पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        पंतप्रधानांनी सिकर, राजस्थान येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन/पायाभरणी प्रसंगी केलेले भाषण
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                27 JUL 2023 2:36PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                राजस्थानचे राज्यपाल श्रीमान कलराज मिश्र जी, केंद्रीय मंत्री श्री नरेंद्र सिंहजी तोमर, अन्य सर्व मंत्री, संसदेतील माझे सहकारी, आमदार आणि अन्य सर्व मान्यवर, तसेच आज या कार्यक्रमात देशातील लाखो ठिकाणांहून कोट्यवधी शेतकरी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. मी राजस्थानच्या भूमीतून देशातील त्या कोट्यवधी शेतकऱ्यांनाही नमन करतो. राजस्थानातील माझे प्रिय बंधू-भगीनीही आज या महत्वपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत.   
खाटू श्यामजी यांची ही भूमी देशभरातील त्या श्रद्धाळुंना विश्वास देते, एक उमेद देते. माझे सौभाग्य आहे की आज मला शूरवीरांची भूमी शेखावाटी येथून, देशासाठी अनेक विकास प्रकल्प सुरु करण्याची संधी मिळाली आहे. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आज येथून  पीएम किसान सन्मान निधीचे सुमारे 18 हजार कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.
देशात आज सव्वा लाख पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्रांची सुरुवात करण्यात आली आहे. गाव आणि ब्लॉक पातळीवर तयार केलेल्या या पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्रांमुळे कोट्यवधी शेतकऱ्यांना थेट लाभ होईल. आज दीड हजारापेक्षा अधिक FPO करिता, आपल्या शेतकर्यांसाठी ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’ अर्थात ONDC चे लोकार्पणही झाले आहे. यामुळे देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील शेतकऱ्याला आपले उत्पादन बाजारापर्यंत पोहचवणे आणखी सुलभ होईल.  
आजच देशातील शेतकऱ्यांकरिता एक नवीन ‘यूरिया गोल्ड’ देखील सुरु करण्यात आले आहे. याशिवाय, राजस्थानातील वेगवेगळ्या शहरांना नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि एकलव्य शाळांची भेट देखील मिळाली आहे. मी देशातील जनतेला, राजस्थानातील जनतेला आणि विशेषतः माझ्या शेतकरी बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
राजस्थानातील सीकर आणि शेखावाटीचा भाग एकप्रकारे शेतकऱ्यांचा गड आहे. येथील शेतकऱ्यांनी हे नेहमी सिद्ध केले आहे की त्यांच्या परिश्रमापुढे काहीच अवघड नाही. पाण्याची कमतरता असूनही येथील शेतकऱ्यांनी या मातीतून मोठ्या प्रमाणावर पीक घेतले आहे. शेतकऱ्यांचे सामर्थ्य, शेतकऱ्यांचे परिश्रम हे मातीतूनही सोने पिकवून दाखवते. आणि म्हणूनच आमचे सरकार देशातील शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून उभे आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्याच्या इतक्या दशकांनंतर आज देशात असे सरकार आले आहे, जे शेतकऱ्यांचे दुःख-वेदना जाणते, शेतकऱ्यांना असलेली चिंता जाणते. यामुळेच गेल्या नऊ वर्षात केंद्र सरकारने सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. आम्ही शेतकऱ्यांकरिता बियाण्यांपासून ते बाजारापर्यंत, नवी व्यवस्था उभारली आहे. मला आठवतंय, राजस्थानातील सुरतगडमधूनच आम्ही 2015 मध्ये मृदा आरोग्य पत्राची योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून आम्ही देशातील शेतकर्यांना कोट्यवधी मृदा आरोग्य पत्र दिले आहेत. या मृदा आरोग्य पत्रांमुळे आज शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्याची माहिती मिळत आहे, त्यानुसार ते खतांचा वापर करत आहेत.
