जलशक्ती मंत्रालय

‘स्वच्छता हीच सेवा अभियाना’ने घेतले ‘लोक चळवळी’चे रूप


15 ते 29 सप्टेंबर, 2023 या कालावधीत सुरु असलेल्या या देशव्यापी मोहिमेत 32 कोटीहून अधिक व्यक्तींनी भाग घेतला, दररोज 2.3 कोटी लोकांचा सहभाग

15 कोटी नागरिकांनी श्रमदान उपक्रमात सहभागी होऊन ‘स्वच्छ भारत’ मोहिमेतील 3.68 लाख उपक्रमांमध्ये दिले योगदान

‘एक तारीख,एक तास, एकमेकांसोबत’ ध्येयासह येत्या 1 ऑक्टोबर रोजी या उपक्रमाचा समारोप होणार – स्वच्छतेसाठी नागरिकांच्या नेतृत्वाखालील एक तासाच्या श्रमदाना’साठी पंतप्रधानांचे जाहीर आवाहन

Posted On: 29 SEP 2023 2:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2023

देशभरात सध्या पंधरा दिवस कालावधीत स्वच्छतेचा उत्सव साजरा करणारे ‘कचरामुक्त भारत’ संकल्पनेवर आधारित स्वच्छता हीच सेवा (एसएचएस) 2023 हे अभियान राबवण्यात येत आहे. एकात्मता आणि निश्चयाचे एकत्रितरीत्या दर्शन घडवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर आवाहनापासून प्रेरणा घेत आतापर्यंत 32 कोटींहून अधिक व्यक्तींनी गेल्या 14 दिवसांच्या कालावधीत या देशव्यापी मोहिमेत भाग घेतला आहे. देशभरातून सरासरी 2.3 कोटी व्यक्ती दररोज या मोहिमेत भाग घेत आहेत.

ही ‘लोक चळवळ’ देशासाठी प्रचंड प्रमाणात उत्तम कामगिरी करत असून देशातील 75% गावे  ओडीएफ प्लस दर्जा मिळवण्यात यशस्वी झाली आहेत, म्हणजेच, या गावांनी हागणदारीमुक्त स्थिती कायम राखत गावांमध्ये घन किंवा द्रवरूप कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी देखील यंत्रणा निर्माण केली आहे. यातून सार्वत्रिक आरोग्य आणि स्वच्छता यांच्या बाबतीत जनता आणि सरकार यांची अढळ कटिबद्धता देखील अधोरेखित होते.

यावर्षीच्या मोहिमेत देशभरातील 32 कोटींहून अधिक व्यक्तींसह प्रचंड प्रमाणात सहभाग दिसून येत असून दररोज 2.3 कोटी व्यक्ती या मोहिमेत भाग घेत आहेत.त्यांच्यापैकी सुमारे 15 कोटी नागरिकांनी ‘श्रमदान’ उपक्रमात सहभागी होऊन एसबीएम मधील 3.68 लाख कार्यांमध्ये योगदान दिले. या कार्यांमध्ये, 5300 किनारपट्ट्या स्वच्छ करणे, 4300 नदीतीर आणि जलसाठ्यांना पुनर्जीवित करणे, 10,700 वारसा कचरा स्थळांवर हक्क प्रस्थापित करणे, पर्यटनदृष्ट्या आणि विशिष्ट बाबतीत महत्त्वाच्या 2400 स्थानांची सुधारणा करणे आणि 93,000 हून अधिक सार्वजनिक ठिकाणांचा पुनर्वापर सुरु करणे इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे. याखेरीज, या मोहिमेमध्ये, 12,000 हून अधिक जलसाठे स्वच्छ करण्यात आले, 60,000 हून अधिक संस्थात्मक इमारती पुनर्जीवित करण्यात आल्या आणि सुमारे 47,000 कचऱ्याच्या असुरक्षित ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. ही आकडेवारी म्हणजे जलद परिवर्तन घडवण्याप्रती अढळ समर्पित वृत्तीचे आणि ‘लोक चळवळी’च्या ताकदीचे प्रतिबिंब आहे.

यावर्षीच्या ‘श्रमदान’ उपक्रमाचा समारोप 1 ऑक्टोबर रोजी होणार असून त्यावेळी संपूर्ण सरकारी यंत्रणा तसेच देशातील नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 10 वाजता नागरिकांच्या नेतृत्वाखालील ‘स्वच्छतेसाठी श्रमदान’ या एक तासभराच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी केलेल्या राष्ट्रीय आवाहनाला प्रतिसाद देत‘एक तारीख, एक तास, एकमेकांसोबत’ या संकल्पनेचा भाग म्हणून देशातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवणार आहेत. पंतप्रधानांनी केलेले हे जाहीर आवाहन समाजाच्या सर्व पैलूंमध्ये स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करते.मन की बात या कार्यक्रमाच्या 105व्या भागात पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता तासभराचा वेळ स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यासाठी देण्याची विनंती केली, हा उपक्रम म्हणजे गांधीजींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सर्व नागरिकांतर्फे त्यांना वाहिलेली ‘स्वच्छांजली’ ठरेल असे ते म्हणाले होते.

