राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गांधीनगर येथे दूर-दृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयुष्मान भव मोहिमेचा केला शुभारंभ
Posted On:
13 SEP 2023 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 सप्टेंबर 2023
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (13 सप्टेंबर 2023) राजभवन, गांधीनगर इथून दूर-दृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयुष्मान भव मोहिमेचा शुभारंभ केला.
कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, ‘कोणतीही व्यक्ती मागे राहू नये आणि कोणतेही गाव मागे राहू नये’, हे आयुष्मान भव मोहिमेचे उद्दिष्ट, आपल्या देशाला सर्वांसाठी आरोग्य सेवेचे उद्दिष्ट गाठण्यामध्ये यश देईल. त्या पुढे म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक कुटुंब निरोगी राहिले, तर निरोगी भारत घडवण्याचा संकल्प पूर्ण होईल. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बहु-मंत्रालयीन दृष्टीकोन अंगीकारण्यात आल्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अशी मोठी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वांचे सहकार्य उपयोगी ठरेल, असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रपती म्हणाल्या की, आयुष्मान आपके द्वार 3.0 या उपक्रमा अंतर्गत, लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड प्रदान करणे, गावकऱ्यांना आरोग्य, स्वच्छता आणि पोषण याबाबत जागरुक करण्यासाठी आयुष्मान सभा आयोजित करणे, आयुष्मान मेळाव्यांचे आयोजन, आणि आठवड्यातून एकदा सामुदायिक आरोग्य केंद्रांवर तज्ञ डॉक्टरांच्या भेटीची व्यवस्था करणे, ही कौतुकास्पद पावले आहेत.
राष्ट्रपती म्हणाल्या की, भारत अनेक क्षेत्रांमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि कार्यपद्धती स्वीकारण्यात मोठ्या उत्साहाने पुढे जात आहे. सप्टेंबर 2021 मध्ये ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ सुरु करण्यात आले, याबद्दल आनंद व्यक्त करत, भारत इतर क्षेत्रांप्रमाणे आरोग्य सेवा क्षेत्रातही डिजिटल समावेशाचे आपले उदाहरण जगासमोर ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयुष्मान भव मोहीम हा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा एक सर्वसमावेशक देशव्यापी आरोग्य सेवा उपक्रम असून, एकात्मिक आरोग्य सेवा कवच प्रदान करणे आणि देशातील प्रत्येक गाव आणि शहरापर्यंत पोहोचणे, हे याचे उद्दिष्ट आहे. ही मोहीम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 'सेवा पंधरवड्या' दरम्यान राबविण्यात येणार आहे.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1956938)
Visitor Counter : 169
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam