पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 07 AUG 2023 4:11PM by PIB Mumbai

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी पीयूष गोयल जी, नारायण राणे जी, भगिनी दर्शना जरदोश जी, उद्योग आणि फॅशन जगतातील सर्व साथीदार, हातमाग आणि खादीच्या विशाल परंपरेशी संबंधित सर्व उद्योजक आणि माझे विणकर बंधू-भगिनी, येथे उपस्थित सर्व विशेष मान्यवर, स्त्रिया आणि पुरुषहो,

काहीच दिवसांपूर्वी 'भारत मंडपमचे' लोकार्पण झाले आहे. तुमच्यापैकी अनेकजण पूर्वीही इथे यायचे आणि तंबूत आपले जग उभारायचे. आता आज तुम्ही इथला बदललेला देश पाहिला असेल आणि आज आपण या 'भारत मंडपम'मध्ये राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करत आहोत. 'भारत मंडपम'च्या या भव्यतेमध्येही भारतातील हातमाग उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. प्राचीन आणि नव्याचा हा संगम आजचा भारत काय आहे ते सांगतो. आजचा भारत केवळ स्थानिक वस्तूंचा आग्रह धरत नाही तर त्या जगभरात पोहोचाव्या यासाठी जागतिक मंचही पुरवत आहे. काही वेळापूर्वी मला आमच्या काही विणकर मित्रांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. देशभरातील अनेक हॅण्डलूम क्लस्टर्समध्ये आमचे विणकर बंधू-भगिनी आमच्याशी जोडले जाण्यासाठी दूरदूरवरून आले आहेत. या भव्य सोहळ्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो, मी तुमचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

ऑगस्टचा महिना हा क्रांतीचा महिना आहे. स्वातंत्र्यासाठी केलेल्या प्रत्येक बलिदानाचे स्मरण करण्याचा हा काळ आहे. आजच्या दिवशी स्वदेशी चळवळ सुरू झाली. स्वदेशीची ही भावना केवळ विदेशी कपड्यांवरबहिष्कार घालण्यापुरती मर्यादित नव्हती. तर आपल्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी ती मोठी प्रेरक होती. भारतातील लोकांना आपल्या विणकरांशी जोडण्याची ही मोहीम होती. आमच्या सरकारने हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले याचे हे एक प्रमुख कारण होते. गेल्या काही वर्षांत भारतातील विणकरांसाठी भारतातील हातमाग क्षेत्राच्या विस्तारासाठी अभूतपूर्व कार्य केले जात आहे. स्वदेशीबाबतदेशात नवी क्रांती झाली आहे. साहजिकच लाल किल्ल्यावरून या क्रांतीची चर्चा व्हावी असे वाटत आहे आणि 15 ऑगस्ट अगदी जवळ आलेला असताना असा विषय तिथे बोलावा, असे वाटत आहे. पण आज माझ्यासोबत देशभरातील अनेक विणकर मित्र जोडले गेले आहेत, त्यामुळे त्यांच्या मेहनतीमुळे भारताला मिळालेल्या या यशाबद्दल सांगताना आणि संपूर्ण गोष्ट इथे सांगताना मला अधिक अभिमान वाटत आहे.

मित्रांनो,

आपले कपडे, आपला पेहराव आपली ओळख सांगत असतो. इथेही विविध प्रकारचे कपडे दिसत आहेत आणि बघूनच कळते की हे तिथले असावेत, ते इथले असावेत, ते या भागातले असावेत. म्हणजेच आपली विविधता हीच आपली ओळख आहे आणि एकप्रकारे ही आपली विविधता साजरी करण्याचीही एक संधी आहे आणि हे वैविध्य आपल्या कपड्यांमध्ये सर्वप्रथम दिसून येते. ते पाहिल्यावरच कळते की काहीतरी नवीन आहे, काहीतरी वेगळे आहे. देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आपल्या आदिवासी बांधवांपासून ते बर्फाच्छादित पर्वतांपर्यंत, तर दुसरीकडे समुद्रकिनाऱ्यापासून ते भारताच्या वाळवंटात आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपर्यंत पोशाखांचे सुंदर इंद्रधनुष्य आपल्याकडे आहे आणि मी एकदा आग्रह केला होता की आमच्याकडे असलेल्या कपड्यांची ही विविधता सूचीबद्ध आणि संकलित केली पाहिजे. आज, भारतीय वस्त्र शिल्प कोषाच्या रूपाने, माझी विनंती येथे पूर्ण झाल्याचे पाहून मला विशेष आनंद होत आहे.

