पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(भाग 102) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

Posted On: 18 JUN 2023 12:03PM by PIB Mumbai

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार, ‘मन की बातमध्ये पुन्हा एकदा तुम्हां सगळ्यांचे स्वागत आहे. मन की बातही प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी असते, परंतु यावेळी एक आठवडा आधीच होत आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, पुढच्या आठवड्यात मी अमेरिकेमध्ये असणार आहे आणि तिथे खूपच धावपळ देखील असेल आणि म्हणूनच मी विचार केला, तिथे जाण्याआधी तुमच्याशी चर्चा करूया, आणि याहून चांगले काय असणार आहे? जनतेचा आशीर्वाद, तुमची प्रेरणा, माझी उर्जा अधिकच वृद्धिंगत करते.

मित्रांनो, खूप लोकं सांगतात की, पंतप्रधान म्हणून मी अमुक एक चांगले काम केले आहे, एखादे मोठे काम केले आहे. मन की बातचे कित्येक श्रोते पत्र लिहून खूप कौतुक करतात. कोणी म्हणतात हे केले, कोणी म्हणते ते काम केले, हे चांगले केले, हे अधिक चंगले केले, हे उत्कृष्ट केले परंतु, जेव्हा मी भारतातील सामान्य नागरिकांचे प्रयत्न, त्यांचे परिश्रम, त्यांची इच्छाशक्ती बघतो तेव्हा मी भारावून जातो. कोणतेही मोठे ध्येय असो, कठीणातील कठीण आव्हान असू दे, भारतीय जनतेची सामूहिक शक्ती प्रत्येक आव्हानावर तोडगा शोधून काढते. दोन-तीन दिवसांपूर्वी देशाच्या पश्चिमेकडे किती मोठे चक्रीवादळ आले हे आपण सगळ्यांनीच पाहिले. जोरदार वारा, मुसळधार पाऊस. बिपरजॉय ने कच्छमध्ये किती मोठे नुकसान केले, परंतु कच्छ मधील लोकांनी हिंमतीने आणि सतर्कतेने इतक्या धोकादायक चक्रीवादळाचा सामना केला हे खूपच अभूतपूर्व आहे. दोन दिवसांनी कच्छ मधील लोकं, त्यांचे नवीन वर्ष अर्थात आषाढ बीज साजरे करणार आहेत. आषाढ बीज, कच्छ मध्ये पावसाच्या आगमनाचे प्रतिक मानले जाते हा देखील एक संयोगच आहे.  मी इतकी वर्षे कच्छला येत-जातो, तिथल्या लोकांची सेवा करण्याचे भाग्यही मला लाभले आहे आणि म्हणूनच मला कच्छच्या लोकांची हिंमत आणि उपजीविकेविषयी माहिती आहे. दोन दशकांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर हा कच्छ पुन्हा कधीच सावरणार नाही, असे म्हंटले जायचे, तोच जिल्हा आज देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. मला खात्री आहे कच्छमधील लोक बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसातून देखील त्याच वेगाने बाहेर पडतील.

मित्रांनो, नैसर्गिक आपत्तींवर कोणाचाच नियंत्रण नाही, परंतु, गेल्या काही वर्षांत भारताने विकसित केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाची ताकद आज एक उदाहरण बनत आहे. नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे - निसर्गाचे संरक्षण. आजकाल पावसाळ्यात आपली जबाबदारी अधिकच वाढते.त्या मुळेच आज ‘Catch the Rain’ सारख्या मोहिमेद्वारे देश सामूहिक प्रयत्न करत आहे. गेल्या महिन्यात 'मन की बात' मध्ये आम्ही जलसंधारणाशी संबंधित स्टार्ट अप्सबद्दल चर्चा केली होती. यावेळीही मला अशा अनेक लोकांबद्दल पत्र लिहून माहिती दिली आहे जे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. असेच एक मित्र आहेत- उत्तरप्रदेश मधील बांदा जिल्ह्यातील तुलसीराम यादव. तुलसीराम यादव हे लुकतरा ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. बांदा आणि बुंदेलखंड भागात पाण्याची किती मोठी समस्या आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी तुलसीराम यांनी गावातील लोकांच्या मदतीने या भागात 40 हून अधिक तलाव तयार केले आहेत. शेतातील पाणी शेतात, गावातील पाणी गावात हा तुलसीराम यांच्या मोहिमेचा मूलमंत्र आहे. आज त्यांच्या परिश्रमामुळेच त्यांच्या गावातील भू-जल पातळी वाढली आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यातील लोकांनी एकत्र येऊन लुप्त झालेल्या एका नदीला पुरुज्जीवित केले आहे. फार वर्षांपूर्वी येथे नीम नावाची नदी वाहत होती. कालांतराने ही नदी लुप्त झाली, परंतु स्थानिक लोकांच्या आठवणींमध्ये आणि लोककथांमध्ये या नदीचा नेहमीच उल्लेख केला जायचा. अखेरीस, लोकांनी त्यांचा हा नैसर्गिक वारसा पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला. लोकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आता 'नीम नदी' पुन्हा जिवंत होऊ लागली आहे. नदीचे उगमस्थान देखील अमृत सरोवर म्हणून विकसित केले जात आहे.

 

मित्रांनो, या नद्या, कालवे, तलाव हे केवळ जलस्रोत नाहीत, तर त्यांच्याशी जीवनाचे रंग आणि भावनाही जोडलेल्या आहेत. असेच एक दृश्य काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात पाहायला मिळाले. हा भाग बहुतांश दुष्काळग्रस्त भाग आहे. पाच दशकांच्या प्रतिक्षेनंतर येथे निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण होत आहे. काही दिवसांपूर्वी चाचणी दरम्यान कालव्यात पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळची जी छायाचित्रे समोर आली ती खरच खूप भावूक करणारी होती. गावातील लोकं होळी-दिवाळी असल्यासारखी नाचत होती.

 

मित्रांनो, व्यवस्थापनाविषयी चर्चा होत असताना आज मला छत्रपती शिवाजी महाराजांचेही स्मरण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याबरोबरच त्यांची शासनपद्धती आणि व्यवस्थापन कौशल्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांनी जलव्यवस्थापन आणि नौदलाबाबत जे कार्य केले आहे, ते आजही भारतीय इतिहासाचा गौरव वृद्धिंगत करत आहेत. त्यांनी बांधलेले जलदुर्ग इतक्या शतकांनंतरही समुद्राच्या मध्यभागी अभिमानाने उभे आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा क्षण मोठ्या उत्सवाप्रमाणे साजरा केला जात आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर त्यासंबंधी भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मला आठवते, खूप वर्षांपूर्वी, 2014 मध्ये रायगडावर जाऊन त्या पवित्र भूमीला नमन करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले होते. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य जाणून घेणे, त्यांच्याकडून शिकणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. यामुळे आपल्यामध्ये आपल्या वारशाबद्दल अभिमानाची भावना निर्माण होईल आणि यातूनच भविष्यामध्ये आपली कर्तव्ये पार पाडण्याची प्रेरणाही मिळेल.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही रामायणातील त्या छोट्याश्या खारी बद्दल नक्कीच ऐकले असेल जिने रामसेतू बांधण्यात मदत करण्यासाठी हिरीरीने सहभाग घेतला होता. सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की, जेव्हा हेतू स्वच्छ असतो, प्रयत्नांमध्ये प्रामाणिकपणा असतो तेव्हा कोणतेच ध्येय हे कठीण नसते. आज भारत देखील याच उद्दात हेतूने एका मोठ्या आव्हानाचा सामना करत आहे. हे आव्हान आहे- टी.बी. चे, ज्याला क्षयरोग देखील म्हंटले जाते. भारताला 2025 पर्यंत क्षयमुक्त भारत बनविण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे, लक्ष्य खूप मोठे आहे. एक काळ असा होता जेव्हा एखाद्याला टी.बी. झाला आहे हे माहित झाल्यानंतर कुटुंबातील लोकच त्या व्यक्तीपासून लांब व्हायचे, परंतु आज काळ बदलला आहे, आता टी.बी. च्या रुग्णाला कुटुंबातीलच एक सदस्य समजून त्याची मदत केली जाते. क्षयरोगाचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी निक्षय मित्रांनी पुढाकार घेतला आहे. देशात मोठ्या प्रमाणात विविध सामाजिक संस्था निक्षय मित्र बनल्या आहेत. खेड्या-पाड्यांमध्ये, पंचायती मध्ये हजारो लोकांनी स्वतः पुढे येऊन टी.बी. रुग्णांना दत्तक घेतले आहे. टीबी रुग्णांच्या मदतीसाठी अनेक मुले पुढ आली आहेत. लोकसहभाग हे या अभियानाचे सर्वात मोठे बलस्थान आहे. या सहभागामुळेच आज देशात 10 लाखांहून अधिक टीबी रुग्णांना दत्तक घेण्यात आले असून सुमारे 85 हजार निक्षय मित्रांनी हे पुण्याचे काम केले आहे. मला आनंद आहे की देशातील अनेक सरपंचांनी, अगदी गावप्रमुखांनीही गावातून टी.बी. चे समूळ उच्चाटन करण्याचा विडा उचलला आहे. 

नैनितालमधील एका गावातील निक्षय मित्र श्री. दिकार सिंग मेवाडी यांनी सहा टीबी रुग्णांना दत्तक घेतले आहे. त्याचप्रमाणे किन्नौरच्या ग्रामपंचायतीचे प्रमुख निक्षय मित्र श्री ग्यान सिंह यांनाही त्यांच्या भागातील टीबी रुग्णांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देत आहेत. भारताला टी.बी मुक्त करण्याच्या मोहिमेत आमची मुले आणि तरुण मित्रही उत्साहाने सहभागी होत आहेत. हिमाचल प्रदेशातील उना येथील 7 वर्षांच्या नलिनी सिंग हिने कौतुकास्पद काम केले आहे, नलिनीने तिच्या खाऊच्या पैशातून टी.बी. रुग्णांना मदत केली आहे. लहान मुलांना पैसे साठवायला (पिग्गी बँक) किती आवडते हे तुम्हाला माहीतच आहे, पण मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील 13 वर्षाची मीनाक्षी आणि पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर येथील 11 वर्षाचा बश्वर मुखर्जी ही दोन्ही मुलं वेगळी आहेत. या दोन्ही मुलांनी त्यांचे साठवलेले पैसे टी.बी. मुक्त भारताच्या मोहिमेसाठी दिले. ही सर्व उदाहरणे खूपच भावूक तसेच प्रेरणादायी आहेत. इतक्या लहान वयात एवढा मोठा विचार करणाऱ्या या सर्व मुलांचे मी मनापासून कौतुक करतो.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, नवीन कल्पनांचे स्वागत करण्यास सदैव तत्पर असणे हा आम्हा भारतीयांचा स्वभाव आहे. आपण आपल्या गोष्टींवर प्रेम करतो आणि नवीन गोष्टी आत्मसात देखील करतो. याचेच उदाहरण म्हणजे - जपानचे तंत्रज्ञान मियावाकी, जर एखाद्या ठिकाणची जमीन नापीक झाली असेल, तर मियावाकी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्या भागाला पुन्हा हिरवेगार बनवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. मियावाकी जंगले वेगाने पसरतात आणि दोन ते तीन दशकात जैवविविधतेचे केंद्र बनतात. आता भारताच्या विविध भागात देखील याचा प्रसार वेगाने होत आहे. केरळमधील शिक्षक श्री राफी रामनाथ यांनी या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने येथील एका क्षेत्राचा कायापालट केला आहे. वास्तविक, रामनाथजी यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना निसर्ग आणि पर्यावरणाविषयी सखोलपणे समजावून सांगायचे होते. त्यासाठी त्यांनी वनौषधीची बागच फुलवली. त्यांची बाग आता जैवविविधता क्षेत्र बनले आहे. त्यांच्या या यशाने त्यांना आणखी प्रेरणा दिली. यानंतर रफीजींनी मियावाकीच्या तंत्रज्ञानाने एक छोटे जंगल बनवले आणि त्याला 'विद्यावनम' असे नाव दिले.आता एवढे सुंदर नाव फक्त एक शिक्षकच ठेवू शकतो - 'विद्यावनम'. रामनाथजींच्या या 'विद्यावनम'मध्ये छोट्या जागेत 115 जातींची 450 हून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. त्यांचे विद्यार्थीही त्यांना या झाडांच्या देखभालीसाठी मदत करतात. हे सुंदर ठिकाण पाहण्यासाठी आजूबाजूची शाळकरी मुले, सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी होते.मियावाकी जंगल कुठेही, अगदी शहरांमध्येही सहज उगवता येते. काही दिवसांपूर्वी मी गुजरातमधील केवडिया, एकता नगर येथे मियावाकी जंगलाचे उद्घाटन केले होते. कच्छमध्येही 2001 च्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ मियावाकी शैलीत स्मारक वन तयार केले आहे.