1 ऑक्टोबरच्या रविवारी सकाळी 10 वाजता एक मोठा स्वच्छताविषयक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तुम्ही सुद्धा वेळ काढून या स्वच्छतेशी संबंधित उपक्रमात सहभागी झाले पाहिजे. तुम्ही तुमच्या जवळच्या रस्त्यावर, परिसरात किंवा बाग, नदी, तलाव किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊ शकता.

या वर्षाच्या मोहिमेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तीन केंद्रीय मंत्र्यांनी एसएचएस मोहिमेचा संयुक्त शुभारंभ होय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ‘स्वच्छ भारत’ साध्य करण्याच्या दिशेने सरकारच्या विविध विभागांच्या प्रयत्नांच्या एकतेचे हे प्रतीक आहे. प्रारंभानंतर अवघ्या एका आठवड्याच्या आत, केंद्रीय जलशक्ती मंत्री, गजेंद्र सिंह शेखावत यांनी देशभरातील 75% गावे ओडीएफ प्लस झाल्याची उद्दिष्टपूर्ती जाहीर केली यावरुन याच्या यशाचा अंदाज लावला जाऊ शकतो.

स्वच्छ भारत अभियान-ग्रामीण आणि शहरी यांच्यातील समन्वयाबरोबरच, ‘स्वच्छ भारत’ सुनिश्चित करण्यासाठी इतर विविध विभागांकडून अनेक उपक्रम राबविले जात असल्याने या वेळी "संपूर्ण सरकारचा" दृष्टिकोन स्पष्ट दिसत आहे. पर्यटन मंत्रालयाने 108 निवडक स्थळांवर स्वच्छता मोहिमेसाठी पर्यावरणस्नेही जीवनशैली आधारित ट्रॅव्हल फॉर लाइफ सुरू केले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशभरातील सर्व चित्रपटगृहात एसएचएस चित्रफीत दाखवली जावी याची खातरजमा केली आहे. तर दूरसंचार विभाग सर्व मोबाइलवर एसएचएस रिंगटोन वाजवत आहे.  नागरी विमान वाहतूक विभाग आणि रेल्वे मंडळ सर्व विमानतळ आणि रेल्वे क्षेत्रातील एसएचएस मोहिमेला पाठबळ देत आहे. एएसआयने, एसएचएस प्रचारासह (ब्रँडिंगसह) सर्व प्रमुख स्मारके सुशोभीत केली आहेत. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग देशातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी शाळांमध्ये स्वच्छता उपक्रम राबवत आहे, तर उच्च शिक्षण विभाग महाविद्यालये आणि विद्यापीठांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.  प्रत्येक विभाग आपापल्या अनोख्या पद्धतीने एसएचएस मोहिमेला पाठबळ आणि योगदान देत आहे.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही मोहीम स्वच्छता वीरांच्या अर्थात सफाईमित्रांच्या कल्याणासाठीही काम करत आहे.  त्यांच्या कल्याणासाठी आरोग्य तपासणी शिबिरे आणि योगशिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.  समाजातील सर्व घटक देखील एसएचएसला यशस्वी करण्यासाठी पुढे येत आहेत. महिला - बचत गट मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत, त्यांच्यापैकी अनेकांनी श्रमदानासाठी गावे दत्तक घेतली आहेत. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तरुणांनी त्यांची शहरे, नगरे आणि गावे स्वच्छ करण्यात मोठा उत्साह दाखवला आहे, तसेच महाविद्यालयांनीही गावे दत्तक घेतली आहेत. ज्येष्ठ नागरिक समुद्रकिनारे, उद्याने, सार्वजनिक ठिकाणी श्रमदान करून स्वच्छ समाजासाठी आपली भूमिका बजावत आहेत. धार्मिक स्थळांवर धर्मगुरूंकडून श्रमदान केले जात आहे. चेंबर्स ऑफ कॉमर्स, रेडक्रॉस, विविध व्यापार आणि कृषी संस्था यांसारख्या विविध संस्था स्वच्छता उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत.

या लोकचळवळीत विविध उपक्रम राबवले जात आहेत. स्वच्छता प्रतिज्ञा, स्वच्छता दौड आणि मानवी साखळी, कार्यालय परिसर आणि लगतच्या भागात स्वच्छता मोहीम (DAPRG च्या विशेष मोहिम 3.0 सह), रेल्वे ट्रॅक आणि स्थानके, विमानतळांच्या लगतचे क्षेत्र, पर्यटन स्थळे/तीर्थक्षेत्र, पर्यटन दिन, एएसआय स्मारके/वारसा स्थळे, शैक्षणिक संस्था, महामार्ग आणि लगतची क्षेत्रे, प्राणीसंग्रहालय, अभयारण्ये, उद्याने; एकल वापर प्लास्टिक बंदी आणि शून्य कचरा कार्यक्रमासाठी प्रतिज्ञा आदी स्वच्छता विषयक उपक्रमांचा यात समावेश आहे. या सामुहिक प्रयत्नांमुळे आपल्या पर्यावरणाचे पुनरुज्जीवन झाले आहे, स्वच्छ, आरोग्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. 'टीम इंडिया'च्या भावनेला ही मानवंदना आहे.

S.Thakur/S.Chitnis/V.Ghode/P.Malandkar

 

 

  

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1961962) Visitor Counter : 197