पंतप्रधान कार्यालय
व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
27 SEP 2023 3:27PM by PIB Mumbai
व्यासपीठावर उपस्थित गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भूपेंद्र भाई पटेल, संसदेतील माझे सहकारी, खासदार सी आर पाटील, गुजरात सरकारमधले मंत्री, उद्योगक्षेत्रातील माझे सर्व सहकारी, इतर मान्यवर आणि इथे उपस्थित माझे सर्व कुटुंबिय.
20 वर्षांपूर्वी आपण एक छोटे बी रुजवले होते. आज त्याच बी पासून हा विशाल आणि बृहद असा व्हायब्रंट म्हणजे चैतन्यमय वटवृक्ष तयार झाला आहे. व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज तुमच्यामध्ये येऊन मला प्रचंड आनंद होत आहे. मला आठवते, कित्येक वर्षांपूर्वी मी म्हटले होते, व्हायब्रंट गुजरात हा केवळ गुजरातचे ब्रँडिंग करण्यापुरता मर्यादित कार्यक्रम नाही, तर हा बॉंडिंग म्हणजे परस्परांशी जोडून घेण्याचा उत्सव आहे. जगासाठी ही यशस्वी शिखर परिषद एक ब्रॅंड असू शकते, मात्र माझ्यासाठी हे एका मजबूत बॉन्ड चे प्रतीक आहे. हा असा बंध आहे, जो माझ्या आणि माझ्या गुजरातच्या सात कोटी नागरिकांशी, त्यांच्या सामर्थ्यांशी जोडला गेला आहे. हा असा बंध आहे, जो माझ्याविषयीच्या त्यांच्या अमर्याद स्नेहातून जोडला गेला आहे.
मित्रांनो,
आज मला स्वामी विवेकानंद यांची एक गोष्ट ही आठवते आहे. स्वामी विवेकानंद जी यांनी म्हटले होते, की प्रत्येक कामाला तीन टप्पे पार करावे लागतात. “पहिल्यांदा लोक तुमची गंमत करतात, कुचेष्टा करतात, नंतर ते तुम्हाला विरोध करतात आणि त्यानंतर ते त्याचा स्वीकार करतात.” आणि विशेषतः तेव्हा, जेव्हा तुमचा विचार, तुमची कल्पना काळाच्या पलिकडची असते तेव्हा. 20 वर्षे हा एक मोठा कालखंड आहे. आजच्या पिढीतल्या युवा मित्रांना कदाचित माहीतही नसेल, की 2001 मध्ये आलेल्या भूकंपानंतर गुजरातची परिस्थिती कशी होती. भूकंपाच्या आधी देखील दीर्घकाळ गुजरात दुष्काळाशी लढा देत होता. त्यानंतर जो भूकंप आला, त्यात तर हजारो लोकांचा बळी गेला. लाखों लोकांना त्याचा फटका बसला, लोकांनाआपले घर देखील सोडावे लागेल होते. दुष्काळ आणि भूकंपाशिवाय, त्या काळात गुजरात मध्ये आणखी एक मोठी घटना झाली होती.
माधवपुरा मर्केंटाइल कोऑपरेटिव बैंक दिवाळखोर झाली होती. आणि त्याचा फटका, आणखी 133 सहकारी बँकांना बसला होता, या सगळ्या बँकांच्या व्यवहारावर विपरीत परिणाम झाला होता. एका अर्थाने गुजरातमधील वित्तीय क्षेत्रच त्यावेळी संकटात सापडले होते. मी त्यावेळी पहिल्यांदा आमदार बनलो होतो, ती भूमिका माझ्यासाठी नवीन होती. सरकार चालवण्याचा काहीही अनुभव नव्हता. मात्र आव्हान खूप मोठे होते. त्याच काळात आणखी एक घटना घडली. गोध्रामधली ती हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आणि त्यानंतरच्या काळात, गुजरात हिंसेच्या आगीत होरपळून निघाले. अशा बिकट परिस्थितीची कदाचित कोणीच कल्पनाही केली नसेल. मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे त्यावेळी फार काही अनुभव नव्हता. मात्र, माझा गुजरातवर, आपल्या गुजरातच्या लोकांवर अतूट विश्वास होता. तसे तर, जे लोक एक अजेंडा घेऊन चालतात, ते त्यावेळी देखील, या सगळ्या घटनांचे आपल्या पद्धतीने, त्यांना हवे तसे विश्लेषण करण्यात व्यस्त होते. असे सांगितले गेले