गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे ‘अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावरील प्रादेशिक परिषद


केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत देशाच्या विविध भागात 1.40 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ केले नष्ट; एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ नष्ट करण्याचा विक्रम

जिथे एकही तरुण अंमली पदार्थांच्या आहारी गेलेला नसेल असा भारत निर्माण करणे हे मोदी सरकारचे उद्दिष्ट

अंमली पदार्थांच्या विरुध्दची आपली ही मोहीम म्हणजे आपल्या भावी पिढ्यांना वाचविण्यासाठी आणि देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सुरु केलेली उदात्त मोहीम, आपण सर्वांनीच या मोहिमेला प्राधान्य दिले पाहिजे

अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यांचा वापर येणाऱ्या पिढ्यांचा नाश तर करतोच पण त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षेवर देखील परिणाम करतो

Posted On: 17 JUL 2023 8:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जुलै 2023

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे ‘अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत देशाच्या विविध भागात 2,378 कोटी रुपये किंमतीचे 1.40 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. देशाच्या सर्व राज्यांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या (एएनटीएफ) समन्वयासह अंमलीपदार्थ नियंत्रण मंडळाने ही कारवाई केली असून एका दिवसात इतके अंमली पदार्थ  नष्ट करण्याचा  हा विक्रम आहे.

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की भारतासारख्या देशात अंमली पदार्थांची तस्करी आणि या पदार्थांचा वापर येणाऱ्या पिढ्यांचा नाश तर करतोच पण त्याचसोबत राष्ट्रीय सुरक्षेवर देखील परिणाम करतो. ते म्हणाले की केंद्रीय गृह मंत्रालय, प्रादेशिक परिषदांच्या बैठकांच्या माध्यमातून सातत्याने अंमली पदार्थविरोधी मोहीम चालवत आहे आणि या मोहिमांचा आढावा घेण्यासाठी आणि मिळालेल्या प्रतिसादातून आपल्या धोरणांमध्ये वेळीच बदल घडवून आणण्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त असे लक्ष्य निश्चित केले आहे की जेव्हा देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीचा शतकमहोत्सव साजरा होईल तेव्हा आपला देश आणि देशातील युवक अंमलीपदार्थांच्या विळख्यातून पूर्णपणे मुक्त झालेले असावेत. जिथे एकही तरुण अंमली पदार्थांच्या आहारी गेलेला नसेल असा भारत निर्माण करणे हे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे आणि ते साध्य करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की आजच्या दिवसात एकूण 1,40,288 किलोपेक्षा अधिक अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आणि याचे श्रेय सर्व राज्यांना, विशेषतः अंमली पदार्थ नियंत्रण मंडळाला जाते. ते म्हणाले की या मोहिमेअंतर्गत 2,378 कोटी रुपये मूल्याचे अंमली पदार्थ आज नष्ट करण्यात आले आणि एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत हा एक विक्रम घडला आहे.

शाह म्हणाले की, 'संपूर्ण सरकार' या दृष्टिकोनातून आरोग्य, समाजकल्याण विभाग, रसायन आणि औषध विभाग, शिक्षण विभाग, पंचायती राज विभाग आणि राज्याचे गृह विभाग यांना एकत्र येऊन एकाच मंचावर काम करावे लागेल, तरच अमली पदार्थमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण होईल आणि आपण हे साकार करू शकू.

आम्ही एक जप्ती माहिती व्यवस्थापन प्रणाली (SIMS) ई-पोर्टल देखील तयार केले आहे आणि त्याचा वापर केला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, राज्यांनी अमली पदार्थांविरुद्ध विशेष न्यायालये स्थापन करावीत आणि त्यांचा खटला जलदगतीने चालवावा. ते म्हणाले की कठोरात कठोर शिक्षा अधिक जरब बसवणारा संदेश देऊन ठोस प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्य करेल. अमली पदार्थांच्या अवैध व्यापारात गुंतलेल्यांची मालमत्ता जप्त करण्याचे प्रमाण वाढले पाहिजे, असेही शहा म्हणाले. या व्यक्तींवर बहिष्कार टाकला तर इतरांना या व्यवसायात सामील होण्यापासून परावृत्त करता येईल यावर त्यांनी भर दिला. शहा म्हणाले की, मालमत्ता जप्त करण्याच्या दिशेने अधिक कठोरतेची  गरज आहे. जोपर्यंत आपण न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळा मजबूत करत नाही तोपर्यंत खटल्यात प्रगती होणार  नाही, असेही ते म्हणाले. हा संसाधनांचा नसून पुढाकाराचा प्रश्न आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

 

* * *

N.Chitale/Sanjana/Vasanti/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1940311) Visitor Counter : 194