पंतप्रधान कार्यालय
वाराणसी इथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
23 SEP 2023 4:54PM by PIB Mumbai
हर हर महादेव!
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, मंचावर उपस्थित उत्तर प्रदेश सरकारचे अन्य मंत्री, लोक प्रतिनिधी, या कार्यक्रमासाठी उपस्थित देशातील क्रीडा जगताशी संबंधित सर्व मान्यवर आणि माझे काशीचे प्रिय कुटुंबीय,
आज पुन्हा वाराणसीला येण्याची संधी मिळाली. वाराणसीमध्ये येऊन झालेला आनंद शब्दात मांडणे अशक्य आहे. पुन्हा एकदा म्हणा...ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव! आज मी अशा दिवशी काशीमध्ये आलो आहे जेव्हा चंद्राच्या ‘शिवशक्ती’ या स्थानावर भारत पोहोचलेल्याला एक महिना पूर्ण होत आहे. ‘शिवशक्ती’ म्हणजे गेल्या महिन्याच्या 23 तारखेला आपले चांद्रयान जिथे उतरले ते स्थान आहे. शिवशक्तीचे एक स्थान चंद्रावर आहे. तर शिवशक्तीचे दुसरे स्थान माझ्या या काशीत आहे. आज शिवशक्तीच्या या स्थानावरून, शिवशक्तीच्या त्या स्थानावरील भारताच्या विजयासाठी मी पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन करतो.
माझ्या कुटुंबियांनो,
ज्या ठिकाणी आपण सर्व एकत्र जमलो आहोत ते पवित्र स्थानासारखे आहे. हे स्थान माता विंध्यवासिनी धाम आणि काशी शहराला जोडणाऱ्या मार्गावर आहे. येथूनच काही अंतरावर भारतीय लोकशाहीचे महान पुरुष आणि माजी केंद्रीय मंत्री राजनारायणजी यांचे मोती कोट हे गाव आहे. या भूमीवरून मी आदरणीय राजनारायणजी आणि त्यांच्या जन्मभूमीला सादर वंदन करतो.
माझ्या कुटुंबियांनो,
काशीमध्ये आज एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करण्यात आली. हे स्टेडियम केवळ वाराणसीच्याच नव्हे तर पूर्वांचलच्या युवकांसाठी एक वरदान ठरेल. जेव्हा हे स्टेडियमबांधून तयार होईल, तेव्हा इथे एकाच वेळी 30 हजारांहून अधिक लोक बसून सामने पाहू शकतील. आणि मला माहीत आहे, जेव्हापासून या स्टेडियमची छायाचित्रे समोर आली आहेत, तेव्हापासून काशीतील प्रत्येक रहिवासी भारावून गेला आहे. महादेवाच्या नगरीतील हे स्टेडियम, त्याची रचना, स्वयं महादेवाला समर्पित आहे. इथे अनेक अविस्मरणीय क्रिकेट सामने होतील, इथे आसपासच्या भागातील युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल. आणि याचा खूप मोठा फायदा माझ्या काशीला होईल.
माझ्या कुटुंबियांनो,
आज क्रिकेटच्या माध्यमातून जग भारताशी जोडले जात आहे. जगातील नवनवीन देश क्रिकेट खेळण्यासाठी पुढे येत आहेत. साहजिकच आगामी काळात क्रिकेट सामन्यांची संख्याही वाढणार आहे. आणि जेव्हा क्रिकेटचे सामने वाढतील तेव्हा नवनवीन स्टेडियमची गरज भासेल. बनारसचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ही मागणी पूर्ण करेल, संपूर्ण पूर्वांचलचा ते चमकता तारा बनणार आहे. उत्तर प्रदेशातील हे पहिलेच स्टेडियम असेल, ज्याच्या उभारणीत बीसीसीआयचेही मोठे सहकार्य असेल. काशीचा खासदार या नात्याने मी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचे, इथला खासदार म्हणून मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.
