वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

गेल्या तीन वर्षांत सरकारी ई- बाजारपेठेतील (जेम) खरेदी दसपटीने वाढली: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल


बदलाचे उत्प्रेरक ठरलेल्या जेमच्या सर्व भागधारकांची गोयल यांनी केली प्रशंसा

देशाच्या सार्वजनिक खरेदीच्या क्षेत्रात स्थित्यंतरे घडवण्यासाठी जेम पुरस्कार विजेत्यांनी केलेल्या प्रयत्नांचे गोयल यांनी केले कौतुक

Posted On: 27 JUN 2023 8:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2023

 

गेल्या तीन वर्षांत सरकारी ई-बाजारपेठेतील (जेम) खरेदी दसपटीने वाढल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. बदलाचे उत्प्रेरक ठरलेल्या जेमच्या सर्व भागधारकांची गोयल यांनी प्रशंसा केली. नवी दिल्लीत जेमने आयोजित केलेल्या 'क्रेता- विक्रेता गौरव सन्मान समारोह 2023' मध्ये ते काल बोलत होते. देशाच्या सार्वजनिक खरेदीत स्थित्यंतरे घडवण्यासाठी जेम पुरस्कार विजेत्यांनी केलेल्या प्रयत्नांचे आणि दिलेल्या योगदानाचे गोयल यांनी कौतुक केले.

तंत्रज्ञान आणि विश्लेषणाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातील एकत्रित, पारदर्शक आणि कार्यक्षम खरेदी प्रणाली आत्मसात करण्यासाठी जेम प्रयत्नशील असल्याचे गोयल यांनी सांगितले. गेल्या सात वर्षांत जेमने व्यापक स्तरावर   वृद्धीचा लाभ घेतला आहे  आणि बहुआयामी वाढ साध्य केली  आहे, असे त्यांनी सांगितले. 2022-23 या आर्थिक वर्षात जेम या सरकारी पोर्टलवर वस्तू आणि सेवांची दोन लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त खरेदी झाली असून  ती तीन लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री डॉ. अनुप्रिया पटेल, जेमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ, पी.के. सिंग, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गोयल आणि अनुप्रिया पटेल यांनी पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला.

जेम द्वारे सार्वजनिक खरेदी प्रक्रियेत सरकारी खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यासाठी ‘क्रेता-विक्रेता गौरव सन्मान समारोह  2023  चे आयोजन केले. हा सोहळा म्हणजे जेमच्या व्यासपीठाचा वापर करून  2022-23 आर्थिक वर्षात खरेदी प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या प्रयत्नांची दखल घेण्यासाठी जेमने  सुरू केलेला एक उपक्रम आहे.

2022-23 या आर्थिक वर्षात 31 मार्च 2023 पर्यंत जेमने एकूण 2 लाख कोटी रुपयांचे सकल व्यापारी मूल्य (जीएमव्ही) नोंदवले होते. संबंधित सहभागींच्या पाठिंब्यामुळे जेम पोर्टल सुरू झाल्यापासून एकत्रितपणे 4.29 लाख कोटी रूपये जीएमव्हीचा टप्पा ओलांडला आहे.  जेमवरील एकूण व्यवहारांची संख्याही 1.54 कोटींच्या पुढे गेली आहे. 69,000 पेक्षा जास्त सरकारी खरेदीदार संस्थांच्या विविध खरेदी गरजा जेम पूर्ण करत आहे. पोर्टलमध्ये 11,800+ उत्पादन श्रेणी तसेच 280+ पेक्षा जास्त सेवा श्रेणी आहेत. विविध अभ्यासांवर आधारित किमान बचत सुमारे 10% आहे. ती 40,000 कोटी रूपये किमतीच्या सार्वजनिक पैशांच्या बचतीएवढी आहे.

 

* * *

S.Kakade/P.Jambhekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1935737) Visitor Counter : 106