गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
इंदूरमध्ये आज राष्ट्रपतींच्या हस्ते भारत स्मार्ट सिटीज पारितोषिक स्पर्धा (ISAC) 2022 च्या विजेत्यांचा सत्कार
स्मार्ट सिटी अभियानाने भारताच्या शहरी परिसंस्थेत नावीन्य आणले: हरदीप सिंग पुरी
Posted On:
27 SEP 2023 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 27 सप्टेंबर 2023 रोजी इंदूर येथे भारत स्मार्ट सिटीज पारितोषिक स्पर्धा (ISAC) 2022 च्या चौथ्या आवृत्तीतील विजेत्यांचा सत्कार केला. भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्मार्ट सिटीज अभियाना अंतर्गत 2018 पासून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशाचे राज्यपाल मंगुभाई सी. पटेल, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर, मध्य प्रदेशाचे शहरी विकास मंत्री भूपेंद्र सिंह यांच्यासह विविध मान्यवरांनी हजेरी लावली.
या कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रपतींनी शहरी विकासात देशाच्या एकूण गुंतवणुकीत वाढ झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. “उत्कृष्ट पद्धती लागू करण्यात आणि व्यवहार्य व्यवसाय प्रारुप विकसित करण्यात स्मार्ट सिटीज अभियानाचे योगदान खूप महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रपतींनी शहरी विकासाशी संबंधित क्षेत्रांवर जी-20 चा भर असल्याचे नमूद केले. जी-20 चा उप-समूह असलेल्या अर्बन 20 ने शहरांमधील संपर्क सुविधेची एक शाश्वत पद्धती स्थापित करण्याचा प्रयत्न केला, असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपतींनी देशातील विविध शहरांतील महापौर आणि महापालिका आयुक्तांना नव्या आत्मविश्वासाने आणि नव्या ऊर्जेने पुढे जाण्याचे आवाहन केले.
स्मार्ट सिटीज अभियानाने भारतातील शहरी परिसंस्थेमध्ये नावीन्य आणले आहे, तसेच भारतातील 100 मोठ्या शहरांमध्ये मुख्य पायाभूत सुविधा निर्माण केल्या असून सेवांना बळकटी दिली आहे, असे उपस्थितांना संबोधित करताना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले. या अभियानाने सरकार, जागतिक संस्था, भागीदार शहरे, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्र यांच्या समवेत व्यापक भागीदारी वाढवली आहे, असेही ते म्हणाले.
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1961434)
Visitor Counter : 98