आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

13व्या भारतीय अवयवदान दिन समारंभात केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांचे संबोधन


दुसऱ्या व्यक्तीला जीवनदान देण्यासारखी मानवतेसाठी दुसरी मोठी सेवा असू शकत नाही : केंद्रीय मंत्री डॉ. मांडविया

Posted On: 03 AUG 2023 4:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2023

दुसऱ्या व्यक्तीला जीवनदान देण्यासारखी मानवतेसाठी दुसरी मोठी सेवा असू शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी केले. ते आज 13 व्या भारतीय अवयव दान दिन (आयओडीडी) समारंभाला संबोधित करत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार आणि प्रा. एस पी.सिंग बघेल तसेच तामिळनाडूचे आरोग्य मंत्री मा सुब्रमण्यम हेही उपस्थित होते. हा 13 वा भारतीय अवयव दान दिन (आयओडीडी) समारंभ मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रिय व्यक्तीचे अवयव दान करण्याच्या धाडसी निर्णयाबद्दल, मृत व्यक्तींच्या अवयव दानाबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि अवयव दान आणि प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. 

या समारंभाला संबोधित करताना डॉ.मांडविया म्हणाले की, या कार्यात सहभागी झालेल्या सर्व लोकांच्या योगदानाची ओळख करून त्यांचे कौतुक करणे महत्त्वाचे आहे. केंद्रीय मंत्र्यांनी आवर्जून सांगितले की, वर्ष 2013 मध्ये सुमारे 5000 लोक अवयव दान करण्यासाठी पुढे आले होते. आता वर्षाला 15,000 हून अधिक अवयव दाता आहेत.

देशात अवयवदानात वाढ व्हावी याकरिता केंद्र सरकारने अनेक पावले उचलली असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, देशात अवयवदानाबाबत अधिक जनजागृती करण्यासाठी अधिकची धोरणे आणि सुधारणा आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

अवयवदाते, त्यांचे कुटुंबीय आणि नागरी समाजातील सदस्यांच्या योगदानाचे कौतुक करून डॉ. मांडविया यांनी त्यांच्या प्रेरक हेतूचे आणि समर्पणाचे कौतुक केले.

यावेळी नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, अर्थात राष्ट्रीय अवयव आणि उती (पेशी) प्रत्यारोपण संघटनेच्या (NOTTO) ई-न्यूज लेटर, ट्रान्सप्लांट मॅन्युअल( (प्रत्यारोपण अहवाल) आणि ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर (प्रत्यारोपण समन्वयक) प्रशिक्षणासाठीच्या राष्ट्रीय अभ्यासक्रमाचे प्रकाशन करण्यात आले.

याच कार्यक्रमादरम्यान, आयसीएमआर (ICMR) ची 'मेक इन इंडिया' उत्पादने जसे की, नॉव्हेल हिमोफिलिया ए रॅपिड कार्ड टेस्ट आणि वॉन विलेब्रँड डिजीज रॅपिड कार्ड टेस्ट आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य विभागाच्या, ई केअर (eCARE) पोर्टलचे (ई-क्लिअरन्स ऑफ आफ्टर लाईफ रीमेन्‍स) लोकार्पणही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

ई केअर (eCARE)पोर्टल: जेव्हा एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या देशात मृत्यू होतो, तेव्हा मृत व्यक्तीचे पार्थिव भारतात परत आणण्यासाठी अनेक कागदपत्रे आणि प्रक्रिया कराव्या लागतात ज्यामुळे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला निराशेचा सामना करावा लागतो. या समस्येची संवेदनशीलता समजून घेऊन आणि किमान सरकार आणि जास्तीत जास्त प्रशासन या तत्त्वाचे पालन करून, भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विविध देशांमधून पार्थिव शरीर भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुलभ आणि जलद करण्यासाठी ई-केअर (ई-क्लिअरन्स ऑफ पोस्ट-लाइफ रिमेन्स) पोर्टल सुरू केले आहे.

हिमोफिलिया ए आणि वॉन विलेब्रँड डिजीज डायग्नोस्टिक किट्स: हिमोफिलिया ए आणि वॉन विलेब्रँड डिजीज हे दोन सर्वसामान्य आजीवन रक्तस्त्राव विकार आहेत. सामान्यपणे सांध्यामध्ये रक्तस्त्राव होऊन सूज आणि वेदना होणे, त्वचेमध्ये रक्तस्त्राव (जखम) किंवा स्नायू आणि उतीमध्ये रक्तस्त्राव होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजी (एनआयआयएच) यांनी हिमोफिलिया ए आणि वॉन विलेब्रँड आजाराच्या निदानासाठी जगात प्रथमच, अशा प्रकारचे हे किट विकसित केले आहे. यामुळे केवळ आपल्या देशातच नाही तर इतर अनेक विकसनशील देशांमध्ये जिथे वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे किंवा त्या सुविधा स्वीकार्य मानकांनुसार नाहीत अशा देशातर रक्तस्त्राव विकारांच्या निदानाची परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे.

 

 S.Tupe/V.Yadav/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1945429) Visitor Counter : 204