आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आमचा दृष्टिकोन स्पष्ट आहे, आमची ध्येये महत्वाकांक्षी आहेत आणि आमचा निर्धार अढळ आहे: डॉ. मनसुख मांडविय


डॉ. मनसुख मांडविय यांनी जी 20 (G20) परिषदेत सहभागी आरोग्य मंत्री आणि उद्योग क्षेत्रातल्या नेत्यांशी संवाद साधताना आरोग्य क्षेत्रातील नवोन्मेश आणि जागतिक सहकार्याबद्दलचा दृष्टिकोन केला स्पष्ट

जनऔषधी केंद्रांच्या भेटीवर गेलेल्या शिष्टमंडळाचे डॉ. मांडविय यांनी केले नेतृत्व

डॉ. मनसुख मांडविय आणि इंडोनेशियाचे आरोग्य मंत्री बुडी जी. सादीकिन यांच्यातील द्विपक्षीय बैठक यशस्वी

भारतात उत्पादित औषधांनी नेदरलँड मधील, युरोपामधील आणि जगभरातील अनेकांचे जीव वाचवले - नेदरलँड्सचे आरोग्य मंत्री डॉ. अर्न्स्ट कुइपर्स यांचे प्रतिपादन

भारतातील जनऔषधी केंद्राचे मॉडेल हे लोकांना उत्तम दर्जाची औषधे, त्यांची सुलभता आणि स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देणारी जगातील सर्वोत्कृष्ट व्यवस्था : इंडोनेशियाचे आरोग्य मंत्री बुडी गुनाडी सादीकिन

Posted On: 20 AUG 2023 12:51PM by PIB Mumbai

 

"आमचा दृष्टीकोन स्पष्ट आहे, आमची उद्दिष्टे महत्वाकांक्षी आहेत आणि आमचा निर्धार अढळ आहे." असे प्रतिपादन  केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी  केले. गांधीनगर येथे जी 20 (G20) आरोग्य मंत्र्यांच्या बैठकी प्रसंगी औषधनिर्माण क्षेत्रातील भारतीय उद्योगातले नेते आणि जी 20 परिषदेत सहभागी मंत्री आणि प्रतिनिधी यांच्या  उपस्थित केलेल्या मुख्य भाषणात त्यांनी हे प्रतिपादन केले.

यावेळी डॉ. मांडविय यांनी औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्रातील भारताच्या कामगिरीची प्रशंसा केली आणि औषध निर्माण क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी जागतिक केंद्र म्हणून भारताची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. औषध निर्माण क्षेत्रात, जागतिक पटलावर भारताची ओळख आता एक आधारस्तंभ म्हणून  होत आहे, असेही ते म्हणाले.

आरोग्यसेवा क्षेत्राच्या भविष्याबाबत भारताचा दृष्टिकोन, यावरच डॉ. मांडवीय यांचे बीजभाषण केंद्रित होते. ज्यामध्ये सर्वसमावेशी दृष्टीकोनापासून मूल्य-आधारित नेतृत्व मॉडेल याचा समावेश होता. "आरोग्यसेवा क्षेत्रातील गुणवत्ता, सुलभता आणि स्वस्त दरात उपलब्धता याबाबतची आमची वचनबद्धता अतुट आहे," असेही ते पुढे म्हणाले.

डॉ. मांडवीय यांनी सांगितले की, भारत औषधी-वैद्यकीय उपकरणे क्षेत्रातील संशोधन आणि विकास आणि नवोन्मेशाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय धोरण सादर करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

डॉ. मांडविय यांनी यावेळी स्पष्ट केले की, आरोग्य सेवा हे केवळ एक क्षेत्र नाही तर एक मिशन (मोहीम) आहे, जे प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे. या मोहिमेमध्ये भारतातील फार्मास्युटिकल आणि वैद्यकीय उपकरण उद्योग महत्त्वाचा भागीदार आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

इंडोनेशिया प्रजासत्ताकचे आरोग्य मंत्री बुडी जी. सादिकिन आणि नेदरलँड्सचे मंत्री डॉ. अर्न्स्ट कुइपर्स यांनी, आपल्या भाषणात आरोग्य आणि औषधनिर्माण शास्त्रातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकला आणि राष्ट्रांमधील परस्पर सहकार्याच्या गरजेवर भर दिला. भारतात निर्माण झालेल्या औषधांनी नेदरलँड्स, युरोप आणि जगातील अनेकांचा जीव वाचवला आहे. मी भारतासोबत अधिक दृढ सहकार्यासाठी उत्सुक आहे. नाविन्यपूर्ण औषधांमध्ये भागीदारीच्या प्रचंड संधी आहेत. जेनेरिक आणि विशिष्ट औषधी क्षेत्रात भारताकडे असलेल्या क्षमता आणि ज्ञानामुळे आपण भारताकडून अधिक एकात्मिक सहकार्याची अपेक्षा करतो. असं डॉ. कुईपर्स म्हणाले.

डॉ. मांडविय यांनी आज इंडोनेशियाच्या आरोग्यमंत्र्यांसोबत  द्विपक्षीय बैठकही घेतली आणि ती यशस्वी ठरली. यावेळी या दोन्ही नेत्यांनी आरोग्य क्षेत्रातील सहकार्य आणि सहकार्याच्या इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

यावेळी डॉ. मांडविय यांनी जन औषधी केंद्राच्या भेटीवर गेलेल्या G20 परिषदेत सहभागी प्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या एका शिष्टमंडळाचे नेतृत्व केले, या शिष्टमंडळात इंडोनेशियाचे आरोग्य मंत्री बुडी जी. सादिकिन यांचाही समावेश होता. यावेळी, या जन औषधी केंद्रांच्या माध्यमातून भारतातील नागरिकांना उपलब्ध होणारी, परवडणारी आणि दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्यात कशाप्रकारे यश मिळाले याविषयी डॉ. मांडविय यांनी माहिती दिली.

या जन औषधी केंद्राच्या भेटीनंतर बुडी गुणादी सादीकिन म्हणाले की, "मला इंडोनेशियातील माझ्या लोकांना सर्वोत्तम औषधे द्यायची आहेत. मी विविध देशांतील अनेक मॉडेल्स पाहिली आहेत पण भारतातील हे जनऔषधी केंद्राचे मॉडेल, लोकांना गुणवत्तापूर्ण औषधी, त्यांची सुलभता आणि ती स्वस्त दरात उपलब्ध करणारी जगातील सर्वोत्कृष्ट व्यवस्था आहे.

***

Jaydevi PS/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1950626) Visitor Counter : 162