पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची घेतली भेट


G20 साठी भारताने आमंत्रित केलेल्या 9 अतिथी देशांपैकी एक आहे बांगलादेश

उभय& नेत्यांनी परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर केली चर्चा

Posted On: 08 SEP 2023 9:02PM by PIB Mumbai

राजकीय, सुरक्षा, आर्थिक, कनेक्टिव्हिटी आणि लोकांमधील परस्पर संबंधांसह द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचे त्यांनी केले सकारात्मक मूल्यांकन .

डिजिटल पेमेंट, संस्कृती आणि कृषी क्षेत्रातील सहकार्य यावरील 3 सामंजस्य करारांच्या देवाणघेवाणीचे त्यांनी केले स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान  शेख हसीना यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. पंतप्रधान हसीना 9-10 सप्टेंबर 2023 रोजी होणाऱ्या G-20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अतिथी देश म्हणून भारताला भेट देत आहेत.

दोन्ही नेत्यांनी राजकीय आणि सुरक्षा सहकार्य, सीमा व्यवस्थापन, व्यापार आणि कनेक्टिव्हिटी, जलसंपदा, वीज आणि ऊर्जा, विकास सहकार्य, सांस्कृतिक आणि लोकांमधील  संबंध यासह द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व पैलूंवर चर्चा केली. प्रदेशातील सध्याच्या घडामोडी तसेच बहुपक्षीय मंचावरील सहकार्यावरही यावेळी चर्चा झाली.

चट्टोग्राम आणि मोंगला बंदरांचा वापर आणि भारत-बांग्लादेश मैत्री पाईपलाईन कार्यान्वित करण्यासंबंधी कराराचे या नेत्यांनी स्वागत केले. त्यांनी भारतीय रुपयांमध्ये  द्विपक्षीय व्यापार करार कार्यान्वित केल्याबद्दल कौतुक केले आणि दोन्ही देशांच्या व्यापारी समुदायाला ही व्यवस्था वापरण्यासाठी प्रोत्साहित केले.

सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर वाटाघाटी सुरू करण्यासाठी दोन्ही देश उत्सुक असून यामध्ये वस्तू, सेवा आणि गुंतवणुकीचे संरक्षण आणि संवर्धन यांचा समावेश आहे.

विकास सहकार्य प्रकल्पांच्या अंमलबजावणीबद्दल समाधान व्यक्त करून, नंतरच्या सोयीस्कर तारखेला पुढील  प्रकल्पांचे संयुक्त उद्घाटन करण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली.

i आगरतळा-अखौरा रेल्वे लिंक

ii मैत्री वीज संयंत्राचे युनिट- II

iii खुलना-मोंगला रेल्वे लिंक

त्यांनी द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी खालील सामंजस्य करारांच्या देवाणघेवाणीचे  स्वागत केले:

i नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि बांग्लादेश बँक यांच्यात डिजिटल पेमेंट व्यवस्थेतील  सहकार्याबाबत  सामंजस्य करार.

ii 2023-2025 साठी भारत आणि बांगलादेश दरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण  कार्यक्रमाच्या  नूतनीकरणाबाबत  सामंजस्य करार.

iii भारतीय कृषी संशोधन परिषद आणि बांगलादेश कृषी संशोधन परिषद यांच्यात सामंजस्य करार.

प्रादेशिक परिस्थितीच्या संदर्भात, पंतप्रधान मोदी यांनी म्यानमारमधील राखीन राज्यातून विस्थापित झालेल्या दहा लाखांहून अधिक लोकांना आश्रय दिल्याबद्दल बांगलादेशचे  कौतुक केले आणि निर्वासितांच्या सुरक्षित आणि शाश्वत मायदेशी परतण्याप्रति  भारताच्या विधायक  आणि सकारात्मक दृष्टिकोनाची माहिती दिली.

बांगलादेशने अलिकडेच  जाहीर केलेल्या हिंद-प्रशांत  दृष्टिकोनाचे भारताने स्वागत केले. उभय नेत्यांनी त्यांचे व्यापक सहभाग आणखी वाढवण्यासाठी यापुढेही एकत्र काम करण्याबाबत सहमती दर्शवली.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

 

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1955693) Visitor Counter : 166