पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 508 रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमात केलेले भाषण

Posted On: 06 AUG 2023 2:17PM by PIB Mumbai

नमस्कार, 

देशाचे रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव जी, कार्यक्रमात देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागीझालेले केंद्रीय मंत्रिमंडळातील  इतर सदस्य, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री गण, राज्य मंत्रिमंडळातील  मंत्रीमहोदय, खासदारगण,  आमदारगण,  इतर सर्व मान्यवर आणि माझ्या प्रियबंधू आणि भगिनींनो!विकसित होण्याच्या लक्ष्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकणारा भारत आपल्या अमृतकाळाच्या प्रारंभात आहे. नवी ऊर्जा आहे, नवी प्रेरणा आहे, नवे संकल्प आहेत. याच पार्श्वभूमीवर आज भारतीय रेल्वेच्या इतिहासात देखील एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. भारतातील सुमारे 1300 प्रमुख रेल्वे स्थानके आता अमृत भारत रेल्वे स्थानके म्हणून विकसित करण्यात येणार आहेत, त्यांचा पुनर्विकास होईल, आधुनिकतेने होईल. यापैकी आज 508 अमृत भारत स्थानकांच्या पुनर्निर्माणाचे काम सुरू होत आहे. आणि या  508 अमृत भारत स्थानकांच्या नवनिर्मितीवर सुमारे 25 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतील. तुम्ही कल्पना करू शकता की देशाच्या पायाभूत सुविधांसाठी, रेल्वेसाठी आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे देशातील सामान्य नागरिकांसाठी हे किती मोठे अभियान ठरणार आहे. याचा लाभ देशातील जवळपास सर्वच राज्यांना मिळणार आहे. जसे यूपी मध्ये यासाठी सुमारे साडे 4 हजार कोटी रुपये खर्चाने 55 अमृत स्थानके विकसित केली जातील. राजस्थानातीलदेखील 55 रेल्वे स्थानके, अमृत भारत स्थानके बनतील.  एमपी मध्ये 1 हजारकोटी रुपये खर्चाने 34 स्थानकांचा कायापालट होणार आहे. महाराष्ट्रात 44 स्थानकांच्या विकासाकरिता  दीड हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होईल.

तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळच्या देखील प्रमुख स्थानकांचा अमृत भारत स्थानके म्हणून विकास करण्यात येईल. मी अमृतकाळाच्या प्रारंभी या ऐतिहासिक अभियानासाठी रेल्वे मंत्रालयाची प्रशंसा करतो आणि सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. मित्रांनो, आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे.  जागतिक पातळीवर भारताची पत वाढली आहे, भारताविषयीची जगाची भूमिका बदलली आहे आणि यासाठी दोन प्रमुख गोष्टी आहेत, दोन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे तुम्ही देशवासीयांनी जवळ जवळ तीन दशकांनंतर, तीस वर्षांनंतर देशात पूर्ण बहुमताचे सरकार बनवले, हे पहिले कारण आहे आणि दुसरे कारण आहे- पूर्ण बहुमताच्या सरकारने त्याच स्पष्टतेने जनता जनार्दनाच्या या भावनेचा आदर करत मोठ-मोठे निर्णय घेतले आहेत, आव्हानांवर स्थायी तोडगे काढण्यासाठी अविरत काम केले आहे.आज भारतीय रेल्वे देखील याचे प्रतीक बनली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेमध्ये जितके काम झाले आहे त्याची आकडेवारी,  त्याची माहिती प्रत्येकालाच प्रसन्न करते आणि आश्चर्यचकित देखील करते. ज्या प्रकारे जगात दक्षिण आफ्रिका, युक्रेन, पोलंड, यूके आणि स्वीडनसारख्या देशांमध्ये रेल्वेचे जितके जाळे आहे, त्यापेक्षा जास्त रेल्वे ट्रॅक आपल्या देशात या नऊ वर्षात तयार करण्यात आले आहेत. तुम्ही कल्पना करा इतके जास्त प्रमाण आहे. दक्षिण कोरिया, न्युझीलँड आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये जितके रेल्वे जाळे आहे, त्यापेक्षा जास्त ट्रॅक भारताने गेल्या वर्षात तयार केले आहेत. एका वर्षामध्ये. भारतात आज आधुनिक रेल्वे गाड्यांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. आज देशाचे हे उद्दिष्ट आहे की रेल्वेचा प्रवास प्रत्येक प्रवाशासाठी प्रत्येक नागरिकांसाठी सुलभ देखील असावा आणि सुखदही असावा. आता ट्रेन पासून रेल्वे स्थानकापर्यंत तुम्हाला एक जास्त चांगला, उत्तमात उत्तम अनुभव देण्याचा हा प्रयत्न आहे. फलाटांवर बसण्यासाठी चांगली आसने बसवण्यात येत आहेत. चांगली प्रतीक्षागृहे तयार केली जात आहेत. आज देशातल्या हजारो रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय ची सुविधा आहे. आम्ही हे पाहिले आहे या मोफत इंटरनेटचा कित्येक युवकांनी लाभ घेतला आहे. अभ्यास करून ते आपल्या आयुष्यामध्ये उत्तम यश प्राप्त करत आहेत.

