पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी राजस्थानच्या बिकानेर इथं, 24,300 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे केले लोकार्पण आणि पायाभरणी


अमृतसर- जामनगर आर्थिक मार्गिकेच्या सहा पदरी ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे विभागाचे केले लोकार्पण

हरित ऊर्जा मार्गिकेसाठी आंतरराज्य पारेषणच्या पहिल्या टप्प्याचेही पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

बिकानेर ते भिवडी पारेषण वाहिनीचेही लोकार्पण

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या 30 खाटांच्या रुग्णालयाचे बिकानेर इथे केले लोकार्पण

बिकानेर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी

चुरू- रतनगढ या 43 किमी रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

“राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या बाबतीत राजस्थानने गाठले द्विशतक”

“राजस्थान ही अपार क्षमता आणि संधींची भूमी”

“ग्रीन फील्ड द्रुतगती मार्गामुळे संपूर्ण पश्चिम भारतातील आर्थिक घडामोडींना चालना मिळेल”

“देशाच्या सीमेवरील गावांना आम्ही ‘देशातील पहिली गावे’ म्हणून केले घोषित”

Posted On: 08 JUL 2023 7:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानच्या  बिकानेर इथं, 24,300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.  या प्रकल्पांमध्ये अमृतसर-जामनगर आर्थिक मार्गिकेच्या सहा पदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती  विभागाचा  सुमारे 11,125 कोटी रुपये  खर्चाचा प्रकल्प,  सुमारे 10,950 कोटी रुपये खर्चाच्या हरित ऊर्जा कॉरिडॉरसाठी आंतर-राज्य पारेषण मार्गाचा पहिल्या टप्प्याचे लोकार्पण यांचा समावेश आहे. सुमारे 1,340 कोटी रुपये खर्चून पॉवर ग्रीडद्वारे विकसित करण्यात येणारी  भिवडी पारेषण मार्गिका  त्याशिवाय, बिकानेरमध्ये कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) 30 खाटांच्या रुग्णालयाचे ही त्यांनी लोकार्पण केले.  त्याशिवाय, सुमारे 450 कोटी रुपये खर्चाच्या बिकानेर रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाची आणि 43 किमी लांबीच्या चुरू-रतनगड विभागाच्या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाची पंतप्रधानांनी पायाभरणी केली.

यावेळी झालेल्या सभेत, पंतप्रधानांनी शूरवीर योद्ध्यांच्या या  भूमीला वंदन केले. ज्या लोकांनी स्वतःला राज्याच्या, देशाच्या विकासासाठी समर्पित केले आहे, असे लोक त्यांना कायमच अशा विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्याची संधी उपलब्ध करुन देत असतात असे ते म्हणाले. आज लोकार्पण झालेल्या प्रकल्पांचा उल्लेख करतांना त्यांनी सांगितले की एकूण  24,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या ह्या प्रकल्पांअंतर्गत, राजस्थानला केवळ काही महिन्यांत दोन आधुनिक सहापदरी द्रुतगती मार्ग मिळाले आहेत. फेब्रुवारी महिन्यांत दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गिकेच्या दिल्ली-दौसा-लालसोट विभागाच्या उद्घाटनाचे स्मरण करत, पंतप्रधानांनी आज अमृतसर-जामनगर द्रुतगती मार्गाच्या 500 किमी सहापदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे विभागाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "एक प्रकारे, राजस्थानने राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीत द्विशतक गाठले  आहे", असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हरित ऊर्जा मार्गिका आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC)  रुग्णालयाच्या उद्घाटनाबद्दल पंतप्रधानांनी बिकानेर आणि राजस्थानच्या जनतेचे अभिनंदन केले.

पंतप्रधान म्हणाले की, राजस्थान नेहमीच अपार  क्षमता आणि संधींची भूमी  राहिली आहे. विकासाच्या या क्षमतेमुळेच राज्यात विक्रमी गुंतवणूक होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. औद्योगिक विकासाच्या अपार  शक्यतांमुळे कनेक्टिव्हिटी अत्याधुनिक  केली जात आहे. जलद-गती एक्स्प्रेसवे आणि रेल्वेमुळे पर्यटनाला  चालना मिळेल, ज्याचा राज्यातील तरुणांना फायदा होईल, असे ते म्हणाले.

आज उद्घाटन झालेल्या ग्रीन फील्ड द्रुतगती महामार्गाचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की हा मार्ग  राजस्थानला हरियाणा, पंजाब, गुजरात आणि जम्मू आणि काश्मीरशी जोडेल, तर जामनगर आणि कांडला सारखी महत्त्वाची व्यापारी बंदरे देखील बिकानेर आणि राजस्थानमधून गाठता येतील. त्यांनी अधोरेखित केले की जोधपूर आणि गुजरातमधील अंतर कमी होण्याबरोबरच बिकानेर आणि अमृतसर आणि जोधपूरमधील अंतर कमी होईल, ज्यामुळे या भागातील शेतकरी आणि व्यवसायांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तेल क्षेत्राच्या रिफायनरीजशी वाढलेल्या कनेक्टिव्हिटीवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले कि “हा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे संपूर्ण पश्चिम भारतातील आर्थिक घडामोडीना बळकटी देईल”, ज्यामुळे पुरवठा मजबूत होईल, ज्यामुळे देशातील आर्थिक घडामोडींनाही  गती मिळेल.

रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाबाबत बोलताना पंतप्रधानांनी राजस्थानमधील रेल्वेच्या विकासाला दिलेले प्राधान्य अधोरेखित केले. 2004-2014 दरम्यान राजस्थानला रेल्वेसाठी दरवर्षी सरासरी 1000 कोटी रुपयांपेक्षा कमी निधी मिळत होता, तर 2014 नंतर राज्याला दरवर्षी सरासरी 10,000 कोटी रुपये मिळतात.

पंतप्रधान म्हणाले की, या पायाभूत सुविधांना मिळालेल्या चालनेचा सर्वात मोठा फायदा छोटे व्यापारी आणि लघुउद्योगांना होतो. त्यांनी बिकानेरच्या लोणचे, पापड, नमकीनचा उल्लेख केला आणि सांगितले की चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे हे छोटे व्यवसाय जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांची उत्पादने पोहोचवू शकतील.

राजस्थानच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत सांगताना पंतप्रधानांनी दीर्घकाळ दुर्लक्षित असलेल्या सीमावर्ती गावांसाठीच्या  व्हायब्रंट व्हिलेज योजनेचा उल्लेख केला. “आम्ही सीमावर्ती गावांना देशातील ‘पहिली गावे’ म्हणून घोषित केले. या प्रदेशांमध्ये विकास करण्याचे आणि या भागांना भेट देण्याबद्दल देशातील लोकांमध्ये नव्याने  स्वारस्य निर्माण झाले,” ते म्हणाले.

पंतप्रधानांनी राजस्थानमधील करणी माता आणि सालासर बालाजीच्या कृपाशीर्वादाबद्दल सांगितले आणि राज्य विकासाच्या शिखरावर असले पाहिजे असे सांगितले. म्हणूनच भारत सरकार राजस्थानच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने काम करत आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून राजस्थानच्या विकासाची सर्व उद्दिष्टे साध्य होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र, केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी अमृतसर-जामनगर आर्थिक मार्गिकेचा भाग असलेल्या सहा पदरी हरित द्रुतगती महामार्गाचे लोकार्पण केले. राजस्थानमधला 500 किमी पेक्षा जास्त लांबीचा, हनुमानगड जिल्ह्यातील जाखरावली गावापासून जालोर जिल्ह्यातील खेतलावास या गावापर्यंत जाणारा महामार्गाचा हा टप्पा सुमारे 11,125 कोटी रुपये खर्च करून बांधला गेला आहे. या द्रुतगती महामार्गामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि प्रमुख शहरे आणि औद्योगिक पट्ट्यां दरम्यानचे दळणवळण सुधारेल. हा द्रुतगती महामार्ग केवळ मालाच्या अखंड वाहतुकीसाठी सोयीचा ठरणार असून त्याचबरोबर  या प्रदेशातील पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना देईल. 

या प्रदेशातील ऊर्जा क्षेत्राला चालना देत, पंतप्रधानांनी हरित ऊर्जा कॉरिडॉरसाठी, सुमारे 10,950 कोटी रुपये खर्चाच्या आंतर-राज्य पारेषण वाहिनीच्या  टप्पा-1 चे लोकार्पण केले. हा हरित ग्रीन ऊर्जा कॉरिडॉर सुमारे 6 गिगा व्हॅट (GW) नवीकरणीय उर्जा एकत्र आणेल आणि पश्चिम विभागातील औष्णिक ऊर्जा आणि उत्तर विभागातील जल-उर्जेबरोबर नवीकरणीय उर्जेचा समतोल साधायला मदत करेल. यामुळे उत्तर विभाग आणि पश्चिम विभागामधील पारेषण क्षमता मजबूत होईल. पंतप्रधानांनी सुमारे 1,340 कोटी रुपये खर्च करून विकसित केल्या जाणाऱ्या बिकानेर ते भिवंडी ट्रान्समिशन लाइनचे  (पारेषण वाहिनी) लोकार्पण केले. बिकानेर ते भिवडी ट्रान्समिशन लाइन राजस्थानमध्ये 8.1 गिगा व्हॅट सौर उर्जा घेऊन जायला उपयोगी ठरेल.  

पंतप्रधानांनी बिकानेर इथल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) 30 खाटांच्या नवीन रुग्णालयाचे लोकार्पण केले. या रुग्णालयाची क्षमता शंभर खाटांपर्यंत वाढवता येईल.  स्थानिक समुदायाच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करणारी आणि सहज उपलब्ध आणि दर्जेदार आरोग्य सेवा सुनिश्चित करणारी ही एक महत्त्वाची आरोग्य सुविधा ठरेल.

त्यानंतर पंतप्रधानांनी बिकानेर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रकल्पासाठी जवळजवळ 450 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पुनर्विकासाच्या कामात सर्व फलाटांचे आणि छताचे नूतनीकरण केले जाईल, त्याचवेळी  रेल्वे स्थानकाच्या सध्याच्या संरचनेचा वारसाही जतन केला जाईल.

चुरू-रतनगड विभागातील 43 किमी लांबीच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली. या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे इथले दळणवळण सुधारेल, आणि बिकानेर इथून जिप्सम, चुनखडी, अन्नधान्य आणि खत उत्पादनांची उर्वरित देशामध्ये वाहतूक सोपी होईल.

 

 

 

 

* * *

N.Chitale/Radhika/Vasanti/Rajshree/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1938205) Visitor Counter : 187