आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताचे जी 20 अध्यक्षपद
गुजरातमधील गांधीनगर येथे जी 20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीचे उद्घाटन
आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्: पंतप्रधान नरेंद्र मोदी
"आज जग परस्परांशी जोडलेले असल्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या आरोग्य विषयक आणीबाणीचा अंदाज बांधणे , तयारी करणे आणि प्रतिसाद देण्यासाठी जागतिक आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची गरज आहे"
"भारताची कुष्ठरोग निर्मूलन मोहीम तसेच क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांमधून दिसून आल्याप्रमाणे यशस्वी आरोग्य उपक्रमांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा आहे"
गांधीनगर येथे झालेल्या जी 20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीतील निष्कर्ष दस्तावेजांना मान्यता देण्यात आली
रोग प्रतिकारासाठी सर्वांना समान वैद्यकीय सुविधा मिळणे हा मूलभूत अधिकार आहे: डॉ. मनसुख मांडविया
आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आणि लोकांना सक्षम बनवण्यासाठी डिजिटल आरोग्यसंबंधी जागतिक उपक्रम : डॉ. मनसुख मांडविया
डिजिटल आरोग्यसंबंधी जागतिक उपक्रमामुळे स्थानिक आणि जागतिक स्तरा
Posted On:
18 AUG 2023 4:57PM by PIB Mumbai
“भारताच्या 1.4 अब्ज लोकांच्या वतीने, मी जागतिक स्तरावरील आरोग्य मंत्री , प्रतिनिधी आणि सहभागींचे भारतात आणि विशेषत: गुजरातच्या ऊर्जाशील राज्यात मनःपूर्वक स्वागत करतो. यामध्ये, माझ्याबरोबर 2.4 दशलक्ष डॉक्टर्स, 3.5 दशलक्ष परिचारिका, 1.3 दशलक्ष निमवैद्यकीय कर्मचारी , 1.6 दशलक्ष फार्मासिस्ट आणि भारताच्या गतिमान आरोग्य सेवा क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज गुजरातमधील गांधीनगर येथे उदघाटन झालेल्या जी 20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीला त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.
आरोग्य आणि सुसंवादी जीवन यांच्यातील अंतर्निहित संबंध अधोरेखित करताना पंतप्रधानांनी महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाचा दाखला दिला. ही भावना उलगडून दाखवणारे एक प्राचीन संस्कृत वचन पंतप्रधानांनी उद्धृत केले ,"आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्" (आरोग्य हीच अंतिम संपत्ती आहे आणि आरोग्य चांगले असेल तर प्रत्येक कार्य पूर्ण करता येऊ शकते).
जागतिक कोविड-19 महामारीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी आरोग्याला जागतिक निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी स्थान देण्याची गरज अधोरेखित केली. लस मैत्री उपक्रमाद्वारे 100 पेक्षा जास्त देशांना लसींच्या 30 कोटी मात्रा पुरवण्यात आल्या , या आंतरराष्ट्रीय सहकार्याचे कौतुक करताना त्यांनी लवचिकता आणि सहकार्याचे महत्व अधोरेखित केले. या संदर्भात ते म्हणाले, "आज जग एकमेकांशी घट्टपणे जोडलेले असल्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या आरोग्य विषयक आणीबाणी स्थितीचा अंदाज बांधणे , तयारी करणे आणि प्रतिसाद देण्यासाठी जागतिक आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची गरज आहे ".
यावेळी पंतप्रधानांनी आरोग्यसेवेप्रति भारताचा व्यापक दृष्टिकोन, पारंपारिक औषध प्रणालींचा अवलंब , आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सर्वांसाठी परवडणारी आरोग्यसेवा सुनिश्चित करण्याबाबत विस्तृत माहिती दिली. गुजरातमधील जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषधांवरील जागतिक केंद्राच्या स्थापनेला पूरक, समग्र आरोग्य आणि निरामयतेच्या दिशेने आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
आरोग्य आणि पर्यावरण यांच्यातील संबंध नमूद करताना पंतप्रधानांनी हवामान आणि आरोग्य विषयक उपक्रम आणि प्रतिजैविक प्रतिकाराविरुद्धच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. परिसंस्था ,मनुष्य , प्राणी आणि वनस्पती यांच्या आरोग्याप्रति "एक पृथ्वी, एक आरोग्य" दृष्टीकोन त्यांनी सामायिक केला.