मित्रांनो, हे इतके मोठे यश आहे.  ज्या प्रकारे रेल्वे मध्ये काम झाले आहे. कोणत्याही पंतप्रधानाला याचा उल्लेख 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून करण्याचा मोह होईल आणि 15 ऑगस्ट जवळ आलेला असताना तर याच दिवशी याची विस्तृत चर्चा करू असा खूपच जास्त मोह होत आहे.  पण आज इतके मोठे आयोजन होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक यामध्ये सहभागी झाले आहेत, म्हणून मी आत्ताच याविषयी इतक्या विस्ताराने चर्चा करत आहे.

मित्रांनो, रेल्वेला आपल्या देशाची जीवनरेखा म्हटले जाते पण याबरोबरच आपल्या शहरांची ओळख देखील शहरांच्या रेल्वे स्थानकांशी संबंधित असते काळानुरूप ही रेल्वे स्थानके आता हार्ट ऑफ द सिटी बनली आहेत शहरातील सर्व प्रमुख घडामोडी रेल्वे स्थानकांच्या जवळपासच होत असतात म्हणूनच आज याची अतिशय गरज आहे की आपल्या रेल्वे स्थानकांचे आधुनिक स्वरुपात रुपांतर केले जावे.  रेल्वेच्या जागेचा सुयोग्य वापर केला जावा.

