पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांच्यात आज झाली बैठक

Posted On: 25 JUN 2023 7:13PM by PIB Mumbai

 

इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज 25 जून 2023 रोजी इजिप्त मध्ये कैरो इथल्या अल इत्तीहादिया राजवाड्यात स्वागत केले.

अध्यक्ष सिसी यांनी जानेवारी 2023 मध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून दिलेल्या भेटीचे, दोन्ही नेत्यांनी अत्यंत हृद्यपणे स्मरण केले आणि या भेटीमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना मिळालेल्या वेगाचे स्वागत केले. इजिप्तच्या मंत्रिमंडळात नव्याने स्थापन झालेला इंडिया युनिट हा भारत संबंधी विभाग, द्विपक्षीय सहयोग आणि सहकार्य वाढवण्यासाठी उपयुक्त माध्यम ठरला आहे याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत  झाले.

दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक सखोल आणि दृढ करण्यासाठीच्या  मार्गांबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. या चर्चेत विशेष करून, व्यापार आणि गुंतवणूक, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण आणि सुरक्षा, अपारंपरीक ऊर्जा, कृषी, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रे आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संबंध या विषयांवर प्रामुख्याने भर होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इजिप्तचे अध्यक्ष सीसी यांनी जी-20 समूहातील परस्पर सहकार्याबाबत सुद्धा चर्चा केली. ही चर्चा करताना त्यांनी, अन्न आणि ऊर्जा याबाबत दोन्ही देशांना वाटत असलेली असुरक्षितता, हवामान बदल आणि ग्लोबल साउथला  संपूर्ण जगात स्वतःचा स्वतंत्र आवाज स्वतःचे स्वतंत्र मत एकजुटीने ठाम मांडण्याची गरज, या विषयांवर भर दिला. नवी दिल्लीत सप्टेंबर 2023 मध्ये होणार असलेल्या जी- 20 नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी अध्यक्ष सिसी यांचे स्वागत करण्याकरता आपण उत्सुक असल्याची भावना, पंतप्रधानांनी यावेळी सिसींकडे व्यक्त केली.

दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध, धोरणात्मक भागीदारी पर्यंत उंचावण्याबाबतच्या करारावर दोन्ही नेत्यांनी स्वाक्षरी केली. कृषी, पुरातत्त्वशास्त्र आणि पुरातन संस्कृती, तसेच कंपन्यांमधील व्यावसायिक स्पर्धेचे नियमन करणारा कायदा या क्षेत्रांबाबतच्या तीन सामंजस्य करारांवर सुद्धा यावेळी स्वाक्षऱ्या झाल्या.

या बैठकीत इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबौली आणि इजिप्तच्या केंद्रीय मंत्रिमंडळातले इतर वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. तर भारताकडून, परराष्ट्रमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि इतर वरिष्ठ  अधिकारी उपस्थित होते.

***

N.Chitale/A.Save/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1935272) Visitor Counter : 173