आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

9 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 मोठ्यासंख्‍येने सहभागींसह जगभर उत्साहात साजरा


उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मध्य प्रदेश मधील जबलपूर येथे सामूहिक योग प्रात्यक्षिकाचे केले नेतृत्व

निरोगी आणि शक्तिशाली समाज निर्माण करण्यामध्ये योग साधनेचे महत्वाचे योगदान असून इथली सामूहिक ऊर्जा भारताचे भविष्य घडवत आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 सार्वत्रिक कल्याणाचा संदेश जगातिक स्तरावर पोहोचवणार आहे: केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल

Posted On: 21 JUN 2023 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2023

 

9 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे साजरा करण्यात आला. अनेक नवीन उपक्रम यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे वैशिष्ट्य ठरले. मध्यप्रदेशमध्ये जबलपूर येथे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या  मुख्य राष्ट्रीय कार्यक्रमात 15,000 पेक्षा जास्त लोकांनी सीवायपी म्हणजेच ‘कॉमन योग प्रोटोकॉल’ प्रात्यक्षिकात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय आयुष आणि बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय आयुष आणि महिला आणि बालविकास राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, कॅबिनेट मंत्री, मध्य प्रदेशचे खासदार,  श्रीराम चंद्र मिशनचे अध्यक्ष कमलेश डी. पटेल, मध्यप्रदेश सरकारचे मंत्री आणि आयुष मंत्रालयाचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, आपल्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे योग हा आता जागतिक उत्सव बनला आहे, ही समाधानाची बाब आहे. योगसाधना ही केवळ कोणा एका व्यक्तीसाठी नसून संपूर्ण मानवतेसाठी आहे. ते म्हणाले की योगने आता आर्थिक रूप धारण केले आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. आपले प्रशिक्षित योग प्रशिक्षक जगभर काम करत आहेत, आणि योग प्रशिक्षकांची मागणी वाढत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे देशाला संबोधित केले आणि सांगितले की यापूर्वीच्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय योग दिनाला ते उपस्थित होते, मात्र विविध कामांच्या वचनबद्धतेमुळे ते सध्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तथापि, यावर्षी ते न्यूयॉर्कमधील यूएन मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करतील.

योगाभ्यासाच्या माध्यमातून आरोग्य, शक्ती  आणि सामर्थ्य प्राप्त होते आणि वर्षानुवर्षे या योगाभ्यासात नियमितपणे सहभागी झालेल्यांना त्याची उर्जा जाणवते,, असे पंतप्रधान म्हणाले. . वैयक्तिक तसेच कौटुंबिक स्तरावर उत्तम आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करताना, योग एक निकोप  आणि सशक्त  समाज निर्माण करतो जिथे सामूहिक ऊर्जा आधी असते, असे पंतप्रधानांनी सांगितले. स्वच्छ भारत आणि स्टार्टअप इंडिया यासांरख्या अभियानांवर प्रकाश टाकत   एक आत्मनिर्भर राष्ट्र निर्माण करण्यासाठी  आणि देशाची सांस्कृतिक ओळख पुनर्संचयित करण्यासाठी या अभियानांची मदत होत असून  यात  देश आणि तरुणांच्या ऊर्जेने  मोठे योगदान दिले आहे, आज देशाची मानसिकता बदलली आहे, म्हणूनच जनजीवन बदलले आहे, असे ते म्हणाले.

“माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी असलेल्या आणि अनुकरणीय नेतृत्वाखाली, आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समुदायांवर योग आणि भारतीय परंपरा खोलवर रुजवत आहे. असे  केंद्रीय आयुष  आणि बंदरे , नौवहन  जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले. हे जागतिक स्तरावर वैश्विक  कल्याणाचा संदेश आणखी प्रसारित करेल ,  असे ते म्हणाले.

“आजच्या तरुण पिढीसाठी योग अत्यंत समर्पक आहे. योगासनांच्या फायद्यांद्वारे ते भविष्यातील आव्हानांना चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतील.”, असे मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी आपल्या भाषणात सांगितले.

मध्य प्रदेश  सरकार शालेय अभ्यासक्रमात योगाभ्यासाचा समावेश करेल आणि मध्य प्रदेशातील सर्व शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा  यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.

9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे ' ओशन रिंग ऑफ योग ' ही  अनोखी संकल्पना, ज्याची कल्पना समन्वित योग प्रात्यक्षिक म्हणून  मांडण्यात आली होती. यामध्ये  जगभरातील विविध बंदरांवर तैनात असलेली भारतीय नौदल जहाजे आणि भारताचे सागरी सहकार्य आणि व्यापारी नौवहन  करार असलेल्या देशांनी सीवायपी योग प्रात्यक्षिकात भाग घेतला.

19 भारतीय नौदलाच्या जहाजांवर सुमारे 3500 नौदल कर्मचार्‍यांनी योगाभ्यासाचे दूत म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही जलक्षेत्रात 35,000 किलोमीटरहून अधिक प्रवास केला. यामध्ये परदेशी बंदरांवरील /आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रातील  11 जहाजांवरील  2400 हून अधिक कर्मचार्‍यांचा समावेश आहे.उल्लेखनीय म्हणजे, आपल्या परदेशातील मोहिमांसह अनेक विदेशी नौदलाच्या जहाजांवर आंतरराष्ट्रीय  योग दिवस साजरा करण्यात आला, यामध्ये  1200 हून अधिक परदेशी नौदलाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

आर्क्टिक ते अंटार्क्टिका पर्यंत योग हा या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा आणखी एक पैलू होता. जिथे प्राइम मेरिडियन लाईनच्या आसपास आणि उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव प्रदेशात येणा-या देशांमध्ये योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. हिमाद्री आणि भारती या आर्क्टिक आणि अंटार्क्टिकामधील भारताच्या संशोधन केंद्रावरील शास्त्रज्ञ/संशोधनांनीही योग प्रात्यक्षिकांमध्ये भाग घेतला. भारतीय लष्कर, भारतीय नौदल, भारतीय वायुसेनेसह  भारत-तिबेट सीमा पोलीस दल ,सीमा सुरक्षा दल  आणि  सीमा रस्ते संघटना  यांनी योग भारतमाला नावाने एकत्रितरीत्या योग प्रात्यक्षिकांची साखळी सादर केली. त्याचप्रमाणे भारतीय किनारपट्टीवर आणि योग सागरमाला नावाच्या बेटावरही योग प्रात्यक्षिके सादर  करण्यात आली.

ग्रामीण समुदायांशी संवाद साधण्यासाठी आयुष मंत्रालयाने "हर आंगन योग" चा संदेश देण्यासाठी व्यापक योजना आखली होती. पंचायत, अंगणवाडी, आरोग्य आणि कल्याण केंद्रे आणि शाळा, सुमारे 2 लाख सामान्य सेवा केंद्रे, आयुष ग्राम युनिट आणि अमृत सरोवरच्या आसपासच्या ठिकाणी सुद्धा योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. 

आंतरराष्ट्रीय योग दिन सर्व महत्त्वाच्या मंत्रालयांनी शासनाच्या धोरणानुसार साजरा केला. भारत सरकार, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आघाडीच्या योग संस्था आणि संस्था आणि  इतर भागधारकांनी  आंतरराष्ट्रीय योग दिवसा मध्ये भाग घेतला. या बरोबर भारतीय दूतावासांसह, संयुक्त राष्ट्र सदस्य राष्ट्रे आणि जामनगरमधील जागतिक आरोग्य संघटना -पारंपारिक औषधांसाठीचे जागतिक केंद्र यांच्या कार्यालयाने देखील आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले.

 

* * *

S.Bedekar/Rajshree/Sonal C/Gajendra/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1934195)