जलशक्ती मंत्रालय
उपराष्ट्रपतींच्या हस्ते 17 जून 2023 रोजी चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे होणार वितरण
जलशक्ती मंत्रालयाने 11 श्रेणींमध्ये 41 विजेत्यांची केली घोषणा
Posted On:
15 JUN 2023 11:40AM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती जगदीप धनखर 17 जून 2023 रोजी चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण करतील. नवी दिल्लीतील विज्ञान भवनामधील प्लेनरी सभागृहात हा सोहळा होणार आहे. जल शक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाने सोहळ्याचे आयोजन केले आहे. विभागाने चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांसाठी एकूण 41 विजेत्यांची घोषणा केली आहे. यात 2022 साठीच्या संयुक्त विजेत्यांचाही समावेश आहे. 11 श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रत्येक पुरस्कार विजेत्याला प्रशस्तीपत्र, चषक तसेच काही श्रेणींमध्ये रोख पारितोषिके दिली जातील.
सर्वोत्कृष्ट राज्याचा पहिला पुरस्कार मध्य प्रदेशला दिला जाईल; ओडिशाच्या गंजम जिल्ह्याला सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा पुरस्कार देण्यात येईल; तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील जगन्नाधापुरम ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार दिला जाईल; सर्वोत्कृष्ट नागरी स्थानिक संस्थेचा पुरस्कार चंदीगडच्या चंदीगड महानगरपालिकेला प्रदान करण्यात येईल.
चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार, 2022 साठीच्या पुरस्कार विजेत्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली जलशक्ती मंत्रालयाने जल व्यवस्थापन आणि जलसंधारणाबाबत राष्ट्रीय स्तरावर जनजागृती करण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे. देशातील जलस्रोत व्यवस्थापनासाठी सर्वांगीण दृष्टीकोन स्वीकारणे, विविध घटकांना प्रोत्साहन देणे आदी उद्देशाने, एकात्मिक राष्ट्रीय जल पुरस्काराची स्थापना करणे आवश्यक ठरले. त्यानुसार, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाद्वारे 2018 मध्ये राष्ट्रीय जल पुरस्कार सुरू करण्यात आले. दुसरे आणि तिसरे राष्ट्रीय जल पुरस्कार 2019 आणि 2020 या वर्षांसाठी देण्यात आले. कोविड महामारीमुळे 2021 मध्ये हे पुरस्कार देण्यात आले नाहीत.
गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर वर्ष 2022 मध्ये, 30 जुलै 2022 रोजी चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची माहिती देण्यात आली. 31 ऑक्टोबर 2022 च्या शेवटच्या तारखेपर्यंत एकूण 868 अर्ज प्राप्त झाले होते. त्यानंतर अर्जांची छाननी आणि पडताळणी करण्यात आली. केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय भूजल मंडळाद्वारे छाननी केलेल्या अर्जांची सत्यता तपासण्यात आली, त्यानंतर सर्व 11 श्रेणींमध्ये संयुक्त विजेत्यांसह 41 विजेत्यांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली.
***
Sonal T/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1932548)
Visitor Counter : 329