पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरात बोडेली, छोटे उदेपूर इथल्या विविध प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

Posted On: 27 SEP 2023 10:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2023

भारत मातेचा विजय असो!

भारत मातेचा विजय असो!!

व्यासपीठावर बसलेले गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. भूपेंद्रभाई पटेल, माझे संसदेतील सहकारी गुजरात भाजपाचे अध्यक्ष श्री. सी.आर. पाटील, गुजरात सरकारचे सर्व मंत्री, राज्य पंचायतींचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो,

कसे आहात सगळे, जरा जोरात बोला! मी खूप दिवसांनी बोडेलीला आलो आहे.  पूर्वी कदाचित वर्षातून दोन-तीन वेळा इथे येणं व्हायचं  आणि त्याआधी संघटनेत काम करत असताना मी रोज बोडेलीला जायचो.  थोड्याच वेळापूर्वी, मी गांधीनगरमध्ये व्हायब्रंट गुजरातची (वेगात घोडदौड सुरु असलेल्या गुजरातची) 20 वर्षे साजरी करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात होतो.  20 वर्षे उलटून गेली आहेत, आणि आता मला बोडेली, छोटा उदेपूर, उंबरगांव ते अंबाजीपर्यंतचा संपूर्ण भाग, अनेक विकास प्रकल्पातील माझ्या आदिवासी बांधवांना भेटण्याची संधी मिळाली आहे.  आताच, मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे, येत्या काळात होऊ घातलेल्या 5000 कोटींहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांसाठी, काहींची पायाभरणी आणि काहींचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली आहे.  आता गुजरातमधील 22 जिल्हे आणि 7500 हून अधिक ग्रामपंचायतींना वाय-फाय देण्याचे काम आज पूर्ण झाले आहे, आम्ही ई-ग्राम, विश्व ग्राम सुरू केले होते, ही ई-ग्राम, विश्व ग्रामची एक झलक आहे.  त्यातच खेड्यापाड्यात राहणाऱ्या लाखो ग्रामस्थांसाठी हा मोबाईल आणि इंटरनेट नवीन नाही, गावातील माता-भगिनींनाही आता त्याचा वापर माहीत आहे आणि मुलगा बाहेर काम करत असेल तर त्या त्याच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सवर (दूरदृष्टी प्रणालीच्या माध्यमातून) बोलतात.  आता आपल्या गावातील माझ्या सर्व वडिलधाऱ्या बंधू-भगिनींना अतिशय कमी खर्चात उत्तम इंटरनेट सेवा मिळू लागली आहे.आणि तुम्हाला मिळालेल्या या उत्तम अशा भेटीसाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

