पंतप्रधान कार्यालय
आकांक्षित जिल्ह्यांशी संबंधित संकल्प सप्ताह या कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
Posted On:
30 SEP 2023 10:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2023
या कार्यक्रमात उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सर्व सहकारी, सरकार मधील अधिकारी वर्ग, निती आयोगाचे सर्व मित्र आणि या कार्यक्रमांमध्ये देशातल्या वेगवेगळ्या भागांमधून, वेगवेगळ्या ब्लॉकमधून तळागाळातील जे लाखो मित्र जोडले गेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात सहभागी लोकप्रतिनिधी सुद्धा आज या कार्यक्रमात कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत आणि या विषयांमध्ये रुची असणारे पण आज आपल्याबरोबर वेगवेगळ्या माध्यमांमधून जोडले गेले आहेत, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना विशेष करून नीती आयोगाचे अभिनंदन करत आहे आणि आपल्या सर्वांना माझ्या शुभेच्छा पण देतो आहे. आपण लोक भारत मंडपम मध्ये एकत्रित झाला आहात आणि यामुळे देशाच्या विचारांची दिशा कळू शकते, भारत सरकारच्या विचारांची दिशा कळू शकते आणि ते हे लोक आहेत की एक महिन्याच्या आत आता जे लोक इथे जमा झाले आहेत जे देशातल्या दूर अति दुर्गम गावांची काळजी करणारे लोक आहेत, अगदी समाजाच्या तळागाळातील कुटुंबांची काळजी करणारे हे लोक आहेत, त्यांच्या हितासाठी विविध योजनांना पुढे घेऊन येणारे हे लोक आहेत आणि याच एका महिन्यात इथे ते लोक बसलेले होते जे संपूर्ण जगाला दिशा दाखवण्याचे काम करत होते, याचा अर्थ आपण या परिघाचा आवाका केवढा मोठा आहे हे लक्षात घ्यावे. ज्या भारत मंडपम मध्ये याच एका महिन्यात जगातले प्रतिष्ठित नेते एकत्र येऊन जगाची काळजी करत होते त्याच भारत मंडपम मध्ये माझ्या देशातले जमीन स्तरावर बदल घडवून आणणारे, अधिक मजबुती आणणारे आणि आपले ध्येय अधिक तीव्र करून काम करणारे लोक आहेत. या माझ्या लाखो मित्रांना आज मी भेटत आहे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझ्यासाठी ही परिषद सुद्धा जी 20 परिषदेपेक्षा कमी नाही आहे. आपल्याबरोबर ऑनलाइन सुद्धा खूप सारे लोक जोडले गेले आहेत. हा कार्यक्रम टीम भारताच्या यशाचे एक प्रतीक आहे, हे सबका प्रयास या भावनेचे प्रतीक आहे. हा कार्यक्रम भविष्यातल्या भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि यामध्ये संकल्पा पासून सिद्धी पर्यंत सर्व काही अंगभूत आहे, त्याचेच हे प्रतिबिंब आहे.
मित्रांनो,
जेव्हा पण कधी स्वातंत्र्यानंतर बनलेल्या टॉप टेन अर्थात सर्वोत्तम दहा योजनांचा अभ्यास केला तर त्यामध्ये अस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम अर्थात आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाला सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिले जाईल. या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाने, आकांक्षित जिल्हा अभियानाने देशातल्या 112 जिल्ह्यांमध्ये 25 कोटी पेक्षा जास्त लोकांच्या जीवनामध्ये घडवून आणला आहे, कॉलिटी ऑफ लाईफ मध्ये अर्थात जीवन जगण्याच्या दर्जामध्ये मोठा बदल घडवून आणलेला आहे, इज ऑफ गव्हर्नन्स अर्थात सुशासन स्तरावर लवचिकता आणून त्यामध्ये बदल घडवून आणलेला आहे आणि जे कालपर्यंत सोडून दे मित्रा, कसेही हे जीवन जगूयात आपल्याला असाच जीवन निर्वाह करावा लागणार आहे.
अशा विचारातून बाहेर पडून तिथला समाज आता असे राहायचे नाही, काहीतरी करून दाखवायचे आहे या मनस्थिती मध्ये आहे, मी वाटते की ही खूप मोठी ताकद आहे, या अभियानाची यशस्विता आता ऍस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्रॅम अर्थात आकांक्षित ब्लॉक कार्यक्रमाचा आधार बनली आहे.
डिस्ट्रिक्ट लेवल अर्थात जिल्हास्तरावरील अनुभव एवढा यशस्वी राहिला आहे की जगामध्ये या विकासाच्या मॉडेलची चर्चा करणारे प्रत्येक जण यातून काही ना काही धडा घेऊन विशेष करून विकसनशील देशांच्या साठी प्रेरणा स्रोत ठरत आहे. आपण सुद्धा त्यामधूनच खूप काही शिकलो आहोत आणि त्यामधूनच हा विचार पुढे आला की 500 ब्लॉक्स देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये जिथे पण आणि एका मापदंडाच्या पद्धतीने त्याचे मूल्यांकन केले गेले आहे.
