ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

गव्हाच्या किमती कमी झाल्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिवांनी घेतली राज्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक


घाऊक विक्रेते /व्यापारी, किरकोळ विक्रेते, मोठे साखळी असलेले किरकोळ विक्रेते आणि प्रक्रिया उद्योजक आता पारदर्शकता आणि चांगल्या देखरेखीसाठी साठा मर्यादा आदेशाअंतर्गत गव्हाचा साठा उघड करतील

सर्व संबंधित हितधारकांनी पोर्टलवर गव्हाच्या साठ्याची स्थिती नियमितपणे घोषित आणि अद्ययावत करावी

Posted On: 13 JUN 2023 6:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2023

गव्हाच्या किमती आटोक्यात राहाव्यात  आणि बाजारात त्याची  सहज उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव  संजीव चोप्रा यांनी आज राज्यांच्या अन्न सचिवांची  दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक  घेतली. या बैठकीदरम्यान, 12.06.2023 रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या  गहू साठा मर्यादा आदेश आणि त्याची पूर्तता यावर तपशीलवार चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारने  घाऊक विक्रेते /व्यापारी, किरकोळ विक्रेते, मोठी साखळी असलेले  किरकोळ विक्रेते आणि प्रक्रिया उद्योजक  यांना लागू असलेली गहू  साठा मर्यादा जारी केल्याच्या एक दिवसानंतर ही बैठक झाली. खुल्या बाजारात  विक्री योजनेअंतर्गत  (देशांतर्गत )  गहू आणि तांदूळ आणण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. किमती आटोक्यात ठेवणे  आणि साठेबाजीला आळा घालणे हा या या उपायांचा उद्देश आहे .

कुठल्याही प्रकारच्या गैरप्रकारांना  आळा घालण्यासाठी आणि गव्हाच्या उपलब्धतेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने  राज्यांना घाऊक विक्रेते /व्यापारी, किरकोळ विक्रेते, मोठी साखळी असलेले  किरकोळ विक्रेते आणि प्रक्रिया उद्योजक  यांच्याकडून गव्हाच्या साठ्याची माहिती  घेण्यास सांगितले आहे.   माहिती भरणे सुलभ व्हावे यासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या पोर्टलवर  (https://evegoils.nic.in/wsp/loginमाहिती सादर  करण्यासंबंधी एक वापरकर्ता नियमावली (युजर मॅन्युअल) राज्य सरकारसोबत सामायिक केली गेली आहे. संबंधितांकडे  असलेला साठा विहित मर्यादेपेक्षा अधिक  असेल तर त्यांनी ही अधिसूचना जारी झाल्यापासून 30 दिवसांच्या आत साठा विहित मर्यादेपर्यंत आणणे आवश्यक आहे.

साठा मर्यादेच्या अधीन असलेल्या सर्व संबंधित संस्थांनी नियमितपणे दर शुक्रवारी या पोर्टलवर गव्हाच्या साठ्याची स्थिती जाहीर  आणि अद्ययावत करतील हे सुनिश्चित करण्याचे  आणि 12.06.2023 च्या केंद्रीय आदेशानुसार साठा  मर्यादेचे काटेकोर पालन करण्यासंबंधीच्या  सूचना त्वरित जारी केल्या जाव्यात, यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना  निर्देश देण्यात आले आहेत.  उपरोक्त पोर्टलवर वरील संस्थांना साठ्याबाबत माहिती  देता येईल. तसेच पोर्टलवर जाहीर  केलेली माहिती  राज्य सरकारी प्राधिकरणांना तपासता येईल.

गहू (पहिल्या टप्प्यात 15 लाख मेट्रिक टन गहू) आणि  खुल्या बाजारात  विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत ) तांदूळ आणण्याच्या केंद्र   सरकारच्या निर्णयाची माहितीदेखील या बैठकीत देण्यात आली.  या निर्णयामुळे  गहू आणि तांदळासह त्यापासून निर्माण होणाऱ्या उत्पादनांच्या  वाढत्या किंमती आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे. गहू आणि तांदूळ यासारखी धान्ये ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध व्हावीत, हे सुनिश्चित करण्यासाठी ही पावले उचलली जात आहेत.

 

S.Patil/S.Kakade/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1932060) Visitor Counter : 118