ऊर्जा मंत्रालय
टाइम ऑफ डे (ToD) अर्थात दिवसांच्या तासांनुसार दरांचा अंतर्भाव करुन आणि स्मार्ट मीटरिंग नियम सुलभ करुन, केंद्र सरकारने वीज (ग्राहकांचे हक्क) नियम, 2020 मध्ये केली सुधारणा
टाइम ऑफ डे (ToD) दरव्यवस्था ग्राहकांसाठी सर्वांगाने लाभदायक बाब असून त्यामुळे ग्राहकांचा वीज खर्च कमी होतो, उर्जा प्रणाली, साधनसंपत्तीचा अधिक कार्यक्षमतेने वापर करता येऊ शकतो: केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह
Posted On:
23 JUN 2023 10:29AM by PIB Mumbai
केंद्र सरकारने, वीज (ग्राहकांचे हक्क) नियम, 2020 मध्ये सुधारणा करुन, विद्यमान वीजदर व्यवस्थेत दोन बदल केले आहेत. टाइम ऑफ डे (ToD) अर्थात दिवसांच्या तासांनुसार दरांचा अंतर्भाव आणि स्मार्ट मीटरिंग म्हणजेच वीजपुरवठा आणि वीजवापराचे अचूक मुल्यांकन करणाऱ्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक पद्धतीच्या नियमांचे सुलभीकरण, हे ते दोन बदल आहेत.
टाइम ऑफ डे (टी ओ डी) दराविषयी माहिती:
दिवसाच्या प्रत्येक वेळी समान दराने वीजशुल्कं आकारण्याऐवजी, दिवसाच्या वेळेनुसार वीजशुल्कं बदलेल. टाइम ऑफ डे दरपद्धतीप्रमाणे, दिवसाच्या सौर तासातील म्हणजेच राज्य विद्युत नियामक आयोगाने निर्दिष्ट केल्यानुसार दिवसातील आठ तासांच्या कालावधीतले दर सामान्य दरांपेक्षा 10 ते 20 टक्क्यांनी कमी असतील. तर, पीक अवर्स म्हणजेच वीज वापर जास्त असलेल्या कालावधीसाठी, वीजदर सामान्य दरापेक्षा 10 ते 20 टक्के जास्त असेल. वीजेची कमाल 10 किलोवॅट आणि त्याहून जास्त मागणी असलेल्या व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी, 1 एप्रिल 2024 पासून आणि कृषी ग्राहक वगळता इतर सर्व ग्राहकांसाठी 1 एप्रिल 2025 पासून, टी ओ डी दर लागू होतील. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर, स्मार्ट मीटर धारक ग्राहकांसाठी, टी ओ डी दर त्वरीत लागू होतील.
टाइम ऑफ डे (टी ओ डी) दरव्यवस्था ग्राहक आणि एकंदर वीजव्यवस्थेसाठी सर्वांगाने लाभदायक बाब असल्याचे, केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांनी म्हटले आहे. “अधिक वीजवापराचे तास, सौर तास आणि सामान्य तासांसाठी स्वतंत्र दर असलेल्या टी ओ डी दरव्यवस्थेमुळे, वीज ग्राहकांना आपल्याला येणाऱ्या वीजशुल्कानुसार वीजवापराचे व्यवस्थापन करण्याची संधी मिळू शकेल. टी ओ डी टॅरिफ यंत्रणेचा प्रभावी आणि विचारपूर्वक वापर करून, ग्राहक त्यांचा वीजखर्च कमी करू शकतात. सौरऊर्जा स्वस्त असल्याने, सौरतासां दरम्यानचे दर कमी असतील, त्यामुळे ग्राहकांना त्याचा फायदा होईल. सौरतासां व्यतिरिक्तच्या कालावधीत, औष्णिक, जल आणि वायू आधारीत वीजक्षमता वापरली जाते आणि त्यांचे दर सौर उर्जेपेक्षा जास्त आहेत. या सर्व बाबींची टी ओ डी दरव्यवस्थेत काळजी घेतली जाते. वीज खर्च कमी असलेल्या सौर तासांमध्ये वीजेचा वापर अधिक असलेली कामे जास्तीत जास्त करुन, आता ग्राहक त्यांचा वीज खर्च कमी करण्यासाठी त्यांच्या वीजवापराचे नियोजन करू शकतात, " असे मतही आर.के. सिंह यांनी व्यक्त केले.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, टी ओ डी व्यवस्थेमुळे अपारंपरीक ऊर्जा स्त्रोतांची गरज वाढून, भारतासाठी ऊर्जावापराचे पारंपरीक पासून अपारंपरीक उर्जासंक्रमण सुलभ होईल. "टी ओ डी टॅरिफ व्यवस्थेमुळे, नवीकरणीय उर्जाउत्पादन आणि वापरामधील चढउतारांचे व्यवस्थापन सुधारेल, नवीकरणीय उर्जावापराच्चा तासांच्या कालावधीत काम जास्त करण्याला प्रोत्साहन मिळेल आणि त्यामुळे अपारंपरीक उर्जेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल," असे आर.के. सिंह यांनी स्पष्ट केले.
***
S.Tupe/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1934761)
Visitor Counter : 204