संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आसाममधील कोक्राझार येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले 132 व्या डुरांड चषक फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

Posted On: 05 AUG 2023 2:53PM by PIB Mumbai

 

आसाममधील कोक्राझार येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 132 व्या डुरांड चषक फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन केले. या वार्षिक स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पहिल्यांदाच या ठिकाणी झाला. सशस्त्र दलांनी आसाम सरकारच्या सहकार्यांने ही स्पर्धा आयोजित केली आहे.

सशस्त्र दले आणि बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिल (बीटीसी) यांनी कोक्राझारमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण केल्यामुळे या शहरात प्रथमच हा कार्यक्रम आयोजित करता आला याबद्दल राजनाथ सिंह यांनी त्यांची प्रशंसा केली. ईशान्येकडील लोकांना फुटबॉलबद्दलचा असलेला उत्साह आणि प्रेम याबद्दल त्यांनी कौतुक केले. हा सुंदर खेळहा केवळ एक क्रीडाप्रकार नसून ती एक भावना आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आसाममध्ये अलीकडच्या काळात अनेक प्रतिभावान फुटबॉलपटू तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.  डुरांड चषक युवकांना नव्या जोमाने फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहन देईल असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

या प्रदेशातील समृद्ध क्रीडा संस्कृतीबद्दल आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सविस्तर माहिती दिली आणि सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या. कोक्राझारमध्ये स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांनी भारतीय लष्कराचे आभार मानले आणि त्यासाठी बीटीसीनं केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. या

उद्घाटन सोहळ्याला आसाम आणि ईशान्य भागातले सुमारे 12,000 फुटबॉल चाहते उपस्थित होते. सुखोई-30 एमकेआय विमान आणि एमआय-17 हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिके, मार्शल डिस्प्ले, गटका आणि भांगडा नृत्यासह स्थानिक पथकाने सादर केलेले बोडो सांस्कृतिक नृत्य ही या समारंभाची प्रमुख आकर्षणे ठरली.

उद्घाटन समारंभानंतर बोडोलँड एफसी आणि राजस्थान युनायटेड एफसी यांच्यातील स्पर्धेचा सलामीचा सामना झाला. कोक्राझार येथे 24 ऑगस्ट 2023 रोजी आठ गट सामने आणि एक उपांत्यपूर्व फेरी खेळली जाणार आहे. एकूण 24 संघ या स्पर्धेत सहभागी आहेत. त्यात नेपाळ आणि बांगलादेश हे दोन परदेशी संघ, भारतीय सशस्त्र दलाचे तिन्ही संघ आणि बोडोलँड एफसीचा स्थानिक संघ यांचा समावेश आहे. कोलकाता, गुवाहाटी आणि कोक्राझार या तीन ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे.

***

R.Aghor/P.Jambhekar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1946028) Visitor Counter : 163