कच्छसारख्या ठिकाणी या तंत्रज्ञानाचे यश हेच दर्शवते की हे तंत्रज्ञान अत्यंत कठीण नैसर्गिक वातावरणातही किती प्रभावी आहे. याचप्रमाणे अंबाजी व पावागड येथेही मियावाकी पद्धतीने रोपे लावण्यात आली आहेत. लखनऊच्या अलीगंजमध्ये देखील एक मियावाकी उद्यान तयार होत असल्याची माहिती मला मिळाली आहे.मागील चार वर्षांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात अशा 60 हून अधिक जंगलांवर काम करण्यात आले आहे. आतातर या तंत्रज्ञानाला जगभरातून पसंती मिळाली आहे. सिंगापूर, पॅरिस, ऑस्ट्रेलिया, मलेशिया अशा अनेक देशांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मी देशवासीयांना, विशेषत: शहरांमध्ये राहणाऱ्यांना नागरिकांना मियावाकीच्या पद्धतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची विनंती करतो. याद्वारे तुम्ही तुमची पृथ्वी आणि निसर्गाला हिरवेगार आणि स्वच्छ करण्यात अमूल्य योगदान देऊ शकता.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, आजकाल आपल्या देशात जम्मू-काश्मीर बद्दल बरीच चर्चा होऊ लागली आहे. कधी वाढत्या पर्यटनाबाबत तर कधी जी-20 च्या भव्य आयोजनाबाबत.  काश्मीरमधील नादरुदेशाबाहेर देखील कशा प्रकारे पसंती मिळू लागली आहे याबाबत मी मन की बातच्या मागच्या एका भागात तुम्हांला माहिती दिली होती.आत जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील लोकांनी एक आश्चर्यकारक गोष्ट करून दाखवली आहे. बारामुल्ला भागात बऱ्याच काळापासून शेती-भाती केली जात होती. मात्र या भागात दुधाची टंचाई जाणवत असे. बारामुल्लाच्या जनतेने हे आव्हान एक संधी म्हणून स्वीकारले. तेथील बऱ्याच लोकांनी दुग्धव्यवसाय सुरु केला. या कामासाठी तेथील महिलांनी पुढाकार घेतला, त्यातल्याच एक भगिनी आहे-इशरत नबी. इशरत एक पदवीधारक महिला आहेत आणि त्यांनी मीर सिस्टर्स डेरी फार्मया नावाने व्यवसाय सुरु केला आहे.त्यांच्या या डेरीफार्ममध्ये दररोज सुमारे दीडशे लिटर दुधाची विक्री होत आहे.असेच आपले सोपोर येथील सहकारी आहेत-वसिम इनायत.वसीम यांच्याकडे दोन डझन जनावरे आहेत आणि ते दररोज दोनशे लिटर दूध विकतात.आबिद हुसेन नावाचे युवा सहकारी देखील डेरीचा व्यवसाय आकारात आहेत.त्यांचे कामही अगदी जोरात सुरु आहे. अशा लोकांच्या कष्टांमुळे आज बारामुल्ला भागात रोज साडेपाच लाख लिटर दुधाचे उत्पादन होऊ लागले आहे. संपूर्ण बारामुल्ला परिसर एका नव्या श्वेतक्रांतीची ओळख बनला आहे. गेल्या अडीच-तीन वर्षांच्या काळात तेथे 500 हून अधिक दुग्धविकास एकके सुरु झाली आहेत. आपल्या देशातील प्रत्येक भाग किती शक्यतांनी भरलेला आहे याची साक्ष बारामुल्ला येथील दुग्धव्यवसाय क्षेत्र देत आहे. कोणत्याही प्रदेशातील जनतेची सामुहिक इच्छाशक्ती कोणतेही उद्दिष्ट्य साध्य करून दाखवू शकते.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, याच महिन्यात क्रीडा विश्वातून भारतासाठी अनेक मोठमोठ्या शुभवार्ता आल्या आहेत. भारतीय संघाने प्रथमच महिलांच्या कनिष्ठ आशिया चषकावर आपले नाव कोरून तिरंग्याचा मान वाढवला आहे. याच महिन्यात आपल्या पुरुष हॉकी संघाने देखील कनिष्ठ आशिया चषक जिंकला आहे. या यशामुळे भारतीय संघ या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात अधिक विजय नोंदवणारा संघ झाला आहे. नेमबाजीतील कनिष्ठ वर्गाच्या विश्वचषक स्पर्धेत देखील आपल्या कनिष्ठ वयोगटातील संघाने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत खेळाडूंसाठी एकूण जितकी सुवर्णपदके उपलब्ध होती त्यातील 20% सुवर्णपदके एकट्या भारताच्या खाती जमा झाली आहेत. याच जून महिन्यात 20 वर्षांखालील खेळाडूंसाठी आशियायी अथलेटिक्स विजेतेपद स्पर्धा देखील झाली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 45 देशांच्या यादीत भारताने पदक तालिकेत सर्वोच्च तीन क्रमांकामध्ये स्थान मिळवले.