आणि या मधून आपण हे 500 ब्लॉक घेतले त्यांना राज्यांच्या स्तरावर आपण घेऊन गेलो तर किंवा राष्ट्रीय स्तरावर घेऊन गेलो तर आपण कल्पना करू शकतो की यातून केवढे मोठा बदल साध्य होऊ शकतो, केवढा मोठा परिणाम येऊ शकतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने अस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम अर्थात आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमाने यशाचा झेंडा फडकवला आहे त्याच पद्धतीने ऍस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम अर्थात आकांक्षित तालुका कार्यक्रम सुद्धा शंभर टक्के यशस्वी होणारच आहे. आणि यासाठीच नव्हे की ही योजना मोठी विलक्षण आहे, परंतु यासाठी की यासाठी काम करणारे लोक विलक्षण आहेत. आत्ताच काही वेळापूर्वी मी तीन मित्रांसोबत गप्पा मारत होतो आपण ऐकलत चर्चा करत होतो, बघा त्यांचा आत्मविश्वास बघा आणि जेव्हा मी तळागाळात कार्य करणाऱ्या तुम्हा मित्रांचा आत्मविश्वास अनुभवतो तेव्हा माझा आत्मविश्वास सुद्धा खूप पटीने वाढतो, नव्हे तो अधिक पटीने द्विगुणित होत जातो. माझ्या केवळ शुभकामना तुमच्या सोबत आहेत असे नव्हे तर मी पूर्णपणे आपल्याबरोबर उभा आहे, जर आपण दोन पावलं पुढे टाकलीत तर मी तीन पावलं चालण्यासाठी तयार आहे जर तुम्ही 12 तास काम करणार असाल तर मी 13 तास काम करण्यासाठी तयार आहे आणि मी आपला एक मित्र म्हणून काम करू इच्छितो, तुमच्या टीमचा एक सदस्य बनून काम करू इच्छितो आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपण सर्वजण एकत्र येऊन एक टीम बनून हा ऍस्पिरेशनल ब्लॉक कार्यक्रमाला यशस्वी करून दाखवू. या कार्यक्रमाला जे यशस्वी करू पाहत आहेत आणि यासाठी आपण त्यांना दोन वर्षांचा वेळ निर्धारित केला तर मला पूर्ण विश्वास आहे की आपण दीड वर्षांमध्ये हे लक्ष्य गाठू जर आपण दीड वर्ष निर्धारित केले आहे तर आपण एका वर्षामध्ये हे लक्ष्य गाठू हा माझा पूर्ण विश्वास आहे.आणि काही तालुके तर असे मिळतील जे एखाद्या विषयाला एक किंवा दोन आठवड्यांमध्ये त्याला साधारणतः राज्याच्या प्रमाणापेक्षा वरती घेऊन जाण्याची क्षमता ठेवता आहेत, ते हे काम करून दाखवतील मला पूर्ण विश्वास आहे कारण आपल्या सर्वांना सुद्धा माहिती आहे की मी या कामाला प्रत्येक दिवशी पाहणार आहे. प्रत्येक दिवशी, अगदी बारकाईने याकडे लक्ष देणार आहे, यासाठी नव्हे की मी आपली परीक्षा घेणार आहे, यासाठी की, जेव्हा मी आपली सफलता पाहतो ना, तेव्हा त्या दिवशी माझ्या काम करण्याच्या करण्याची क्षमता वाढते. माझा उत्साह वाढतो. मला पण असे वाटते की यार, आपण एवढे काम करत आहात चला मी सुद्धा थोडे जास्त करतो. मी यासाठी वेळापत्रकाकडे पाहत राहतो. कारण ते वेळापत्रकच माझी प्रेरणा बनत जाते, माझी ताकद बनते.
आणि यासाठीच मित्रांनो,अस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम अर्थात आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमाला, आकांक्षीत जिल्ह्यांना आता पाच वर्षे झालेली आहेत या कार्यक्रमापासून कोणाला काय मिळाले काय काय प्राप्त झाले कुठे आणि किती चांगले झाले या सर्व विषयांचे आकलन जेव्हा कोई कोणी तिसरी संस्था करते तेव्हा ती संस्था सुद्धा समाधान व्यक्त करते तेव्हा आपण लोक तर जे एकत्र जोडले गेलेले आहोत आपल्याला तर समाधान होणे खूपच स्वाभाविक आहे.
आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमापासून एक आणखी गोष्ट निश्चित झाली आहे ती म्हणजे जर आपण गुड गव्हर्नन्स अर्थात चांगल्या सुशासनाची खूपच साधारण गोष्टींवरती लक्ष केंद्रित करतो देतो तेव्हा अवघड वाटणारे उद्दिष्ट सुद्धा साध्य होते. आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी खूपच सरळ नियमावली च्या माध्यमातून काम केले आहे आपण सुद्धा पाहिले असेल जेव्हा कोणी व्यक्ती आजारी पडला असेल तेव्हा तो डॉक्टरांजवळ जातो तिथे डॉक्टर चला पहिल्यांदा असे समजू की त्याला वाटते की ही एक गंभीर आजार आहे आणि त्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे परंतु डॉक्टर तातडीची निकड आहे तरीपण म्हणेल की अजून पंधरा दिवस नाही पहिल्यांदा आपली प्रतिकारशक्ती चांगली झाली पाहिजे म्हणजेच तेव्हाच शस्त्रक्रिया होऊ शकेल जेव्हा आपले शरीर प्रतिसाद देईल, अशीच आपली स्थिती असली पाहिजे त्यासाठी आपली क्षमता वाढणे गरजेचे आहे.
आणि ते रुग्णावर त्याच प्रकारे उपचार करतात, त्याच प्रकारे मदत करतात, त्याच प्रकारची तयारी करून घेतात आणि शरीर प्रतिसाद देण्या योग्य झाले की मग ते गांभी आजार हाताळण्याच्या दिशेने प्रयत्न करतात, शस्त्रक्रिया करतात, बाकी कशाची गरज नाही. कुठलेच शरीर तोपर्यंत पूर्णपणे सुदृढ मानले जात नाही, जो पर्यंत प्रत्येक अवयव योग्य प्रकारे काम करत नाही. आता निकष बघितले. वाजन ठीक आहे, उंची ठीक आहे, अमुक ठीक आहे, तमुक ठीक आहे. पण शरीराचा एक अवयव योग्य प्रकारे कम करत नाही, त्याला आपण सुदृढ म्हणणार का? नाही म्हणणार. त्याच प्रकारे आपल्या देशात देखील सर्व निकषांवर देश एकदम समजा विकसित देशासारखा वाटत असेल, मात्र जर का त्याचे 2, 4, 10 जिल्हे, 2, 4 तालुके मागे राहिले तर कसं वाटेल? आणि म्हणून ज्याप्रमाणे एक डॉक्टर रुग्णाच्या पूर्ण शरीराकडे लक्ष देतो आणि त्यानुसार काम करतो, ज्याप्रमाणे आपणही आपले शरीर सुदृढ म्हणजे प्रत्येक अवयव सुदृढ असणे असे मानतो, कुटुंबात देखील एखादी व्यक्ती आजारी पडली तर कुटुंबाची पूर्ण शक्ती, कुटुंबाचं पूर्ण लक्ष, कुटुंबाचे सर्व कार्यक्रम त्याच्याच अवतीभोवती फिरत राहतात, बाकी सर्व कार्यक्रमांशी तडजोड करावी लागते. कुणी आजारी पडला आहे, तर बाहेर जाण्यापासून थांबवावे लागते, कुटुंब देखील पूर्णपणे सुदृढ बनेल तेव्हाच त्या कुटुंबाचा विकास होऊ शकतो. त्याह प्रमाणे, आपला जिल्हा, आपलं गाव, आपला तालुका, सर्वांगीण विकास, सर्वसमावेशक विकास, सर्वहितकारी विकास हे जर आपण केलं नाही तर आकडे कदाचित वाढू शकतील, आकडे समाधान देखील देतील, पण मुळात परिवर्तन शक्य होत नाही. आणि यासाठी आवश्यक आहे, जमिनीवरचे प्रत्येक निकष पूर्ण करत आपण पुढे गेलं पाहिजे. आणि आपण आज य परिषदेत जे लोक माझ्यासोबत बसले आहेत, तुम्ही बघू शकता या मागे काय इच्छा आहे. इथे भारत सरकारचा उच्च चमू बसली आहे. सर्व सचिव इथे बसले आहेत जे धोरण ठरविण्याचे काम करतात, ते सर्व आहेत. आता माझ्या समोर 2 विषय आहेत मी यांना ताकद देऊन जे सर्वोच्च आहे तेच दुरुस्त करू? की जमिनीवर सक्षमीकरण करण्यासाठी काम करू, मी पर्याय निवडला आहे, जमीनीवर सक्षमीकरण करण्याचा आणि जमीनीवर सक्षमीकरण केल्यानेच हा आपला पिरामिड वर जाईल. विकासातला जो सर्वत खालचा घटक आहे तो जितका जास्त विकसित होईल, मला असं वाटतं, तितका जास्त परिणाम सध्या होईल. आणि या साठी आमचे प्रयत्न हेच आहेत की या प्रकारे विकासाला चालना दिली जावी, आपले प्रयत्न यासाठी असायला पाहिजेत. त्याच प्रकारे जसा विचार आम्ही विकास तालुक्यांचा केला आहे, मी सरकारच्या इथे बसलेल्या सचिवांना देखील आवाहन करतो. आणखी दोन दिशांना आपण काम करू शकतो, हे काम पुढे नेण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या कामासाठी, समजा पूर्ण देशात 100 तालुके निवडले. आणि त्यांना हे सगळ्या जगाला दाखवायची गरज नाही, त्यांच्या विभागात कुठले 100 तालुके पिछाडीवर आहेत. आणि जर समजा आरोग्य विभागाला असे वाटते की या संपूर्ण देशात 100 तालुके सर्वात मागे आहेत, तर भारत सरकारचा आरोग्य विभाग त्या 100 तालुक्याची स्थिती सुधारण्यासाठी एक रणनीती ठरवेल. शिक्षण विभाग आपल्या विभागासाठी 100 तालुक्यांची निवड करेल, शिक्षण विभागाचे ते 100 तालुके आहेत ते भारत सरकारचा शिक्षण विभाग हे बघेल की, आम्ही जे सर्वात पिछाडीवर असलेले 100 तालुके निवडले आहेत, मी याला, आपल्याला हे आकांक्षीत जिल्हे, आकांक्षीत तालुके हे नीती आयोगाचा कार्यक्रम बनू द्यायचे नाही. मला सरकारचा असा स्वभाव बनवायचा आहे, केंद्र आणि राज्य सरकारचा स्वभाव बनवायचा आहे. जेव्हा सगळे विभाग ठरवतील की, आमचे जे शेवटचे 100 तालुके आहेत, ते आता सरासरीच्या वर पोहोचले आहेत.