आरोग्य सेवेतील लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, "भारतातील कुष्ठरोग निर्मूलन मोहीम आणि क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासारख्या यशस्वी आरोग्य उपक्रमांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सिद्ध झाले आहे. " भारताचा ई-संजीवनी प्लॅटफॉर्म आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेला सहाय्यक कोवीन प्रणालीचे उदाहरण देऊन पंतप्रधानांनी जागतिक नवोन्मेष आणि डिजिटल संशोधनाला प्रोत्साहन दिले. पंतप्रधानांनी मानवतेप्रति प्राचीन भारतीय आकांक्षेचा उल्लेख करत सर्वांना आनंदी आणि निरामय जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. शिखर परिषदेच्या चर्चेच्या निष्कर्षांबाबत त्यांनी आशावाद व्यक्त केला.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी उद्घाटन कार्यक्रमात बोलताना वाटाघाटींना अंतिम रूप देण्यात आल्याची घोषणा केली तसेच आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीच्या निष्कर्ष दस्तावेजाना मान्यता देण्यात आल्याचे सांगितले. युक्रेनवरील एक भू-राजकीय परिच्छेद वगळता अन्य सर्व परिच्छेदांवर सहमती झाली. वाटाघाटीदरम्यान G20 राष्ट्रांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले आणि आरोग्य विषयक उदयोन्मुख आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नजीकच्या काळात त्याची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्यांच्यासमवेत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयसस, जपानचे आरोग्य मंत्री कात्सुनोबू काटो आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार आणि प्रा. एस. पी. सिंह बघेल हे उपस्थित होते. 18-19 ऑगस्ट 2023 दरम्यान होणारी जी 20 आरोग्य मंत्र्यांची ही बैठक दोन दिवस चालेल आणि भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली निर्धारित आरोग्य विषयक 3 प्राधान्यक्रमांवर लक्ष केंद्रित करेल.
3 प्राधान्यक्रमांमध्ये आरोग्यविषयक आपत्कालीन स्थितीला प्रतिबंध, सज्जता आणि प्रतिसाद (एक आरोग्य आणि प्रतिजैविक प्रतिकार यावर केंद्रित ); सुरक्षित, परिणामकारक, दर्जेदार आणि परवडणाऱ्या वैद्यकीय प्रतिकार सुविधा (लस, उपचार आणि निदान) सर्वांना सहज उपलब्ध करण्यावर लक्ष केंद्रित करून औषधनिर्मिती क्षेत्रातील क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणे; आणि सार्वत्रिक आरोग्य सेवेच्या व्याप्तीसाठी आणि आरोग्य सेवा पुरवण्यासाठी डिजिटल आरोग्य नवोन्मेष आणि उपाययोजना यांचा समावेश आहे. तत्पूर्वी काल जी 20 आरोग्य उपप्रमुखांची बैठक झाली.
आपले गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये मंत्री आणि प्रतिनिधींचे स्वागत करताना डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले, “एक गतिशील राज्य असलेल्या गुजरातमधील गांधीनगर या ऐतिहासिक शहरात जगभरातील मान्यवरांचे स्वागत करताना मला अत्यंत अभिमान आणि सन्मान वाटत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा चिरंतन वारसा आणि अहिंसा, सत्य आणि सर्वांचे उत्थान, या त्यांच्या तत्त्वांचे स्मरण करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत, त्यामुळे या मेळाव्याला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.”
सुरक्षित, दर्जेदार, किफायतशीर आणि प्रभावी लसी, उपचार आणि निदान याची वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तळागाळापर्यंत वैद्यकीय प्रतिसाद समन्वय यंत्रणा स्थापन करण्याचा आपला सामूहिक संकल्प असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. ते म्हणाले, “समन्यायी वैद्यकीय प्रतिसाद उपाययोजनांचे तत्त्व, हा एक मूलभूत अधिकार असून, त्यासाठी आपण G20 सदस्य वचनबद्ध आहोत. या गंभीर समस्येवर G7 आणि G20 दरम्यान झालेले काम हे, आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवा नियमन आणि आंतर-सरकारी वाटाघाटी मंडळावरील जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यगटाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जागतिक आरोग्याचे रक्षण करण्याच्या आपल्या सामायिक कटीबद्धतेचे निदर्शक आहे.”
