गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे संसदेच्या राजभाषा समितीची 38 वी बैठक संपन्न


राष्ट्रपतींना सादर केल्या जाणाऱ्या, संसदेच्या राजभाषा समितीच्या अहवालाच्या बाराव्या खंडालाही बैठकीदरम्यान देण्यात आली मान्यता

हिंदीची स्थानिक भाषांशी स्पर्धा नाही, सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन देऊनच राष्ट्र सक्षम होईल

सर्व भाषांनी आपला देश जोडण्याचे केले काम, गुलामगिरीच्या काळातही भारतीय भाषा आणि त्यांचे शब्दकोश अबाधित राहिले, ही मोठीच उपलब्धी

Posted On: 04 AUG 2023 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑगस्ट 2023

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह  यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे संसदेच्या राजभाषा समितीची 38 वी बैठक पार पडली. संसदेच्या राजभाषा समितीच्या अहवालाच्या बाराव्या खंडालाही बैठकीदरम्यान मान्यता देण्यात आली. हा खंड राष्ट्रपतींना सादर केला जाईल.

स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवाच्या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर “पंच प्रण” ठेवले आहेत. त्यापैकी दोन प्रण(संकल्प) आहेत- वारशाचा आदर करणे आणि गुलामगिरीची चिन्हे पुसून टाकणे, असे केन्द्रीय गृहमंत्री आपल्या भाषणात म्हणाले.   या दोन प्रणांच्या 100% अंमलबजावणीसाठी सर्व भारतीय भाषा आणि राजभाषा यांनी त्यांची ताकद दाखवायला हवी असे त्यांनी सांगितले.

भाषेचा आदर केल्याशिवाय वारशाचा आदर अपूर्ण असून स्थानिक भाषांना सन्मान दिला तरच राजभाषेचा स्वीकार होईल, असे ते म्हणाले.  हिंदीची स्थानिक भाषांशी स्पर्धा नाही, सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन देऊनच राष्ट्र सशक्त होईल, असे शाह यांनी सांगितले. 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 भाषांमध्ये अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असून लवकरच हे अभ्यासक्रम सर्व भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होतील आणि तो क्षण स्थानिक भाषा आणि राजभाषेच्या उदयाची नांदी ठरेल.  पंतप्रधान मोदींनी संसदेत एकही भाषण इंग्रजीत केले नाही आणि सरकारचे मंत्रीही भारतीय भाषांमध्ये भाषण देण्याचा प्रयत्न करतात, यामुळे विविध भाषा जोडण्याच्या  चळवळीला खूप चालना मिळते, असे त्यांनी सांगितले. 

  

गुलामगिरीच्या कालखंडानंतरही भारतीय भाषा आणि त्यांचे शब्दकोश अबाधित राहिले, ही मोठी उपलब्धी असल्याचे ते म्हणाले. भाषांनी देशाला एकसंध ठेवण्याचे काम केले आहे असे शाह  म्हणाले.

राजभाषा संसदीय समितीचे उपाध्यक्ष भर्तृहरी महताब, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा आणि निशीथ प्रामाणिक आणि समितीचे सदस्य या बैठकीत उपस्थित होते.

 

* * *

S.Kakade/Vinayak/Vasanti/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1945886) Visitor Counter : 186