 

मित्रांनो, एकेकाळी आपल्याला आंतरराष्ट्रीयमध्ये स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनाबाबत माहिती तर मिळत असे पण त्या स्पर्धेत भारताचे कुठेच नामोनिशाण नसे. आज मात्र,मी केवळ गेल्या काही आठवड्यांतील कामगिरीचा उल्लेख केला तर ती यादी कितीतरी मोठी झाली.हीच आपल्या युवकांची खरी ताकद आहे. असे कितीतरी क्रीडाप्रकार आणि क्रीडास्पर्धा आहेत ज्यांच्यामध्ये आज भारत पहिल्यांदाच उपस्थिती नोंदवत आहे. उदा. लांब उडी स्पर्धेत श्रीशंकर मुरली याने पॅरिस डायमंड लीग सारख्या मानाच्या स्पर्धेत देशाला कांस्यपदक मिळवून दिले. यास्पर्धेत भारताने मिळवलेले हे पहिले पदक आहे. किर्गीझीस्तान मध्ये देखील आपल्या सतरा वर्षांखालील महिला मुष्टियुध्द संघाने असेच चमकदार यश मिळवले आहे. देशातील या सर्व खेळाडूंचे, त्यांच्या पालकांचे तसेच प्रशिक्षकांचे  त्यांच्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन करतो.