आजच्या जगापुढील आरोग्य विषयक विविध आव्हानांवर बोलताना डॉ. मांडवीय म्हणाले, “कोविड-19 महामारीने डिजिटल आरोग्य सेवेचा अवलंब आणि अंमलबजावणीची अत्यावश्यकता अधोरेखित केली असून, आरोग्य प्रणाली मजबूत करण्याची आणि लोकांना सक्षम बनविण्याची त्याची क्षमता आपण ओळखली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या भागीदारीने, डिजिटल आरोग्य सेवेचे जागतिक प्रयत्न सुरु झाले असून, ही परिवर्तनात्मक दृष्टी साकारण्यासाठी या प्रयत्नांनी जगातील देश आणि संस्थांमधील सहकार्याला चालना दिली आहे.”
आपल्या भाषणाचा समारोप करताना डॉ. मांडवीय म्हणाले, " सर्वांसाठी एक निरोगी भविष्य घडवण्यासाठी, सीमा आणि मतभेद पार करून, एक असे जग निर्माण करण्यासाठी आपण या संधीचा फायदा घेऊया, जिथे प्रत्येक व्यक्तीचे जीवन निरामय करण्यावर भर दिला जाईल."
डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी या कार्यक्रमात, G20 परिषदेचे आयोजन करण्यामधील भारताची आतिथ्यशीलता आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल आभार प्रदर्शित केले. युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज, अर्थात सर्वांसाठी आरोग्य सुरक्षा आणि आयुष्मान भारत योजनेच्या यशाबद्दल त्यांनी भारताची प्रशंसा केली, जो जगातील सर्वात व्यापक आरोग्य विमा उपक्रम आहे. गांधीनगर येथील आरोग्य आणि निरामयता केंद्राला (HWC) दिलेली भेट, आणि HWC द्वारे 1000 कुटुंबांना पुरवल्या जात असलेल्या प्राथमिक आरोग्य सेवांमुळे आपण कसे प्रभावित झालो, याचे अनुभव कथन त्यांनी केले. ते म्हणाले, “येथे पुरवल्या जाणार्या टेलिमेडिसिन सेवांचे मला कौतुक वाटते, ज्या स्थानिक पातळीवर प्रिस्क्रिप्शन आणि उपचार प्रदान करतात. भारतातील आजच्या आरोग्य सेवेच्या बदलत्या स्वरूपाचे हे उत्तम उदाहरण आहे.” डिजिटल आरोग्य सेवेच्या जागतिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. गेब्रेयसस म्हणाले, "डिजिटल तंत्रज्ञान स्थानिक आणि जागतिक स्तरावर आरोग्य सेवेत बदल घडवू शकते, आणि भारताच्या G20 अध्यक्षतेखाली सुरू होणारे डिजिटल आरोग्याबाबतचे जागतिक प्रयत्न, जागतिक आरोग्य संघटनेच्या डिजिटल आरोग्य सेवेबाबतच्या धोरणाला पुष्टी देतील.”
इंडोनेशिया, आणि ब्राझील या ट्रोइका देशांच्या आरोग्य मंत्र्यांनी, त्यांचे आरोग्य मंत्री बुडी गुनाडी सादिकिन आणि निसिया त्रिंदाडे यांच्या नेतृत्वाखाली उद्घाटन सत्रात आपले विचार मांडले.
परिषदेच्या या दिवशी, भविष्यातील साथीच्या रोगांसाठी तयारी आणि प्रतिबंध करण्यासाठी लवचिक आरोग्य प्रणाली तयार करण्याला, आरोग्य विषयक प्रथम प्राधान्य देण्यावर विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. पारंपरिक औषधांवरील जागतिक परिषदेचा भाग म्हणून, तसेच सीमांचे बंधन नसलेल्या मूल्य आधारित आरोग्यसेवेला प्रोत्साहन देण्याची गरज म्हणून, दोन चर्चा सत्रे देखील आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला इंडोनेशिया आणि ब्राझील, या ट्रोइका देशांचे मंत्री आणि G20 आणि आमंत्रित देशांचे मंत्री आणि प्रतिनिधी उपस्थित होते. नीती (NITI) आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव सुधांश पंत, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. राजीव बहल, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि भारताच्या G20 अध्यक्षपदाचे शेर्पा आणि आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी देखील कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला उपस्थित होते.
G20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीमधील पंतप्रधानांचे भाषण येथे पहा:
***
S.Patil/S.Kane/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1950271)
Visitor Counter : 242