राष्ट्रपती कार्यालय

मुस्लीम वर्ल्ड लीग या संघटनेच्या सरचिटणीसांनी राष्ट्रपतींची भेट घेतली

Posted On: 12 JUL 2023 4:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2023

मुस्लीम वर्ल्ड लीग या संघटनेचे सरचिटणीस डॉ.मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इस्सा यांनी आज,12 जुलै 2023 रोजी, नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

डॉ.अल-इस्सा यांच्या पहिल्याच भारतभेटीबद्दल त्यांचे स्वागत करुन राष्ट्रपती म्हणाल्या की सहिष्णुतेची मूल्ये, चेतनांवरचा संयम आणि आंतर-धार्मिक संवाद यांना प्रोत्साहन देण्यात मुस्लीम वर्ल्ड लीगने बजावलेली भूमिका तसेच निश्चित केलेली उद्दिष्टे यांची भारत प्रशंसा करतो. त्या म्हणाल्या की एक बहु-सांस्कृतिक, बहु-भाषिक, बहु-वांशिक आणि बहु-धर्मीय समाज म्हणून भारत विविधतेतील एकतेचा संदेश देत आला आहे. आमच्या 200 दशलक्षांहून अधिक भारतीय मुस्लीम बंधू-भगिनींनी जगातील मुस्लीम धर्मीयांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये या भारत देशाला दुसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवले आहे. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की सौदी अरेबियाशी असलेल्या नात्याला भारताने फार महत्त्वाचे स्थान दिले आहे. भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशांमधील सौहार्दपूर्ण संबंधांचा इतिहास या देशांदरम्यान असलेला व्यापार तसेच नागरिकांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध यांच्यात खोलवर रुजलेला आहे. या दोन्ही देशांकडे, जगाला शिकवण देण्याजोग्या अनेक बहुमोल बाबी आहेत असे त्यांनी पुढे सांगितले.

 राष्ट्रपती म्हणाल्या की भारत आणि सौदी अरेबिया हे दोन्ही देश सर्व स्वरूपाच्या दहशतवादाचा निषेध करतात आणि दहशतवाद अजिबात खपवून न घेण्याचे ‘शून्य सहनशीलता’ धोरणाचा पुरस्कार करतात. दहशतवाद आणि हिंसक अतिरेक यांना आळा घालण्यासाठी समग्र दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज आहे आणि हे केवळ समतोल विचारसरणीच्या अनुकरणाने शक्य आहे यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.अतिरेकीपणा, दहशतवाद आणि हिंसा यांच्याविरुद्ध डॉ.अल-इस्सा यांनी घेतलेल्या भूमिकेची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. डॉ.अल-इस्सा यांच्या या भारतभेटीमुळे मुस्लीम वर्ल्ड लीगशी असलेल्या भारताच्या सहयोगी संबंधांसाठी आणखी नवे मार्ग खुले होतील असा विश्वास राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केला.

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1938947) Visitor Counter : 135