आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

गुजरातच्या दिशेने येत असलेल्या ‘बिपरजॉय’ वादळाचा सामना करण्यासाठीच्या सज्जतेचा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी घेतला आढावा


वादळाला तोंड देण्यासाठी केंद्राच्या मदतीची दिली ग्वाही

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्यस्तरीय आणि प्रादेशिक कार्यालयांसोबत समन्वयाने वादळाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे

केंद्र सरकारची आरोग्यविषयक शीघ्र प्रतिसाद पथके मदतीसाठी पूर्णपणे सज्ज

Posted On: 13 JUN 2023 4:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2023

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी भूज येथे गुजरात राज्याचे आरोग्यमंत्री ऋषिकेश गणेशभाई पटेल यांच्यासह ‘बिपरजॉय’वादळामुळे उद्भवू शकणाऱ्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर केंद्र तसेच गुजरात राज्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला.

‘बिपरजॉय’ हे अत्यंत तीव्र चक्रीवादळ येत्या 15 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टी ओलांडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय पश्चिम किनाऱ्यावरील गुजरातसह सर्व तटवर्ती राज्यांतील प्रादेशिक कार्यालयांच्या सतत संपर्कात राहून या राज्यांना वादळाच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यासंदर्भात लागेल ती सर्व मदत करण्याच्या सूचना देत आहे. आतापर्यंत, अशा प्रकारच्या मदतीची मागणी कोणत्याही तटवर्ती राज्याने आरोग्य मंत्रालयाकडे केलेली नाही.

सहा बहु-शाखीय केंद्रीय शीघ्र प्रतिसाद आरोग्य पथके (नवी दिल्ली येथील डॉ.राममनोहर लोहिया रुग्णालय, लेडी हार्डिंग्ज वैद्यकीय महाविद्यालय, सफदरजंग रुग्णालय, एम्स रुग्णालय तसेच जोधपुर आणि नागपूर येथील एम्स रुग्णालयांतून पाचारण करण्यात आलेली पथके)आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि सेवा पुरवण्याची गरज उद्भवली तर त्यासाठी तयार ठेवण्यात आली आहेत. त्याचसोबत, वादळाने प्रभावित लोकांना मानसिक उपचार आणि तत्सम मदतीची गरज भासली तर ती पुरवण्यासाठी बेंगळूरू येथील एनआयएमएचएएनएस संस्थेतील पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वादळाचे पश्चात परिणाम म्हणून कोणत्याही साथीच्या रोगांचा प्रसार वेळेवर शोधून काढण्यासाठी  आयडीएसपी अर्थात एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांना राज्य/जिल्हा स्तरावरील सर्वेक्षम पथकांच्या माध्यमातून आपत्ती-पश्चात रोग-सर्वेक्षण मोहीम राबवण्याचे कार्य सोपवण्यात आले आहे. राज्यांना कोणत्याही प्रकारे लॉजिस्टिक्स संदर्भातील गरज भासली तर त्यासाठी एचएलएल लाईफकेअर या कंपनीला संदर्भित मालाचा पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्री वादळाच्या स्थितीवर बारकाईने सतत लक्ष ठेवून आहेत आणि कोणत्याही आरोग्यविषयक आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहेत.

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1931990) Visitor Counter : 124