मी छोटे उदेपुरात किंवा या इथे बोडेलीत जेव्हा फिरतो तेव्हा इकडचे लोक असे म्हणतात की आमचा छोटे उदेपूर जिल्हा मोदी साहेबांनी दिला आहे, असे म्हणता ना! कारण मी जेव्हा इथे असायचो तेव्हा छोटे उदेपूर हून बडोद्याला जाण्यासाठी खूप वेळ लागायचा, बडोदा खूप दूर होते आणि ही गोष्ट मला माहित होती! एवढा त्रास व्हायचात्यामुळे मी आता सरकारलाच आपल्या परसदारामध्ये घेऊन आलो आहे. लोक आजही आठवण काढतात की नरेंद्र भाईंनी कितीतरी मोठमोठ्या योजना, मोठमोठे प्रकल्प आपल्या पूर्ण उंबरगावापासून ते अंबाजी पर्यंतच्या आदिवासी क्षेत्रात सुरू केले. मात्र, माझे तर मुख्यमंत्री व्हायच्या आधीपासूनच इथल्या धरणी मातेशी एक नाते राहिले आहे, इथल्या गावांशी माझे नाते राहिले आहे, इथल्या आदिवासी कुटुंबियांशी माझे नाते जोडले गेले आहे आणि ही सर्व नाती मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनल्यानंतर निर्माण झालेली नाहीत, तर त्याही आधीपासून निर्माण झाली आहेत आणि तेव्हा तर मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून इथे यायचो आणि छोटे उदेपूर मध्ये यायचो तेव्हा लेले दादांच्या झोपडीमध्ये जायचो आणि लेले दादा…..इथे कितीतरी लोक असतील ज्यांनी लेले दादांसोबत काम केले असेल आणि या इथे या बाजूला दाहोद पासून उंबरगाव पर्यंत, संपूर्ण क्षेत्र पहा; मग ते लिमडी असो वा संतरामपूर असो, झालोद असो वा दाहोद असो, गोधरा… हालोल… कालोल…..तेव्हा तर माझा मार्गच हा असायचा. बसनेइथे यायचे आणि सगळ्यांना भेटून काही कार्यक्रम असतील ते पार पडून निघून जायचे. कधी वेळ असला तर कायावरोहणेश्वरला जायचो, भोलेनाथ महादेवाच्या चरणी लीन व्हायचो. मालसर, पोरगांव, नाही तर पोर मध्ये किंवा मग नारेश्वर इथे सुद्धा माझे खूप जाणे व्हायचे. करनाळीला खूप वेळा जायचो, अगदी सावलीलासुद्धा जायचो आणि सावलीत तर जे शिक्षणाचे कार्य सुरु असायचे  तेव्हा एक स्वामीजी होते. कितीतरी वेळा त्यांच्याशी सत्संग करण्याची(पवित्र सहवासात रमण्याची) संधी मिळायची.  भादरवाबाबत बोलायचे झाले तर अगदी दीर्घकाळापर्यंत भादरवाच्या विकास यात्रेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली. याचाच अर्थ असा होतो की माझे या संपूर्ण विकास प्रक्रियेशी नाते खूप जवळचे राहिले आहे. कितीतरी गावांमध्ये मी रात्रीचा मुक्काम करायचो. कितीतरी गावांमध्ये अनेकांशी चर्चा-गप्पागोष्टी केल्या असतील आणि बऱ्याच वेळा सायकलवर, नाही तर मग पायीतर कधी बस मध्ये…. जे कुठले वाहन मिळेल ते घेऊन आपल्या सर्वांसोबत मी काम करत राहायचो आणि इथे माझी कितीतरी जुनी मित्रमंडळी आहे.

आज मी सी आर पाटील आणि भूपेंद्र भाईंचे आभार मानतो कारण जेव्हा मला या जीप मधून यायची  संधी मिळाली, तेव्हा खूप जुन्या लोकांचे दर्शन घडण्याची संधी मला मिळाली, सगळ्यांसोबत माझी भेट झाली, कितीतरी जुन्या लोकांसोबतच्या जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला… कितीतरी कुटुंबांसोबत माझे नाते राहिले आहे…. कितीतरी घरांमध्ये माझे उठणे-बसणे व्हायचे…. आणि मी, छोटा उदेपूरच नाही तर इथली संपूर्ण स्थिती-परिस्थिती अगदी खूप जवळून बघितली आहे, या संपूर्ण आदिवासी क्षेत्राची खडा न खडा माहिती मला आहे आणि आता सरकार मध्ये आल्यापासून मला याची पूर्ण जाणीव आहे की मला या संपूर्ण क्षेत्राचा विकास करायचा आहे, आदिवासी क्षेत्राचा विकास करायचा आहे आणि त्यासाठीच कितीतरी विकास योजना मी सुरु केल्या आहेत आणि या सर्व योजनांचा आता सर्वांना लाभही मिळत आहे. कितीतरी उपक्रम सुरू केले आणि आज या सर्व गोष्टींचे सकारात्मक लाभ सुद्धा वास्तवात मिळत असलेले दिसत आहेत. इथे मला चार-पाच छोटी मुले…. छोटी मुलेच म्हणेन, कारण 2001-2002 मध्ये जेव्हा ती छोटी मुले होती तेव्हा मी त्यांचे बोट पकडून त्यांना शाळेत घेऊन गेलो होतो….आज त्यांच्यापैकी कुणी डॉक्टर बनला आहे, कुणी शिक्षक बनला आहे आणि त्याच मुलांशी आज मला भेटण्याची संधी मिळाली आहे. आणि जेव्हा मनामध्ये अशा प्रकारच्या भेटीची पक्की खात्री असते पक्का विश्वास असतो की आपण कोणतेही छोटे काम चांगल्या हेतूने केले आहे आणि  योग्य तेच करावे या भावनेने केले आहे, तेव्हा असे वाटते की आज याची यशस्वी पूर्तता झालेली मी आज माझ्या डोळ्यांसमोर पाहत आहे. यातून माणसाला एवढी शांतता लाभते, एवढी मन:शांती लाभतेइतके समाधान मिळते की त्यावेळच्या कष्टाचे आज फळ मिळाले आहे.आज या मुलांना आशा आणि उत्साहाच्या भरात पाहून आनंद वाटला.

माझ्या कुटुंबियांनो,

चांगल्या शाळा बांधल्या, चांगले रस्ते बांधले, चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध झाली, पाण्याची सोय उपलब्ध झाली, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण त्यामुळे एका सामान्य कुटुंबाचे जीवन बदलते, गरीब कुटुंबाच्या विचारशक्तीमध्ये परिवर्तन घडते आणि गरिबांना घरे, पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, शिक्षण मिळावे यासाठीचा वसा घेऊन  काम करण्यास आमचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे.  गरीबांसमोरील आव्हाने मी चांगल्या प्रकारे ओळखतो आणि त्यावर मात करण्यासाठी मी लढत राहतो.  एवढ्या कमी वेळात, मी संपूर्ण देशभरात आणि माझ्या प्रिय गुजरातच्या बंधू आणि भगिनींनो तुमच्या मध्ये अभिमानाने उभा आहे, कारण आज देशभरातील गरिबांसाठी 4 कोटींहून अधिक पक्की घरे बांधल्याचे मला समाधान आहे.  पूर्वीच्या सरकारांमध्ये, जेव्हा गरिबांसाठी घरे बांधली जात होती, तेव्हा त्यांच्यासाठी  गरीबाचे एक घर ही निव्वळ एक मोजदाद होती, आकडा होता.  100, 200, 500, 1000, कितीही असो, आमच्यासाठी घर बांधणे ही फक्त मोजण्याची बाब नाही, घर बांधले तर फक्त किती बांधली हे मोजत नाही बसायचे, तर गरिबांसाठी घर असावे, म्हणजे त्याला मान-सन्मान मिळावा, असे आम्हाला वाटते आणि त्यासाठी आम्ही काम करतो, त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी आम्ही काम करतो.

आणि हे घर माझ्या आदिवासी बंधु भगिनींना मिळावे, त्यातही त्यांना हवे तसे घर बनवता यावे, असे नाही की आपण त्यांना चार भिंती बांधून दिल्या, नाही, आदिवासींना आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या साधनातून जसे हवे तसे घर बनवता यावे, मध्ये कोणीही दलाल नको, सरकार कडून थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि बंधुनो तुम्ही तुमच्या मर्जीने असे घर बनवा की तुम्हाला त्यात शेळ्या बांधण्यासाठी जागा हवी असेल तर ती असावी, तुम्हाला कोंबड्यांसाठी जागा हवी असेल तर ती देखील असावी, तुमच्या मर्जीनुसार तुमचे घर बांधण्यात यावे, अशी आमची भूमिका आहे. आदिवासी असो, दलित असो, मागास वर्ग असो, त्यांना घर मिळावे, त्यांच्या गरजा पूर्ण करणारे घर मिळावे, आणि ते घर त्यांच्या प्रयत्नातून तयार व्हावे, सरकार पैसे देईल. अशी लाखो घरे आपल्या भगिनींच्या नावावर करण्यात आली आहेत, आणि एक एक घर दीड - दीड, दोन लाख रुपयांचे आहे, म्हणजेच माझ्या देशातील करोडो भगिनी आणि माझ्या गुजरातमधील लाखो भगिनी आता लखपती दीदी झाल्या आहेत. माझ्या नावावर आजही घर नाही, मात्र माझ्या देशातील लाखो स्त्रीयांच्या नावावर घरे आहेत.

