युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

क्रीडा मंत्रालयाने खेळाडू आणि संघ अधिका-यांसाठी भोजन आणि निवास  व्यवस्थेची कमाल मर्यादा 66% ने वाढवली

Posted On: 16 JUN 2023 3:43PM by PIB Mumbai

 

भारतीय क्रीडापटू आणि संघ अधिकाऱ्यायांना भोजन आणि निवासासाठी (बोर्डिंग आणि लॉजिंग) दिल्या जाणाऱ्या रकमेची कमाल मर्यादा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 66% ने वाढवली आहे.

मंत्रालयाच्या राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (एनएसएफ) साहाय्य योजनेअंतर्गत ही तरतूद केवळ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणार्‍या खेळाडूंसाठी आणि अधिकार्‍यांसाठी आहे.  नवीन सुधारित नियमांनुसार, परदेशात मान्यताप्राप्त स्पर्धांसाठी प्रवास करणारे खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना आता प्रतिदिन 250 अमेरिकन डॉलर मिळतील. याआधी ही तरतूद प्रतिदिन 150 अमेरिकन डॉलर मिळायचे.

राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या विनंत्या विचारात घेऊन ही सुधारणा करण्यात आली आहे. स्पर्धांच्या स्थानिक आयोजन समितीने (LOC) निश्चित केलेले बोर्डिंग आणि लॉजिंगचे दर सध्याच्या 150 अमेरिकन डॉलर प्रतिदिन या कमाल मर्यादेपेक्षा जास्त आहेत, हे या महासंघांनी विनंती अर्जात नमूद केले होते.  बोर्डिंग आणि लॉजिंगचे हे निकष नोव्हेंबर 2015 मध्ये निश्चित करण्यात आले होते आणि त्यात सुधारणा होऊन आठ वर्षे झाली आहेत.

या नव्या निर्णयामुळे विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये  देशाचे प्रतिनिधित्व करताना राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या खेळाडूंची वाजवी दरात उत्तम राहण्याची व्यवस्था होऊ शकेल.

अलीकडील कल असा दिसतो की आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या स्थानिक आयोजन समित्या सहभागी संघांना पूर्वीप्रमाणे फक्त बोर्डिंग आणि लॉजिंगची व्यवस्था करण्याऐवजी संपूर्ण आदरातिथ्य पॅकेज देत आहेत. या पॅकेजमध्ये भोजन, निवास, स्थानिक वाहतूक खर्च आणि काही प्रसंगी प्रवेश शुल्क देखील समाविष्ट आहे. पॅकेजची एकूण किंमत प्रति व्यक्ती प्रतिदिन 150 अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आहे. या विचारांमुळे 2015 मध्ये निश्चित केलेल्या बोर्डिंग आणि लॉजिंग नियमांचे पुनरावलोकन करणे आवश्यक ठरले होते.

***

S.Kakade/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1932913)