होते, गुजरातमधून युवक, गुजरातमधील उद्योग, गुजरातमधील व्यापारी सगळे लोक इथून निघून जातील. इथून पलायन करतील आणि गुजरात तर असे उद्ध्वस्त होईल, की देशावरचे एक ओझे बनून राहील. सगळ्या जगभरात गुजरातला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचले गेले. एक निराश वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न केले गेले. असे सांगितले गेले, की गुजरात आता कधीही आपल्या पायांवर उभे राहू शकणार नाही. त्या संकटाच्या स्थितीतही मी संकल्प केला होता, कितीही विपरीत परिस्थिती आली, तरी मी गुजरातला या संकटातून नक्की बाहेर काढेन. आम्ही केवळ गुजरातची पुनर्रभारणी नाही, तर त्याच्या पुढचा देखील विचार करत होतो. आणि त्याचे प्रमुख माध्यम आम्ही बनवले, व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेला. ही परिषद गुजरातचा आत्मविश्वास वाढवण्याचे आणि त्या माध्यमातून, जगाशी डोळ्याला डोळा भिडवून चर्चा करण्याचे माध्यम ठरली. ही परिषद गुजरात सरकारची निर्णय प्रक्रिया आणि निश्चित केंद्र असलेला दृष्टिकोन, संपूर्ण जगासमोर आणण्याचे एक माध्यम ठरली. ही गुजरात सह भारताच्या औद्योगिक क्षमता जगापुढे आणण्याचे माध्यम ठरली. ही परिषद, भारतात अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रांच्या अमर्याद संधी आणि क्षमता दाखवण्याचे माध्यम ठरली. ही भारताच्या गुणवत्तेचा देशात वापर करण्याचे माध्यम ठरली. भारताची दिव्यता, भव्यता आणि सांस्कृतिक वारसा जगासमोर दाखवण्याचे माध्यम ठरली. आम्ही त्यावर अत्यंत बारकाईने काम केले होते. आणि त्याचा एक पुरावा म्हणजे, व्हायब्रंट गुजरातच्या आयोजनाची वेळ आहे. आम्ही व्हायब्रंट गुजरात तेव्हा आयोजित केले होते, जेव्हा गुजरातमध्ये नवरात्री आणि गरब्याचा उत्सव असतो. आम्ही या परिषदेला गुजरातच्या औद्योगिक विकासाचे एक पर्व बनवले होते.
मित्रांनो,
आज मी तुम्हा सर्वांना आणखी एका गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो. 20 वर्षे होत आहेत. अशा प्रकारच्या भल्या बुऱ्या आठवणी येणे अत्यंत साहाजिक आहे. आज सगळे जग व्हायब्रंट गुजरातचे यश बघत आहे. मात्र व्हायब्रंट गुजरातचे आयोजन आम्ही अशा काळात केले होते, जेव्हा, तत्कालीन केंद्र सरकार देखील गुजरातच्या विकासाबद्दल उदासीन होते. मी कायमच असे म्हटले आहे, की गुजरातच्या विकासातून देशाचा विकास. मात्र त्या काळात केंद्र सरकार चालवणारे लोक गुजरातच्या विकासाकडे देखील राजकारणाच्या नजरेतून बघत असत. केंद्र सरकारमधील मंत्री तेव्हा व्हायब्रंट गुजरात परिषदेला उपस्थित राहण्यास नकार देत असत. वैयक्तिक पातळीवर तर मला सांगत असत, की आम्ही नक्की येऊ, मात्र नंतर मागून काय दंडुका पडत असे, कोणजाणे, मात्र ते नकार देत असत. सहकार्य तर दूरचीच गोष्ट आहे, उलट आडकाठी आणण्याचा त्यांचा प्रयत्न असे. परदेशी गुंतवणूकदारांना धमक्या दिल्या जात की गुजरातला नका जाऊ. मात्र, इतक्या धमक्या मिळाल्यानंतरही परदेशी गुंतवणूकदायर गुजरातला आले. आणि खरेतर, इथे गुजरातमध्ये त्यांना काही विशेष सवलत दिली जात नसे. ते इथे येत, कारण इथे सुप्रशासन, पारदर्शक प्रशासन, धोरणप्रणित प्रशासन आणि विकसाची सर्वांना समान संधी असे अनुभव त्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात येत असत.
