवाई वाहतूक नियमन  क्षेत्रात व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

विमानविषयक नियम, 1937 मधील ही सुधारणा हा विद्यमान नियामकीय सुरक्षा आणि संरक्षणविषयक चौकट मजबूत करण्यासाठी आवश्यक सुधारणाविषयक उपाय सुचवण्याच्या उद्देशाने या उद्योगातील भागधारकांशी केलेल्या सखोल विचारविनिमयाचा परिपाक आहे. या सुधारणांमुळे भारतातील हवाई वाहतूकविषयक नियम आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेच्या (आयसीएओ) मापदंडांना तसेच शिफारस केलेल्या पद्धती (एसएआरपीएस) आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट पद्धती यांच्याशी अनुसरुन करण्यात आले आहेत.

विमानविषयक नियम, 1937 मधील सुधारणेचा महत्त्वाच्या ठळक घटकांपैकी एक म्हणजे 39सी या नियमाचे पुनरिक्षण. या सुधारणेअंतर्गत, विमानकंपनी वाहतूक वैमानिक परवाना (एटीपीएल) आणि व्यावसायिक वैमानिक परवाना (सीपीएल) यांसंबंधीच्या परवान्यांची वैधता पाच वर्षांवरून वाढवून 10 वर्षे करण्यात आली आहे. हा बदल करण्यात आल्यामुळे, वैमानिक तसेच डीजीसीए सारख्या हवाई वाहतूक प्राधिकरण संस्थांवरील प्रशासकीय दबाव कमी होईल आणि त्यातून अधिक सुरळीत आणि कार्यक्षम परवाना पद्धतीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

विमानविषयक नियम, 1937 मधील सुधारणांअन्वये, नियम 66 मध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. विमानतळ परिसरात “फसवे दिवे” दिसण्याबाबत असलेल्या समस्येशी याचा संबंध आहे. या नव्या सुधारणेनुसार, “दिवे” या संज्ञेमध्ये कंदिल, मेणबत्ती असणारे पतंग आणि लेसर दिवे यांचा समावेश आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या दिव्यांशी संबंधित न्यायक्षेत्राचा परीघ विमानतळापासून 5 किलोमीटरवरुन वाढवून 5 नॉटिकल मैल करण्यात आला आहे. तसेच, विमानांच्या सुरक्षित परिचालनात अडथळा निर्माण करणारे असे दिवे लावणाऱ्या किंवा विमानातील कर्मचारीवर्गाला धोकादायक ठरणाऱ्या  व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्याचे अधिकार सरकारला आहेत असे देखील या सुधारणेत स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय, या सुधारणेनुसार, परदेशी परवान्यांच्या ग्राह्यतेबाबतचा नियम 118 अनावश्यक असल्याने रद्द करण्यात आला आहे. या बदलामुळे, हवाई वाहतूक क्षेत्राच्या वाढत्या गरजांशी जुळणारे नियम तयार करण्याची सुरुवात झाली आहे.

विमानविषयक नियम, 1937 मध्ये केलेल्या या सुधारणा म्हणजे हवाई वाहतूक क्षेत्राला बळकट करण्याच्या तसेच भारतातील हवाई वाहतूक क्षेत्रात व्यवसाय करण्यातील सुलभता वाढवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

 

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1968082) Visitor Counter : 163