मित्रांनो,

गेल्या शतकांमध्ये एवढा समृद्ध असलेला वस्त्रोद्योग स्वातंत्र्यानंतर पुन्हा सक्षम करण्यावर फारसा भर दिला गेला नाही, हेही दुर्दैव आहे. परिस्थिती अशी होती की खादीही मरणासन्न अवस्थेत होती. खादी परिधान करणाऱ्यांकडे लोक तुच्छतेने पाहू लागले. 2014 पासून आमचे सरकार ही परिस्थिती आणि ही विचारसरणी बदलण्यात गुंतले आहे. मला आठवते, मन की बात कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या दिवसांत मी देशातील नागरिकांना किमान एक खादीची वस्तू खरेदी करण्याची विनंती केली होती. त्याचा परिणाम काय झाला, याचे आज आपण सारेच साक्षीदार आहोत. गेल्या 9 वर्षांत खादीचे उत्पादन 3 पटीने वाढले आहे. खादीच्या कपड्यांची विक्रीही 5 पटीने वाढली आहे. खादीच्या कपड्यांना देश-विदेशात मागणी वाढत आहे. मी काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये एका मोठ्या फॅशन ब्रँडच्या सीईओला भेटलो. त्यांनीही मला सांगितले की परदेशात खादी आणि भारतीय हातमाग वस्तूंचे आकर्षण कसे वाढत आहे.

मित्रांनो,

नऊ वर्षांपूर्वी खादी आणि ग्रामोद्योगांची उलाढाल केवळ 25 हजार, 30 हजार कोटी रुपयांच्या आसपास होती. आज ती एक लाख तीस हजार कोटी रुपयांच्या वर पोहोचली आहे. गेल्या 9 वर्षांत या क्षेत्रात अतिरिक्त 1 लाख कोटी रुपये आले असून हा पैसा कुठे पोहोचला आहे ? हा पैसा हातमाग क्षेत्राशी निगडित माझ्या गरीब बंधू-भगिनींकडे गेला आहे, हा पैसा गावांमध्ये पोहोचला आहे, हा पैसा आदिवासींकडे गेला आहे. आज नीती आयोग सांगतो की भारतात गेल्या 5 वर्षात साडेतेरा कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. त्यांना गरिबीतून बाहेर काढण्याच्या कामातही या क्षेत्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज 'व्होकल फॉर लोकल' या भावनेने देशवासी मनापासून स्वदेशी उत्पादने खरेदी करत आहेत, ही एक जनचळवळ बनली आहे. आणि मी सर्व देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन करतो, येत्या काही दिवसांत रक्षाबंधनाचा सण येत आहे, गणेशोत्सव येत आहे, दसरा, दीपावली, दुर्गापूजा येत आहे. या सणांच्या दिवशी आपण आपल्या स्वदेशी संकल्पाचा पुनरुच्चार केला पाहिजे. यातून आपण आपल्या हस्तकलाकारांना, आपल्या विणकर बंधू-भगिनींना, हातमाग क्षेत्राशी संबंधित लोकांना मदत करतो आणि जेव्हा बहीण रक्षाबंधनाला राखी बांधते तेव्हा तिचे संरक्षण करण्याचे वचन देतो, त्यासोबतच जर तिला एखाद्या गरीब आईने हाताने बनवलेली काहीतरी भेटवस्तू आपण दिली तर त्यासोबत त्या आईचेदेखील संरक्षण करत असतो.

