दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

स्वच्छ आणि सुरक्षित डिजिटल व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी मोबाइल वापरकर्ता संरक्षण विषयक दोन सुधारणा जाहीर


सीम कार्ड अदलाबदल किंवा पर्यायी सीम कार्डसाठी नव्याने केवायसी आवश्यक

अंगठा किंवा बुबुळांव्यतिरिक्त चेहरा आधारित बायोमेट्रिक पडताळणीला परवानगी

व्यावसायिक मोबाईल जोडणीसाठी, शेवटच्या वापरकर्त्याचे संपूर्ण केवायसी अनिवार्य

पॉइंट ऑफ सेल (पॉस मशीन) परवानाधारकाची नोंदणी

बनावट पॉस मशीन धारकाचे नाव 3 वर्षांसाठी काळ्या यादीत

संचार साथीकडून 52 लाख संशयित मोबाइल जोडण्या रद्द

Posted On: 17 AUG 2023 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्ट 2023

 

देशात, सामाजिक आर्थिक घडामोडींमधे दिवसेंदिवस डिजिटलीकरण वाढत आहे, या पार्श्वभूमीवर, मोबाईल सेवांसह इतर टेलिकॉम साधनांचा, ऑनलाईन सेवांसाठी वापर वाढत आहे. डिजिटल जोडण्या, सामाजिक, आर्थिक आणि परिवर्तनशील गतिशीलतेला अधिक सक्षम करणाऱ्या असतात. आणि म्हणूनच, टेलिकॉम साधनांच्या सुरक्षित वापराला प्रोत्साहन देणे अत्यंत महत्वाचे आहे.

डिजिटली एकात्मिक समाजाला प्रोत्साहन देण्यासाठीची भारत सरकारची  कटिबद्धता अधिक दृढ करण्यासाठी तसेच, त्याचवेळी, सुरक्षामानके आणि ग्राहक संरक्षण कायम राखण्यासाठी, केंद्रीय संपर्क, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, डिजिटल परिवर्तन आणि ग्राहक संरक्षणविषयक दोन सुधारणा जाहीर केल्या आहेत.  त्या पुढीलप्रमाणे :

  1. केवायसी सुधारणा
  2. पॉइंट ऑफ सेल (पॉस) नोंदणी सुधारणा

केंद्र सरकारने या आधी सुरू केलेल्या संचार साथी, या सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी या नागरिक केंद्री पोर्टलच्या अनुषंगानेच, या नव्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.

पॉस म्हणजेच पॉइंट ऑफ सेल नोंदणी सुधारणा – ह्या सुधारणेअंतर्गत, पॉइंट-ऑफ-सेल (POS) नोंदणी सुधारणा- ही सुधारणा परवानाधारकांद्वारे फ्रँचायझी, एजंट आणि वितरकांची (PoS) नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे समाजविघातक, देशविघातक घटकांना सीम कार्ड देणारे  बनावट पॉस मशीन्स पकडले जाऊन ते नष्ट करता येतील.

पॉस नोंदणी प्रक्रियेमध्ये परवानाधारकाच्या पॉसची निर्विवाद पडताळणी केली जाते. या नोंदणी प्रक्रियेमुळे पॉस आणि परवानाधारक यांच्यात लेखी करार अनिवार्य असेल. पॉस मशीनद्वारे कोणतीही बेकायदेशीर कृत्ये केल्याचे आढळले, तर तीन वर्षांच्या कालावधीसाठी ते बंद केले जाईल आणि काळ्या यादीत टाकले जाईल. सर्व विद्यमान परवानाधारकांना 12 महिन्यांच्या आपल्या पॉस मशीनची नोंदणी करावी लागेल.

यामुळे गैरप्रकार करणारी विक्री केंद्रे ओळखण्यात, त्यांचे नाव काळ्या यादीत टाकण्यात आणि परवानाधारकांच्या यंत्रणेतून त्यांचे नाव काढून टाकण्यात तसेच नियमानुसार काम करणाऱ्या विक्री केंद्रांना प्रोत्साहन देण्यात मदत होईल

केवायसी सुधारणा – केवायसी ही ग्राहकाची विशिष्ट ओळख निश्चित करणारी आणि त्याला दूरसंचार सेवा पुरवण्याआधी त्याचा शोध घेणे शक्य करणारी प्रक्रिया आहे. विद्यमान केवायसी प्रक्रिया अधिक मजबूत करणे हे कोणत्याही संभाव्य घोटाळ्यापासून दूरसंचार सेवेच्या ग्राहकांचे संरक्षण करणारे आणि त्यायोगे सामान्य जनतेचा डिजिटल परिसंस्थेवरील विश्वास वाढवणारे एक साधन आहे

कोणत्याही ग्राहकाच्या छापील आधार प्रतीचा गैरवापर टाळण्यासाठी त्या प्रतीचा क्यूआर कोड स्कॅन करून त्या ग्राहकाचे लोकसंख्याशास्त्रीय तपशील पडताळणे अनिवार्य असेल. मोबाईल क्रमांकाची सेवा खंडित झाली तर तो मोबाईल क्रमांक 90 दिवस संपेपर्यंत कोणत्याही नव्या ग्राहकाला दिला जाणार नाही. ग्राहकाला त्याच्या मोबाईलचे सिम बदलून घेण्यासाठी संपूर्ण केवायसी तपशील नव्याने जमा करावे लागतील आणि नवे सिमकार्ड घेतल्यानंतर पुढील 24 तासांच्या अवधीसाठी लघुसंदेश पाठवणे आणि प्राप्त करणे अशा दोन्ही सुविधा बंद ठेवण्यात येणार आहेत.  

आधार ई-केवायसी प्रक्रियेमध्ये अंगठ्याचे ठसे आणि डोळ्याच्या बुबुळांच्या प्रतिमेचे प्रमाणीकरण यांसह आता चेहेऱ्यावर आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरणाला देखील मान्यता देण्यात आली आहे.

संस्थांना (उदा. कंपन्या, संघटना, विश्वस्त निधी, सहकारी संस्था, इत्यादी) मोबाईल जोडण्या देण्यासाठी व्यापारी जोडण्या पद्धत सुरु करण्यात आलेली आहे. संस्था कितीही मोबाईल जोडण्या घेऊ शकतात, मात्र त्यांना हे क्रमांक वापरणाऱ्या प्रत्येकाचे केवायसी सादर करणे अनिवार्य असेल. त्या संस्थेतील सर्व वापरकर्त्यांच्या केवायसीची यशस्वी पडताळणी केल्यानंतर आणि त्या संस्थेचा परिसर/ पत्ता यांची प्रत्यक्ष पडताळणी करून घेतल्यानंतरच सिमकार्ड सक्रीय केले जाईल. 

देशातील नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्याबाबत दृढ कटिबद्धता म्हणून केंद्रीय दूरसंचार विभागाने परिवर्तनीय सुधारणांच्या माध्यमातून हा नवा पवित्रा घेतला आहे. कठोर आणि व्यापक उपाययोजनांच्या माध्यमातून ग्राहक संरक्षण वाढवणे आणि दूरसंचार क्षेत्रातील वाढत्या धोक्यांविरुद्धच्या सुरक्षिततेत वाढ करणे हा दूरसंचार विभागाचा मुख्य उद्देश आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची दक्ष निरीक्षणाशी सांगड घालून विभागाने संपर्कासाठी सर्वांना सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्याच्या हेतूने देशातील दूरसंचार क्षेत्रविषयक पटलामध्ये सर्वोच्च पातळीवरील सुरक्षा आणि विश्वास यांना प्रोत्साहन देण्याची मोहीम अत्यंत खंबीरपणे हाती घेतली आहे.

सविस्तर मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे:

‘संचार साथी’चा प्रभाव - मोबाईल वापरकर्त्याच्या संरक्षणासाठी एक नागरिक केंद्रित पोर्टल

  1. मोबाईल वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी जागतिक दूरसंचार दिनानिमित्त (17 मे 2023) ‘संचार साथी’ पोर्टल सुरू करण्यात आले.
  2. 'संचार साथी' पोर्टल मोबाइल ग्राहकांना पुढील सुविधा पुरवते:
    1. स्वतःच्या नावावर नोंदवलेल्या मोबाईल जोडणीचा शोध घेणे,
    2. आपल्या नावावर फसव्या पद्धतीने मोबाईल जोडणी नोंदवली गेलील असेल, तर त्याबाबत तक्रार करणे, आणि
    3. चोरीला गेलेल्या/ हरवलेल्या मोबाईल संचाबाबत तक्रार करणे आणि तो ब्लॉक करणे.
  3. 'संचार साथी' पोर्टल आणि ASTR टूलच्या मदतीने सुमारे 114 कोटी सक्रिय मोबाइल जोडण्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्याचे निष्पन्न पुढील प्रमाणे:
    1. 66 लाखांपेक्षा जास्त संशयित मोबाईल जोडण्या आढळून आल्या.
    2. पुनर्पडताळणी अयशस्वी ठरल्यामुळे 52 लाखांहून अधिक मोबाईल जोडण्या खंडित करण्यात आल्या.
    3. 67000 हून अधिक पॉइंट ऑफ सेल (PoS) काळ्या यादीत टाकण्यात आले.
    4. सुमारे 17000 मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्यात आले.
    5. 1,700 हून अधिक पॉइंट ऑफ सेल (PoS) विरोधात 300 पेक्षा जास्त प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यात आले.
    6. 66000 हून अधिक व्हॉट्सअॅप खाती ब्लॉक करण्यात आली.
    7. फसवणूक करणाऱ्यांनी वापरलेली सुमारे 8 लाख बँक/वॉलेट खाती गोठवण्यात आली.
  4. सुमारे 18 लाख ग्राहकांनी त्यांच्या नावावर मोबाईल जोडणी बाबत फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली, त्यापैकी 9.26 लाख तक्रारींचे निराकरण करण्यात आले.
  5. चोरीला गेलेल्या/हरवलेल्या मोबाईल हँडसेटच्या 7.5 लाख तक्रारींपैकी 3 लाख मोबाईल हँडसेट शोधण्यात आले.
  6. जानेवारी 2022 पासून, 114 बेकायदेशीर दूरसंचार व्यवस्था उघडकीला आल्या आणि त्या विरोधात LEAs ने कारवाई केली.

 

* * *

S.Patil/Radhika/Sanjana/Rajshree/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1950014) Visitor Counter : 111