मित्रांनो,  जेव्हा देशात इतकी जास्त आधुनिक स्थानके बनतील, तेव्हा विकासाविषयीचे एक नवे वातावरण देखील तयार होईल. देशी विदेशी कोणतेही पर्यटक जेव्हा रेल्वेने या आधुनिक स्थानकांवर पोहोचतील, तेव्हा राज्याचे, आपल्या शहराचे पहिले चित्र त्याला नक्कीच प्रभावित करेल आणि ते कायम त्याच्या स्मरणात राहील. आधुनिक सेवांमुळे पर्यटनाला चालना मिळेल. रेल्वे स्थानकाच्या जवळच चांगल्या व्यवस्था असल्यामुळे आर्थिक व्यवहारांना देखील चालना मिळेल. सरकारने रेल्वे स्थानकांना, शहर आणि राज्यांची जी ओळख आहे त्यांच्यासोबत जोडण्यासाठी वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजना देखील सुरू केली आहे.  यामुळे संपूर्ण भागातील लोकांना कामगारांना आणि कारागिरांना फायदा होईल. त्याबरोबरच त्या जिल्ह्याचे ब्रॅण्डिंग देखील होईल. मित्रांनो, स्वातंत्र्याच्या अमृतकाळात देशाने आपल्या वारशाबाबत अभिमान बाळगण्याचा संकल्प देखील केला आहे. ही अमृत रेल्वे स्थानके त्याचे देखील प्रतीक बनतील आणि आपल्याला या स्थानकांचा  अभिमान वाटेल.  या स्थानकांमध्ये देशाची संस्कृती आणि स्थानिक वारशाचे दर्शन घडेल. ज्या प्रकारे जयपूर रेल्वे स्थानकात हवा महल, आमेर किल्ला यांसारख्या राजस्थानच्या वारशाचे दर्शन होते. जम्मू काश्मीरचे जम्मू तावी रेल्वे स्थानक प्रसिद्ध रघुनाथ मंदिराने प्रेरित असेल. नागालँडच्या दिमापुर स्थानकावर तिथल्या 16 आदिवासी स्थानिक वास्तुकला दिसतील. प्रत्येक अमृत स्थानक शहराच्या आधुनिक आकांक्षा आणि प्राचीन वारशाचे प्रतीक बनेल. देशाच्या विविध ऐतिहासिक स्थळांना आणि तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी सध्याच्या काळात देशात एक भारत गौरव यात्रा ट्रेन, भारत गौरव टूरिस्ट ट्रेन देखील चालवण्यात येत आहे. कदाचित तुमच्या हे देखील लक्षात आले असेल की त्याला देखील मजबुती दिली जात आहे. मित्रांनो, कोणत्याही व्यवस्थेचे परिवर्तन करण्यासाठी आपल्याला तिच्यामध्ये असलेली क्षमता ओळखणे गरजेचे आहे. भारतीय रेल्वेमध्ये विकासाला गती देण्याची अपार क्षमता आहे. याच विचाराने गेल्या नऊ वर्षात आम्ही रेल्वेमध्ये विक्रमी गुंतवणूक केली आहे. यावर्षी रेल्वेला अडीच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे ही तरतूद 2014 च्या तुलनेत पाचपट जास्त आहे.

आज एका सर्वसमावेशक विचाराने रेल्वेच्या समग्र विकासासाठी काम केले जात आहे. या 9 वर्षात लोकोमोटीव्ह च्या उत्पादनात नऊ पट वाढ झाली आहे. आज देशात पूर्वीपेक्षा 13 पट अधिक एचएलबी कोच बनत आहेत. 

मित्रांनो, 

ईशान्येकडील राज्यां मधल्या रेल्वे सेवा विस्तारालाही सरकारने प्राधान्य दिले आहे. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण असो, गेज परिवर्तन असो, विद्युतीकरण असो, नव्या मार्गाची निर्मिती असो, यावर जलद गतीने काम केले जात आहे. लवकरच ईशान्येकडील सर्व राज्यांच्या राजधान्या रेल्वे मार्गाने जोडलेल्या असतील. नागालॅंडमध्ये जवळपास शतकानंतर दुसरे रेल्वे स्थानक बनवण्यात आले आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये नव्या रेल्वे मार्गांचे कार्यान्वयन पूर्वीपेक्षा तिपटीने वाढले आहे.

मित्रांनो,

मागच्या नऊ वर्षात बावीसशे किलोमीटर डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर देखील बनवण्यात आले आहेत. यामुळे मालगाडीच्या प्रवासाच्या वेळेत बरीच घट झाली आहे. दिल्ली -एनसीआर पासून पश्चिमेकडील बंदरांपर्यंत, मग तो गुजरातचा किनारी प्रदेश असो किंवा महाराष्ट्राचा समुद्र किनारा, पूर्वी रेल्वेमधून सामान पोहचवण्यासाठी सर्वसाधारणपणे 72 तास लागत होते, आज तेच सामान, तोच माल 24 तासात पोहचवला जातो. अशाच प्रकारे इतर मार्गावर देखील प्रवास वेळ 40% ने घटला आहे. प्रवास वेळेत घट झाली याचा सरळ अर्थ म्हणजे मालगाड्यांची गति वाढत आहेत आणि सामान देखील अधिक गतीने पोहोचत आहे. याचा मोठा लाभ आपले उद्योजक, व्यापारी आणि खासकरून आपल्या शेतकरी बंधू भगिनींना होत आहे. आपल्या भाज्या आणि फळे आता जलद गतीने देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहचत आहेत. जेंव्हा देशात या प्रकारे वाहतूक जलद गतीने होत असेल तर तितक्याच जलद गतीने भारताची जी उत्पादने आहेत. आपले छोटे मोठे कारागीर, आपले लघु उद्योग जे काही उत्पादित करतात ते सामान जागतिक बाजारात जलद गतीने पोहोचेल. 

मित्रांनो, 

पूर्वी रेल्वे ओव्हर ब्रीज खूपच कमी असल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या, हे तुम्ही अनुभवले आहेच. 2014 पूर्वी देशात 6 हजाराहून कमी रेल्वे ओव्हर आणि अंडर ब्रीज होते. आज ओव्हर आणि अंडर ब्रीजची ही संख्या 10 हजारांहून अधिक झाली आहे. देशात मोठ्या रेल्वे मार्गावर मानव रहित क्रॉसिंगची संख्या देखील शून्यावर आली आहे. रेल्वेमध्ये आणि रेल्वे फलाटावर प्रवाशांसाठीच्या सुविधा निर्मितीमध्ये आज वृद्धांच्या आणि दिव्यांगजनांच्या गरजांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. 

मित्रांनो,

भारतीय रेल्वेला अत्याधुनिक बनवण्या सोबतच पर्यावरणपूरक बनविण्यावर देखील आमचा भर आहे. लवकरच भारतातील शंभर टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण केले जाणार आहे. म्हणजेच येत्या काही वर्षांत भारतातील सर्व रेल्वे गाड्या विजेवर चालतील. यामुळे पर्यावरणाला किती मोठा हातभार लागेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. गेल्या 9 वर्षात सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करणाऱ्या रेल्वे स्थानकांची संख्या देखील बाराशेहुन अधिक झाली आहे. भविष्यात सर्व स्थानके हरित ऊर्जा निर्मिती करतील हेच उद्दिष्ट आहे. आपल्या रेल्वे गाड्यांमध्ये जवळपास 70000 डब्बे, 70 हजार कोचमध्ये एलईडी लाईट्स लावण्यात आले आहेत. रेल्वे गाड्यांमधील बायोटॉयलेटस् ची संख्या देखील 2014 च्या तुलनेत आता 28 पटीने वाढली आहे. ही जी अमृत स्थानके बनणार आहेत, ती देखील हरित इमारतीची मानके पूर्ण करणारी असतील. 2030 पर्यंत भारत असा देश बनेल जिथली रेल्वे निव्वळ शुन्य उत्सर्जन करेल.

मित्रांनो,

अनेक दशकांपासून रेल्वेने आपल्याला आपल्या प्रियजनांना भेटवण्याचे खूप मोठे अभियान चालवले आहे, काम केले आहे, एका प्रकारे देशाला जोडण्याचे काम देखील केले आहे. आता रेल्वेला एक विशिष्ट ओळख मिळवून देणे आणि रेल्वेला आधुनिक भविष्याबरोबर जोडणे ही आपली जबाबदारी आहे. यासोबतच एक नागरिक या नात्याने रेल्वेचे रक्षण, व्यवस्थेचे रक्षण, सोयी सुविधांचे रक्षण, स्वच्छतेचे पालन ही कर्तव्ये आपल्याला पूर्ण करायची आहेत. अमृत काळ हा कर्तव्य काळ देखील आहे. पण मित्रांनो काही गोष्टी जेव्हा मी पाहतो तेव्हा मनाला दुःख देखील होते. दुर्दैवाने आपल्या देशातील विरोधी पक्षाचा एक गट आज देखील जुन्याच मार्गाचा अवलंब करत आहे. ते आज देखील स्वतः काही करत नाहीत आणि इतरांनाही करू देत नाहीत. 'काम करणार नाही आणि करुही देणार नाही' ही वृत्ती त्यांनी अंगी भिनवली आहे. देशाने आजच्या आणि भविष्याच्या गरजांची काळजी घेत संसदेची आधुनिक इमारत बांधली आहे. संसद देशाच्या लोकशाहीचे प्रतीक असते, यामध्ये सत्तारुढ पक्ष आणि विरोधी पक्ष सर्वांचे प्रतिनिधित्व असते. मात्र विरोधी पक्षाच्या या गटाने संसदेच्या नव्या इमारतीचा देखील विरोध केला आहे. आम्ही कर्तव्यपथाचा विकास केला तर त्याचाही विरोध करण्यात आला. या लोकांनी सत्तर वर्षांपर्यंत देशाच्या वीर शहिदांसाठी युद्ध स्मारक देखील बनवले नाही. जेव्हा आम्ही राष्ट्रीय युद्ध स्मारक बनवले, त्याची निर्मिती पूर्ण झाली तेव्हा याच्यावरही खुलेआम टीका करायला ते लाजले नाहीत. सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी आज जगातील सर्वात मोठा पुतळा आहे. याचा प्रत्येक भारतीयाला गर्व आहे. आणि काही राजनैतिक दलांना निवडणुकीच्या काळात तर सरदार साहेबांचे स्मरण होते. मात्र आजवर यांच्या एकाही बड्या नेत्याने स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे जाऊन सरदार साहेबांच्या या भव्य प्रतिमेचे दर्शन देखील केले नाही, त्यांना नमनही केले नाही. 

पण मित्रांनो,

आम्ही देशाच्या विकासाला सकारात्मक राजनीतिने पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे, आणि म्हणूनच नकारात्मक राजनीतीला मागे ठेवून सकारात्मक राजनीतीच्या मार्गावर एका मिशनच्या रूपात आम्ही मार्गक्रमण करत आहोत. कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार आहे, कुठे कोणाची वोट बँक आहे या सर्व बाबी मागे ठेवून आम्ही संपूर्ण देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत आहोत. सबका साथ सबका विकास या तत्त्वानुसार चालण्यासाठी आम्ही तन मनाने प्रयत्न करत आहोत.

मित्रांनो,

मागच्या काही वर्षांपासून रेल्वे युवकांना नोकरी देण्याचे एक मोठे माध्यम बनत आहे. जवळपास दीड लाखाहून अधिक युवकांना एकट्या रेल्वेने कायम सेवेमध्ये सामावून घेतले आहे. याच प्रकारे पायाभूत सुविधांवर लाखो कोटींची गुंतवणूक केल्यामुळे लाखो युवकांना रोजगार मिळत आहे. सध्या सरकार दहा लाख युवकांना नोकरी देण्याचे अभियान चालवत आहे. रोजगार मेळ्यातून युवकांना सतत नियुक्तीपत्र मिळत आहेत. हे बदलत्या भारताचे चित्र आहे, ज्यामध्ये विकास युवकांना नव्या संधी देत आहे आणि युवक विकासाला नवे पंख देत आहेत.

मित्रांनो,

आज या कार्यक्रमात अनेक स्वातंत्र्यसैनिक आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. तसेच अनेक पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. प्रत्येक भारतीयासाठी ऑगस्ट महिना हा खूप विशेष महिना असतो. हा महिना क्रांतीचा, कृतज्ञतेचा, कर्तव्य भावनेचा महिना आहे. ऑगस्टमध्ये अनेक ऐतिहासिक दिवस येतात, ज्यांनी भारताच्या इतिहासाला नवी दिशा दिली आणि आजही आपल्याला प्रेरित करत आहेत. उद्या, 7 ऑगस्ट रोजी संपूर्ण देश स्वदेशी चळवळीला समर्पित राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करणार आहे. 7 ऑगस्ट ही तारीख प्रत्येक भारतीयासाठी ‘व्होकल फॉर लोकल’ बनण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार करण्याचा दिवस आहे. काही दिवसांनी गणेश चतुर्थीचा पवित्र सणही येणार आहे. आपल्याला आतापासूनच पर्यावरण-स्नेही गणेश चतुर्थीच्या दिशेने वाटचाल करायची आहे. गणपती बाप्पाच्या मूर्ती पर्यावरणपूरक सामग्री पासून बनवलेल्या असतील यासाठी प्रयत्न करायला हवेत. हा सण आपल्या स्थानिक कारागिरांनी, आपल्या हस्तशिल्प कारागिरांनी तसेच आपल्या छोट्या उद्योजकांनी बनवलेली उत्पादने खरेदी करण्याची प्रेरणा देतो.

मित्रांनो,

7 तारखेनंतर एक दिवसाने 9 ऑगस्ट येत आहे. 9 ऑगस्ट या दिवशी ऐतिहासिक ‘भारत छोडो’ आंदोलनाला सुरुवात झाली होती. महात्मा गांधींनी मंत्र दिला होता आणि ‘भारत छोडो’ आंदोलनाने स्वातंत्र्याच्या दिशेने भारताच्या वाटचालीत नवी ऊर्जा निर्माण केली होती. यातून प्रेरित होऊन आज संपूर्ण देश प्रत्येक वाईट गोष्टीला म्हणत आहे – भारत छोडो. सगळीकडे एकच आवाज घुमत आहे . भ्रष्टाचार- भारत छोडो. घराणेशाही -भारत छोडो, तुष्टीकरण -भारत छोडो.

मित्रांनो,

त्यानंतर, 15 ऑगस्टची पूर्वसंध्या 14 ऑगस्टचा भयावह फाळणी स्मृती दिन, जेव्हा भारतभूमीचे दोन तुकडे झाले होते, एक असा दिवस, जो प्रत्येक भारतीयाचे डोळे पाणावणारा दिवस आहे. भारताच्या फाळणीची ज्यांनी मोठी किंमत मोजली अशा असंख्य लोकांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. भारतमातेप्रति आदर व्यक्त करताना सर्वस्व गमावलेल्या मात्र तरीही धैर्याने आपले जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लढा दिलेल्या कुटुंबांप्रति एकजुट दर्शवण्याचा हा दिवस आहे.

आपले कुटुंब, आपल्या देशाच्या हितासाठी, देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. मित्रांनो 14 ऑगस्ट, फाळणीचा दिवस, भारतभूमीच्या विभाजनाचा तो दिवस भविष्यात भारत मातेला एकसंध ठेवण्याच्या जबाबदारीची जाणीव करून देतो. आता या देशाचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये असा संकल्प करण्याची वेळ म्हणजे हा फाळणीचा दिवस 14 ऑगस्ट आहे.

मित्रांनो,

देशातील प्रत्येक बालक, वृद्ध, प्रत्येकजण 15 ऑगस्टची वाट पाहत असतो. आणि आपला 15 ऑगस्ट, आपला स्वातंत्र्यदिन हा आपला तिरंगा आणि आपल्या देशाच्या प्रगतीप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याचा दिवस आहे. गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला प्रत्येक घरात तिरंगा फडकवायचा आहे. प्रत्येक घरात तिरंगा, प्रत्येक हृदयात तिरंगा, प्रत्येक मनात तिरंगा, प्रत्येक हेतूत तिरंगा, प्रत्येक स्वप्नात तिरंगा, प्रत्येक संकल्पात तिरंगा. आजकाल अनेक मित्र सोशल मीडियावर आपला तिरंगा असलेला डीपी अपडेट करत असल्याचे मी पाहतो. ‘हर घर तिरंगा’ जयघोष याबरोबरच फ्लॅग मार्चही काढण्यात येत आहे. आज मी सर्व देशवासियांना, विशेषत: युवकांना ‘हर घर तिरंगा’ या चळवळीत सहभागी होण्याचे आणि त्याचा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन करतो.

मित्रांनो,

दीर्घकाळापासून आपल्या देशातील जनतेला आपण जो कर भरतो त्याला काही अर्थ नाही असे वाटायचे. आपला कष्टाचा पैसा भ्रष्टाचारात वाया जाईल असे त्यांना वाटायचे. मात्र आमच्या सरकारने हा समज बदलला. आज लोकांना जाणीव होत आहे की त्यांचा पैसा राष्ट्र उभारणीसाठी वापरला जात आहे. सुविधा वाढत आहेत, जीवन सुखकर होत आहे. तुम्हाला ज्या संकटांचा सामना करावा लागला तो तुमच्या मुलांना करावा लागू नये यासाठी रात्रंदिवस काम केले जात आहे. याचा परिणाम म्हणजे कर भरणाऱ्या लोकांचा विकासावरील विश्वास वाढला आहे आणि त्यामुळे कर भरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. एक काळ असा होता की देशात 2 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर आकारला जात होता. आज मोदींची ही हमी पहा, आज 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही कर आकारला जात नाही. मात्र तरीही, देशात जमा होणाऱ्या प्राप्तिकराची रक्कम सातत्याने वाढत आहे. जे विकासासाठी उपयोगी पडत आहे. देशातील मध्यमवर्गाची व्याप्ती सातत्याने वाढत आहे हे यातून स्पष्ट होत आहे. आता पाच दिवसांपूर्वीच प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. या वर्षी आपण पाहिलं आहे की प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्या लोकांच्या संख्येत 16% वाढ झाली आहे. देशातील सरकारवर, देशात होत असलेल्या नवनिर्माणावर आणि विकासाची किती गरज आहे यावर लोकांचा विश्वास किती वाढत आहे, हे यावरून दिसून येते. आज लोक पाहत आहेत, देशात रेल्वेचा कशा प्रकारे कायापालट होत आहे, मेट्रोचा विस्तार होत आहे. लोक पाहत आहेत, आज देशात एकापाठोपाठ एक नवीन एक्स्प्रेस वे कसे बांधले जात आहेत. लोक पाहत आहेत, आज देशात कशा प्रकारे वेगाने नवनवीन विमानतळ बांधले जात आहेत, नवीन रुग्णालये बांधली जात आहेत, नवीन शाळा बांधल्या जात आहेत. जेव्हा लोक असा बदल पाहतात तेव्हा त्यांच्या पैशातून नवा भारत घडत आहे ही भावना प्रबळ होते. या सर्व कामांमध्ये तुमच्या मुलांच्या उज्वल भविष्याची हमी आहे. हा विश्वास आपल्याला दिवसेंदिवस अधिक मजबूत करायचा आहे.

बंधू आणि भगिनींनो,

हे जे 508 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे, हे देखील त्याच दिशेने उचललेले पाऊल आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की, अमृत भारत स्थानके भारतीय रेल्वेच्या या कायापालटाला नव्या उंचीवर नेतील आणि या क्रांतीच्या महिन्यात, आपण सर्व भारतीय नवीन संकल्पांसह, 2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, तेव्हा भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी एक नागरिक म्हणून माझी जी कर्तव्ये आहेत, ती नक्कीच पार पाडेन. या संकल्पासह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार! खूप खूप शुभेच्छा.

 

***

 

Jaydevi PS/Shailesh/Sonal T/S. Mukhedkar /Samarjit T/Sushma K/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1946309) Visitor Counter : 173