माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्यदिन 2023 कार्यक्रमाच्या थेट प्रसारणासाठी प्रसारभारती सज्ज


उत्सवाचा प्रत्येक क्षण टिपण्यासाठी 5 रोबोटिक कॅमेरे आणि दोन 360-अंशामध्‍ये चित्रण करणा-या कॅमेरांसह 40 कॅमेरे

15 ऑगस्ट रोजी सकाळी 6:15 वाजता थेट प्रसारण सुरू होणार

Posted On: 14 AUG 2023 6:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्ट 2023

 

लाल किल्ल्यावरून 77 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे थेट प्रसारण करण्यासाठी प्रसारभारतीने व्यापक व्यवस्था केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट 2023 रोजी दिल्लीतील प्रसिद्ध लाल किल्ल्यावरून 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी राष्ट्राचे नेतृत्व करतील. पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज  फडकावतील आणि परंपरेनुसार ऐतिहासिक स्मारक लाल किल्ल्याच्या  तटबंदीवरून राष्ट्राला उद्देशून  भाषण करतील.

या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी  'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' सोहळ्याचा समारोप होईल.  पंतप्रधानांनी गुजरात येथील अहमदाबादमधल्या साबरमती आश्रमातून 12 मार्च 2021 रोजी 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' सोहळ्याचा प्रारंभ केला होता.  आता वर्ष 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे  स्वप्न साकार करण्यासाठी देश उत्साहाने  'अमृत काळा' साठी घोषणा  करेल.  77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी अनेक नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मोठ्या संख्येने  देशभरातून पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रसारण,  दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून  स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाच्या प्रसारणाने सुरू होईल.

स्वातंत्र्यदिन सोहळ्यात 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा लाल किल्ल्यावर जेव्हा  तिरंगा फडकावतील तेव्हा त्या ऐतिहासिक क्षणाची समृद्ध आणि व्यापक अनुभूती देण्यासाठी चित्रीकरणात 40 हून अधिक कॅमेऱ्यांचा उपयोग केला जाईल. 

मंत्रमुग्ध करणारा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दूरदर्शनने 41 कॅमेरे तैनात केले आहेत. यापैकी 36 लाल किल्ल्यावर आणि 5 राजघाटावर तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये 5 रोबोटिक मानवरहित कॅमेऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय  दोन पूर्ण 360-अंशातील  दृश्‍ये  चित्रित होतील, असे कॅमेरेदेखील वापरले जाणार आहेत. या सोहळ्याच्या उत्कृष्ट चित्रीकरणासाठी   4 कॅमेरे जिमी जिब्सवर आणि 1 सिझर क्रेनवर बसवण्यात आले आहेत.

15 ऑगस्ट रोजी सोहळ्याचे थेट प्रसारण सकाळी 6:15 वाजता सुरू होणार असून पंतप्रधानांच्या भाषणाच्या थेट प्रसारणासाठी एक उत्तम आणि अनुभवी पथक  तैनात करण्यात आले आहे. तैनात करण्यात आलेल्या कॅमेरा पथकात  दोन महिलांचा  समावेश आहे.  दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर 'डीडी न्यूज'वरील   सांकेतिक भाषा अनुवादासह  थेट प्रसारण केले जाईल.  YouTube वर देखील  लाइव स्ट्रिमिंग असेल.

आकाशवाणीच्या राष्ट्रीय वाहिन्या  संपूर्ण कार्यक्रमाचे  इंग्रजी आणि हिंदी समालोचन थेट प्रसारित  करतील. आकाशवाणी  दिवसभर विविध देशभक्तीपर आणि सांस्कृतिक कार्यक्रम प्रसारित करेल.

दूरदर्शन आणि आकाशवाणीची विविध राज्यांमधली  प्रादेशिक केंद्रे आपापल्या राज्यांमध्ये स्थानिक स्वातंत्र्यदिन सोहळ्यांचे प्रसारण करतील.

 

* * *

S.Bedekar/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1948647) Visitor Counter : 187