मला आनंद आहे की आज पुन्हा एकदा राजस्थानच्या भूमीतून शेतकऱ्यांसाठी आणखी एका मोठ्या योजनेची सुरूवात होत आहे. आज देशभरात सव्वा लाखाहून अधिक पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्रं राष्ट्राला समर्पित करण्यात आली आहेत. या सर्व केंद्रांमुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होणार आहे. ही एक प्रकारे शेतकर्यांसाठी सर्वकाही एकाच ठिकाणी उपलब्ध होणारी केन्द्रं आहेत.
तुम्हा शेतकरी बंधू-भगिनींना शेतीशी निगडीत मालासाठी आणि इतर गरजांसाठी अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. आता तुम्हाला अशा अडचणींचा सामना करावा लागणार नाही. आता पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्रातून, शेतकऱ्यांना बी-बियाणे देखील मिळेल आणि खतेही मिळतील. याशिवाय, शेतीशी संबंधित अवजारे आणि इतर यंत्रेही या केंद्रात मिळणार आहेत. ही केंद्रं शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित प्रत्येक आधुनिक माहिती देणार आहेत. मी पाहिले आहे की, माझ्या शेतकरी बंधू-भगिनींना योजनेची योग्य माहिती नसल्याने खूप त्रास सहन करावा लागतो. ही पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्रं आता शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेची वेळेवर माहिती देणारे माध्यम बनतील.
मित्रांनो,
ही तर फक्त सुरूवात आहे. आणि मी माझ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की, तुम्हीही ही सवय लावून घ्या, भलेही तुम्हाला येथून काहीही खरेदी करायचे नसेल, पण तुम्ही बाजारात गेला असाल, त्या शहरात शेतकरी समृद्धी केंद्र असेल, तर काहीही खरेदी करायचे नसेल, तरीही तिकडे एक फेरी नक्की मारा. अशी कित्येक कामे आज देशात होत आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठे बदल होत आहेत.
मित्रांनो,
भारताचा विकास तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा भारतातील गावांचा विकास होईल.  भारत तेव्हाच विकसित देखील बनू शकतो, जेव्हा भारतातील गाव विकसित होतील. आज आमचे सरकार भारतातील गावांमध्ये ती प्रत्येक सुविधा पोहोचवण्याचे काम करत आहे जी शहरांमध्ये मिळू शकते. तुम्हा सर्वांना हे माहीत आहेच की एक काळ असा होता जेव्हा देशाच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग आरोग्य सेवांपासून वंचित होता. म्हणजेच कोटी कोटी लोक नेहमीच आपल्या दैवाच्या भरवशावर आपला जीव पणाला लावून जगत होते. असे ठरवून टाकले होते की चांगली रुग्णालये तर फक्त दिल्ली-जयपूरमध्ये किंवा मोठ्या शहरातच मिळतात. आम्ही ही स्थिती देखील बदलत आहोत. आज देशाच्या प्रत्येक भागात नवीन एम्स (AIIMS) सुरू होत आहेत, नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू होत आहेत. आमच्या या प्रयत्नांचा परिणाम आहे की आज देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढून 700 च्या वर पोहोचली आहे. 8-9 वर्षांपूर्वी राजस्थानमध्येही केवळ 10 वैद्यकीय महाविद्यालये होती, आज राजस्थानमध्ये देखील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 35 झाली आहे. यामुळे तुमच्याच जिल्ह्यांच्या आजूबाजूला चांगल्या उपचारांच्या सुविधा तर तयार होत आहेतच, यामधून शिक्षण घेऊन मोठ्या संख्येने डॉक्टर देखील बाहेर पडत आहेत. हे डॉक्टर लहान वाडी-वस्त्या आणि गावांमध्ये चांगल्या आरोग्य व्यवस्थेचा आधार बनत आहेत.
