युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या पोर्टलची केली सुरुवात


केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी तिसऱ्या फिट इंडिया प्रश्नमंजुषेची केली घोषणा

क्रीडाक्षेत्रापासून ते थेट चंद्रावर चांद्रयान उतरवण्यापर्यंत सर्व क्षेत्रात आपण आपली छाप उमटवली आहे. हा नवा भारत आहे: केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर

Posted On: 29 AUG 2023 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑगस्ट 2023

 

राष्ट्रीय क्रीडा दिन 2023 निमित्त, आज नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु स्टेडीयममध्ये आयोजित कार्यक्रमात, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी इतर अनेक उपक्रमांसह, तिसऱ्या फिट इंडिया प्रश्नमंजुषेची घोषणा केली.

नवी दिल्ली येथील विविध विद्यालयांचे सुमारे 500 विद्यार्थी तसेच विविध प्रख्यात क्रीडापटू आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघाचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी, खेलो इंडिया योजनेअंतर्गत येणाऱ्या क्रीडाविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले तसेच राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या पोर्टलची सुरुवात देखील करण्यात आली. केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी यावेळी बुडापेस्ट येथे भरलेल्या जागतिक क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत 4 x 400 मीटर रिले प्रकारात नवा आशियाई विक्रम प्रस्थापित करणाऱ्या भारतीय पुरुष संघाचा सत्कार देखील केला.

या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले, “हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांनी 1928,1932 आणि 1936 या वर्षी झालेल्या ऑलिम्पिकस्पर्धांमध्ये सलग तीन सुवर्णपदके मिळवून  दिली.हॉकीच्या या महान व्यक्तित्वाला आदरांजली  वाहण्यासाठी आजचा दिवस अत्यंत योग्य आहे, आणि गेल्या काही वर्षांमध्ये प्रशिक्षक आणि क्रीडापटू यांनी क्रीडा क्षेत्रातील ही क्रांती आणखी पुढे नेण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे हे पाहून मी आनंदित झालो आहे.”

“क्रीडादिनानिमित्त आज देशभरात 3526 कार्यक्रम होत आहेत आणि आपण ज्या मार्गाने आज इथवर पोहोचलो आहोत त्याची साक्ष्य हे कार्यक्रम देत आहेत. भारतीय क्रीडाविश्वासाठी हा अत्यंत अविश्वसनीय टप्पा आहे. सुमारे 60 वर्षांच्या काळात जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये केवळ 18 पदकांची कमाई झाली होती. मात्र, या एकाच वर्षात आपण या स्पर्धांमध्ये 26 पदकांची कमाई केली आहे. केवळ इतकेच नव्हे तर सर्वच क्रीडाप्रकारांमध्ये, मग बुद्धिबळात प्रज्ञानंद असो, कुस्तीमध्ये अंतिम पंघाल असो किंवा धनुर्विद्येत अदिती गोपीचंद स्वामी असो, आपण अत्यंत अभूतपूर्व कामगिरी केली आहे. बुडापेस्ट येथे भरलेल्या जागतिक क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत देखील 4 x 400 मीटर रिले प्रकारात आपल्या पुरुष संघाने देखील सरस  कामगिरी केली. त्याचबरोबर, आपला सदाबहार खेळाडू नीरज चोप्रा याने क्रीडा क्षेत्रातील उच्च स्तरावरील सर्व जागतिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे,” केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले.

फिट इंडिया प्रश्नमंजुषेच्या गेल्या दोन वर्षांच्या यशस्वी आयोजनानंतर आता तिसऱ्या वर्षीच्या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. ही भारतातील शालेय विद्यार्थ्यांसाठीची सर्वात मोठी क्रीडा आणि तंदुरुस्तीशी संबंधित प्रश्नमंजुषा असून यात मिळणाऱ्या बक्षिसांची एकूण रक्कम सव्वातीन कोटी रुपये आहे. फिट इंडिया प्रश्नमंजुषेच्या संदर्भात बोलताना, केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले, “अरुणाचल प्रदेशातील तेंगा खोऱ्यातील तसेच अंदमान, सिक्कीम येथील दुर्गम भागातील आणि अशाच इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी देखील फिट इंडिया प्रश्नमंजुषेत भाग घेतलेला पाहून मला अत्यंत आश्चर्य वाटले. या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या संघांचा या स्पर्धेतील पहिल्या काही सर्वोत्कृष्ट  संघांमध्ये समावेश होता.”