मित्रांनो,

पूर्वी पाण्याची स्थिती कशी होती, हे गुजरातच्या गावांमधील लोक चांगलेच जाणतात, आपल्या आदिवासी क्षेत्रातील लोक तर म्हणतात, साहेब, खालचे पाणी वर कधी चढते का, आम्ही तर डोंगराळ भागात राहातो, आणि आमच्या येथे पाणी कसे वर चढणार. या पाण्याच्या संकटाच्या आव्हानाला देखील आम्ही हाती घेतले आणि भले आम्हाला खालचे पाणी वर चढवावे लागले, आम्ही ते चढवले आणि घराघरात पाणी पोहचवण्यासाठी आम्ही मेहनत केली, आणि आज नळाद्वारे पाणी पोहोचावे याची व्यवस्था केली, पूर्वी एक हात पंप लावण्यात येत असे जो तीन चार महिन्यांत बिघडून जायचा आणि तीन चार वर्षे झाली तरी दुरुस्त केला जात नसे, बंधुनो असे दिवस देखील आम्ही पाहिले आहेत. आणि जर पाणी शुद्ध नसेल तर ते आपल्या सोबत अनेक प्रकारचे आजार घेऊन येते, यामुळे मुलांच्या विकासात अनेक अडथळे येतात. आज गुजरातमधील घराघरात पाईपद्वारे पाणी पोहचवण्याचे भगिरथ प्रयत्न आम्ही यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. आणि हे कार्य करत असताना मला हे शिकयला मिळाले, तुमच्या सोबतीने तुमच्या खांद्याला खांदा लावून जे कार्य मी केले आहे, बंधुंनो ते आज दिल्लीत काम करताना माझ्या खुप कामी येत आहे, तुम्ही तर माझे गुरूजन आहात, तुम्ही मला जे शिकवले आहे, ते ज्ञान जेव्हा मी तिथे वापरतो तेव्हा लोकांना वाटते की हे तर खरोखरच मी त्या समस्येवरचा उपाय घेऊन आलो आहे, त्याचे कारण हे आहे की तुमच्या सोबत राहून मी सुख दुःख पाहिले आहे अणि अडचणीतून मार्ग काढले आहेत.

चार वर्षांपूर्वी आम्ही जल जीवन मिशनचा प्रारंभ केला. आज 10 कोटी, जरा विचार करा, जेव्हा माता भगिनींना पाणी आणण्यासाठी तीन तीन किलोमीटर जावे लागत होते, आज 10 कोटी कुटुंबांत पाणी नळाद्वारे घरात पोहोचवले जात आहे, स्वयंपाकघरापर्यंत पोहोचवले जात आहे, माता भगिनी आशिर्वाद देतात त्याचे कारण हे आहे, आपल्या छोट्या उदेपूरमध्ये, आपल्या कवाट गावामध्ये आणि माझ्या लक्षात आहे की कवाट गावामध्ये अनेक वेळा आलो आहे. कवाट एकेकाळी खूप मागास गाव होते. आत्ताच मला काही लोक भेटायला आले होते, मी म्हणालो मला सांगा की कवाट गावातील कौशल्य विकासाचे काम सुरू आहे की नाही? तर त्यांना आश्चर्य वाटले. ही आमची प्रवृत्ती आहे, हा आमचा स्नेहभाव आहे, कवाट गावाचे प्रादेशिक पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण केले आणि त्यामुळे 50 हजार लोकांपर्यंत, 50 हजार घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे काम पूर्ण झाले आहे.

