पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

चांद्रयान 3 च्या ऐतिहासिक लॅंडींगचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान इस्रो टीमसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून सहभागी


हा क्षण 140 कोटी भारतीयांच्या एकत्रित हृदयाच्या ठोक्याची क्षमता सांगणारा आणि भारताच्या नव्या उर्जेच्या आत्मविश्वासाचा क्षण

अमृत काळातील हा पहिला प्रकाश किरण, “ही यशाची अमृत वर्षा”

“आजवर जगातील कोणताही देश पोहचू न शकलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा झेंडा रोवण्याचे संपूर्ण श्रेय आपल्या शास्त्रज्ञांचे समर्पण आणि गुणवत्तेलाच”

आता तो दिवस दूर नाही जेव्हा मुलं म्हणतील- “चंदा मामा एक टूर के” म्हणजेच, चंद्राचे अंतर एका यात्रेइतके सोपे

“आमचे चांद्र अभियान मानवकेंद्री दृष्टिकोनावर आधारित. म्हणूनच, हे यश संपूर्ण मानवतेचे यश”

“आम्ही सौर मालिकेच्या सीमाही आजमावणार आणि मानवासाठी ब्रह्मांडाच्या असीम संधी प्रत्यक्षात साकार करण्यासाठी देखील काम करणार”

“ भारत हे वारंवार सिद्ध करतो आहे की - आम्ही आकाशाला गवसणी घालणारे लोक!”

Posted On: 23 AUG 2023 8:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2023

चांद्रयान 3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर होणाऱ्या लॅंडींगच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरनसिंगच्या माध्यमातून इस्रोच्या टीमसोबत सहभागी झाले होते. चांद्रयानच्या यशस्वी लॅंडींगनंतर लगेचच, पंतप्रधानांनी इस्रोच्या टीमशी संवाद साधला आणि या ऐतिहासिक यशासाठी त्यांचे अभिनंदन केले.

इस्रोच्या सर्व टीमला आपले कुटुंबिय असे संबोधत,पंतप्रधान म्हणाले की असे ऐतिहासिक क्षण, संपूर्ण देशाच्या शाश्वत चेतनेचा भाग बनून जातात.

हा क्षण अविस्मरणीय, अभूतपूर्व आहे. हा क्षण 'विकसित भारताचा शंखनाद करण्याचा आहे. भारतासाठी हा क्षण  विजयाच्या जयघोषाचा , अडचणींचा महासागर पार करून विजयाच्या 'चंद्रपथावर' चालण्याचा हा क्षण आहे. 140 कोटी हृदयाच्या स्पंदनांच्या  सामर्थ्याचा  आणि भारताच्या नव्या ऊर्जेच्या आत्मविश्वासाचा हा क्षण आहे.हा भारताच्या उगवत्या भाग्याला  आमंत्रण देणारा हा क्षण आहे, असे पंतप्रधानांनी आनंद व्यक्त करणाऱ्या राष्ट्राला संबोधित करताना  सांगितले."'अमृत काळ 'च्या पहिल्या प्रकाशात ही यशाची 'अमृत वर्षा' आहे", असे पंतप्रधानांनी आनंद व्यक्त करताना सांगितले.  शास्त्रज्ञांनी जे सांगितले त्याचा  उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले  की, "भारत आता चंद्रावर आहे!" आपण नुकतेच अंतराळात नव्या भारताच्या पहिल्या उड्डाणाचे साक्षीदार आहोत, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान म्हणाले की, ते सध्या जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाले आहे मात्र  त्यांचे  मनदेखील इतर नागरिकांप्रमाणे चांद्रयान 3 वर केंद्रित होते. प्रत्येक भारतीय जल्लोष करत आहे  आणि प्रत्येक कुटुंबासाठी हा उत्सवाचा दिवस आहे आणि या विशेषप्रसंगी ते प्रत्येक नागरिकाशी उत्साहाने जोडलेले  आहेत , असे पंतप्रधानांनी सांगितले.  या मोहिमेसाठी ज्यांनी वर्षानुवर्षे अथक परिश्रम घेतले आहेत. त्या  टीम चांद्रयान, इस्रो आणि देशातील सर्व शास्त्रज्ञांचे   पंतप्रधानांनी अभिनंदन केले.  तसेच उत्साह, आनंद आणि भावनांनी भरलेल्या या अद्भुत क्षणासाठी 140 कोटी देशवासियांचेही त्यांनी  अभिनंदन केले.