क्रीडाक्षेत्रापासून ते थेट चंद्रावर चांद्रयान उतरवण्यापर्यंत सर्वच क्षेत्रात आपण आपली छाप उमटवली आहे. हा नवा भारत आहे. आपल्या खेळाडूंनी सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मी केवळ एनएफएस आणि आयओए या संघटनांचे अभिनंदन करत नाही तर ज्यांनी त्यांच्या मुलांना शिस्त लावली आणि क्रीडाक्षेत्रात प्रवेश करण्यासाठी प्रोत्साहित केले त्या अनेक पालकांचे आणि प्रशिक्षकांचे देखील मी अभिनंदन करू इच्छितो,” केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर पुढे म्हणाले.

आज सुरु करण्यात आलेले राष्ट्रीय क्रीडा महासंघाचे पोर्टल हे भारत सरकारने व्यापार करण्यातील सुलभता आणि उत्तम प्रशासन यांची सुनिश्चिती करण्यासाठी सुरु केलेल्या डिजिटल भारताच्या संकल्पनेला अनुसरून आहे. हे एनएसएफएससाठी एकात्मिक ऑनलाईन पोर्टल असून एनएसएफएसच्या मान्यतांचे वार्षिक नवीकरण करणे, राष्ट्रीय क्रीडा महासंघांची निवडणूक इत्यादींसाठीची एक खिडकी प्रणाली असेल.

या पोर्टलचे कार्य सुरु झाल्यामुळे, एनएसएफएस तर्फे प्रत्यक्ष पद्धतीने कागदपत्रे जमा करणे तसेच केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे त्या कागदपत्रांची छाननी करण्याची सध्याची व्यवस्था मोडीत निघणार आहे. केंद्रीय क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघ यांच्यात अधिक उत्तम समन्वय साधला जाईल याची सुनिश्चिती देखील हे ऑनलाईन पोर्टल करून घेईल.

त्याचप्रमाणे, ऑनलाइन आवेदने भरण्यासाठी आणि संबंधित प्रक्रियेसाठी उपयोगात येणारे पोर्टलही यावेळी सुरू करण्यात आले. खेलो इंडिया योजनेअंतर्गत क्रीडा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांची निर्मिती आणि सुधारणा तसेच क्रीडा उपकरणांच्या मागणीसाठी सर्व अर्ज हाताळण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून  आपल्या आर्थिक सहाय्याचे प्रस्ताव सादर करण्यासाठी अनुदानधारक, राज्ये, केंद्रशासित प्रदेशांसाठी हे पोर्टल 1 सप्टेंबर 2023 पासून उपलब्ध होणार आहे.

खेलो इंडिया योजनेंतर्गत मंजूर झालेल्या क्रीडा पायाभूत सुविधा प्रकल्पांवरील माहिती पुस्तिका, ही वर्ष 2016 पासून खेलो इंडिया योजना देशातल्या क्रीडा क्षेत्रासाठी कशी फलदायी ठरली आणि त्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात कसा कायापालट घडून आला याचे दर्शन घडवते. ही माहिती  पुस्तिका देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील संपूर्ण क्रीडा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा ज्या विकसित केल्या गेल्या आहेत आणि ज्या विकासाच्या मार्गावर आहेत अशा , सर्व पायाभूत सुविधांवर प्रकाश टाकते. खेलो इंडिया योजना, तिच्या स्थापनेपासून, तळागाळातल्या स्तरावर लक्ष केंद्रित केल्याने देशातील क्रीडा विकासात निर्णायक ठरली आहे.

हा भव्य सोहळा साजरा करण्यासाठी आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहण्यासाठी, भारत सरकारच्या अनेक कार्यालयांमध्ये, केंद्रीय मंत्रालयाची कार्यालये, भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रे, खेलो इंडिया केंद्रांमध्ये,राष्ट्रीय क्रीडा महासंघ तसेच शाळा आणि महाविद्यालयात विविध खेळ आणि आरोग्य संबंधी उपक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच यावेळी वयोगटानुसार, 18-40 वर्षे, 40-60 वर्षे आणि 60+ वर्षे या वयोगटांसाठी स्पर्धात्मक आणि मजेदार खेळ आयोजित करण्यात आले होते.

 

* * *

N.Chitale/Sanjana/Vikas/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1953384) Visitor Counter : 130