मित्रांनो,

शिक्षण क्षेत्रात निरंतर नवनवीन प्रयोग करणे या परंपरेचे गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर पालन केले जात आहे, आज ज्या प्रकल्पांचा प्रारंभ झाला ती देखील त्याच दिशेने उचललेली महत्वपूर्ण पावले आहेत आणि यासाठी मी भूपेंद्र भाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चमूला शुभेच्छा देतो. मिशन स्कूल ऑफ एक्सीलंस आणि विद्या समीक्षा या योजना आपल्या दूसऱ्या टप्प्यात गुजरातमधील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रभाव टाकतील. आत्ताच काही दिवसांपूर्वी मी जागतिक बँकेच्या अध्यक्षांची भेट घेतली. ते काही दिवसांपूर्वी विद्या समीक्षा केंद्र पाहण्यासाठी गुजरातमध्ये आले होते, ते मला आग्रह करत होते की, मोदी साहेब, तुम्ही ही विद्या समिक्षा केंद्रे हिंदूस्थानातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू केले पाहिजे, ज्याप्रमाणे तुम्ही गुजरातच्या प्रत्येक जिल्ह्यात केले आहे. आणि जागतिक बँक अशाच चांगल्या कामात सहभागी होऊ इच्छिते. ज्ञान शक्ती, ज्ञान सेतू आणि ज्ञान साधना या सारख्या योजना प्रतिभावंत, गरजू विद्यार्थी, मुली मुले यांना लाभप्रद ठरणाऱ्या आहेत. यामध्ये गुणवत्तेला प्रोत्साहित केले जात आहे. आपल्या आदिवासी क्षेत्रातील युवकांना खूप सारे आनंद उत्सव साजरे करण्याची संधी मिळणार आहेत.

माझ्या कुटुंबीयांनी मागच्या दोन दशकांपासून गुजरातमध्ये शिक्षण आणि कौशल्य विकास या कामांवर भर दिला आहे. तुम्ही सर्वजण जाणताच की दोन दशकांपूर्वी गुजरातमध्ये विद्यालयातील वर्ग खोल्यांची स्थिती आणि शिक्षकांची संख्या काय होती. अनेक मुले आपले प्राथमिक शिक्षण देखील पूर्ण करु शकली नाहीत, त्यांना शाळा सोडून द्यावी लागली. उमरगाव ते अंबाजीपर्यंतच्या संपूर्ण आदिवासी भागात परिस्थिती इतकी खराब होती की जो पर्यंत मी गुजरातचा मुख्यमंत्री झालो नव्हतो तोवर त्या भागात विज्ञान शाखेचे विद्यालय नव्हते. बंधुनो, जर विज्ञान शाखेचे विद्यालय नसेल तर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी आरक्षण द्या, राजकारण करा, मात्र आम्ही मुलांचे भविष्य उज्ज्वल बनवण्याचे काम केले. विद्यालयांची संख्या देखील कमी आहे आणि विद्यालयांमध्ये सुविधांचीही कमतरता आहे, विज्ञानाचा तर मागमूसही नाही, आणि ही सर्व स्थिती पाहूनच आम्ही ती बदलण्याचा निर्णय घेतला. मागच्या दोन दशकांत शिक्षकांच्या नियुक्तीसाठी 2 लाख शिक्षकांच्या भर्तीचे अभियान चालवण्यात आले. 1.25 लाखाहून अधिक वर्ग खोल्यांची निर्मिती करण्यात आली. शिक्षण क्षेत्रात करण्यात आलेल्या विकास कामांचा सर्वात अधिक लाभ आदिवासी बहुल भागांना झाला आहे. अशातच मी सीमावर्ती भागाचा दौरा केला, तिथे आपल्या सैन्यातील लोक तैनात आहेत. ही माझ्यासाठी आश्चर्याची आणि आनंदाची बाब होती की या दौऱ्यात जवळपास प्रत्येक ठिकाणी मला माझ्या आदिवासी क्षेत्रातील एक तरी जवान सीमेवर तैनात राहून देशाचे रक्षण करत असलेला दिसत होता आणि ते जवान माझ्याजवळ येऊन मला म्हणत होते की, सर, तुम्ही आमच्या गावात आला आहात, हे ऐकून मला कितीतरी आनंद होत आहे. मागच्या 2 दशकात विज्ञान शाखा असो, वाणिज्य शाखा असो, अनेक विद्यालय आणि महाविद्यालयांचे एक मोठे जाळे आज या भागात विकसित झाले आहे. नव नवीन कला महाविद्यालये सुरू झाली आहेत. भाजपा सरकारने केवळ आदिवासी क्षेत्रात 25 हजार नव्या वर्ग खोल्या, 5 हजार वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती केली आहे, गोविंद गुरू विद्यापीठ आणि बिरसा मुंडा विद्यापीठाने उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याचे काम केले आहे. आज या क्षेत्रात कौशल्य विकासाशी संबंधित अनेक प्रोत्साहन पर कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत.

माझ्या कुटुंबीयांनो,

अनेक वर्षानंतर देशात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यात आले आहे. आम्ही तीस वर्षे प्रलंबित असलेले काम पूर्ण केले आहे आणि स्थानिक भाषेमध्ये शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मुलांना जर स्थानिक भाषेमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली तर त्यांना कमी मेहनत करावी लागते आणि ते गोष्टींचे आकलन सहज करू शकतात, म्हणून स्थानिक भाषेत शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. देशभरात 14 हजारांहून अधिक पीएम श्री विद्यालये, एक अत्याधुनिक नव्या प्रकारचे विद्यालय निर्माण करण्यात आल्यावर अभ्यास सुरू करण्यात आला आहे. गेल्या नऊ वर्षात एकलव्य निवासी विद्यालयांनी आदिवासी क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे आणि आदिवासी लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न केले जावेत यासाठी आम्ही या केंद्रांची स्थापना केली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये देखील आम्ही खूप प्रगती केली आहे.

माझ्या आदिवासी क्षेत्रातील युवकांमार्फत आदिवासी क्षेत्रातील छोट्या छोट्या गावांना स्टार्टअपच्या जगात पुढे आणता यावे असे आमचे प्रयत्न आहेत. लहान वयातच तंत्रज्ञान, विज्ञान यामध्ये यांना आवड निर्माण झाली आणि त्यासाठी त्यांनी दुर्गम भागातील जंगलांमध्ये सुद्धा शाळांमध्ये एक कायमस्वरूपी टिंकरिंग लॅब उभारण्याचे काम केले.

माझ्या कुटुंबीयांनो,

काळ बदलला आहे. प्रमाणपत्रांचे महत्त्व जेवढे वाढले आहे तेवढेच कौशल्यप्राप्तीचे महत्व सुद्धा वाढले आहे. महत्त्व आहे ते आपल्या हातात कोणते कौशल्य आहे आणि कौशल्य विकसित करण्यासाठी जमिनीवर कोणतं काम केलं आहे याला. आणि त्यामुळेच कौशल्य विकासाचे महत्त्वही वाढले आहे.

कौशल विकास योजनेचा लाभ आज लाखो युवकांना मिळत आहे. युवकाने एकदा काम शिकून घेतले की आपल्या रोजगारासाठी मुद्रा योजनेतून कोणतीही हमी दिल्याशिवाय बँकेतून त्याला लोन मिळते. लोन मिळते पण त्याची गॅरंटी कोण देणार? तर ही आपल्या मोदीची गॅरंटी आहे. त्यांनी स्वतःचे काम सुरू केले पाहिजे आणि फक्त स्वतःपुरतेच पैसे न मिळवता इतर चार लोकांनासुद्धा रोजगार दिला पाहिजे. वनबंधू कल्याण योजनेअंतर्गत कौशल्य प्रशिक्षणाचे काम सुरू आहे. गुजरातमधील पन्नासहून अधिक आदिवासी तालुक्यांमध्ये आज आयटीआय आणि कौशल्य विकासासाठी मोठी केंद्रे सुरू आहेत. आज आदिवासी भागांमध्ये वनसंपदा केंद्रे सुरू आहेत, ज्यामध्ये अकरा लाखांहून अधिक आदिवासी बंधू भगिनी वनधन केंद्रातून शिक्षण मिळवत आहेत, कमाई करत आहेत, आणि आपला व्यवसाय वाढवत आहेत. जनजातीय सहकाऱ्यांना, त्यांच्या कौशल्यासाठी नवीन बाजारपेठ आहे. त्यांच्या कलात्मक उत्पादनांसाठी, त्यांच्या चित्रांसाठी त्यांच्या कलात्मकतेसाठी विशेष दुकाने उघडण्याचे काम सुरू आहे.