माझ्या कुटुंबियांनो,
जेव्हा क्रीडाविषयक पायाभूत सुविधा निर्माण होतात, एवढं मोठं स्टेडियम बांधलं जातं, तेव्हा त्याचा केवळ खेळांवरच नव्हे तर स्थानिक अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होतो. जेव्हा अशी मोठी क्रीडा केंद्रे बांधली जातील, तेव्हा तिथे मोठ्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातील. जेव्हा भव्य आयोजन होईल, तेव्हा प्रेक्षक आणि खेळाडू मोठ्या संख्येने येतील. याचा फायदा हॉटेलवाल्यांना होतो, छोट्या - मोठ्या खाद्यपदार्थांच्या दुकानांना फायदा होतो, रिक्षा-ऑटो-टॅक्सी यांनाही याचा फायदा होतो आणि आमच्या नाविकांसाठी तर ती पर्वणी असते. एवढ्या मोठ्या स्टेडियममुळे क्रीडा प्रशिक्षणासाठी नवीन केंद्रे उघडली जातात आणि क्रीडा व्यवस्थापन शिकवण्यासाठी नवीन संधी निर्माण होतात. आपल्या बनारसचे तरुण नवीन स्पोर्ट्स स्टार्ट अप्सचा विचार करू शकतात. फिजिओथेरपीसह खेळांशी संबंधित अनेक अभ्यासक्रम सुरू होतील आणि वाराणसीमध्ये एक मोठा क्रीडा उद्योगही उभा राहील.
माझ्या कुटुंबियांनो,
एक काळ असा होता की आई-वडील आपल्या मुलांना खेळल्याबद्दल सतत रागवायचे, सारखे खेळत राहणार का, अभ्यास करणार की नाही, इथेच दंगामस्ती करत राहणार का, हेच ऐकावे लागायचे. मात्र आता समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे. मुलं आधीपासूनच गंभीर होतीच, आता आईवडीलही खेळाप्रति गंभीर झाले आहेत. आता देशाचा स्वभाव असा बनला आहे की जो खेळेल त्याचीच भरभराट होईल.
मित्रहो,
गेल्या 1-2 महिन्यांपूर्वी मी मध्य प्रदेशातील शहडोल या आदिवासी भागातील एका आदिवासी गावात गेलो होतो, तिथे मला काही युवकांना भेटण्याची संधी मिळाली आणि तेथील दृश्य पाहून आणि त्यांचे म्हणणे ऐकून मी खूप प्रभावित झालो. ते युवक म्हणाले की हे आमचे मिनी ब्राझील आहे, मी विचारले, तुम्ही मिनी ब्राझील कसे झालात, त्यावर म्हणाले आमच्या प्रत्येक घरात एक फुटबॉल खेळाडू आहे आणि काही लोकांनी मला सांगितले की आमच्या कुटुंबात राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडूंच्या तीन-तीन पिढ्या झाल्या आहेत. खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी आपले जीवन तिथेच समर्पित केले. आणि आज तुम्हाला प्रत्येक पिढीतील व्यक्ती तिथे फुटबॉल खेळताना दिसेल. आणि ते सांगतात की आमचा वार्षिक कार्यक्रम असतो, तेव्हा तुम्हाला घरात कोणीही सापडणार नाही. या भागात शेकडो गावे आहेत आणि लाखोंच्या संख्येने लोक 2-2, 4-4 दिवस मैदानात खेळत असतात. ही संस्कृती ऐकून आणि पाहून देशाच्या उज्ज्वल भविष्यावरचा माझा विश्वास अधिकच बळावतो. आणि काशीचा खासदार म्हणून इथे झालेल्या बदलांचा देखील मी साक्षीदार बनलो आहे. खासदार क्रीडा स्पर्धेदरम्यान येथे जो उत्साह असतो त्याची माहिती मला सातत्याने मिळत असते. काशीतील तरुणांनी क्रीडा जगतात आपले नाव कमवावे हीच माझी इच्छा आहे. त्यामुळे वाराणसीतील तरुणांना उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याच दृष्टिकोनातून या नवीन स्टेडियम बरोबरच सिगरा स्टेडियमवर देखील सुमारे 400 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. सिगरा स्टेडियममध्ये 50हून अधिक खेळांसाठी आवश्यक सुविधा विकसित केल्या जात आहेत. आणि त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हे देशातील पहिले बहुस्तरीय क्रीडा संकुल असेल जे दिव्यांगांना डोळ्यासमोर ठेवून उभारले जात आहे. हे देखील लवकरच काशीच्या जनतेला समर्पित केले जाईल. बड़ालालपुर इथला सिंथेटिक ट्रॅक असेल, सिंथेटिक बास्केटबॉल कोर्ट असेल, वेगवेगळ्या आखाड्यांना प्रोत्साहन देणं असेल, आम्ही नवीन व्यवस्था तर उभारत आहोतच, मात्र शहरातील जुन्या व्यवस्था देखील सुधारत आहोत.