तुम्ही बघाल, सगळे निकष बदलून जातील. आणि हे जे आकांक्षीत जिल्हे आहेत, तिथे कामं करण्याची पद्धत राज्य, जिल्हा आणि इथले विभाग ठरवतील. पण देशभरात या प्रकारे विचार करत आपण ही पद्धत पुढे नेऊ शकतो का? मला वाटतं आपण त्या दिशेने प्रयत्न करायला हवेत. आणि अशाप्रकारे सर्व विभागात, आणि जर कौशल्य विकासाचा प्रश्न असेल तर त्यांनी हे देखील बघावे की भारतात असे कोणते 100 तालुके आहेत जिथे मी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारे, राज्य सरकारांनी जास्त नाही, पूर्ण राज्यातून असे 100 गावे निवडावीत, संपूर्ण राज्यातून 100 गावे, जी अगदी मागास आहेत. त्या गावात 2 महिने, 3 महिन्यांची कामे गावातून किंवा बाहेरून आणावीत, मग त्यातून आपल्याला अभिसरण कसे होते, हे कळू शकेल. तिथल्या समस्यांचे निराकरण कसे होऊ शकते हे कळेल. तिथे जर कर्मचारी नाहीत, तर तिथे भरती करण्याची गरज आहे. तिथे जर युवा अधिकाऱ्यांना आणण्याची गरज आहे, तर युवा अधिकारी घेऊन जावेत. जर एकदा त्यांच्या समोर मॉडेल तयार झाले, की त्यांच्या 100 गावात त्यांनी एका महिन्यात सुधारणा केली, तर मग तेच मॉडेल गे 1000 गावांत सुधारणा करण्यासाठी वापरू शकतात. त्याच पद्धतीने काम केल्यास त्याचे तसेच परिणाम मिळतील. आज आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. आपल्याला 2047 साली आपल्या देशाला विकसित देश म्हणून बघायचे आहे. आणि विकसित देशाचा अर्थ हा नाही की दिल्ली, मुंबई, चेन्नई अशी शहरे भव्य दिसावीत आणि आपली गावे मागे पडावीत, ती अविकसित राहावीत. ते आमचे विकासाचे मॉडेल नाही. आपल्याला तर 140 कोटी लोकांचे भाग्य बदलायचे आहे. त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे. आणि त्यांच्यासाठी जे निकष निश्चित केले आहेत, ते घेऊन चालायचे आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की हे करतांना एक निकोप स्पर्धेचा भाव असावा. मी जेव्हा आकांक्षीत जिल्ह्यांच्या विकासाकडे नियमितपणे बघत होतो, मला इतका आनंद होत असे. एक तर त्या चार्ट मधे कुठलीही बनावट माहिती भरण्याची काहीच सोय नाही. जोपर्यंत प्रत्यक्ष जमिनीवरचे काम केल्याची माहिती पडताळून पाहिली जात नाही, तोपर्यंत तिथे आकडे भरण्याने काहिही होणार नाहीये. हे तर करावेच लागेल, असे काम आहे. मात्र मी बघत होती की काही जिल्ह्यांचे अधिकारी इतके उत्साही होते, की दर दोन दिवसांनी, तीन दिवसांनी ते आपल्या कामगिरीची माहिती अपलोड करत, त्यात सुधारणा करत, आणि मग मी बघत असे की सहा महिन्यांपूर्वी वाटत असे की अरे हा जिल्हा तर पुढे पोहोचला, मात्र त्यानंतरच्या 24-48 तासात असे कळत असे की अरे हा तर मागे पडला, दुसऱ्या कोणत्या तरी जिल्ह्याने बाजी मारली आहे. तर आणखी 72 तासांनी वेगळाच कोणता तरी जिल्हा पुढे गेलेला दिसत असे.
म्हणजे इतके सकारात्मक, स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले होते,त्यामुळे परिणाम साध्य करण्यात मोठा बदल झाला आहे. याचा सर्वात मोठा फायदा असा झाला आहे की माझा पूर्वीचा अनुभव आहे मी गुजरात मध्ये काम करत होतो आमच्या इथे कच्छ जिल्ह्यात एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाली तर त्याचे सहकारी विचारत असत की त्याचे सरकारशी भांडण आहे का ? मुख्यमंत्री तुझ्यावर नाराज आहेत का ?तुझा राजकारणाशी संबंधित काही प्रश्न आहे का ? तुला शिक्षा म्हणून देण्यात येणारे ठिकाण का दिले आहे ? त्याचे सहकारी त्याला असे बोलून त्याच्या डोक्यात ही बाब पक्की करत आणि त्यालाही तसेच वाटू लागत असे. मात्र कच्छ जिल्ह्यात भुकंपानंतर तिथे उत्तम अधिकाऱ्यांची आवश्यकता भासली, सर्वाना प्रोत्साहन देऊन आणण्यात आले (1.09.23) आज गुजरातमध्ये अशी परिस्थिती आहे की कच्छ जिल्ह्यात नियुक्ती मिळाली तर तो सरकारचा प्रिय अधिकारी असे मानले जाईल. म्हणजे कालपर्यंत ज्या जागी बदली म्हणजे शिक्षा असे मानले जात असे ते स्थान एक प्रकारे सन्माननीय बनले, असे घडू शकते. जे आकांक्षीत जिल्हे, अरे हा जिल्हा तर काही कामगिरीच करत नाही , बेकार आहे, राहू दे, अशी धारणा अनेक वर्षे राहिली आहे. आम्ही अशा आकांक्षीत जिल्ह्यामध्ये युवा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे धोरण अवलंबले तर अगदी वेगाने त्याचे उत्तम परिणाम दिसू लागले, कारण काही उत्तम काम करण्याचा त्यांचा उत्साह होता, 3 वर्षे हे काम केले तर सरकार मला आणखी चांगले काम देईल असा त्यांचा विचार होता आणि झालेही असेच आकांक्षी जिल्ह्यांमध्ये ज्यांनी काम केले त्यांना नंतर उत्तम ठिकाणी नियुक्ती मिळाली.