आपण कल्पना करू शकता, जेव्हा आम्ही व्हायब्रंट गुजरातची सुरुवात केली होती, तेव्हा गुजरातला मोठमोठे हॉटेल्स देखील नव्हते, जिथे इतक्या सगळ्या परदेशी पाहुण्यांची सोय करता येईल. तेव्हा सगळे सरकारी अतिथीगृहे देखील भरून जात. मग आमच्यासमोर हा प्रश्न असे की आता इतर सगळ्या लोकांची व्यवस्था कुठे करायची ? अशा परिस्थितीत, अनेक उद्योगसमूहांना देखील मी विनंती केली, की जर तुमचे काही अतिथीगृह असतील, तर ते देखील आम्हाला द्या. म्हणजे आम्ही पाहुण्यांची व्यवस्था करू शकू. विद्यापीठातील अतिथीगृहे देखील आम्ही वापरत असू, त्यांच्या अतिथीगृहात पाहुण्यांची व्यवस्था करत असू. काही लोकांना तर बडोद्याला पण थांबावे लागले होते.
मित्रांनो,
मला आठवते, 2009 मध्ये जेव्हा व्हायब्रंट गुजरातचे आयोजन केले गेले होते, तेव्हा संपूर्ण जगात मंदीचे वातावरण होते, जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली होती. आणि सर्वांनी मला सांगितले, आमचे अधिकारी मला सांगत होते, की सर यावेळी व्हायब्रंट गुजरात रद्द करूया, ते काही यशस्वी होणार नाही, कोणी येणार नाही. मात्र मी त्यावेळी देखील सांगितले होते, नाही, हे थांबणार नाही, हे होणार आणि जर अपयश आले तर टीका होईल, आणखी काय होईल, मात्र त्याचे सातत्य तुटायला नको.
आणि त्या काळात, जेव्हा जगभरात मंदीचे वातावरण होते, तेव्हा म्हणजे 2009 साली देखील व्हायब्रंट गुजरात यशस्वी झाले, आणि यशाच्या या मालिकेत आणखी एक नवा अध्याय जोडला गेला.
मित्रांनो,
व्हायब्रंट गुजरातचे यश त्याच्या विकासाच्या प्रवासावरूनही समजू शकते. 2003 मध्ये सुमारे 100 जण आणि प्रतिनिधी या शिखर परिषदेशी संबंधित होते. खूप छोटा कार्यक्रम होता. आज या शिखर परिषदेत 40 हजाराहून अधिक लोक आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. 2003 मध्ये या शिखर परिषदेत फक्त काही देश सहभागी झाले होते, आज 135 देश यात सहभागी झाले आहेत. 2003 मध्ये या शिखर परिषदेच्या सुरुवातीला सुमारे 30 प्रदर्शक आले होते, आता 2 हजारांहून अधिक प्रदर्शक या परिषदेत सहभागी होतात.
मित्रांनो,
व्हायब्रंट गुजरातच्या यशामागे अनेक विशिष्ट कारणे आहेत. त्याच्या यशामागे अभिनव कल्पना, कल्पनाशक्ती आणि उत्तम अंमलबजावणी यासारख्या मूलभूत घटकांचा समावेश आहे. अभिनव कल्पनेविषयी सांगायचे झाल्यास, व्हायब्रंट गुजरात ही एक अत्यंत वेगळी संकल्पना होती, ज्याबद्दल भारतात फार कमी लोकांनी ऐकले होते. पण कालांतराने मिळालेल्या यशाने त्याचे महत्त्व लोकांना समजले. काही काळानंतर, इतर राज्यांनीही स्वतःचा व्यवसाय आणि गुंतवणूकदार परिषदा आयोजित करण्यास सुरुवात केली. आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे कल्पनाशक्ती. आम्ही वेगळा विचार करण्याचे धाडस केले.
त्या काळात आम्ही, राज्य पातळीवर खूप मोठ्या गोष्टीचा विचार करत होतो, जे देशपातळीवरही होऊ शकले नाही. एका देशाला, तेही विकसित देशाला, आपला भागीदार देश बनवण्याचे धाडस आम्ही दाखवले. एखादे छोटं राज्य जगातील विकसित देशाचा भागीदार देश होण्याचा विचार आज विचित्र वाटू शकतो.जरा कल्पना करा त्यावेळी काय झालं असेल? पण आम्ही केले. देशातील एकाच राज्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती.
मित्रांनो,
तुमच्या अभिनव कल्पना आणि कल्पनाशक्ती कितीही चांगली असली तरी, संपूर्ण यंत्रणा एकत्रित करणे आणि अपेक्षित परिणाम देणे खूप महत्वाचे असते.
हे एक असे काम आहे ज्यासाठी व्यापक नियोजन, क्षमता वाढीमध्ये गुंतवणूक, बारीकसारीक तपशीलाकडे लक्ष आणि अथक परिश्रम आवश्यक आहेत, जेणेकरून इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करता येईल. मी पूर्वीही सांगितले आहे, तेच अधिकारी, तीच संसाधने आणि त्याच नियमांसह, आम्ही असे काहीतरी केले, ज्याचा कोणीही विचार केला नव्हता.
मित्रहो,
व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेची आणखी एक ओळख लक्षात घेण्यासारखी आहे. आज व्हायब्रंट गुजरात वर्षातून एकदा आयोजन होणारा कार्यक्रम राहिला नसून एक संस्था बनली आहे, ज्याची यंत्रणा आणि प्रक्रिया सरकारच्या आत आणि बाहेर वर्षभर सुरूच असते. मुख्यमंत्री बदलले, बहुतेक सर्व जुने आघाडीचे अधिकारी निवृत्त झाले, जे 2001 मध्ये पहिल्यांदाच गुजरातमध्ये आले असावेत, ते अधिकारी आज गुजरातचा कारभार सांभाळत आहेत. ते आता वरिष्ठ झाले आहेत. काळ बदलला, पण एक गोष्ट बदलली नाही. प्रत्येक वेळी व्हायब्रंट गुजरात यशाची नवी शिखरे गाठत राहिला. हे यामुळे घडले कारण आम्ही प्रक्रिया संस्थात्मक केल्या. हे जे सातत्यपूर्ण यश आहे त्याचा आधार हीच ताकद आहे. आणि त्यासाठी पायाभूत सुविधांवरही तेवढाच भर दिला, कधी टागोर हॉलमध्ये कार्यक्रम झाले, कधी सायन्स सिटीमध्ये तंबू उभारून कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि आज महात्मा मंदिर झाले.
मित्रहो,
ज्या भावनेने आपण व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद पुढे नेली , तसे आपल्या देशात क्वचितच पाहायला मिळते. आम्ही ही शिखर परिषद गुजरातमध्ये आयोजित करायचो , मात्र आम्हाला या माध्यमातून प्रत्येक राज्याला फायदा मिळवून द्यायचा होता. आमची ही विचारसरणी समजून घेऊ शकलेले फार कमी लोक आहेत. ते आपापल्या कोषात संकुचित होऊन बसले आहेत. त्यावेळी गुजरातचा एक मुख्यमंत्री देशातील मुख्यमंत्र्यांना विनंती करायचा की, शिखर परिषद होत आहे, तुम्हीही तुमचा ध्वज फडकवा, तुम्हीही तुमचा स्टॉल लावा, तुम्हीही चर्चासत्रेही घ्या. इतर राज्यांनाही व्हायब्रंट गुजरात परिषदेत सहभागी होण्याची संधी दिली जात होती. आम्ही राज्यांना आमंत्रित केले होते. तुम्हीही या, तुमची ताकद इथे लावा आणि लाभ घ्या. आम्ही एक राज्य परिसंवाद आयोजित केला ज्यामध्ये अनेक राज्ये सहभागी व्हायची आणि व्हायब्रंट समिट दरम्यान, कुठे ओदिशा शिखर परिषद सुरू आहे, कुठे तेलुगू शिखर परिषद सुरू आहे, कुठे हरियाणा, जम्मू आणि काश्मीर शिखर परिषद सुरू आहे. याशिवाय गुजरातमध्ये आयुर्वेदाची राष्ट्रीय परिषद, पुरोगामी भागीदाराची एक मोठी शिखर परिषद, अखिल भारतीय विधिज्ञ शिखर परिषद , अशा विविध प्रकारच्या शिखर परिषदांचे नियमित आयोजन करायचो. गुजरातचाही विकास देखील आम्ही राष्ट्रीय दृष्टिकोनातून करत होतो.