माझ्या कुटुंबियांनो,
आज भारताला क्रीडा स्पर्धांमध्ये जे यश मिळत आहे, हा देशाच्या विचारात झालेल्या बदलाचा परिणाम आहे. आम्ही खेळांना तरुणांच्या तंदुरुस्तीशी आणि तरुणांच्या रोजगार आणि करिअरशी जोडले आहे. 9 वर्षांपूर्वीच्या तुलनेत यंदा केंद्रीय अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठीच्या तरतुदीत 3 पटीने वाढ करण्यात आली आहे. खेलो इंडिया कार्यक्रमासाठीच्या तरतुदीत तर गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 70 टक्के वाढ केली आहे. आज सरकार आपल्या खेळाडूंबरोबर शाळेपासून ऑलिम्पिक व्यासपीठापर्यंत संघाचा सदस्य म्हणून बरोबर चालत आहे. खेलो इंडिया अंतर्गत देशभरात शाळांपासून ते विद्यापीठांपर्यंत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आपल्या मुलीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. सरकार प्रत्येक टप्प्यावर खेळाडूंना शक्य ती मदत करत आहे. ऑलिम्पिक पोडियम योजना हा देखील असाच एक प्रयत्न आहे. या अंतर्गत, सरकार वर्षभर देशातील अव्वल खेळाडूंना आहार, फिटनेसपासून ते प्रशिक्षणापर्यंत लाखो रुपयांची मदत पुरवते. याचे परिणाम आज आपण प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाहत आहोत. अलीकडेच काही दिवसांपूर्वी जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात भारताने गेल्या अनेक दशकांत जिंकलेल्या एकूण पदकांपेक्षा या वर्षी आपल्या खेळाडूंनी जास्त पदके जिंकली आहेत. आजपासून आशियाई क्रीडा स्पर्धा देखील सुरू होत आहेत, मी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार्या सर्व भारतीय खेळाडूंना माझ्या शुभेच्छा देतो.
मित्रहो,
भारताच्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक गावात क्रीडा प्रतिभा आहेत, दिग्गज खेळाडू आहेत. त्यांना शोधणे आणि त्यांना पैलू पाडणे गरजेचे आहे. आज छोट्या-छोट्या खेड्यापाड्यातून आलेले युवक संपूर्ण देशाचा अभिमान बनले आहेत.या उदाहरणांवरून आपल्या छोट्या शहरातील खेळाडूंमध्ये किती गुणवत्ता आहे हे दिसून येते. या कलागुणांना जास्तीत जास्त संधी द्यायला हव्यात. म्हणूनच खेलो इंडिया अभियानामुळे आज देशाच्या कानाकोपऱ्यात लहान वयातच मुलांची गुणवत्ता हेरली जात आहे. खेळाडूंना हेरून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू बनवण्यासाठी सरकार प्रत्येक पाऊल उचलत आहे. आज या कार्यक्रमात अनेक दिग्गज खेळाडू खास आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांनी क्रीडा जगतात देशाचा गौरव वाढवला आहे. काशीप्रति हे प्रेम दाखवल्याबद्दल मी त्या सर्वांचे विशेष आभार मानतो.
माझ्या कुटुंबियांनो,
आज खेळाडूंना पुढे नेण्यासाठी चांगले प्रशिक्षक आणि उत्तम प्रशिक्षण मिळणेही तितकेच आवश्यक आहे. येथे जे दिग्गज खेळाडू उपस्थित आहेत, ते याचे महत्त्व जाणतात. म्हणूनच, आज सरकार खेळाडूंसाठी चांगल्या प्रशिक्षणाची व्यवस्था करत आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये खेळलेल्या आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. गेल्या काही वर्षांत देशातील युवकांना वेगवेगळ्या खेळांशी जोडण्यात आले आहे.
मित्रहो,
सरकार प्रत्येक गावात निर्माण करत असलेल्या आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधांमुळे खेड्यापाड्यातील आणि लहान शहरांतील खेळाडूंनाही नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई सारख्या मोठ्या शहरांमध्येच चांगले स्टेडियम उपलब्ध होते, मात्र आता देशाच्या कानाकोपऱ्यात, अगदी दुर्गम भागातही खेळाडूंना या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत उभारण्यात येत असलेल्या क्रीडा विषयक पायाभूत सुविधांचा आपल्या मुलींना खूप फायदा होत आहे याचा मला आनंद आहे. आता मुलींना खेळण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी घरापासून दूर जाण्याचा त्रास कमी होत आहे.
मित्रहो,
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात खेळांना विज्ञान, वाणिज्य किंवा इतर अभ्यासाप्रमाणेच त्याच श्रेणीत ठेवण्यात आले आहे. पूर्वी खेळ हा केवळ अतिरिक्त छंद मानला जात होता, मात्र आता तसे नाही. आता शाळांमध्ये खेळ हा विषय म्हणून शिकवायचा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्या सरकारनेच मणिपूरमध्ये देशातील पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन केले आहे. उत्तर प्रदेशातही क्रीडा सुविधांवर हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. गोरखपूरमधील क्रीडा महाविद्यालयाच्या विस्तारापासून ते मेरठमधील मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाच्या उभारणीपर्यंत, आपल्या खेळाडूंसाठी नवीन क्रीडा केंद्रे बांधली जात आहेत.
मित्रहो,
देशाच्या विकासासाठी क्रीडा सुविधांचा विस्तार करणे अत्यंत आवश्यक आहे. हे केवळ खेळासाठीच नाही तर देशाच्या प्रतिष्ठेसाठीही महत्त्वाचे आहे. आपल्यापैकी अनेकांना जगातील अनेक शहरे यासाठी माहीत आहेत कारण तिथे मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन झाले आहे. आपल्याला भारतातही अशी केंद्रे तयार करावी लागतील, जिथे अशा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करता येईल. हे स्टेडियम, ज्याची आज पायाभरणी झाली आहे, ते खेळाप्रती आपल्या या निर्धाराचा साक्षीदार बनेल. हे स्टेडियम केवळ विटा आणि काँक्रीटने बनवलेले मैदान नसेल तर ते भविष्यातील भारताचे भव्य प्रतीक बनेल. प्रत्येक विकास कामासाठी माझी काशी माझ्या पाठीशी आशीर्वाद घेऊन उभी आहे, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. तुम्हा लोकांशिवाय काशीमध्ये कोणतेही कार्य पूर्ण होऊ शकत नाही. तुमच्या आशीर्वादाने आम्ही काशीच्या कायापालट करण्यासाठी अशाच प्रकारे विकासाचे नवे अध्याय लिहित राहू. पुन्हा एकदा, क्रिकेट स्टेडियमच्या पायाभरणीबद्दल मी काशी आणि संपूर्ण पूर्वांचलच्या जनतेचे खूप-खूप अभिनंदन करतो.
हर-हर महादेव! धन्यवाद।
****
Shilpa P/Sushama K/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1960083)
Visitor Counter : 145
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam