इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील एक विश्वासार्ह जागतिक भागीदार म्हणून उदयाला येत आहे : सेमिकॉन इंडिया 2023च्या समारोपाच्या दिवशी परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांचे प्रतिपादन
Posted On:
31 JUL 2023 9:12AM by PIB Mumbai
परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांनी तीन दिवसीय सेमिकॉन इंडिया 2023च्या समारोपाच्या दिवशी संबोधित केले. महत्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील भारताची भूमिका विशद करून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील विशेषतः सेमीकंडक्टर उद्योगातील राष्ट्राच्या वृद्धीचे महत्व अधोरेखित केले. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील एक विश्वासार्ह जागतिक भागीदार म्हणून भारताची ओळख वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात अमेरिका, जपान, आणि ऑस्ट्रेलियासह इतर समविचारी देशांबरोबर असलेल्या उदयोन्मुख संधींना अनन्यसाधारण महत्व असल्याचे ते म्हणाले.
तीन दिवसीय सेमिकॉन इंडिया 2023 परिषदेच्या शेवटच्या दिवशी विद्यापीठे, स्टार्टअप्स, प्रमुख सेमीकंडक्टर कंपन्या आणि भारत सरकारचे विविध भागीदार असे विविध क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते. या परिषदेत अतिशय अर्थपूर्ण सत्रे आणि विविधांगी संवाद याद्वारे सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रातील महत्वपूर्ण पैलूंचे महत्व विशद करण्यात आले, त्याचप्रमाणे भक्कम, क्रियाशील आणि शास्वत सेमीकंडक्टर जैवसंस्थेच्या विकासाच्या महत्वावर देखील विचारमंथन झाले.
"वसुधैव कुटुंबकम" किंवा "एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य" म्हणजेच सर्वांसाठी समान वाढ आणि सामायिक भविष्य या विचारसरणीवर भारताचा गाढ विश्वास आहे. या तत्वाला अनुसरून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे सदस्य अंशुमन त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखालील "विश्वासार्ह आणि लवचिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीकरता जागतिक सहकार्य" या विषयावर समर्पित पॅनल चर्चा झाली. अमेरिकी दूतावासातले कौन्सिल जनरल माईक हॅन्की, जपानच्या अर्थव्यवस्था आणि विकास मंत्री क्योको होकुगो, ऑस्ट्रेलियन उच्चायुक्ताच्या प्रधान सचिव, जॉर्जिना रोझ मॅके, आणि जॉर्जिया टेक युनिव्हर्सिटीचे प्रा. अरिजित रायचौधरी यांचा पॅनल मध्ये समावेश होता. या चर्चेत सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताच्या भूमिकेवर विशेष लक्ष केंद्रित करून संशोधन, बुद्धिसंपदेची देवाणघेवाण, स्वच्छ ऊर्जा संक्रमण आणि दुर्लभ खनिजांचा शोध यादृष्टीने सेमीकंडक्टर उद्योग वाढविण्यासाठी जागतिक भागीदारीच्या संभाव्यतेचा शोध घेतला.
उदयोन्मुख तंत्रज्ञानातील संधी आणि आव्हाने यावरील पॅनेल चर्चेत टेक्सास इन्स्ट्रुमेंट्सचे संतोष कुमार, ए एम डी च्या जया जगदीश, एनएक्सपी सेमीकंडक्टरचे हितेश गर्ग, आणि आयआयटी मुंबईचे प्रा. उदयन गांगुली, यांच्यासह अनेक तज्ञांचा समावेश होता; या चर्चासत्रात सेमीकंडक्टर क्षेत्रातील महत्वपूर्ण संशोधन, ऑटोमोटिव्ह सेमीकंडक्टर्सचे भविष्य, सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये शैक्षणिक भूमिका आणि सेमीकंडक्टर जैवसंस्थेतील शाश्वतता या मुद्द्यांवर विचारविनिमय झाला.
सेमीकंडक्टर जैवसंस्थेतील तयारीच्या मूल्यांकनावर पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आली होती.
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव राजेश कुमार सिंग यांनी जागतिक पातळीवर स्पर्धात्मक अनुपालन आणि नियामक आराखड्याच्या निर्मिती संदर्भातील सत्राला संबोधित केले. राज्य पातळीवर उद्योगांना अनुकूल वातावरण निर्मितीवर भर देत देशात झालेल्या व्यवसाय स्नेही वातावरणातील आणि थेट परकीय गुंतवणूक प्रक्रियेतील बदल सिंग यांनी अधोरेखित केले. तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अल्केश कुमार शर्मा यांनी जागतिक गुंतवणूकदारांशी केलेले सहकार्य, करसंबंधित सुधारणा, संपूर्ण सरकार दृष्टिकोन आणि गुंतवणूकदारांसाठीच्या निर्णय प्रक्रियेतील धोरणात आलेले स्थैर्य याविषयी माहिती दिली, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या सदस्य प्रज्ञा सहाय सक्सेना, यांनी उद्योग सल्लामसलत आणि आवश्यकतांवर आधारित संरचनात्मक बदलांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार कसे सक्रिय आहे यावर प्रकाश टाकला. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे सदस्य राजीव तलवार यांनी संपर्करहित, कागदरहित आणि फेसलेस कस्टम अर्थात मानवीहस्तक्षेप न होता होणाऱ्या प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करून सेमीकंडक्टर जैवसंस्थेमधील कार्यान्वयन सुव्यवस्थित करण्यासाठीची वैशिष्ट्ये सांगितली. मायक्रॉनचे एस वी पी गुरशरण सिंग, यांनी आगाऊ किंमती कराराबद्दलच्या सरकारच्या गतिशील दृष्टिकोनाचे कौतुक केले. लावाचे एमडी, हरी ओम राय यांनी उद्योगधंद्यांचा दृष्टिक्षेप विशद करत भारत 2033 पर्यंत जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उप्तादनाच्या आवश्यकतेपैकी 50 टक्के उत्पादन करेल असा विश्वास व्यक्त केला.
सेमीकॉनइंडियाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या आयोजनामुळे, जागतिक कंपन्यांना नेतृत्व आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च स्तरावर सहभागी करून, भारताला सर्वसाधारणपणे तंत्रज्ञानाचे भविष्य आणि विशेषतः सेमीकंडक्टर्सचे भविष्य या विषयावरील संभाषणाच्या केंद्रस्थानी स्थान मिळवून दिले आहे. यामुळे भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रवासाला एक औपचारिक व्यासपीठ उपलब्ध झाले असून भारताला इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टरसाठी जागतिक केंद्र बनवण्याची कल्पना साकारण्यासाठी बळ मिळाले आहे.
***
SonalT/BhaktiS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1944246)
Visitor Counter : 183