आकांक्षीत भागातल्या राज्य सरकारांना माझे आवाहन आहे आणि भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनीही लक्ष द्यावे की ज्यांनी या क्षेत्रात यशस्वी कार्य केले आहे त्यांचे भविष्यही उज्वल राहले पाहिजे,ज्यांच्या कडे काही करण्याची उमेद आहे, उत्तम कल्पना वास्तवात साकारणारे जे लोक आहेत अशा चमूना वाव दिला पाहिजे,प्रामुख्याने त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
आपल्याला आणखी एक पाहायला पाहिजे, सरकारमध्ये एक परंपरा झाली आहे. पूर्वी आपल्याकडे आउटपुट म्हणजेच एक प्रकारे काम मानले जात असे, इतके बजेट आले ते इकडे खर्च केले,इतके तिकडे खर्च केले म्हणजे बजेट खर्च केले. आउटपुट म्हणजेच एक प्रकारे यश मानले जात असे. आपण पाहिले असेल 2014 नंतर आम्ही सरकारचा फलनिष्पत्ती अर्थसंकल्प द्यायचीही सुरवात केली. अर्थसंकल्पाबरोबर आऊटकमचा अहवाल द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे गुणात्मक परिवर्तन मोठ्या प्रमाणात झाले आहे. आपल्या भागात आपणही पहा की ज्या योजनेसाठी पैसे खर्च करत आहे,ज्या योजनेसाठी इतका वेळ खर्च करत आहे, ज्या योजनेसाठी माझे इतके अधिकारी काम करत आहेत त्याची निष्पत्ती प्राप्त होते की नाही. आणि ती साध्य करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे,मित्रांनो,काही लोकांना वाटते पैसे असतील तर काम होईल, आपण विश्वास बाळगा, माझा प्रदीर्घ अनुभव आहे.सरकार चालवण्याचा मला जो अनुभव मिळाला आहे इतका प्रदीर्घ अनुभव फार कमी लोकांना मिळतो.मी अनुभवाने सांगतो की केवळ पैशामुळे परिवर्तन घडते असे नाही. आपण जर संसाधनांचा पुरेपूर उपयोग आणि परिवर्तन याकडे आपण जर लक्ष दिलेत तर आपण तालुका विकासासाठी एक नवा पैसा आणल्याशिवाय सुद्धा ते काम करू शकतो. मनरेगाचे काम सुरु आहे. तर मी जो आराखडा आखला आहे मनरेगा अंतर्गत तेच काम होईल का जे विकासाच्या माझ्या आराखड्यानुरूप असेल ?मी मनरेगाचे तेच काम करेन ज्यामुळे मला रस्त्यासाठी जी माती हवी आहे त्याच रस्त्याची माती वापरेन, म्हणजे रस्त्याचे माझे अर्धे काम तर होऊनच जाईल.परिवर्तन साध्य झाले. म्हणजे जे रूपांतरण करतात, समजा पाणी आहे, काही भागात पाण्याची टंचाई आहे आणि आपल्याला वर्षातून 3-4 महिने पाण्यासाठी परिश्रम करावे लागतात. मात्र आपण मनरेगाअंतर्गत आराखडा केलात की या भागात सर्वात जास्त तलाव बांधायचे आहेत,सर्वात जास्त पाण्याचा साठा करायचा आहे, मिशन मोड वर काम करायचे आहे तर 25 गावे जी, वर्षाचे 4 महिने पाण्यासाठी वणवण करत होती ती वणवण थांबेल, आपली शक्ती खर्च होणार नाही.
परिवर्तनात मोठी ताकद असते.आणि सुप्रशासनाची पहिली अट म्हणजे आपण संसाधनांचा पुरेपूर उपयोग करायला हवा.
आणखी एक अनुभव आला आहे,आणि माझे अनुभवाचे बोल आहेत, होते काय की, अगदी स्वाभाविक आहे की वर्गात जर इन्स्पेक्शन असेल तर हुशार विद्यार्थ्यांना शिक्षक थोडे सांगतात की जर प्रश्न विचारला तर तुम्ही लगेच हात वर करा. मी हे जाणतो,अगदी स्वाभाविक आहे,त्याला आपला दबदबा निर्माण करायचा असेल तर एक उत्तम विद्यार्थी हात वर करेल.माझे सांगण्याचे तात्पर्य इतकेच आहे ज्यामध्ये परिणाम लगेच मिळतात त्यात गुंतवणूक करण्याचा आपला स्वभाव असतो.समजा सरकारमध्ये मला एक उद्दिष्ट साध्य करायचे असेल आणि मला वाटते ही सहा राज्ये आहेत त्यांना सांगितले तर ते पूर्ण होईल. तर मी त्याच सहा राज्यांवर लक्ष केंद्रित करेन बाकी 12 राज्ये ज्यांना आवश्यकता आहे मात्र त्यांची कामगिरी फारशी चांगली नाही त्यांच्यासाठी ती संसाधने मी तिकडे जाऊ देत नाही आणि एका गोड असलेल्या चहात मी आणखी दोन चमचे साखर घालतो. होते असे की जे विकसित झाले आहेत,जे चांगली कामगिरी करत आहेत त्यांना इतके जास्त मिळते की संसाधने वाया जातात. आपण पहाल एके काळी घरोघरी मुळे शिकत असत, मी शिकत होतो तेव्हा माझ्या नशिबात असे नव्हते मात्र माझे मित्र होते त्यांना त्यांचे आई-वडील सांगत असत 10 वीला इतके गुण मिळवले तर घड्याळ देईन,12 वीला इतके गुण मिळवले तर दुसरी एखादी वस्तू भेट देईन.माझ्या काळी असे होते.आज कोणाच्याही घरात एखाद्या कोनाड्यात बघाल तर 3-4 घड्याळे अगदी सहज मिळतील.काही घड्याळाना तर सहा महिने हातही लागला नसेल.मात्र एखद्या गरीबाच्या घरी एक घड्याळ असेल तर तो 365 दिन त्याचा वापर करेल आणि त्याचा सांभाळही करेल.
जिथे संसाधने पडून आहेत तिथे अतिरिक्त संसाधने देऊन अपव्यय होत आहे.गरजेपेक्षा अधिक त्याचा अतिरिक्त वापर होतो.आणि म्हणूनच मला वाटते की, आपण आपल्या संसाधनांचे समान वितरण आणि जिथे गरज आहे तिथे विशेषकरून वितरण याची सवय आपण जर लावून घेतली तर त्यांना बळ मिळेल.आणि या दिशेने काम करायला हवे.तशाच प्रकारे तुम्ही पाहिले असेल कोणतेही काम करायचे असेल तर सर्व काही सरकार करेल या भ्रमात आपण आहोत.हा गेल्या शतकातील विचार आहे.मित्रांनो, सर्व काही सरकार करेल या विचारातून आपण बाहेर पडायला हवे.समाजाची ताकद खूप मोठी असते , तुम्ही सरकारला सांगा की तुम्ही स्वयंपाकघर चालवा, आम्हाला माध्यान्ह भोजन करायचे असेल तरी कष्टप्रद वाटते पण आमचे सरदार बंधू-भगिनी लंगर चालवतात, लाखो लोक खातात, त्यांना कधीच थकवा जाणवत नाही, हे होत आहे. समाजाची एक शक्ती असते, या समाजाच्या शक्तीत आपण भर घालतो का? माझ्या अनुभवानुसार, ज्या तालुक्यांमध्ये किंवा जिल्ह्यांमधील नेतृत्वामध्ये समाजाला एकत्र आणण्याची ताकद असते तेथे परिणाम लवकर मिळतात.
आज या स्वच्छता अभियानाने यशाच्या दिशेने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. कारण काय आहे? हे मोदींमुळे होत आहे का? 5-50 लोक झाडून काढतात म्हणून हे होत आहे का? तर नाही, आता घाण करणार नाही असे वातावरण समाजात निर्माण झाले आहे.आणि जेव्हा समाज ठरवेल की मी कचरा करणार नाही, तेव्हा स्वच्छतेची गरज भासणार नाही मित्रांनो.लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्याकडे नेतृत्वाची अत्यंत विकृत व्याख्या करण्यात आली आहे की, जो लांब कुर्ता-पायजमा आणि खादीचे कपडे घालून येतो तो नेता असतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व असते. शिक्षण क्षेत्रात नेत्यांची गरज आहे, कृषी क्षेत्रात नेत्यांची गरज आहे आणि तिथे राजकीय नेत्यांची गरजच नाही. आमचे अधिकारीही नेते आहेत, ते प्रेरणाही देतात. आपण तालुका स्तरावर नेतृत्व कशाप्रकारे तयार करू शकतो आणि या संकल्प सप्ताहात प्रत्येकी एक गट बसणार आहे,त्यांचा एक उद्देश सांघिक भावना आहे.संघ भावना निर्माण झाली तर नेतृत्व येईल, संघभावना निर्माण झाली तर लोकसहभागाच्या नवीन कल्पना समोर येतील. तुम्ही पाहिले असेल की, जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा केवळ सरकारी संसाधने ती नैसर्गिक आपत्ती हाताळू शकतात का? काही वेळातच इतक्या मोठ्या संख्येने लोक त्यात सहभागी होतात की ते काही वेळातच संकटाचे निवारण करण्यासाठी कार्यरत होतात. लोक काम करू लागतात आणि त्यावेळी आपल्यालाही वाटते की वा .. समाजाने आपल्याला खूप मोठी मदत केली,आपले काम झाले. या लोकांनी मला मदत केली आणि माझे काम झाले हे चांगले आहे, असेही त्या अधिकाऱ्याला वाटते.
तळागाळात काम करणाऱ्यांना ते माहीत आहे की, या प्रकारची समाजाची ताकद ओळखून,समाजाच्या या ताकदीला बळ द्यायला हवे. आपल्या शाळा आणि महाविद्यालये चांगली चालायला हवीत .कुटुंबातील सदस्य सहभागी झाले, पालक सहभागी झाले, पालक आले तर बघा शाळा कधीच मागे पडणार नाहीत. आणि त्यासाठी मार्ग शोधले पाहिजेत. मी नेहमी म्हणतो की , गावाचा जन्मदिवस साजरा करा, तुमच्याकडे रेल्वे स्थानक असेल तर रेल्वे स्थानकाचा जन्मदिवस शोधा, जे नोंदींमध्ये सापडेल, त्याचा जन्मदिवस साजरा करा. .
लोकसहभागाचे मार्ग असतात , लोकसहभागाचा अर्थ असा नाही की तुम्ही देणगी द्या. आता जसे की कुपोषण आहे , अंगणवाडीतील कुपोषणाच्या समस्येचे निवारण करायचे असेल तर केवळ आर्थिक तरतुदीतून होईल ? , हा केवळ एक मार्ग आहे . पण मी म्हटले तर, माझ्या गावात मी एक तिथी भोजनाचा कार्यक्रम करेन . त्या तिथी भोजनाच्या कार्यक्रमामध्ये , कुणाची जयंती, कुणाच्या आई-वडिलांचा स्मृतीदिन असेल , कुणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल तर मी त्यांना सांगेन की, बघा तुमच्या गावात जी अंगणवाडी आहे, तिथे 100 मुले आहेत, तुमचा वाढदिवस आहे, तुम्ही घरी काही चांगले अन्न खाणार असाल , करणार असाल तर असे करा, तुमच्या वाढदिवशी या 100 मुलांसाठी एक फळ आणा आणि प्रत्येक मुलाला एक केळ द्या.वाढदिवस साजरा होईल. आणि तुम्हाला स्वतःला यायचे आहे आणि त्या मुलांना द्यायचे आहे यामुळे सामाजिक न्यायही होतो, समाजात असलेली दरीही भरून निघते. आणि तुम्हाला गावात वर्षभरात 80-100 कुटुंबे नक्कीच सापडतील जी शाळेत, अंगणवाडीत येऊन त्या मुलांना चांगल्या गोष्टी खाऊ घालतील.हंगामी जी गोष्ट असेल, समजा खजूर आली तर तो म्हणेल , आज मी प्रत्येकी 2 नग घेऊन जातो आणि ही 100 मुले आहेत, त्यांना खाऊ मी घाऊ घालतो. . लोकसहभाग आहे. अर्थसंकल्पात इतकी बचत करण्यास सरकारला वाव नाही. लोकसहभागाच्या बळावर मी गुजरातमध्ये असताना तिथी भोजनाची मोहीम राबवली होती आणि सर्व धार्मिक कथाकार वगैरेही आपल्या भाषणातून लोकांना याबद्दल आवाहन करायचे.सुमारे 80 दिवस त्यावेळेचे मी सांगत आहे, आता मला माहिती नाही पण तेव्हा वर्षातले 80 दिवस असे असायचे की ते शाळेतील मुलांसोबत कुठल्या ना कुठल्या कुटूंबातील शुभ प्रसंग साजरे करायचे आणि मुलांना चांगला खाऊ द्यायचे, कुपोषणाविरुद्धही लढाही दिला जायचा आणि खाऊ घालण्याचा शिक्षकांचा ताणही हलका व्हायचा. माझे म्हणणे एवढेच आहे की समस्या सोडवण्यासाठी लोकसहभागाची ताकद खूप मोठी आहे.क्षयरोगाचेच घ्या आपल्या तालुक्यामध्ये 10 लोक जरी क्षयरोगाचे रुग्ण असतील तर क्षयरोग मित्र या योजनेशी त्यांना जोडा. आणि मी असे सांगेन की, तुम्ही त्यांना दर आठवड्याला फोन करत रहा. तुम्ही केवळ त्यांची विचारणा करत राहा 6 महिन्यांत क्षयरोग नाहीसा होईल त्यांचा . आपण जितक्या अधिक लोकांना ओळखू , त्यांना एकत्र आणण्यासाठी सुरुवातीला खूप मेहनत घ्यावी लागते पण नंतर ती शक्ती बनते.भारताचे नाव आज जगात घुमत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. वर्तमानपत्रात छापून येते, मोदींमुळे हे घडत आहे, मोदींमुळेच हे घडत आहे, मोदी सरकारची मुत्सद्दीगिरी खूप चांगली आहे, हे आहे ते आहे , मलाही असेच वाटते
पण प्रत्यक्षात आणखी एक कारण आहे ज्याकडे लोक लक्ष देत नाहीत, ते म्हणजे आपला परदेशस्थ भारतीय समुदाय. भारतातून गेलेल्या आणि त्या देशात राहणाऱ्या लोकांमध्ये जी सक्रियता आली आहे, त्यांच्यात निर्माण झालेली संघटित ताकद, त्यांचा सार्वजनिक जीवनात वाढलेला सहभाग, त्या देशांतील लोकांनाही वाटतंय की हे लोक खूपच उपयोगी आहेत. त्यामुळे भारताला उपयोगी वाटू लागला आहे. म्हणजे जर लोकसहभागाची ताकद परराष्ट्र धोरणात उपयोगी पडत असेल तर लोकसहभागाची ताकद माझ्या प्रभागातही (ब्लॉकमध्येही) सहज उपयोगी येऊ शकते मित्रांनो. आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो की या संकल्प सप्ताहाचा जास्तीत जास्त वापर करा, खुल्या मनाने चर्चा करा आणि याच्या रुपरेषेवर काम करा. त्याचप्रकारे आपल्या संसाधनांचा वापर करा. आपल्या इथे काय होतं की एका ब्लॉकमध्ये 8-10 वाहनं असतात, जास्त नसतातच आणि मोजक्याच अधिकार्यांकडे वाहनं असतात, आता दूरचा प्रवास करण्याची जबाबदारी अनेक लोकांवर असते, ज्यांच्याकडे साधनही नाही. मी गुजरातमध्ये एक प्रयोग केला होता जो खूप यशस्वी झाला. समजा एका ब्लॉकमध्ये 100 गावे असतील तर मी प्रत्येकी 10 गावे 10 अधिकाऱ्यांना दिली. आणि मी म्हणालो की तुम्ही तुमच्या गाडीतून जाल तर या पाच खात्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनाही तुमच्या गाडीत घेऊन जा, आणि महिनाभर या 10 गावांचीच काळजी घ्या. तुम्हाला सर्व विषयांवर चर्चा करायची आहे, तुम्ही कृषी विभागाचे अधिकारी असलात, तरी तुम्ही त्या गावात जाऊन शिक्षणाबाबत चर्चा कराल, शेतीबाबत चर्चा कराल, पाण्याबाबतही चर्चा कराल, जनावरांची चिंताही कराल. दुसरे, दुसरी 10 गावे, तिसरे, तिसरी. ते महिनाभर त्याच 10 गावात राहायचे आणि नंतर महिनाभरात बदल केला जायचा. अनुभव असा असायचा की आपल्या खात्यापुरताचा, कप्प्यात विचार करणं संपलं, संपूर्ण सरकार दृष्टीकोन आला आणि हे 10 अधिकारी आठवड्यातून एकदा एकत्र यायचे, त्यांचे अनुभव सांगायचे की भाऊ, मी त्या भागात गेलो होतो, माझा विभाग शिक्षण आहे पण मी शेतीबाबत या या गोष्ट पाहिल्या. पाण्याच्या क्षेत्रात… त्या संसाधनांचा योग्य वापर झाला. आणि परिणाम खूप चांगले येऊ लागले आणि 10 अधिकारी असे होते ज्यांना त्या ब्लॉकची संपूर्ण माहिती होती. ते शेती खात्याचे असतील पण त्यांना शिक्षणाचीही माहिती होती, एखाद्याचा शिक्षण विभाग असेल पण त्यांना आरोग्याचीही माहिती होती. मला वाटते की आपण आपली रणनीती बदलली पाहिजे, जर आपण आपली प्रशासनाची रणनीती बदलली आणि आपण आपल्या संसाधनांचा पुरेपूर वापर केला आणि आज संवाद ही शक्तीही आहे आणि संवादाची समस्या देखील आहे. मला वाटते की मी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे माहिती घेईन, मोबाईलच्या माध्यमातून माहिती घेईन, पण मित्रांनो, प्रत्यक्ष लोकांमधे जाण्याला पर्याय नाही, असे मला वाटते. आज मी तुमच्याशी जे काही बोलतोय, ते समजा तुम्ही तुमच्या गावात असता आणि मी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोललो असतो तर त्यात काही नवीन नसते अशी शक्यता आहे. पण इथे येऊन तुमच्याशी थेट डोळ्यात पाहून बोलल्यावर जी शक्ती येते ती व्हिडीओ कॉन्फरन्समधून येत नाही. आणि म्हणूनच आपल्या ज्या प्रत्यक्षात पार पाडायच्या जबाबदाऱ्या आहेत, त्या प्रत्यक्षातच पार पाडाव्या लागतील त्यामध्ये आपण कधीही तडजोड करू नये. जेव्हा आपण त्या ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला या आकांक्षित ब्लॉकची ताकद कळते. कदाचित पहिल्यांदाच हा सप्ताह सुरु होईल तेव्हा, हे तुमच्या आधी कधीच लक्षात आले नसेल. याआधी तुमच्या साथीदारांच्या सामर्थ्याची तुम्हाला कल्पना आली नसेल. कधी कधी तर तुम्हाला त्यांचं नावही माहीत नसेल, की ते तुम्हाला ऑफिसमध्ये रोज भेटत असतील, तुमच्यात नमस्काराची देवाणघेवाण झाली असेल, पण नावही माहीत नसेल. मात्र जेव्हा तुम्ही आठवडाभर एकत्र येता तेव्हा तुम्हाला त्यांची ताकद, त्यांची वैशिष्ट्ये कळतील आणि ते आपल्या सांघिक भावनेसाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि जेव्हा एक संघ तयार होतो तेव्हा इच्छित परिणाम आपोआप प्राप्त होतात. आणि म्हणून मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की 3 महिन्यांच्या आत, समजा आपण 30 मापदडांवर मागे आहात असे गृहीत धरू या, असे 5 मापदंड निश्चित करा ज्यामध्ये आपण पूर्णपणे राज्याच्या सरासरीच्या बाहेर याल, ते करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल मित्रांनो, जर तुम्ही 5 तर झाले मग आता 10 देखील होऊ शकतात. आणि म्हणूनच आपण शाळेत शिकलो तेव्हा शिक्षकांनी काय शिकवले? परीक्षेला बसले की आधी सोपे उत्तर लिहा. त्यामुळे शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टी आजही उपयोगी पडत आहेत, तुम्हीही आधी तुमच्याकडे असलेल्या सोप्या गोष्टी सोडवा आणि त्यातून बाहेर पडा, म्हणजे 40 गोष्टी असतील तर आधी 35 वर या. हळुहळू तुम्ही प्रत्येक समस्येवर मात कराल आणि काही वेळातच तुमचा ब्लॉक आकांक्षित मधून इतरांच्या आकांक्षा वाढवण्याची आकांक्षा बनेल. तो स्वतःच एक प्रेरणा बनेल. आणि माझा विश्वास आहे की आपले 112 जिल्हे, जे कालपर्यंत आकांक्षित जिल्हे होते, ते आज प्रेरणादायी जिल्हे बनले आहेत, एका वर्षात 500 आकांक्षित ब्लॉक्स असतील त्या 500 पैकी किमान 100 प्रेरणादायी ब्लॉक बनतील. संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ब्लॉक तयार केले जातील. आणि हे काम पूर्ण करा. मित्रांनो, मला या कार्यक्रमात तुम्हा सर्वांशी बोलण्याची संधी मिळाली याचा मला आनंद. जे माझे बोलणे ऑनलाइन ऐकत आहेत त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपण युद्धपातळीवर वाटचाल केली पाहिजे आणि मी विभागातील लोकांनाही सांगतो की संपूर्ण देशातून 100 ब्लॉक्स निवडा आणि त्यांना कालमर्यादेत राष्ट्रीय सरासरीवर आणा. प्रत्येक विभागाने या पद्धतीने काम केले पाहिजे. जमीनीस्तरावर कोणतेही काम सुटेल यावर माझा विश्वास नाही. 1-2 वर्षात सर्व कामे पूर्ण होतील. मित्रांनो, मी आत्ता तुम्हाला सांगतोय की 2024 मध्ये आम्ही ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुन्हा भेटू, आपण प्रत्यक्ष भेटू आणि आपण त्याचा आढावा घेऊ, त्यावेळी मला इथे प्रेक्षकांमध्ये बसून तुमच्यापैकी 10 लोकांच्या यशोगाथा ऐकायला आवडेल. आणि मग मला जे काही म्हणायचे आहे ते मी पुढच्या वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2024 मध्ये तुमच्याशी बोलेन. तोपर्यंत मी तुमचा जास्त वेळ घेत नाही कारण तुम्हाला तालुका लवकरात लवकर पुढे न्यायचा आहे, त्यामुळे मी आता तुमचा वेळ घेता कामा नये. खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद.
JPS/VPY/NC/RA/SBC/VG/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1964708)
Visitor Counter : 813