मित्रहो,

आम्ही प्रत्यक्षात कोणत्या प्रकारच्या कौशल्य विकासावर भर दिला आहे. त्याचे नजीकचे उदाहरण आपणही बघितले आहे. विश्वकर्मा जयंती च्या दिवशी, 17 तारखेला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केला गेला आणि या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आपल्या आसपास जर कोणत्या गावात बघितले तर समजते काही लोकांच्या शिवाय गाव वसवता येऊ शकत नाही. म्हणून आपल्याकडे त्यांच्यासाठी एकच शब्द आहे तो म्हणजे 'निवासी'. हे निवासस्थानामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. जर आपण कुंभार, शिंपी, न्हावी, धोबी, लोहार, सुतार, फुलांचे हार गुंफणारे बंधू भगिनी, घराचे बांधकाम करणारे गवंडी, घर बांधतात त्यांना हिंदीत 'राजमिस्त्री' म्हणतात. अशा वेगवेगळी काम करणाऱ्या लोकांसाठी करोडो रुपयांची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली गेली आहे. त्यांच्या पारंपारिक कौटुंबिक व्यवसायाचे प्रशिक्षण त्यांना मिळावे. आधुनिक यंत्रसामग्री मिळावी, त्यांच्यासाठी नवीन नवीन अभिकल्पित यंत्रे मिळावीत आणि ते जे उत्पादन घेतील ते जगाच्या बाजारपेठेत विकले जावे. या देशातील गरीब आणि सामान्य कष्टकरी लोकांसाठी आम्ही एवढे मोठे काम सुरू केले आहे. त्यासाठीच मूर्तिकारांनी अशी परंपरा पुढे नेली आहे की आधीच एक समृद्ध परंपरा आहे आणि आता आम्ही केलेल्या कामामुळे त्यांना कशाची चिंता करावी लागू नये. आम्ही असे ठरवले आहे की ही परंपरा, ही कला नष्ट होता कामा नये, गुरु शिष्य परंपरा सुरू राहिली पाहिजे आणि पीएम विश्वकर्मा योजनेचा फायदा अशा लाखो परिवारांपर्यंत पोहोचला पाहिजे जे प्रामाणिकपणे काम करत कौटुंबिक जीवन जगत आहेत. अशा अनेक उपाययोजनांच्या माध्यमातून सरकार त्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याचे काम करत आहे. अगदी कमी व्याजावर लाखो रुपयांचं कर्ज मिळवण्याची त्यांना चिंता आहे. आता त्यांना जे कर्ज मिळेल त्याच्यासाठी कोणती हमी देण्याची सुद्धा गरज नाही‌ कारण त्याची हमी मोदींनी घेतली आहे. त्याची हमी सरकारने घेतली आहे