 

मित्रांनो, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाला मिळालेल्या या यशाच्या पाठीमागे आपल्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर केलेली कठोर मेहनत असते.देशभरातील विविध राज्यांमध्ये आज एका नव्या उत्साहाने खेळांचे आयोजन होत असते. त्यामुळे खेळाडूंना खेळ खेळण्यातून, जिंकण्या-हारण्यातून  शिकण्याची संधी मिळते. जसे की, नुकतेच उत्तर प्रदेशात खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये तरुण खेळाडूंचा उत्साह आणि जोम बघायला मिळाला. या स्पर्धेत आपल्या युवा खेळाडूंनी अकरा विक्रम मोडले आहेत. या स्पर्धेत, पंजाब विद्यापीठ अमृतसर येथील गुरु नानक देव विद्यापीठ आणि कर्नाटकचे जैन विद्यापीठ यांनी पदक तालिकेत पहिले तीन क्रमांक पटकावले.

 

मित्रांनो, अशा स्पर्धांचा सर्वात मोठा पैलू हा देखील असतो की या स्पर्धांमधून खेळाडूंच्या कित्येक प्रेरणादायक कथा आपल्यासमोर येतात.खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडास्पर्धांमध्ये रोइंग क्रीडा प्रकारात सहभागी झालेला आसामच्या कॉटन विद्यापीठाचा अन्यतम कुमार हा या स्पर्धेत भाग घेणारा पहिला दिव्यांग विद्यार्थी ठरला. गुडघ्याला गंभीर जखम झालेली असताना देखील बर्कतुल्ला विद्यापीठाची निधी पवैया ही क्रीडापटू सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरली. पुण्याच्या सावित्राबाई फुले विद्यापीठातील शुभम भंडारे याला घोट्याच्या दुखापतीमुळे गेल्या वर्षी बेंगळूरु येथील स्पर्धेत निराश व्हावे लागले होते मात्र यावर्षी तो स्टीपलचेस मध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. बरद्वान विद्यापीठाची विद्यार्थिनी सरस्वती कुंडू त्यांच्या कबड्डी संघाची कप्तान आहे. अनेक अडचणींवर मात करत ती इथवर पोहोचली आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना टॉप्स योजनेतून मोठी मदत मिळत आहे. आपले खेळाडू जितके अधिक खेळ खेळतील तितकेच अधिक त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलून येईल.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, 21 जून देखील जवळ येतो आहे. यावेळेस देखील जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक आंतरराष्ट्रीय योग दिवसाची उत्सुकतेने वाट पहात आहेत. या वर्षीच्या योग दिवसाची संकल्पना आहे – ‘वसुधैव कुटुंबकमसाठी योगम्हणजेच एक विश्व-एक कुटुंबया कल्पनेसह सर्वांच्या कल्याणासाठी योग.सर्वांना जोडून ठेवणाऱ्या आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणाऱ्या योगाच्या भावनेला ही संकल्पना व्यक्त करते. दर वर्षीप्रमाणेच या वर्षी देखील देशभरात ठिकठिकाणी योगाशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतील.

 

मित्रांनो, यावेळेस मला संयुक्त राष्ट्रांच्या न्युयॉर्क येथील मुख्यालयात योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. मला दिसतंय की समाज माध्यमांवर देखील योग दिनाच्या संदर्भात भरपूर उत्साह दिसून येतो आहे.

           

मित्रांनो, तुम्हां सर्वांना माझी आग्रहपूर्वक विनंती आहे की तुम्ही तुमच्या जीवनात योगाचा स्वीकार करा, दिनचर्येत योगाचा समावेश करा. अजूनही तुम्ही योगसाधनेशी जोडले गेले नसाल तर आगामी 21 जून ही या संकल्पासाठी उत्तम संधी आहे. योग करण्यासाठी तसेही फारशा साधन सामुग्रीची गरज नसते. तुम्ही जेव्हा योग करणे सुरु कराल तेव्हा तुमच्या जीवनात किती मोठे परिवर्तन येईल ते तुम्ही बघालच.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, परवा म्हणजे 20 जून रोजी ऐतिहासिक रथयात्रा सुरु होते आहे. रथयात्रेला संपूर्ण जगात एक विशिष्ट ओळख मिळालेली आहे. देशाच्या विविध राज्यांमध्ये मोठ्या धुमधडाक्यात भगवान जगन्नाथांची रथयात्रा निघते. ओदिशा राज्यातील पुरी येथे होणारी रथयात्रा तर अत्यंत अद्भुत असते. मी जेव्हा गुजरातेत होतो तेव्हा मला अहमदाबाद येथे निघणाऱ्या विशाल रथयात्रेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत असे. या देशभरातील रथयात्रांमध्ये ज्या प्रकारे सर्व समाजांचे, सर्व वर्गातील लोक सहभागी होतात ती अत्यंत अनुकरणीय पद्धत आहे. ही रथयात्रा लोकांच्या श्रद्धेसह एक भारत-श्रेष्ठ भारतकल्पनेचे देखील प्रतिबिंब असते. या अत्यंत पवित्र प्रसंगी माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.भगवान जगन्नाथ सर्व देशवासियांना उत्तम आरोग्य आणि सुख-समुद्धीचा आशीर्वाद देवो हीच सदिच्छा मी व्यक्त करतो.

           

मित्रांनो, भारतीय परंपरा आणि संस्कृतीशी जोडलेल्या उत्सवांची चर्चा करताना मी, देशातील राजभवनांमध्येआयोजित करण्यात आलेल्या रोचक कार्यक्रमांचा देखील आवर्जून उल्लेख करू इच्छितो. आता आपल्या देशात, राजभवनांची ओळख सामाजिक आणि विकास कार्यांशी संबंधित संस्था अशी होऊ लागली आहे. आज आपले राजभवन क्षयरोग मुक्त भारत अभियान, नैसर्गिक शेतीशी संबंधित अभियान यांचे ध्वजवाहक होऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये गुजरात असो, गोवा असो, तेलंगणा किंवा महाराष्ट्र असो, अथवा सिक्कीम असो, या सर्व राज्यांचे स्थापना दिन,विविध  राजभवनांनी ज्याउत्साहाने साजरे केले ते खरोखरीच अनुकरणीय होते.एक भारत-श्रेष्ठ भारतया भावनेला अधिक सशक्त बनवणारा हा एक उत्कृष्ट उपक्रम आहे.

    

मित्रांनो, भारत लोकशाहीची जननी आहे, लोकशाहीची माता आहे. आपण आपल्या प्रजासत्ताक आदर्शांना सर्वोच्च स्थान देतो, आपल्या संविधानाला सर्वोत्तम मानतो आणि म्हणूनच आपण 25 जून हा दिवस विसरू शकत नाही.याच दिवशी आपल्या देशावर आणीबाणी लागू करण्यात आली होती.भारताच्या इतिहासातील हा एक काळा कालखंड होता. लाखो लोकांनी संपूर्ण शक्तीनिशी आणीबाणीचा विरोध केला. लोकशाहीच्या समर्थकांवर त्या काळात इतके अत्याचार करण्यात आले, त्यांचा इतका छळ करण्यात आला की ते आठवून आजही मनाचा थरकाप होतो. या काळातील अत्याचारांवर आणि पोलीस तसेच प्रशासनाने दिलेल्या शिक्षांवर आधारित अनेक पुस्तके लिहिली गेली. मला देखील त्यावेळी संघर्षमय गुजरातनामक पुस्तक लिहिण्याची संधी मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच, आणीबाणीच्या विषयावर लिहिलेले आणखी एक पुस्तक माझ्या वाचनात आले त्याचे नाव आहे – TORCHER OF POLITICAL PRISONER IN INDIA. आणीबाणीच्या काळात छापण्यात आलेल्या या पुस्तकात, तत्कालीन सरकार, लोकशाहीच्या रक्षकांना किती क्रूरपणे वागवत होते याचे वर्णन करण्यात आले आहे. या पुस्तकात अनेक घटनांचे अभ्यासपूर्ण विवेचन आहे, अनेक छायाचित्रे आहेत. माझी अशी इच्छा आहे की आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, अशा वेळी देशाच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अशा गुन्ह्यांची देखील नक्की माहिती करुन घ्या. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला लोकशाहीचा अर्थ आणि त्याचे महत्त्व समजून घेणे अधिक सोपे होईल.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,  ‘मन की बातहा कार्यक्रम म्हणजे रंगबिरंगी मोत्यांची बनलेली एक माळ आहे आणि त्यातला प्रत्येक मोती स्वतःच अद्वितीय आणि मौल्यवान आहे. या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग खूप सजीव असतो. हा कार्यक्रम आपणा सर्वांमध्ये सामूहिकतेच्या भावनेसह समाजाप्रती कर्तव्यभावना आणि सेवा भाव भरतो. येथे अशा विषयांवरचर्चा होते ज्यांच्याबद्दल आपल्याला सामान्यतःफार कमी वाचायला ऐकायला मिळते. मन की बातमध्ये एखाद्या विषयाचाउल्लेख झाल्यानंतर अनेक देशवासियांना त्यातून कशा प्रकारे प्रेरणा मिळते हे आपल्याला नेहमीच दिसून येते. नुकतेच मला देशातील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आनंदा शंकर जयंत यांचे एक पत्र मिळाले. या पत्रात त्यांनी मन की बातच्या ज्या भागात  गोष्टी सांगण्याच्याकलेबाबत चर्चा केली होती त्या भागाबद्दल लिहिले होते. मन की बातच्या त्या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन आनंदा शंकर जयंत यांनी कुट्टी कहानीतयार केली आहे. विविध भाषांतील गोष्टींचा लहान मुलांसाठी केलेला हा उत्तम संग्रह आहे. या उपक्रमामुळे आपल्या मुलांना आपली संस्कृतीची असलेली ओढ अधिक गहिरी होते आणि म्हणूनच हा उपक्रम खूप चांगला आहे. त्यांनी या गोष्टींचे काही रोचक व्हिडिओ त्यांच्या यु-ट्यूब वाहिनीवर देखील अपलोड केले आहेत. मी आनंदा शंकर जयंत यांच्या या उपक्रमाची खासकरून चर्चा यासाठी केली कारण की ते पाहून मला असे वाटले की काही देशवासीयांचे चांगले कार्य इतरांना देखील प्रेरित करत आहे. यातून शिकवण घेऊन ते देखील आपल्या अंगच्या गुणांतून देश आणि समाजासाठी काही चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.  आपल्या सर्व भारतवासीयांची हीच सामुहिक शक्तीदेशाच्या प्रगतीमध्ये नवी उर्जा भरत आहे.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, या वेळच्या मन की बातमध्ये माझ्यासोबत इतकेच. पुढच्या वेळी, नव्या विषयांसह तुमच्याशी पुन्हा संवाद होईल. पावसाचे दिवस आहेत म्हणून स्वतःच्या तब्येतीची नीट काळजी घ्या. समतोल आहार घ्या आणि निरोगी राहा. आणि हो, योगसाधना नक्की करा. आता अनेक शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील संपत आल्या असतील.  मी मुलांना देखील सांगेन की गृहपाठ शेवटच्या दिवसापर्यंत शिल्लक ठेवू नका. ते काम संपवून टाका आणि निश्चिंत व्हा. खूप खूप धन्यवाद.         

***

S.Thakur/AIR/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1933217) Visitor Counter : 268