जसे आज जी नवीन वैद्यकीय महाविद्यालये मिळाली आहेत, त्यामुळे बारां, बुंदी, टोंक, सवाई माधोपूर, करौली, झुनझुनु, जेसलमेर, धौलपूर, चितोडगड, सिरोही आणि सीकरसह अनेक भागांना लाभ मिळतील. उपचारांसाठी लोकांना आता जयपूर आणि दिल्लीच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. आता तुमच्या घराच्या जवळच चांगली रुग्णालये देखील असतील आणि गरीबाचा मुलगा आणि मुलगी या रुग्णालयांमध्ये शिक्षण घेऊन डॉक्टर बनू शकतील. आणि मित्रांनो, तुम्हाला ठाऊक आहे का, आमच्या सरकारने वैद्यकीय शिक्षण देखील मातृभाषेतून घेण्याचा मार्ग तयार केला आहे. आता असे होणार नाही की इंग्रजी येत नसल्याने गरीबाचा मुलगा-मुलगी डॉक्टर बनू शकले नाहीत आणि ही देखील मोदी यांची हमी आहे.
बंधू आणि भगिनींनो,
अनेक दशके आपली गावे आणि गरीब यामुळे देखील मागे राहिले कारण गावांमध्ये शिकण्यासाठी चांगल्या शाळा नव्हत्या. मागास आणि आदिवासी समाजातील बालके स्वप्ने तर पाहात होते, मात्र ही स्वप्ने पूर्ण करण्याचा कोणताही मार्ग त्यांच्याकडे नव्हता. आम्ही शिक्षणासाठीचे बजेट खूप मोठ्या प्रमाणात वाढवले, संसाधनांमध्ये वाढ केली, एकलव्य आदिवासी शाळा सुरू केल्या. याचा आदिवासी युवकांना खूप मोठ्या प्रमाणावर लाभ झाला आहे. 
मित्रांनो,
जेव्हा स्वप्ने मोठी असतात तेव्हाच यश देखील मोठे असते. राजस्थान तर देशातील असे राज्य आहे ज्याच्या वैभवामुळे अनेक शतके जगाला चकित केले आहे. आपल्याला या वारशाचे संरक्षण करायचे आहे आणि राजस्थान आधुनिक विकासाच्या शिखरावर देखील पोहोचवायचे आहे. म्हणूनच राजस्थानमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा तयार करण्याला आमचे प्राधान्य आहे. राजस्थानमध्य गेल्या काही महिन्यात दोन-दोन अत्याधुनिक द्रुतगती मार्गांचे लोकार्पण झाले आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा एक प्रमुख भाग आणि अमृतसर-जामनगर द्रुतगती मार्गाच्या माध्यमातून राजस्थान विकासाची नवी गाथा लिहीत आहे.  राजस्थानच्या लोकांना वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे.
भारत सरकार आज पायाभूत सुविधांमध्ये जी गुंतवणूक करत आहे, पर्यटनाशी संबंधित सुविधांचा विकास करत आहे, त्यामुळे राजस्थानमध्ये नव्या संधींमध्येही वाढ होईल. जेव्हा तुम्ही ‘पधारो म्हारे देश’ म्हणून पर्यटकांना साद घालाल तेव्हा एक्सप्रेस वे आणि उत्तम रेल्वे सुविधा त्यांचे स्वागत करतील.
आपल्या सरकारने स्वदेस दर्शन योजने अंतर्गत खाटू श्याम जी मंदिरात सुविधांचा विस्तार केला आहे. श्री खाटू श्यामजींच्या आशीर्वादाने राजस्थानच्या विकासाला आणखी जास्त गती मिळेल. आपण सर्व राजस्थानचा गौरव आणि वारशाला संपूर्ण जगात ओळख मिळवून देऊ.
मित्रांनो,
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत जी काही दिवसांपासून आजारी आहेत, त्यांच्या पायामध्ये काही तरी समस्या आहे. ते आज या कार्यक्रमात येणार होते. मात्र या समस्येमुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि संपूर्ण राजस्थानचे या अनेकविध भेटींबद्दल, देशाच्या शेतकऱ्यांना या महत्त्वाच्या व्यवस्था विकसित करण्यापासून त्या समर्पित करण्याबद्दल मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देत माझ्या भाषणाचा समारोप करतो.
खूप-खूप धन्यवाद !
***
S.Thakur/S.Patil/V.Ghode/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 1943559)
                Visitor Counter : 97
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam