वस्त्रोद्योग मंत्रालय

भारत हा वैद्यकीय वस्त्रोद्योगात विशेषतः कोविड काळात उदयास आलेल्या देशांपैकी एक आघाडीचा देश: दर्शना विक्रम जरदोश


‘मेडिटेक्स 2023’ या वैद्यकीय वस्त्रोद्योगातील व्याप्ती आणि संधीवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून आयोजन

Posted On: 14 SEP 2023 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 सप्‍टेंबर 2023

 

वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानांतर्गत (एनटीटीएम) द साउथ इंडिया टेक्सटाईल रिसर्च असोसिएशन (एसायटीआरए) सोबत भागीदारीत ‘मेडिटेक्स 2023: वैद्यकीय वस्त्रोद्योगातील व्याप्ती आणि संधी या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे 13 सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजन केले होते.

या परिषदेत वैद्यकीय वस्त्रोद्योगातील अलीकडील फायदे आणि संधी; आयात पर्याय: स्वदेशी वैद्यकीय वस्त्र उत्पादनांची व्याप्ती आणि मागणी; वैद्यकीय वस्त्रोद्योगातील उद्योजकीय मार्ग – संकल्पनेपासून बाजारपेठेपर्यंत; वैद्यकीय वस्त्रोद्योगातील भविष्यातील दिशा; आणि मानके, प्रमाणन आणि नियामक आवश्यकता यासह अनेक सत्रे होती. या परिषदेदरम्यान वैद्यकीय वस्त्रोद्योगातील 15 वर्षांच्या संशोधनावरील: अ क्रिस्टल ज्युबिली पब्लिकेशन (2008-2023) या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

केंद्रीय मंत्रालयांचे अधिकारी आणि प्रतिनिधी, केंद्र आणि राज्य सरकारचे वापरकर्ता विभाग (आरोग्य आणि वैद्यकीय), संस्था, अग्रणी उद्योजक, वैज्ञानिक तज्ज्ञ, संशोधक आणि वैद्यकीय वस्त्रोद्योगाशी संबंधित व्यावसायिक या परिषदेत सहभागी झाले होते.

वस्त्रोद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री आणि कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी दर्शना विक्रम जरदोश, यांनी यावेळी मार्गदर्शन करताना नवोन्मेषावर लक्ष केंद्रित करण्यावर, नवीन उत्पादनांचे व्यावसायिकरण वाढवण्यावर आणि वैद्यकीय वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानातील प्रगतीच्या संधी वाढवण्यावर भर दिला.

पीपीई किट्स आणि मास्कचे जागतिक अग्रणी म्हणून भारताच्या झालेल्या परिवर्तनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. कोविड ग्रेड पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) चा उत्पादक नसलेला भारत;  कोविड काळात अवघ्या सहा महिन्‍यांच्‍या कालावधीत पीपीई आणि एन-95 मास्‍कचा जगातील दुसरा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार बनला आहे, असे त्यांनी पुढे अधोरेखित केले.

भारतातील वस्त्रोद्योग आणि तांत्रिक वस्त्रोद्योग परिसंस्था सर्वांगीणरीत्या बळकट करण्यासाठी वस्त्रोद्योगासाठी पीएलआय योजना, पीएम मित्र पार्क योजना आणि राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान (एनटीटीएम) यासह विविध उपक्रमांच्या रूपात सरकार सातत्याने धोरणात्मक पाठबळ पुरवत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

त्यांनी विविध भागधारकांना त्यांचे मौल्यवान विचार मांडायला सांगितले, जे भारतातील वैद्यकीय वस्त्रोद्योगाच्या भविष्यासाठी ठोस रूपरेषा तयार करण्यासाठी आणि पंतप्रधानांच्या कर्तव्य कालच्या दृष्टीकोनाला साकार करण्यासाठी मार्ग खुला करतील.

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सहसचिव राजीव सक्सेना यांनी भारतातील पॅकटेक आणि मोबिलटेकच्या तुलनेत कमी वाटा असूनही, जीवनमानाच्या गुणवत्तेशी थेट संबंध असल्यामुळे वैद्यकीय वस्त्रोद्योगाच्या उभारीवर प्रकाश टाकला.

वस्त्रोद्योग मंत्रालय हे विविध वैद्यकीय वस्त्रांच्या नियामक पैलूंवर सीडीएससीओ सोबत काम करत आहे, असेही ते म्हणाले. वस्त्रोद्योग मंत्रालय लवकरच सॅनिटरी पॅड आणि डायपरसह 6 वैद्यकीय वस्त्रांसाठी गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCOs) अधिसूचित करेल, असेही त्यांनी जाहीर केले.

डॉ. शैलेश पवार, शास्त्रज्ञ-एफ, आयसीएमआर-एनआयव्ही यांनी भारतातील वैद्यकीय उपकरणांच्या स्वदेशी विकासाच्या प्रचंड व्याप्तीवर प्रकाश टाकला.

द साउथ इंडिया टेक्सटाईल रिसर्च असोसिएशन च्या प्रशासकीय परिषदेचे सदस्य एस के सुंदररामन यांनी तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने राबवलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.

 

* * *

Jaydevi PS/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1957340) Visitor Counter : 118