पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जी 20 शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्रातले निवेदन

Posted On: 10 SEP 2023 12:49PM by PIB Mumbai

 

आदरणीय मान्यवर,

आपण सर्वानी काल एक पृथ्वी आणि एक कुटुंब सत्राअंतर्गत व्यापक विचारविनिमय केला. आज जी 20, एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या दृष्टिकोनाला मूर्त रूप देण्यासाठी एक आशादायक व्यासपीठ म्हणून उदयाला आली आहे.

आपण येथे अशा भविष्याबद्दल बोलत आहोत, ज्यात आपण जागतिक गाव या संकल्पनेपलीकडे जाऊन जागतिक कुटुंब  साकारताना पाहत आहोत. असे भविष्य ज्यामध्ये केवळ देशांचे हितच नाही तर हृदयेही जोडलेली आहेत.

 

मित्रहो,

मी जीडीपी केंद्रित दृष्टिकोनाच्या ऐवजी नेहमीच मानव केंद्रित दृष्टिकोनाकडे तुमचे लक्ष वेधले आहे. आज भारतासारख्या अनेक देशांकडे अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आम्ही संपूर्ण जगाबरोबर सामायिक करत आहोत. भारताने चांद्रयान मोहिमेचा डेटा मानवतेच्या हितासाठी सर्वांशी सामायिक  करण्याचा आपला विचार व्यक्त केला आहे. हे सुद्धा मानव केंद्रित विकासाप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे.

भारताने तंत्रज्ञानाचा वापर सर्वसमावेशक विकास आणि त्याचा लाभ तळागाळातील समाज घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी केला आहे. आमच्या छोट्या खेड्यापाड्यांमधील अगदी छोटा व्यापारी देखील डिजिटल व्यवहार करत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आराखडा तयार करण्यावर सहमती झाल्याने मला आनंद होत आहे. त्याचप्रमाणे, "विकासासाठी डेटा वापरण्यावर जी 20 तत्त्वे" देखील स्वीकारली गेली आहेत.

वैश्विक दक्षिणेच्या विकासाकरता "क्षमता निर्माण विकास उपक्रमासाठी डेटा" हा कार्यक्रम लाँच करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली  स्टार्टअप 20 प्रतिबद्धता गटाची  निर्मिती हे देखील एक मोठे पाऊल आहे.

 

मित्रहो,

आज आपण नवीन पिढीच्या तंत्रज्ञानात होत असलेले कल्पनातीत सुधार आणि वेग यांचे साक्षीदार आहोत. आपल्या समोर कृत्रिम बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे.

2019 मध्ये, जी 20 ने AI वरील तत्त्वेस्वीकारली होती. आज आपल्याला एक पाऊल पुढे जाण्याची गरज आहे.

आता आपण एका जबाबदार मानव केंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासनाकरता आराखडा तयार करावा असे मी सुचवतो. याबाबत भारत देखील आपल्या सूचना देईल. सर्व देशांना सामाजिक-आर्थिक विकास, जागतिक कार्यबल आणि संशोधन आणि विकास यांसारख्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचे लाभ  मिळावेत असा आमचा प्रयत्न असेल.

 

मित्रहो,

आज जगासमोर अन्य काही ज्वलंत समस्या देखील आहेत, ज्याचा परिणाम सर्व देशांच्या वर्तमानसह भविष्यावर सुद्धा होत आहे. आम्ही सायबर सुरक्षा आणि क्रिप्टो चलनाच्या आव्हानांशी परिचित आहोत. क्रिप्टो-चलन, सामाजिक व्यवस्था, वित्तीय  आणि आर्थिक स्थैर्य हे क्षेत्र प्रत्येकासाठी एक नवीन विषय म्हणून उदयास आले आहे. म्हणून, आम्हाला क्रिप्टो-चलनांचे नियमन करण्यासाठी जागतिक मानके विकसित करावी लागतील. यासाठी बँकेच्या नियमनासंदर्भातील बेसल मानके आमच्यासमोर प्रारूप म्हणून आहेत.

या दिशेने लवकरात लवकर ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. अशाच प्रकारे सायबर सुरक्षेसाठी जागतिक सहकार्य आणि आराखड्याची आवश्यकता आहे. सायबर विश्वातून दहशतवादाला नवनवीन माध्यमे आणि निधी मिळवण्याच्या नव्या पद्धती मिळत आहेत.प्रत्येक देशाच्या सुरक्षिततेच्या आणि समृद्धीच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.

जेव्हा आपण प्रत्येक देशाच्या सुरक्षेची, प्रत्येक देशाची संवेदनशीलता जपण्यावर भर देऊ, तेव्हाच One Future ची भावना दृढ होईल.

 

मित्रहो,

जगाला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाण्याच्या दृष्टीकोनातून जागतिक व्यवस्था वर्तमानातल्या वास्तवानुसार असणे आवश्यक आहे. आज "संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद" हे देखील त्याचेच एक उदाहरण आहे. जेव्हा UN ची स्थापना झाली तेव्हाचे जग आजच्या जगापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. त्यावेळी UN मध्ये 51 संस्थापक सदस्य होते. आज UN मध्ये सहभागी देशांची संख्या जवळजवळ 200 झाली आहे.

असे असूनही, UNSC मधील कायम सदस्यांची संख्या अजूनही तितकीच आहे. तेव्हापासून आजपर्यंत जग प्रत्येक बाबतीत खूप बदलले आहे. वाहतूक असो, दळणवळण असो, आरोग्य , शिक्षण, प्रत्येक क्षेत्रात बदल झाले आहेत. हे नवीन वास्तव आपल्या नवीन जागतिक रचनेत प्रतिबिंबित झाले पाहिजे.

जी व्यक्ती आणि संस्था काळानुरूप स्वतःत बदल करत नाही, ती आपली प्रासंगिकता गमावून बसते हा निसर्गाचा नियम आहे. गेल्या काही वर्षांत अनेक प्रादेशिक मंच अस्तित्वात आले असून ते प्रभावीही ठरत असण्यामागे कारण काय आहे याचा खुल्या मनाने विचार करायला हवा.

 

मित्रहो,

आज प्रत्येक जागतिक संघटनेला आपली प्रासंगिकता वाढवण्यासाठी सुधारणा करणे आवश्यक आहे. हे ध्यानात ठेऊन काल आपण आफ्रिकी महासंघाला G-20 चे कायम सदस्य बनवण्यासाठी ऐतिहासिक पुढाकार घेतला आहे. याप्रमाणेच, आपल्याला बहुराष्ट्रीय विकास बँकांबाबत एकमत होण्याची भूमिका  विस्तृत करणे गरजेचे आहे. या दृष्टीकोनातून आपले निर्णय तात्काळ आणि प्रभावी देखील असले पाहिजेत.

 

मित्रहो,

झपाट्याने बदलणाऱ्या जगात आपल्याला परिवर्तनासोबतच शाश्वतता आणि स्थैर्यही तितकेच गरजेचे आहे. हरित विकास करार, शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांसाठी कृती आराखडा,  भ्रष्टाचारविरोधी उच्च स्तरीय मूल्य, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि बहुराष्ट्रीय विकास बँकांच्या सुधारणांचे आपले संकल्प पूर्णत्वास नेण्याची शपथ आपण घेऊया.

 

महोदय,

महामहिम,

मला आता आपल्या सर्वांची मते जाणून घ्यायला आवडेल.

***

S.Thakur/B.Sontakke/S.Naik/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1956046) Visitor Counter : 166