ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय मानक ब्युरोने देशभरातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन केले 6467 मानक क्लब


‘मानक कक्षा’ साठी 1 लाख रुपये अर्थ सहाय्य तर प्रयोगशाळेसाठी 50 हजार रुपये

बीआयएस "मानक क्लब" द्वारे गुणवत्तापूर्ण तरुण राजदूतांना देत आहे प्रोत्साहन

Posted On: 19 SEP 2023 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2023

 

भारतीय मानक ब्युरो (BIS) या भारताच्या राष्ट्रीय मानक मंडळाने घोषित केले आहे की त्यांनी देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 6467 मानक क्लब स्थापन केले आहेत. भारतीय मानक ब्युरो (BIS) नुसार समाजातील तरुण सदस्यांना जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी मानकांच्या महत्त्वाबद्दल जागरूक करण्याच्या उद्देशाने मानक क्लब स्थापन केले जात आहेत.

“मुले ही सशक्त, चैतन्यशील आणि गतिमान भारताचे शिल्पकार आहेत. भारतीय मानक ब्युरो (BIS) देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मानक क्लबची निर्मिती या दूरदर्शी उपक्रमाद्वारे भारताचे भविष्य उज्ज्वल बनवत आहे. या नाविन्यपूर्ण प्रयत्नाचा उद्देश तरुणांच्या मनात गुणवत्ता, मानके आणि वैज्ञानिक स्वभाव निर्माण करण्याला सर्वोच्च महत्त्व देणे हे आहे. गुणवत्तापूर्ण चेतना, मानकीकरणाच्या तत्त्वांचा अंगिकार हे वेगवान आर्थिक विकासाचा मुख्य आधारस्तंभ आहेत. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, मानके आणि मानकीकरणाची प्रक्रिया रुजवून आम्ही एक ठिणगी पेटवत आहोत ज्यामध्ये आपल्या समाजात परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती आहे” अशी माहिती भारतीय मानक ब्युरोने (BIS) एका अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे.

2021 मध्ये देशभरातील 6,467 शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुरू झालेल्या मानक क्लब उपक्रमाने आधीच महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे, असे भारतीय मानक ब्युरोने म्हटले आहे. या क्लबमध्ये विज्ञान शाखेची पार्श्वभूमी असलेल्या 1.7 लाखांहून अधिक उत्साही विद्यार्थ्यांचे सदस्यत्व आहे. या विद्यार्थ्यांना भारतीय मानक ब्युरो द्वारा प्रशिक्षित संबंधित शाळेतील समर्पित विज्ञान शिक्षक मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करत आहेत. यापैकी 5,562 मानक क्लब शाळांमध्ये तयार करण्यात आले आहेत, तर 905 क्लब विविध महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आले आहेत, ज्यातील 384 क्लब अभियांत्रिकी महाविद्यालयात आहेत.

या मानक क्लबचे विद्यार्थी सदस्य खालील प्रकारच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात :

  • मानक लेखन स्पर्धा
  • प्रश्नमंजुषा स्पर्धा
  • वादविवाद, निबंध लेखन आणि पोस्टर बनवणे
  • प्रयोगशाळा आणि औद्योगिक आस्थापनांना आणि इतर ठिकाणी अधिक माहिती घेण्यासाठी भेटी देतात

प्रतिभावांत तरुणांना गुणवत्ता आणि मानकीकरणाच्या  क्षेत्रातले संपूर्ण ज्ञान प्रदान करण्यासाठी या उपक्रमांची रचना केली गेली आहे. या क्लब अंतर्गत विविध प्रकारचे उपक्रम आयोजित केले जातात आणि हे उपक्रम आयोजित करण्यासाठी या शैक्षणिक संस्थांना भारतीय मानक ब्युरो च्या माध्यमातून (BIS) आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.  याव्यतिरिक्त, मानक क्लबच्या मार्गदर्शकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि विद्यार्थी सदस्यांसाठी प्रयोगशाळा आणि उद्योग एककांना भेटी देण्याचे कार्यक्रम भारतीय मानक ब्युरो च्या माध्यमातून नियमितपणे आयोजित केले जातात.

“व्यावहारिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून भारतीय मानक ब्युरोने आपले आर्थिक सहाय्य आणखी वाढवले आहे,अधिक माहिती करता निवेदन वाचावे.

मानक क्लब असलेल्या उच्च आणि उच्च माध्यमिक पात्र सरकारी शाळा जास्तीत जास्त 50,000/- रुपयांपर्यंत एक-वेळचे प्रयोगशाळा अनुदान मिळण्यास पात्र ठरतात. आपल्या विज्ञान प्रयोगशाळांच्या श्रेणीसुधारित करण्यासाठी या शाळांना अत्याधुनिक प्रयोगशाळा उपकरणांच्या स्वरूपात भारतीय मानक ब्युरो कडून हे अनुदान दिले जाते, अधिक माहिती करता निवेदन वाचावे.

“याशिवाय, शिक्षणाच्या ठिकाणी वातावरण आनंददायी आणि आकर्षक राहावे याची खात्री करण्यासाठी भारतीय मानक ब्युरोच्या माध्यमातून, 1,00,000/- रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य  देखील प्रदान केले जाते. ज्या सरकारी संस्थांमध्ये मानक क्लब तयार केले गेले आहेत त्या ठिकाणी 'मानक कक्ष' स्थापन करण्यासाठी हे अनुदान दिले जाते. या उपक्रमांतर्गत शाळेतील एका खोलीचे स्मार्ट टीव्ही, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, योग्य रोषणाई, भिंती सुशोभित करणे इत्यादी मूलभूत सुविधा पुरवून नूतनीकरण केले जाईल. अशा उपक्रमांमुळे जिज्ञासा आणि नाविन्यपूर्णतेला चालना मिळावी आणि या क्षेत्रातले भावी तज्ञ निर्माण व्हावेत हे उद्दिष्ट ठेवून अशी ठिकाणे स्थापन केली जात आहेत, असे या निवेदनात सांगितले आहे.

असेही नमूद करण्यात आले आहे की, “गुणवत्तेसाठी आपल्या अतूट वचनबद्धतेसह, भारतीय मानक ब्युरो आपल्या तरुणांच्या मनाचे पालनपोषण करून भारताचे भविष्य घडवत आहे. हा दूरदर्शी उपक्रम केवळ गुणवत्ता आणि मानकांना चालना देत नाही तर तरुण पिढीला जबाबदार आणि दर्जेदार जागरूक नागरिक बनण्यास सक्षम बनवतो.”

 

* * *

S.Patil/Shraddha/Vikas/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1958800) Visitor Counter : 230