माझ्या कुटुंबीयांनो,

खूप काळापासून ज्या गरीब, दलित आदिवासींना वंचित ठेवले गेले, त्यांच्या वाट्याला अभाव होता, आज ते अनेक योजनांच्या माध्यमातून अनेक प्रकारे विकासाच्या दिशेला आशावादी विचारांसह पुढे जात आहेत. स्वातंत्र्यानंतर इतकी दशकं गेली तेव्हा मला आदिवासींच्या गौरवाचा सन्मान करण्याची संधी मिळाली. भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस जो आता संपूर्ण हिंदुस्थानात जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. आम्ही या दिशेने काम केलं आहे. भाजपा सरकारने आदिवासी समुदायासाठीचे बजेट आधीच्या सरकारच्या तुलनेत पाचपट वाढवले आहे. काही दिवसांपूर्वीच देशाने एक महत्त्वपूर्ण काम केले. भारताची नवीन संसद सुरू झाली आणि नारी शक्ती वंदना कायदा हा नव्या संसदेतील पहिला कायदा झाला. आपल्या आशीर्वादाने आम्ही तो पूर्ण करण्यात सक्षम राहू आणि तरीसुद्धा जे लोक याबाबतीत मोठ्या मोठ्या गोष्टी करतात त्यांना जरा विचारा की आपण एवढ्या दशकांपर्यंत बसून का राहिलात? माझ्या माता भगिनींना तर पहिल्यांदाच हा हक्क दिला गेला असता तर त्या कितीतरी पुढे गेल्या असत्या म्हणूनच मला वाटते की त्यांनी अशी वचने पूर्ण केली नाहीत. बंधू-भगिनी जे स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांपर्यंत छोट्या छोट्या सोयी सुविधांपासून वंचित होते, माझ्या माता,भगिनी, लेकी दशकांपर्यंत आपल्या अधिकारांपासून वंचित होत्या आणि आज जेव्हा मोदी एका मागून एक सर्व अडचणी दूर करत आहेत तेव्हा त्यांना हे म्हणावं लागत आहे की नवीन नवीन खेळी रचायची म्हणून या योजना बनवल्या जात आहेत हे. काही देण्याच्या योजना बनवतात, हे समाजाला भटकावण्यासाठी योजना बनवतात मी छोटा उदयपूरमध्यै या देशातील आदिवासी माता आणि बहिणींना हे सांगायला आलो आहे की आपला हा मुलगा आहे तो आपल्या अधिकारांवर भर देण्यासाठी. आणि एक एक करत आपण हे पार पाडत आहोत आपणा सर्व भगिनींसाठी संसद तसेच विधानसभेमध्ये जास्तीत जास्त भागीदारीचे रस्ते उघडले गेले आहेत. आपल्या संविधानानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती समुदायासाठी सुद्धा भगिनींसाठीसुद्धा त्यात व्यवस्था केली आहे. ज्यामुळे त्यांना सुद्धा संधी मिळावी. या सर्व गोष्टींमध्ये एक मोठा भाग हा आहे की आज देशात या कायद्याला अंतिम स्वरूप कोण देईल संसदेत मंजूर तर झाला पण त्यावर अंतिम निर्णय कोण घेणार. या देशातील पहिली आदिवासी महिला द्रौपदी मुर्मूजी ज्या आज राष्ट्रपती पदावर विराजमान आहेत त्या यावर निर्णय घेतील आणि कायदा होईल आज छोटा उदयपूर मधल्या आदिवासी भागातील आपणा सर्व भगिनींना भेटताना मी या सर्व मोठ्या संख्येने आलेल्या भगिनींचे अभिनंदन करतो आपल्याला प्रणाम करतो. आणि आजादीच्या अमृत काळाची ही सुरुवात किती चांगली झाली आहे किती उत्तम झाली आहे त्यासाठी तसंच आपले संकल्प प्रत्यक्षात यावेत म्हणून आता याच मातांचे आशीर्वाद आम्हाला नवीन शक्ती देणार आहेत. नवीन नवीन योजना मधून आम्ही या भागाचा विकास करू आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने येऊन आपला आशीर्वाद दिला त्यासाठी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. पूर्ण शक्तीनिशी दोन्ही हात वर करून माझ्याबरोबर म्हणा, भारत माता की जय! आपल्या बोडेलीचा आवाज उमरगावमध्ये अंबाजीपर्यंत पोहोचला पाहिजे.

भारत माता की जय,

भारत माता की जय,

भारत माता की जय,

भारत माता की जय,

खूप खूप धन्यवाद!

Jaydevi PS/Ashutosh/Vijaya/Shraddha/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1962001) Visitor Counter : 150