युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील नेमबाजी, सेलिंग, वुशू, टेनिसमधील पदक विजेत्यांचा केला सत्कार आणि रोख बक्षिसे केली प्रदान

Posted On: 02 OCT 2023 9:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑक्‍टोबर 2023

 

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये नेमबाजी, सेलिंग, वुशू, टेनिस प्रकारात पदकं जिंकून मायदेशी परतलेल्या खेळाडूंचा सत्कार केला.

या कार्यक्रमात बोलताना अनुराग सिंह  ठाकूर यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांच्या कामगिरीचा  देशाला अभिमान वाटल्याचे ते म्हणाले. त्यांनी खेळाडूंना त्यांनी निवडलेल्या खेळात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक ते  सर्व सहकार्य पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. "मी सर्व खेळाडूंना माझ्या शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की (आशियाई क्रीडा स्पर्धेची) अंतिम फेरी होईल तेव्हा भारताच्या खेळाडूंनी मोठ्या संख्येने पदके जिंकली असतील. लवकरच पॅरिस ऑलिम्पिक होणार आहे आणि सर्वांच्या नजरा त्याकडे आहेत. पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच खेळाडूंना सर्व खेळांमध्ये 100 टक्के योगदान देण्यास प्रोत्साहन दिले आहे,” असे ते म्हणाले.

त्यांनी महासंघाचे  महत्त्व आणि खेळाडूंना  पाठिंबा देण्यासाठी टॉप्स आणि खेलो इंडिया सारख्या सरकारच्या योजनांबद्दल देखील सांगितले.  ते म्हणाले, "महासंघाची मोठी भूमिका आहे. 2014 मध्ये क्रीडापटूंना सुविधा पुरवण्यासाठी आणि त्यांचे खेळावर  लक्ष केंद्रित राहावे या उद्देशाने टॉप्स योजना  सुरू करण्यात आली होती. खेलो इंडिया योजनेनेही अशीच मदत पुरवली. आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंतची सर्वाधिक पदके पटकावल्याबद्दल मी  नेमबाजी महासंघाचे (NRAI) अभिनंदन करतो. 2002 मध्ये आपण नेमबाजीत दोन पदके जिंकली होती, तर यावेळी आपल्याला  22 पदके मिळाली.

  

“आम्ही पॅरिस मध्ये नेमबाजीवर  एकूण 38 कोटी रुपये खर्च केले. एशियाडच्या आधी वुशूसाठी 1.8 कोटी रुपये खर्चून शिबिरे आयोजित केली होती.  आता आशियाई क्रीडा स्पर्धा  संपायला अजून 7 दिवस शिल्लक  आहेत, आणि मला खात्री आहे कि यावेळी आपली आतापर्यंतची सर्वोच्च पदकसंख्या असेल" . असे ते म्हणाले.

हँगझोऊ स्पर्धेत यश मिळवण्यात मदत केल्याबद्दल खेळाडूंनी सरकार आणि त्यांच्या सहाय्यक चमूचे देखील  आभार मानले.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1963434) Visitor Counter : 104