नागरी उड्डाण मंत्रालय
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते खजुराहो इथे हेली शिखर परिषद 2023 आणि उडान 5.2 चे उद्घाटन
हेली शिखर परिषद 2023 ची संकल्पना “शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे: हेलिकॉप्टर्स आणि छोट्या विमानांच्या माध्यमातून प्रादेशिक संपर्कव्यवस्था प्रस्थापित करणे”
Posted On:
25 JUL 2023 6:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जुलै 2023
नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज मध्य प्रदेशात खजुराहो इथे हेली शिखर परिषद 2023 चे उद्घाटन केले. सिंधिया यांनी कार्यक्रमादरम्यान आरसीएस उडान 5.2 आणि हेली सेवा ॲप चे ही उद्घाटन केले.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि मध्य प्रदेश सरकार यांनी पवनहंस लिमिटेड, आणि फिक्कीच्या सहकार्याने, संयुक्तपणे, पाचव्या ‘हेलिकॉप्टर अँड स्मॉल एअरक्राफ्ट’ शिखर परिषद (हेली समिट 2023) आयोजित केली आहे. या शिखर परिषदेची संकल्पना “शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे : हेलिकॉप्टर्स आणि छोट्या विमानाच्या माध्यमातून दळणवळण यंत्रणा वाढवणे” अशी आहे. कार्यक्रमात, उद्घाटन सत्रानंतर एक तांत्रिक सत्र होणार आहे. शिखर परिषदेची ठळक उद्दिष्टे पुढीलप्रमाणे : -
भारतीय हेलिकॉप्टर आणि छोट्या विमान उद्योगाची यशोगाथा यावर चर्चा करण्यासाठी सर्व उद्योजकांना आणि धोरणकर्त्यांना एक सामाईक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे.
उडान योजनेची व्याप्ती वाढवणे आणि दुर्गम तसेच डोंगराळ भागात ही योजना पोहोचवून, देशातील ग्रामीण -नागरी संपर्क व्यवस्थेचा विस्तार करणे.
सध्या असलेले आणि भविष्यात पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्याची क्षमता असलेल्या स्थळी, हेलिकॉप्टर आणि छोट्या विमानांची वाहतूक आणि संपर्कव्यवस्थेला बळ देणे.
उडान 5.2 ही योजना देशाच्या दुर्गम आणि प्रादेशिक भागांशी संपर्कव्यवस्था वाढवण्यासाठी तसेच 1A (<9 जागा) आणि श्रेणी 1(20 पेक्षा अधिक जागा) सारख्या छोट्या विमानांद्वारे शेवटच्या टोकापर्यंत दळणवळण व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यावेळी म्हणाले, “गेल्या नऊ वर्षांत, देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्राचे लोकशाहीकरण झाले आहे. विमानतळांच्या संख्येबरोबरच विमानांची संख्या आणि संबंधित बाजारपेठेचाही मोठा विस्तार झाला आहे. तसेच या विस्तारात मेट्रो शहरांमधील मोठी विमानतळे आणि मोठ्या एअरलाइन्स जेवढ्या महत्वाच्या आहेत, तेवढेच महत्व लहान शहरांमधील विमानतळ, लहान एअरलाइन्स आणि हेलिकॉप्टर्स यांनाही आहे.”
यावेळी, सिंधिया यांनी हेली-सेवा मोबाईल ॲपही लाँच केले. HeliSewa पोर्टल हा, हेलिकॉप्टर ऑपरेटर आणि जिल्हाधिकारी यांच्यात एक व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी एक समान व्यासपीठ तयार करण्यासाठी डिजिटल इंडिया अंतर्गत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा एक उपक्रम आहे.
भारतात, हेलिकॉप्टर आणि छोट्या विमानांच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी पवन हंस आणि जेटसर्व्ह यांच्यातील सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली.
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1942549)
Visitor Counter : 142