भारत आपल्या शास्त्रज्ञांच्या समर्पणाने आणि प्रतिभेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचला आहे, ज्या ठिकाणी जगातील कोणताही देश  आजवर पोहोचू शकला नाही, असे पंतप्रधान म्हणाले. चंद्राशी संबंधित सर्व दंतकथा आणि कथा आता बदलतील आणि नव्या पिढीच्या म्हणींना नवा अर्थ सापडेल, असे त्यांनी अधोरेखित केले. पृथ्वीला ‘आई’, आणि चंद्राला 'मामा’ मानले जाते, अशा भारतीय दंतकथांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, चंद्र देखील खूप दूरचा मानला जातो आणि त्याला 'चंदा मामा दूर के' म्हणून संबोधले जाते, परंतु ही वेळ दूर नाही, जेव्हा मुले म्हणतील, 'चंदा मामा एक टूर के' म्हणजेच चंद्राचे अंतर एका यात्रेएवढे सोपे  आहे. 

जगातील लोक, प्रत्येक देश आणि प्रदेशाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, भारताची यशस्वी चांद्र मोहीम ही केवळ एकट्या भारताची नाही. या वर्षी जग भारताच्या जी -20  अध्यक्षपदाचा साक्षीदार आहे. ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हा आमचा दृष्टीकोन जगभर निनादत आहे. आमच्या या मानवकेंद्री  दृष्टिकोनाचे जगाने स्वागत केले आहे. आमची चांद्र मोहीमदेखील याच मानवकेंद्री दृष्टिकोनावर आधारित आहे. म्हणूनच, हे यश संपूर्ण मानवजातीचे आहे, आणि ते भविष्यात इतर देशांच्या चांद्र मोहिमांना उपयोगी ठरेल. पंतप्रधान मोदी म्हणाले.मला विश्वास आहे की ग्लोबल साउथसह जगातील सर्व देश अशा प्रकारची कामगिरी करण्यास सक्षम आहेत. आपण सर्वजण चंद्र आणि त्यापलीकडील  आकांक्षा बाळगू शकतो.

चांद्रयान महाअभियानाच्या यशामुळे भारत चंद्राच्या कक्षेच्या पलीकडे झेप घेण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. आपण आपल्या सौरमालेच्या सीमा तपासून पाहू आणि मानवासाठी ब्रह्मांडाच्या असीम संधी जाणून घेण्याचा प्रयत्न करू  असे  मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी भविष्यासाठी निर्धारित महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे अधोरेखित केली  आणि सांगितले  की इस्रो लवकरच सूर्याच्या विस्तृत  अभ्यासासाठी 'आदित्य एल-1' मोहीम राबवणार आहे. शुक्र हे देखील इस्रोच्या ध्येयांपैकी एक असल्याचेही त्यांनी सांगितले. आकाशाला  मर्यादा नाही हे भारत पुन्हा पुन्हा सिद्ध करत आहे, असे सांगत त्यांनी गगनयान मोहिमेचा उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले या मोहिमेअंतर्गत भारत आपल्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेसाठी पूर्णपणे सज्ज आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान हे देशाच्या उज्ज्वल भवितव्याचा आधार आहेत यावर त्यांनी भर दिला. हा दिवस आपल्या सर्वांना उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देईल आणि संकल्पांच्या सिद्धीचा  मार्ग दाखवेल, असे ते म्हणाले. पराभवातून शिकत विजय कसा मिळवता येतो हे आजच्या दिवसाने दाखवून दिले आहे."असे सांगत पंतप्रधानांनी वैज्ञानिकांना त्यांच्या भविष्यातील सर्व प्रयत्नांमध्ये यशस्वी होण्यासाठी  शुभेच्छा दिल्या.

S.Kakade/Radhika/Sonal C/Rajashree/Sushama/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1951527) Visitor Counter : 153