मित्रहो,
20 व्या शतकात आपले गुजरात, आपली ओळख काय होती? एक व्यापारी राज्य म्हणून आपली ओळख होती. एका ठिकाणाहून घ्यायचे आणि दुसऱ्या ठिकाणी द्यायचे. मध्ये जी काही दलाली मिळायची त्यावर गुजराण करत होतो. ही आमची ओळख होती. मात्र 20 व्या शतकातील ती प्रतिमा बाजूला सारून, 21 व्या शतकात गुजरात हे व्यापाराबरोबरच एक कृषी महासत्ता बनले, एक आर्थिक केंद्र बनले आणि एक औद्योगिक आणि उत्पादन परिसंस्था म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. याशिवाय गुजरातची व्यापार आधारित ओळख देखील बऱ्यापैकी मजबूत झाली आहे. या सगळ्यामागे व्हायब्रंट गुजरातसारख्या कार्यक्रमांचे यश आहे, जे कल्पना, नवोन्मेष आणि उद्योगांचे इनक्यूबेटर म्हणून काम करत आहे. आमच्याकडे गेल्या 20 वर्षांतील हजारो यशोगाथा आणि अभ्यास प्रबंध आहेत. प्रभावी धोरण आखणी आणि कार्यक्षम प्रकल्प अंमलबजावणीमुळे हे शक्य होऊ शकते. वस्त्रोद्योग आणि परिधान वस्त्र उद्योगांमध्ये गुंतवणूक आणि रोजगारामध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. त्यामुळे आपली निर्यातही विक्रमी होत आहे. गेल्या दोन दशकांत आम्ही विविध क्षेत्रात नवीन उंची गाठली आहे. 2001 च्या तुलनेत वाहन निर्मिती क्षेत्रातील आमची गुंतवणूक जवळपास 9 पटीने वाढली आहे. आमचे उत्पादन 12 पटीने वाढले आहे. रासायनिक क्षेत्रात गुजरात देशातील आणि जगातील अनेक कंपन्यांची पसंती बनले आहे. आज भारतातील रंग (डाय ) आणि अन्य सहाय्यक उत्पादनात गुजरातचे योगदान सुमारे 75 टक्के आहे. देशातील कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगातील गुंतवणुकीत गुजरातचा वाटा सर्वाधिक आहे. आज गुजरातमध्ये 30 हजारांहून अधिक अन्न प्रक्रिया उद्योग कार्यरत आहेत. औषध निर्मिती क्षेत्रात, गुजरात नवोन्मेष -प्रणित , ज्ञान-केंद्रित फार्मा उद्योग म्हणून उदयास येत आहे. वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीमध्ये गुजरातचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक आहे आणि कार्डियाक स्टेंट्सच्या निर्मितीमध्ये सुमारे 80 टक्के वाटा आहे. रत्न आणि आभूषण उद्योगात गुजरातचे यश अद्भुत आहे. जगातील प्रक्रिया युक्त हिऱ्यांमधील 70 टक्क्यांहून अधिक वाटा गुजरातचा आहे. भारतातील हिऱ्यांच्या निर्यातीत गुजरातचा वाटा 80 टक्के आहे. सिरॅमिक क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर, गुजरातच्या एकट्या मोरबी क्षेत्राचा देशाच्या सिरॅमिक बाजारपेठेत 90 टक्के वाटा आहे. येथे सिरेमिक टाइल्स, सॅनिटरी वेअर आणि विविध सिरॅमिक उत्पादनांचे सुमारे 10 हजार कारखाने आहेत. गुजरात भारतातील अव्वल निर्यातदारांपैकी देखील एक आहे. गेल्या वर्षी राज्यातून सुमारे 2 अब्ज डॉलरची निर्यात झाली. आगामी काळात संरक्षण उत्पादन हे खूप मोठे क्षेत्र असेल.
मित्रहो,
आम्ही व्हायब्रंट गुजरात सुरू केले तेव्हा आमचा हेतू होता की हे राज्य देशाच्या प्रगतीचे विकास इंजिन बनले पाहिजे. मी काय म्हणतोय ते समजतंय का? आम्ही इथे काम करत होतो तेव्हा आमची कल्पना होती, स्वप्न होते की गुजरात देशाचे विकास इंजिन बनावे , काही मोजक्याच लोकांना तर समजले. हे स्वप्न प्रत्यक्षात साकारताना देशाने पाहिले आहे. 2014 मध्ये, जेव्हा आम्हाला देशाची सेवा करण्याची संधी दिली गेली, तेव्हा आमचे लक्ष्य देखील विस्तारले आणि भारताला संपूर्ण जगाचे विकास इंजिन बनवण्याचे आमचे लक्ष्य होते. आज आंतरराष्ट्रीय संस्था आणि तज्ञ याच सुरात बोलत आहेत. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आता आपण एका वळणावर उभे आहोत जिथे भारत जागतिक आर्थिक महासत्ता बनणार आहे. आता भारताला जगाची आणि तुम्हाला आमची हीच हमी आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यांसमोर पाहाल, काही वर्षातच भारत जगातील पहिल्या अव्वल 3 मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सामील होईल. ही मोदींची हमी आहे. म्हणून, मी येथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांना आणि भारतीय उद्योगजगतालाही आवाहन करू इच्छितो. तुम्ही सर्वांनी अशा क्षेत्रांचा विचार केला पाहिजे जिथे भारत स्वतःसाठी नवीन क्षमता निर्माण करू शकेल किंवा आपली स्थिती आणखी सुधारू शकेल. व्हायब्रंट गुजरात या मिशनला कशी गती देऊ शकेल याचाही विचार आपण करायला हवा. शाश्वततेच्या बाबतीत आज भारत ज्याप्रमाणे जगाचे नेतृत्व करत आहे.या परिषदेचा आपल्या स्टार्टअप परिसंस्थेला जास्तीत जास्त फायदा कसा मिळू शकेल याचाही विचार करावा लागेल. आज ऍग्रीटेक - कृषी तंत्रज्ञान हे एक उदयोन्मुख क्षेत्र आहे. अन्न प्रक्रिया क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. श्री-अन्नाच्या वाढत्या वापरामुळे, आज आपल्या भरड धान्याला जगातील मोठमोठ्या भोजन समारंभात जेवणाच्या टेबलावर स्थान मिळाले आहे. श्रीअन्नाच्या वापरामुळे नवीन संधी निर्माण होत आहेत. प्रक्रिया, पॅकेजिंग, त्यात बदल आणि जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याच्या शक्यता अनेक नव्या संधी घेऊन आल्या आहेत.
आजच्या मुळापासून जोडलेल्या जगात, आर्थिक सहकार्याच्या संस्थांची गरज झपाट्याने वाढत आहे.गुजरातमध्ये आधीपासूनच एक गिफ्ट सिटी आहे, ज्याची प्रासंगिकता दिवसेंदिवस वाढत आहे. गिफ्ट सिटीमध्ये आमच्या संपूर्ण सरकारी दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दिसते. येथे केंद्र, राज्य आणि आयएफएससी अधिकारी जगातील सर्वोत्तम नियामक वातावरण तयार करण्यासाठी एकत्र काम करतात. जागतिक स्तरावर तिला स्पर्धात्मक वित्तीय बाजारपेठ बनवण्यासाठी आपण प्रयत्न गतिमान केले पाहिजेत. यासाठी आपण आपल्या मोठ्या देशांतर्गत मागणीचा फायदा घेऊ शकतो. व्हायब्रंट गुजरातसमोर उद्दिष्ट आहे गिफ्ट सिटीला अधिक बळकट कसे करायचे जेणेकरून त्याचे जागतिक अस्तित्व वाढेल.
मित्रहो,
व्हायब्रंट गुजरातच्या यशाची चर्चा करताना मी असेही म्हणेन की ही थांबण्याची वेळ नाही. मागील 20 वर्षांपेक्षा पुढील 20 वर्षे अधिक महत्त्वपूर्ण आहेत. व्हायब्रंट गुजरातला जेव्हा 40 वर्षे पूर्ण होतील तेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाच्या जवळ पोहचला असेल. हीच वेळ आहे जेव्हा भारताला असा मार्गदर्शक आराखडा बनवावा लागेल, जो 2047 पर्यंत एक विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून आपण जगासमोर प्रस्थापित करू. मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण या दिशेने नक्कीच काम कराल, नक्कीच पावले उचलाल , नक्कीच पुढे याल. आता जानेवारीत व्हायब्रंट शिखरपरिषद होणार आहे. राज्य सरकार आणि इथले उद्योग जगतातील सहकारी पूर्ण ताकदीने मेहनत करत असतील, पण माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आज जेव्हा तुम्ही मला बोलावलेत, तेव्हा मीही 20 वर्षांनी लहान झालो आणि त्या जुन्या आठवणींमध्ये हरवून गेलो, त्या कठीण काळातून गुजरातला कसे बाहेर काढले आणि आज कुठे पोहोचले आहे? जीवनात यापेक्षा मोठे समाधान काय असू शकते मित्रांनो? त्या 20 वर्षांचे पुन्हा स्मरण केल्याबद्दल मी पुन्हा एकदा गुजरात सरकारचे अभिनंदन करतो. तुमच्यामध्ये सहभागी होऊन जुने दिवस आठवण्याची संधी दिलीत, मी खूप आभारी आहे, खूप खूप शुभेच्छा.
***
Jaydevi/Radhika/Sushama/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1963592)
Visitor Counter : 134