मित्रांनो,

मला या गोष्टीचं समाधान आहे की वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी ज्या योजना आम्ही राबविल्या, त्या सामाजिक न्यायाचे देखील एक मोठे माध्यम बनत आहेत. आज देशभरातील गावांत आणि खेड्यांत लोक हातमागावर काम करत आहेत. यात बहुतांश दलित, मागास, पासमंडा आणि आदिवासी समाजातले लोक आहेत. गेल्या नऊ वर्षांत सरकारच्या प्रयत्नांनी यांना केवळ मोठ्या प्रमाणात रोजगारच दिला नाही, तर यांचे उत्पन्न देखील वाढवले आहे. वीज, पाणी, गॅस जोडण्या, स्वच्छ भारत सारख्या मोहिमांचा देखील सर्वात जास्त लाभ इथे पोचला आहे. आणि मोदीने त्यांना हमी दिली आहे - मोफत अन्नधान्य देण्याची. आणि जेव्हा मोदी हमी देतो, तेव्हा त्यांची चूल 365 दिवस पेटतेच पेटते. मोदीने त्यांना हमी दिली आहे – पक्क्या घरांची. मोदीने त्यांना हमी दिली आहे पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची. आम्ही मुलभूत सुविधांसाठी आपल्या विणकर बंधू भगिनींची अनेक दशकांची प्रतीक्षा संपवली आहे.

मित्रांनो,

सरकारचा प्रयत्न आहे की वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित ज्या परंपरा आहेत, त्या केवळ जिवंतच राहू नयेत, तर नव्या अवतारात जगाला आकर्षित करावे. यासाठी आम्ही या कामाशी संबंधित सहकाऱ्यांना आणि त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि उत्पन्नावर भर देत आहोत. आम्ही विणकर आणि कारागीरांच्या मुलांच्या आकांक्षांना पंख देऊ इच्छितो. विणकरांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना वस्त्रोद्योग संस्थेत दोन लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळत आहे. गेल्या नऊ वर्षांत 600 पेक्षा जास्त हातमाग संकुले विकसित करण्यात आली आहेत. यात देखील हजारो विणकरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आम्ही सातत्याने विणकरांचे काम सोपे व्हावे, उत्पादकता वाढावी, गुणवत्ता उत्तम असावी, नवनवे डिझाईन यावे, यासाठी प्रयत्न करत आहोत. यासाठी त्यांना संगणक चलित पंचिंग मशीन उपलब्ध करून दिली जात आहे. यामुळे धागे बनविणे देखील सोपे होते आहे. यामुळे नवनवीन डिझाईन वेगाने बनवले जाऊ शकतात. मोटारने चालणाऱ्या मशीनमुळे धागे बनविणे देखील सोपे होते आहे. अशी अनेक उपकरणे, अशी अनेक यंत्रे विणकरांना उपलब्ध करून दिली जात आहेत, हातमाग विणकरांना सवलतीच्या दारात कच्चा माल म्हणजे धागा देखील सरकार देत आहे. कच्च्या मालाच्या वाहतुकीचा खर्च देखील सरकार उचलत आहेत. मुद्रा योजनेच्या माध्यमातून देखील विणकरांना विनातारण कर्ज मिळणे शक्य झाले आहे.

मित्रांनो,

मी गुजरातमध्ये राहत असताना अनेक वर्ष, माझ्या विणकर मित्रांसोबत बराच काळ घालवला आहे. आज मी जिथला खासदार आहे, त्या काशी क्षेत्राच्या उद्योगाचे देखील, त्या पूर्ण क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेत देखील हातमाग उद्योगाचे मोठे योगदान आहे. मी अनेकदा त्यांना भेटत देखील असतो, त्यांच्याशी बोलत असतो. म्हणून मला जमिनीवरची माहिती मिळत असते. आपल्या विणकर समाजासाठी सर्वात मोठे आव्हान हे आहे, की ते उत्पादने तर बनवतात, मात्र ते विकायला पुरवठा साखळीची अडचण असते. आमचे सरकार त्यांची ही समस्या देखील सोडवत आहे. सरकार हस्तनिर्मित उत्पादनाच्या विपणनावर देखील भर देत आहोत. देशाच्या कुठल्या न कुठल्या भागात दररोज एक विपणन प्रदर्शन आयोजित केले जात आहे. भारत मंडपम प्रमाणे देशाच्या अनेक शहरांत प्रदर्शन स्थळे निर्माण केले जात आहेत. यात दैनिक भत्त्यासोबतच मोफत स्टॉल देखील उपलब्ध करून दिले जातात. आणि आज आनंदाची गोष्ट ही आहे आपल्या नव्या पिढीचे तरुण आहेत जे नवनवे स्टार्टअप्स घेऊन येत आहेत. स्टार्टअपच्या जगातले लोक देखील माझ्या भारताचे चतुर तरुण हातमागावर बनलेल्या वस्तू, हस्तकलेच्या वस्तू, आपल्या कुटीर उद्योगांत बनणाऱ्या वस्तूंसाठी अनेक नवनवीन तंत्र, नवनवे प्रकार, त्यांच्या विपणनाची नवनवीन व्यवस्था, अनेक स्टार्टअप्स आजकाल या जगात आले आहेत. आणि म्हणूनच मी त्यांचे उज्ज्वल आणि नाविन्यपूर्ण भविष्य बघतो आहे.

आजएक जिल्हा एक उत्पादन’ योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात तिथल्या विशेष उत्पादनांना प्रोत्साहन दिले जात आहे. देशातल्या रेल्वे स्थानकांवर देखील अशा उत्पादनांच्या विक्रीसाठी विशेष स्टॉल बनविले जात आहेत. प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक राज्यातल्या हस्तशिल्प, हातमागावर बनलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार एकता मॉल देखील बनवत आहे. एकता मॉलमध्ये त्या राज्यातील हस्तकला उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध असणार आहेत. याचा देखील खूप मोठा लाभ हातमाग क्षेत्राशी संबंधित बंधू भगिनींना होणार आहे. तुमच्यापैकी कुणाला गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्याची संधी मिळाली असेल तर तिथे एक एकता मॉल बनला आहे. भारताच्या कारागिरांनी बनविलेली हस्तशिल्प उत्पादने, देशाच्या कानाकोपऱ्याततील वस्तू तिथे उपलब्ध असतात. तर पर्यटक जे तिथे येतात ते एकतेचा देखील अनुभव घेतात आणि त्यांना हिंदुस्तानच्या ज्या कोपऱ्यातील वस्तू हवी असेल, ती इथे मिळते. असे एकता मॉल देशातल्या सर्व राजधानीच्या शहरांत बनवावे या दिशेने देखील प्रयत्न सुरु आहेत. आपल्या या वस्तूंचे महत्व किती आहे. मी पंतप्रधान म्हणून परदेशात जातो तर जगातील मान्यवरांसाठी काही न काही भेट घेऊन जावी लागते. माझा हा आग्रह असतो की तुम्ही ज्या वस्तू बनवता, त्याच वस्तू मी जगातील लोकांना देतो. त्यांना आनंद तर होतोच होतो. जेव्हा मी त्यांना सांगतो की हे माझ्या अमुक भागातील अमुक गावातल्या लोकांनी बनवले आहे तर ते फारच प्रभावित होतात.

मित्रांनो,

आपल्या हातमाग क्षेत्रातील बंधू भगिनींना डिजिटल इंडियाचा लाभ देखील मिळावा, यासाठी देखील पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत. तुम्हाला माहित आहे सरकार ने खरेदी विक्रीसाठी एक पोर्टल बनविले आहे – गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस म्हणजेच GeM. या ई-बाजारपेठ पोर्टलवर लहानात लहान कारागीर, शिल्पकार, विणकर आपल्या वस्तू थेट सरकारला विकू शकतो. विणकरांनी फार मोठ्या संख्येने याचा लाभ घेतला आहे. आज हातमाग आणि हस्तशिल्प यांच्याशी संबंधित पावणे दोन लाख संस्था GeM पोर्टलशी जोडल्या आहेत

मित्रांनो,

आमचे सरकार, विणकरांना जगातील सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी स्पष्ट धोरणासह काम करत आहे.आज जगातील मोठमोठ्या कंपन्या भारतातील एमएसएमई,आपले विणकर, कारागीर आणि शेतकऱ्यांची उत्पादने जगभरातील बाजारपेठेत नेण्यासाठी पुढे येत आहेत. अशा अनेक कंपन्यांच्या नेतृत्वाशी माझी प्रत्यक्ष चर्चा झाली आहे. त्यांची जगभरात मोठमोठी दुकाने, किरकोळ पुरवठा साखळी, मोठे मॉल्स, दुकाने आहेत. ऑनलाइन जगतातही त्यांचे सामर्थ्य प्रचंड आहे.अशा कंपन्यांनी आता भारतातील स्थानिक उत्पादने परदेशातील कानाकोपऱ्यात नेण्याचा संकल्प केला आहे.आपली भरडधान्य ज्याला आपण आता श्रीअन्न म्हणून ओळखतो. हे श्रीअन्न असो, हातमागाची उत्पादने असो, याला आता या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या जगभरातील बाजारपेठांमध्ये घेऊन जाणार आहेत. म्हणजे उत्पादन भारताचे असेल, ते भारतातच बनवले जाईल, त्याला भारतातील लोकांच्या कष्टाचा वास असेल आणि या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या पुरवठा साखळ्यांचा वापर होईल. आणि आपल्या देशातील या क्षेत्राशी निगडित प्रत्येक लहान व्यक्तीला याचा मोठा फायदा होणार आहे.

मित्रांनो,

सरकारच्या या प्रयत्नांमध्ये आज मी वस्त्रोद्योग आणि फॅशन जगतातील मित्रांना एक गोष्ट सांगू इच्छितो. आज जेव्हा आपण जगातील अव्वल -3 अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवण्यासाठी पावले उचलली आहेत, तेव्हा आपल्याला आपल्या विचारांची आणि कार्याची व्याप्ती वाढवावी लागेल. आपण आपले हातमाग, आपली खादी आणि आपले वस्त्रोद्योग क्षेत्राला जगज्जेता बनवायचे आहे. मात्र यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. कामगार असो, विणकर असो, डिझायनर असो किंवा उद्योग असो, प्रत्येकाला समर्पित प्रयत्न करावे लागतील. तुम्ही भारतातील विणकरांच्या कौशल्याला व्याप्तीशी जोडा . तुम्ही भारतातील विणकरांच्या कौशल्याला तंत्रज्ञानाशी जोडा. आज आपण भारतात नवमध्यमवर्गाचा उदय पाहत आहोत. भारतात प्रत्येक उत्पादनासाठी एक मोठा तरुण ग्राहक वर्ग तयार होत आहे. भारतातील वस्त्र कंपन्यांसाठी ही नक्कीच मोठी संधी आहे. त्यामुळे स्थानिक पुरवठा साखळी बळकट करून त्यात गुंतवणूक करण्याची जबाबदारीही या कंपन्यांची आहे. बाहेर तयार मिळत असेल तर आयात करा, हा दृष्टिकोन आज महात्मा गांधींच्या कार्याचे स्मरण करत बसलो आहोत, तेव्हा बाहेरून आणून गरज भागवणे हा योग्य मार्ग नाही हे पुन्हा एकदा मनाला सांगावे लागेल ,असा निर्धार मनाला करावा लागेल. हे इतक्या लवकर कसे होईल, स्थानिक पुरवठा साखळी एवढ्या लवकर कशी तयार होईल, याची सबब या क्षेत्रातील मातब्बर सांगू शकत नाहीत. भविष्यात लाभ घ्यायचा असेल तर आज स्थानिक पुरवठा साखळीत गुंतवणूक करावी लागेल. विकसित भारत घडवण्याचा हा मार्ग आहे आणि या मार्गाने आपले विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल.

मित्रांनो,

माझा ठाम विश्वास आहे की, जो स्वाभिमानी असेल, ज्याला स्वतःचा अभिमान असेल, ज्याला आपल्या देशाचा अभिमान असेल, त्याच्यासाठी खादी हे वस्त्र आहे.पण त्याचवेळी जो आत्मनिर्भर भारताचे स्वप्न विणतो, जो मेक इन इंडियाला बळ देतो, त्याच्यासाठी खादी हे केवळ वस्त्रच नाही, तर ते एक अस्त्रही आहे आणि शस्त्रही आहे.

मित्रांनो,

परवा 9 ऑगस्ट आहे. आजचा दिवस जर स्वदेशी चळवळीशी निगडीत असेल तर 9 ऑगस्ट ही तारीख भारतातील सर्वात मोठ्या आंदोलनाची साक्षीदार आहे. 9 ऑगस्ट रोजीच पूज्य बापूंच्या नेतृत्वाखाली भारत छोडो चळवळ म्हणजेच भारत छोडो आंदोलन सुरू झाले. आदरणीय बापूंनी इंग्रजांना स्पष्टपणे सांगितले होते - भारत छोडो. यानंतर काही काळातच देशात असे जागृत वातावरण निर्माण झाले, एक चैतन्य जागृत झाले, शेवटी इंग्रजांना भारत सोडावा लागला. आज आदरणीय बापूंच्या आशीर्वादाने तीच इच्छाशक्ती ही काळाची गरज आहे. आपल्याला पुढे जायचे आहे. जो मंत्र इंग्रजांना हुसकावून लावणारा ठरू शकतो तो मंत्र आपल्या इथल्या अशा वाईट घटकांना हुसकावून लावण्याचे कारण बनू शकतो. आज आपल्याकडे एक स्वप्न आहे, विकसित भारत घडवण्याचा संकल्प आहे. या संकल्पासमोर काही वाईट गोष्टी अडसर ठरल्या आहेत. म्हणूनच आज भारत या वाईट गोष्टींना एक सुरात म्हणत आहे - भारत छोडो. आज भारत म्हणत आहे- भ्रष्टाचार भारत छोडो . आज भारत म्हणत आहे, घराणेशाही भारत छोडो. आज भारत म्हणत आहे, तुष्टीकरण भारत छोडो. भारतातील ही दुष्प्रवृत्ती देशासाठी मोठा धोका आहे. देशासमोर मोठे आव्हानही आहे. मला विश्वास आहे की आपण सर्वजण आपल्या प्रयत्नांनी या वाईट गोष्टींचा अंत करू आणि पराभूत करू आणि मग भारताचा विजय होईल, देशाचा विजय होईल, प्रत्येक देशवासियाचा विजय होईल.

मित्रांनो,

15 ऑगस्ट, घरोघरी तिरंगा आणि आज मला त्या भगिनींना भेटण्याची संधी मिळाली ज्या वर्षानुवर्षे देशात तिरंगा ध्वज बनवण्याच्या कामात व्यस्त आहेत. मला त्यांनाही नमस्कार करण्याची, त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली, या 15 ऑगस्टलाही मागच्या वर्षीप्रमाणे आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षी तिरंग्याची ही बाब घरोघरी घेऊन पुढे जायचे आहे, आणि जेव्हा छतावर तिरंगा फडकतो ना तो केवळ छतावरच फडकत नाही तर मनातही फडकत असतो. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना राष्ट्रीय हातमाग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद!

***

Sonali/RadhkaA/SonalC/JaideviPS/SamarjitT/SonalT/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1946605) Visitor Counter : 178