विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चांद्रयान-3 श्रीहरिकोटा येथून या आठवड्यात प्रक्षेपित होणार, चंद्राच्या पृष्ठभागावर आपले अंतराळ यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरणार - डॉ जितेंद्र सिंह


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाच्या अंतराळ कौशल्यात उल्लेखनीय वाढ झाल्यानंतर चांद्रमोहिमेत  आगेकूच  करण्यासाठीची भारताची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येईल: डॉ जितेंद्र सिंह

चांद्रयान-3 ही मोहीम चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग आणि रोव्हिंग करण्याची भारताची क्षमता प्रदर्शित करेल  : डॉ जितेंद्र सिंह

चांद्रयान-2 चा उत्तराधिकारी असलेल्या चांद्रयान-3 मध्ये लँडरची मजबुती वाढवण्यासाठी काही बदल करण्यात आले

Posted On: 09 JUL 2023 2:12PM by PIB Mumbai

 

चांद्रयान-3 श्रीहरिकोटा येथून या आठवड्यात प्रक्षेपित करण्याचे नियोजन करण्यात आले असून चंद्राच्या पृष्ठभागावर आपले अंतराळ यान उतरवणारा भारत हा चौथा देश बनणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यात अंतराळाशी संबंधित महत्त्वाच्या करारांवर झालेल्या स्वाक्षऱ्यांनी हे चिन्हांकित केले आहे की ज्या देशांनी आपला अंतराळ प्रवास भारताच्या खूप आधी सुरू केला होता ते देश आज भारताकडे समान सहयोगी म्हणून पाहत आहेत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), डॉ जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाच्या अंतराळ कौशल्यात अतुलनीय वाढ झाल्यानंतर चांद्रमोहिमेत  आगेकूच  करण्यासाठीची भारताची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येईल, असे मंत्री म्हणाले.

चांद्रयान-3 ही चांद्रयान-2 च्या पाठोपाठची  मोहीम आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग म्हणजे अलगदपणे उतरण्याची  आणि रोव्हिंगची भारताची क्षमता प्रदर्शित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. अंतराळयानाला चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेले जटिल मोहीम तंत्रज्ञान अतिशय अचूकपणे कार्यान्वित केले गेले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.चांद्रयान-3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर सहा चाके असलेला रोव्हर बाहेर येईल आणि चंद्रावर 14 दिवस काम करेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. या रोव्हरवर लावण्यात आलेल्या अनेक कॅमेऱ्यांमुळे चंद्राच्या पृष्ठभागावरील अचूक आणि तपशीलवार माहिती देणारी छायाचित्रे उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

सरकारने,अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पूरक वातावरण पुरवल्याचे आणि अंतराळ क्षेत्र सार्वजनिक खाजगी भागीदारीसाठी खुले करण्यासारखे अतिशय धाडसी निर्णय घेतल्याचे पूर्ण श्रेय, जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  दिले. भारताच्या अंतराळ क्षेत्र विकासाचा हा विद्यमान चढता आलेख बघता भारताचे अंतराळ क्षेत्र येत्या काही वर्षात एक ट्रिलियन म्हणजेच एक लाख कोटी अमेरिकी डॉलर्सचा पल्ला गाठू शकेल असे ते म्हणाले.

चंद्रयान-3 मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट तीनपदरी असून, 1) चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे आणि हळुवारपणे उतरवण्याचे प्रात्यक्षिक दर्शवणे  2) चंद्राच्या पृष्ठभागावर सहजपणे फिरू शकणारे रोव्हर दर्शवणे 3) चांद्र अभ्यास करण्यासाठी आणि चंद्रावरून पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी, चंद्रावरच  वेगवेगळ्या प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग करून पाहणे, हे या मोहिमेचे तीन पदर आहेत, असे डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.

चंद्रयान-1 या पहिल्या चांद्रमोहिमेच्या आठवणींना उजाळा देतचंद्रावर पाण्याचे अस्तित्व सिद्ध करण्याचे श्रेय जितेंद्र सिंह यांनी या मोहिमेला दिले. या मोहिमेमुळेच संपूर्ण जगाला चंद्रावर पाणी असल्याचे कळले आणि अमेरिकेच्या नासा (राष्ट्रीय हवाई उड्डाण आणि अंतराळ प्रशासन संस्था) सारख्या अव्वल दर्जाच्या प्रमुख अंतराळ संशोधन संस्थेनेही  या नव्या शोधामुळे प्रभावित होत या मोहिमेत आलेल्या अनुभवांचा उपयोग त्यांच्या पुढच्या प्रयोगांसाठी केला असे जितेंद्र सिंह म्हणाले. चंद्रयान-3 ही मोहीम पुढील सुधारीत विकसित पातळीवर राबवली जात आहे असे सांगून ते पुढे म्हणाले की इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विकसित केलेल्या एल व्ही एम-3 (लॉन्च व्हेईकल मार्क-3) या प्रक्षेपक यानाद्वारे चंद्रयान-3 चे प्रक्षेपण होणार आहे.

भारताच्या चंद्रयान-2 ने चंद्राच्या पृष्ठभागावर 6 सप्टेंबर 2019 रोजी उतरायला सुरुवात केल्यानंतर अवघ्या 13 मिनिटातच त्याचे उतरणे फसल्यामुळे या मोहिमेतून अपेक्षित  निष्कर्ष मिळू शकले नाहीत, त्यामुळे चंद्रयान-3 मोहिमेबद्दल देशभरात प्रचंड उत्सुकता आहे असे डॉक्टर जितेंद्र सिंह म्हणाले. यावेळी पंतप्रधान  नरेंद्र मोदी स्वतः श्रीहरिकोटा इथे उपस्थित होते असे त्यांनी सांगितले.

चंद्रयान-3 ही चंद्रयान-2 ची पुढची  आवृत्ती असल्यामुळे त्यात लँडर (चंद्रयानाला चंद्रावर उतरवणारे वाहन) हळुवारपणे उतरू शकेल अशा पद्धतीने त्याची  शक्ती वाढवण्यासारखे महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. हे सर्व बदल अगदी बारीकसारीक गोष्टी लक्षात घेऊन आणि सर्व प्रकारच्या चाचण्यांद्वारे तावूनसुलाखून केले गेले आहेत असे त्यांनी सांगितले.

वैज्ञानिक जगताला चंद्रावरील माती आणि खडकांच्या रासायनिक आणि मूलभूत रचनेसह विविध गुणधर्मांची माहिती प्रदान करु शकतील, अशा पद्धतीने चंद्रयान-3 चे लँडर आणि रोव्हर यांची पेलोडसह रचना करण्यात आली आहे अशी माहितीही डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली.

***

N.Chitale/S.Mukhedkar/A.Save/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1938292) Visitor Counter : 333