संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदलाच्या जवानांचा प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा अनुभव वाढवण्यासाठी कोच्चीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक सिम्युलेटर संकुल ‘ध्रुव’चे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले उद्घाटन

Posted On: 21 JUN 2023 2:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2023

 

संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी 21 जून 2023 रोजी दक्षिण नौदल कमांड, कोच्ची  येथे एकात्मिक सिम्युलेटर संकुल (आयएससी) 'ध्रुव' चे उद्घाटन केले. आयएससी ‘ध्रुव’ मध्ये असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञानानयुक्त आधुनिक स्वदेशी बनावटीचे सिम्युलेटर, भारतीय नौदलातील व्यावहारिक प्रशिक्षणात लक्षणीय वाढ करतील. हे सिम्युलेटर नौकानयन, नौदलाच्या मोहिमा आणि नौदल रणनीतींच्या प्रत्यक्ष वेळेचा अनुभव देतील. या सिम्युलेटरचा उपयोग मित्र देशांतील जवानांच्या प्रशिक्षणासाठीही केला जाईल.

या संकुलामध्ये संकल्पित अनेक सिम्युलेटरपैकी,  मल्टी-स्टेशन हँडलिंग सिम्युलेटर (एमएसएसएचएस ), एअर डायरेक्शन आणि हेलिकॉप्टर कंट्रोल सिम्युलेटर (एडीएचसीएच ) आणि अॅस्ट्रो नॅव्हिगेशन डोमला संरक्षण मंत्र्यांनी  भेट दिली. नवी दिल्लीतील एआरआय प्रायव्हेट लिमिटेड द्वारे उत्पादित जहाज हाताळणी सिम्युलेटर 18 देशांमध्ये निर्यात करण्यात आले आहेत. इन्फोव्हिजन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केलेला अॅस्ट्रोनॅव्हिगेशन डोम हा भारतीय नौदलातील अशाप्रकारचा पहिलाच सिम्युलेटर आहे.

डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन विकास संस्थेच्या  प्रणाली अभ्यास आणि विश्लेषण संस्थेने विकसित केलेला एडीएचसीएस हा सिम्युलेटर प्रशिक्षणार्थींना नौदल मोहिमांच्या प्रत्यक्ष वातावरणाची अनुभूती देईल. हे तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक सिम्युलेटर ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाचे द्योतक  आहेत आणि राष्ट्रासाठी मोठ्या संरक्षण निर्यात क्षमतेचे सुचिन्ह आहेत. .संकुलातील इतर काही स्वदेशी बनावटीच्या  सिम्युलेटरमध्ये लढाऊ व्यवस्थापन प्रणाली  आणि सागरी क्षेत्र  जागरूकता प्रयोगशाळेचा समावेश आहे.

उद्घाटनादरम्यान राजनाथ सिंह यांनी या सिम्युलेटरच्या विकासात सहभागी असलेल्या कंपन्यांच्या वरिष्ठ प्रतिनिधींशी संवाद साधला.

 

* * *

R.Aghor/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1934013) Visitor Counter : 136